सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळाचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले. दिवसभर सभागृहात या मुद्द्यावरून गदारोळ पाहायला मिळाला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते; मात्र हा निर्णय सभापती प्रा. राम शिंदे यांनी राखून ठेवला. या निर्णयावर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच हेमंत पाटील आणि विक्रम काळे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील गोंधळाचा विषय उपस्थित केला. त्यानंतर अनिल परब, भाई जगताप, सचिन आहीर, संजय खोडके, मनीषा कायंदे, प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत शुक्रवारी (ता. २०) भाजपाने अनपेक्षित विजय मिळवला. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी, तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे आणि अशोक पाटील यांचा पराभव केला. हा निकाल मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले.
निवडणुकीतील पार्श्वभूमी
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजपाला ६५ पैकी २७ जागा मिळाल्या होत्या, मात्र बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २०, शिवसेना (शिंदे गट) कडे १५, काँग्रेसला १, स्वाभीमानी शेतकरी संघटनेला १ आणि अपक्षाला १ जागा मिळाली होती. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आघाड्या आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी अज्ञातस्थळी हलवले होते. मात्र भाजपनेही जोरदार रणनीती आखत अध्यक्षपदासाठी आपला दावा कायम ठेवला.
मतदानाच्या दिवशीचा गोंधळ
मतदानाच्या दिवशी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपअधीक्षक राजीव नवले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता.
याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अनिल देसाई आणि संतोष मांडवे यांना अपहरणाच्या गुन्ह्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. हा गुन्हा मतदानाच्या आदल्या रात्री दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही सदस्यांना मतदान करता आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांशी जोरदार झटापट केली. या गोंधळात मंत्री शंभूराज देसाई जखमी झाले.
मतदानाचा निकाल आणि राजकीय समीकरणे
या घटनांमुळे राष्ट्रवादी-शिवसेनेच्या एकत्रित संख्याबळात घट झाली. तसेच काही सदस्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचेही समोर आले. परिणामी भाजपच्या उमेदवारांना प्रत्येकी ३३ मते मिळाली, तर विरोधकांना ३० मते मिळाली. तीन मतांच्या फरकाने भाजपने सातारा जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. भाजपच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि इतर नेत्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. या विजयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले.
अपहरण प्रकरणातील ट्विस्ट
या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले, जेव्हा बापू उर्फ दिनकर शिंदे यांनी पोलिसांसमोर हजर होऊन “माझे अपहरण झाले नव्हते” असा जबाब नोंदवला. त्यांच्या या खुलाशामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या तक्रारीच्या आधारे दोन सदस्यांना ताब्यात घेण्यात आले, तीच तक्रार संशयास्पद ठरल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
विधिमंडळात शिवसेना-भाजपा आमनेसामने
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत, मतदानापासून सदस्यांना वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल, असे सांगितले. त्यांनी अल्प शब्दांत प्रतिक्रिया देत विषय अधिक वाढवणे टाळले.
दरम्यान, अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत, “मंत्रीच जर पोलिसांकडून मार खात असतील, तर सामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल उपस्थित केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांना सत्तेचा त्याग करण्याचेही आव्हान दिले. याउलट मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवरच आरोप करत, जिल्हा परिषद परिसरात मोठी गर्दी कोणी जमवली याबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि पोलिस अधिकाऱ्यांवरील कारवाईचा विरोध केला.
जिल्हा परिषद निवडणुकीतील घटनाक्रम
- सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ६५ पैकी ३५ जागा मिळून बहुमत
- भाजपने २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले
- सत्ता स्थापनेसाठी ३३ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती
- अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने विरोधकांमध्ये फूट पाडत ६ सदस्य आपल्या बाजूला वळवले
- यामध्ये शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ सदस्य असल्याचे समोर आले
- एका अपक्ष सदस्याचा पाठिंबा मिळवत भाजपने आपली ताकद वाढवली
- शिवसेनेकडून आरोप करण्यात आला की, त्यांच्या आघाडीतील २ सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखले
- या सर्व घडामोडींमुळे भाजपाने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
- शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीची भाजपकडून अध्यक्षपदी निवड झाली
