Saudi Arabian desert see snowfall हवामानातील बदलामुळे वातावरणात अनेक अनैसर्गिक बदल पाहायला मिळत आहेत. जगाच्या काही भागांत भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे; तर काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. असेच काहीसे चित्र सौदी अरेबियातदेखील पाहायला मिळत आहे. सौदी अरेबियाचा विचार केल्यास डोळ्यांसमोर येते ते चारही बाजूंना पसरलेले अथांग वाळवंट. सौदी अरेबिया हा देश कडक उन्हाळा आणि अथांग पसरलेल्या वाळवंटासाठी ओळखला जातो. मात्र, सध्या तेथील चित्र पूर्णपणे बदलल्याचे पाहायला मिळत आहे.
सौदी अरेबियाच्या वाळवंटात चक्क बर्फवृष्टी झाली आहे. देशाच्या मोठ्या भागात झालेली हिमवृष्टी, मुसळधार पाऊस व तापमानात झालेली मोठी घसरण यांमुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. या हवामान बदलाच्या घटनेने पुन्हा एकदा हे अधोरेखित केले आहे की, ज्या प्रदेशांची अशा वातावरणासाठी तयारी नाही, तिथेही हवामान बदलामुळे आता अनपेक्षित बदल घडून येत आहेत. सौदी अरेबियातील चित्र काय? बर्फवृष्टीमागील नेमकी कारणे काय आहेत? हा चिंतेचा विषय का ठरत आहे? जाणून घेऊयात…
रखरखीत वाळवंटात बर्फवृष्टी
उत्तर सौदी अरेबियात झालेल्या आश्चर्यकारक हिमवृष्टीमुळे ताबुक प्रांतातील डोंगररांगांचे रूप पूर्णपणे पालटून गेले आहे. समुद्रसपाटीपासून २,६०० मीटर उंचीवर असलेल्या ‘जबेल अल-लॉझ’मधील ‘ट्रोजेना’ या पर्यटनस्थळावर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे आणि या भागात हलका पाऊसदेखील पडत आहे. हाईल शहराच्या आसपासच्या परिसरासह हाईल प्रांतातही हिमवृष्टी झाली आहे.
मध्यपूर्वेतील देशांसाठी ही एक दुर्मीळ घटना आहे. पहाटेच्या वेळी काही ठिकाणी तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यामुळे उंचावर बर्फ साचण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. या थंडीच्या लाटेबरोबरच अनेक राज्यांत पावसानेही हजेरी लावली. बीर बिन हरमास, अल-अयिना, अम्मार, अल-उला गव्हर्नरेट, शक्रा आणि त्याच्या उपनगरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे, तर रियाध, कासिम आणि पूर्व प्रांतातील काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
बर्फवृष्टीचे कारण काय?
‘नॅशनल सेंटर फॉर मेट्रोलॉजी’ (एनसीएम)च्या मते, रियाधच्या उत्तरेस असलेल्या ‘अल-मजमाह’ आणि ‘अल-घाट’मध्येही हिमवृष्टी झाली आहे. या भागात मोकळ्या मैदानात आणि उंचावर बर्फ साचला आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर मेट्रोलॉजी’चे प्रवक्ते हुसेन अल-कहतानी यांनी सांगितले, “मध्य आणि उत्तरेकडील भागात थंड हवेचा प्रवाह आल्यामुळे आणि त्याचा पावसांच्या ढगांशी संपर्क आल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, विशेषतः उत्तर आणि मध्य भागात तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीने वाहन चालवण्याचे आणि पूर येऊ शकणाऱ्या नद्या-नाल्यांपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे.
२०२४ मध्येही सौदी अरेबियात अशाच स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी, ‘यूएई’च्या राष्ट्रीय हवामान केंद्राने (एनसीएम) सांगितले होते की, अरबी समुद्रापासून ओमानपर्यंत पसरलेला कमी दाबाचा पट्टा या असामान्य घटनेस कारणीभूत आहे. या हवामान पॅटर्नमुळे आर्द्रतेने भरलेली हवा सामान्यत: वातावरणात कोरडेपणा निर्माण करते, ज्यामुळे सौदी अरेबिया आणि शेजारील संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये गडगडाटी वादळे, गारपीट आणि पाऊस पडतो.
बदलत्या हवामानाने वाढली चिंता
सौदीतील बर्फाच्छादित डोंगरांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ‘अल-मजमाह’ व ‘अल-घाट’मध्ये हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. खराब हवामानामुळे राजधानी रियाधमधील सर्व शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून ‘ऑनलाइन’ शिक्षण घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान तज्ज्ञ या घटनेला विशिष्ट वातावरणीय बदलांशी जोडत आहेत.
मात्र, अशा घटना वारंवार घडत असल्याने हवामान बदलामुळे निसर्गाचे जुने चक्र कसे बदलत आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उष्णता आणि दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशातील हिमवृष्टीने जागतिक हवामान बदलाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. युनायटेड अरब अमिरातीमधील (यूएई) अनपेक्षित पाऊस, दक्षिण आशियातील उष्णतेची लाट, मध्यपूर्वेतील कोरड्या भागात आलेला पूर आणि युरोपसह उत्तर आफ्रिकेत झालेली हिमवृष्टी या सर्व घटना दर्शवतात की, हवामानात होणारे बदल जगाला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जात आहेत. तज्ज्ञ याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत की, अशाच प्रकारे पाऊस आणि बर्फवृष्टी होत राहिली, तर सौदी अरेबियाचे कृषी क्षेत्र बदलू शकते.
पावसाचा हाहाकार
दोन दिवसांपूर्वी युनायटेड अरब अमिराती आणि इतर आखाती देशांत मुसळधार पावसाने थैमान घातले, ज्यामुळे रस्ते जलमय झाले आणि जगातील सर्वांत व्यग्र आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. त्यादरम्यान सौदी अरेबिया आणि कतारच्या काही भागांत बर्फाची चादर पसरली. यूएईमधील विमानतळ प्रशासनाने वादळामुळे डझनभर उड्डाणे रद्द केली किंवा पुढे ढकलली. दुबईच्या ‘एमिरेट्स’ एअरलाईनने शुक्रवारी १३ उड्डाणे रद्द केली. हवामान केंद्राने रियाधच्या उत्तरेकडील भागात आणखी हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
