अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान पुण्यातील ६५ वर्षीय धावपटू संजय कदम यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच १७ किलोमीटरचे अंतर धावण्याइतकी शारीरिक क्षमता असलेल्या व्यक्तीचे हृदय कसे बंद पडू शकते. तसेच, तातडीने सीपीआर देऊन आणि अँजिओप्लास्टीद्वारे ब्लॉक झालेली धमनी मोकळी केल्यानंतरही काही तासांत पुन्हा दुसरा झटका (Heart Attack) कसा येऊ शकतो? असा वैद्यकीय प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमागचे कारण समजून घेण्यासाठी कोरोनरी धमनीत अडथळा निर्माण झाल्यानंतर त्याचा हृदयावर काय परिणाम होते हेदेखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. संजय कदम हे अत्यंत अनुभवी आणि उत्साही धावपटू होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असूनही ते नियमितपणे धावण्याचा सराव करत होते. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी पहिल्यांदाच सहभाग घेतला होता.

२१ किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत सुमारे १७ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर संजय यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि ते अचानक कोसळले. त्याचवेळी या शर्यतीत सहभागी असलेले हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाझ मुजावर यांनी तातडीने त्यांना सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर संजय यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या मुख्य कोरोनरी धमनीत मोठा ब्लॉक असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी कोणताही विलंब न करता त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी केली. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुरुवातीला स्थिर झाली होती; पण काही तासांनंतर संजय यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

अँजिओप्लास्टीनंतरचे २४ तास का महत्त्वाचे?

बेंगळुरू येथील स्पर्श रुग्णालयातील प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. रंजन शेट्टी यांच्या मते, अँजिओप्लास्टीनंतरचे पहिले २४ तास अत्यंत नाजूक असतात. रक्तवाहिनीतील अडथळा दूर केला म्हणजे हृदय लगेच पूर्ववत झाले असा होत नाही. हार्ट अटॅकच्या झटक्यादरम्यान हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याने स्नायूंचा काही भाग आधीच कमकुवत झालेला असतो. अशा स्थितीत रक्तप्रवाह पूर्ववत सुरू झाला, तरीही हृदयातील क्रिया अस्थिर राहू शकते. त्यामुळेच हृदयाच्या ठोक्यांची गती धोकादायक पद्धतीने अनियमित होऊन पुन्हा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. याच कारणामुळे अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या अत्यंत बारीक देखरेखीखाली ठेवले जाते. डॉ. शेट्टी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हृदयविकारानंतरच्या या स्थितीमागील वैद्यकीय विज्ञानही स्पष्ट केले आहे.

हार्ट अटॅक आणि हृदय बंद पडणे यात फरक काय?

हार्ट अटॅक ही प्रामुख्याने हृदयाच्या रक्तपुरवठ्याशी संबंधित समस्या आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्यांपैकी एखाद्या रक्तवाहिनीत रक्तप्रवाह गंभीरपणे कमी होतो किंवा ती पूर्णपणे बंद होते. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंच्या काही भागाला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. तर कार्डियाक अरेस्ट (हृदय बंद पडणे) ही हृदयाच्या प्रणालीशी संबंधित समस्या आहे. त्यामध्ये हृदयाची क्रिया इतकी अस्थिर होते की- हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही. अशा वेळी व्यक्ती बेशुद्ध पडते, नाडी प्रभावीपणे जाणवत नाही आणि सीपीआर तसेच डिफिब्रिलेशनद्वारे तातडीने उपचार न मिळाल्यास काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो. हे दोन्ही प्रकार एकाच वेळीही घडू शकतात. कोरोनरी रक्तवाहिनीतील अडथळ्यामुळे हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होऊन रक्त पंप करण्याची प्रक्रिया खंडित होऊ शकते.

उच्च रक्तदाब किती धोकादायक ठरू शकतो?

उच्च रक्तदाब असणारी व्यक्ती व्यायाम किंवा धावणे करू शकत नाहीत असा याचा अर्थ नाही; उलट, नियमित व्यायाम हा हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. मात्र, दीर्घकाळ राहिलेला उच्च रक्तदाब शरीराच्या रक्तवाहिन्यांवर आतून गंभीर परिणाम करतो. सातत्याने वाढलेला रक्तदाब धमन्यांच्या भिंतींवर अतिरिक्त ताण निर्माण करतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक म्हणजेच चरबीजन्य थर जमा होण्याची शक्यता वाढते. हा कोरोनरी आर्टरी डिसीजचा एक महत्त्वाचा जोखीम मानला जातो. याशिवाय, एखाद्या व्यक्तीची धावण्याची क्षमता आणि सहनशक्ती उत्तम असली तरीही तिच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत लक्षणीय अरुंदता किंवा ब्लॉकेज असू शकते. संजय कदम यांच्या बाबतीत ते कोसळल्यानंतर डॉक्टरांना हृदयाच्या प्रमुख रक्तवाहिनीत मोठा अडथळा आढळून आल्याचे सांगितले जाते.

अँजिओप्लास्टीनंतरही हृदय पुन्हा बंद का पडू शकते?

स्टेंट किंवा अँजिओप्लास्टीच्या माध्यमातून हृदयाच्या बंद झालेल्या कोरोनरी रक्तवाहिनीत पुन्हा रक्तप्रवाह सुरळीत करता येतो. मात्र, रक्तवाहिनी मोकळी केल्याने जखमी झालेले हृदय लगेच पूर्णपणे पूर्ववत होत नाही. तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानंतर निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींमुळे रुग्णाला पुन्हा कार्डियाक अरेस्ट येण्याचा धोका का संभवतो. एका बंद रक्तवाहिनीतील ब्लॉकेज शोधून त्यावर उपचार करणे महत्त्वाचे असले, तरी हृदयाच्या इतर रक्तवाहिन्यांमध्येही अस्थिर स्वरूपाचे ब्लॉकेज असण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांना केवळ उघडलेल्या रक्तवाहिनीची स्थिती तपासणे पुरेसे नसते. हृदयाची एकूण स्थिती, त्याची रक्त पंप करण्याची क्षमता आणि हृदयाची विद्युत स्थिरता यांचेही मूल्यांकन करावे लागते. रक्ताभिसरण पुन्हा सुरू झाल्यानंतरही कार्डियाक अरेस्ट ही शरीरासाठी अत्यंत गंभीर आणि मोठी आपत्कालीन परिस्थिती असते वैद्यकीय भाषेत याला ‘रिटर्न ऑफ स्पॉन्टेनियस सर्क्युलेशन’ असे म्हटले जाते.

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी, विशेषतः वय वाढत असताना, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच हृदयविकाराशी संबंधित जोखीम घटकांची नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. व्यायामादरम्यान कोणतीही नवीन लक्षणे जाणवू लागल्यास किंवा व्यायामाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा विचार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती काही काळ तुलनेने कमी व्यायाम करत असेल आणि त्यानंतर हाफ मॅरेथॉनची तयारी सुरू करत असेल, तर तिने अचानक धावण्याचे अंतर किंवा व्यायामाची तीव्रता वाढवण्याऐवजी हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण वाढवावे. हृदयाचा झटका आल्यास वेळेवर दिलेला ‘सीपीआर’, तत्काळ वैद्यकीय मदत आणि मुख्य समस्येवर जलद उपचार हेच जीवन आणि मृत्यू यांमधील अंतर ठरवू शकतात, असेही डॉ. रंजन शेट्टी यांनी स्पष्ट केले.