Saudi Arabia Blood Money Abdul Rahim Kerala : केरळमधील कोझिकोड शहरातील फेरोके परिसरात राहणाऱ्या ‘माचिलाकाथू’ कुटुंबासाठी यंदाची ईद मोठ्या पुनर्मिलनाची ठरली. गेल्या दोन दशकांपासून सौदी अरेबियातील तुरुंगात मृत्युदंडाच्या छायेत दिवस काढणारा त्यांचा मुलगा अखेर गुरुवारी (२८ मे) मायदेशी परतला. अब्दुल रहीम असे या तरुणाचे नाव असून डिसेंबर २००६ पासून तो सौदी अरेबियाच्या तुरुंगात होता. त्याच्या देखरेखीखाली असलेल्या एका किशोरवयीन मुलाच्या मृत्यू प्रकरणात त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, ईदच्या दिवशीच रहीम हा मायदेशी परतल्याने त्याच्या स्वागतासाठी कोझिकोड विमानतळाबाहेर शेकडो लोकांनी गर्दी केली होती.

सौदी अरेबियातील प्रशासनाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर रहीम हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी केवळ एक जुनी आठवण म्हणून राहिला होता, तर गावातील तरुणांसाठी तो एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरला होता. रहीमला फाशीच्या शिक्षेतून वाचवण्यासाठी आणि त्याची सुटका करण्यासाठी जगभरातील मुस्लिमांनी एक अभूतपूर्व लोकवर्गणी मोहीम राबवली होती. या मोहिमेतून गोळा झालेल्या रकमेमुळेच रहीमची सौदी अरेबियाच्या तुरुंगातून सुटका झाल्याचे त्याच्या एका कुटुंबातील सदस्याने सांगितले. घरी परतल्यानंतर रहीमने आपल्याला नवजीवन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. “माझ्या सुटकेसाठी मदत करणाऱ्या जगभरातील मुस्लीम बांधवांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या पाठिंब्यामुळेच माझी सौदीच्या तुरुंगातून सुटका झाली,” असे त्याने सांगितले.

२००६ मध्ये मिळाली होती सौदीमध्ये नोकरी

सौदी अरेबियाला जाण्यापूर्वी रहीम हा केरळमध्ये ऑटोरिक्षा आणि स्कूल बस चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, सहा भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या रहीमचे अचानक नशीब उजळले. २८ नोव्हेंबर २००६ रोजी त्याला सौदीमध्ये वाहनचालक म्हणून मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आणि त्यानंतर तो रियाधला रवाना झाला. सौदीतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीमकडे त्याच्या मालकाच्या १७ वर्षांच्या मुलाची काळजी घेण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. हा मुलगा पूर्णपणे अर्धांगवायूने ग्रस्त होता आणि जगण्यासाठी श्वसन यंत्रणेवर अवलंबून होता. २४ डिसेंबर २००६ रोजी रहीम गाडी चालवत असताना तो मुलगा पाठीमागच्या सीटवर बसला होता. याचदरम्यान त्याचे श्वसन यंत्र अचानक गळून पडल्यामुळे या मुलाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.

परदेशात गेल्यानंतर अवघ्या २८ दिवसांत अटक

विशेष बाब म्हणजे, रहीम हा गाडी चालवण्यात व्यग्र असल्यामुळे पाठीमागे बसलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची कोणतीही कल्पना त्याला नव्हती. मात्र, घरी गेल्यानंतर ही बाब उजेडात आली आणि मालकाने आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी रहीमला जबाबदार धरले. इतकेच नाही तर त्याला तातडीने कामावरूनही काढून टाकले. परिणामी, त्याच्यावर बेरोजगारीचे संकट ओढावले. त्यावेळी २६ वर्षीय असलेल्या रहीमला सौदी अरेबियात पोहोचून अवघे २८ दिवस झाले होते. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर २०११ मध्ये सौदीच्या एका न्यायालयाने रहीमला दोषी ठरवत फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात त्याने तेथील उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, उच्च न्यायालयानेही रहीमला सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली, त्यामुळे केरळमधील त्याचे कुटुंब अनेक वर्षे फाशीच्या भीतीच्या सावटाखाली जगत होते. आपल्या मुलाला कधीही फाशी होऊ शकते, अशी भीती त्यांना सतावत होती.

सौदी अरेबियातून सुखरूप मायदेशी परतल्यानंतर केरळवासियांचे आभार मानताना अब्दुल रहीम (छायाचित्र सोशल मीडिया)

रहीमची फाशीची शिक्षा कशी माफ झाली?

या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर एप्रिल २०२४ मध्ये रहीमसाठी एक आशेचा किरण समोर आला. मृत मुलाच्या कुटुंबीयांनी त्याची फाशीची शिक्षा माफ करण्याची तयारी दर्शवली. परंतु, त्यासाठी त्यांनी ‘ब्लड मनी’ (नुकसान भरपाई) म्हणून रहीमकडे तब्बल ३४ कोटी रुपयांची मागणी केली, त्यामुळे एवढी मोठी रक्कम नेमकी कुठून जमा करायची असा प्रश्न रहीमच्या कुटुंबीयांसमोर होता. यादरम्यान त्याच्या काही बालपणीच्या मित्रांनी एकत्रित येत समाजमाध्यमावर एक मोहीम राबवली. या मोहिमेद्वारे रहीमला फाशीपासून वाचवण्यासाठी जगभरातील मुस्लिमांकडे आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. ३४ कोटी रुपयांची ही प्रचंड रक्कम गोळा करणे रहीमच्या कुटुंबासाठी पूर्णपणे अशक्य होते. मात्र, जगभरातील मुस्लीम बांधवांनी एकत्र येत एका मोठ्या निधीद्वारे हा चमत्कार घडवून आणला.

रहीमच्या सुटकेसाठी कुणीकुणी मदत केली?

सामान्य कामगार, परदेशात राहणारे अनिवासी भारतीय, सामाजिक संस्था आणि अनेक नामांकित व्यक्तींनी या मोहिमेत सढळ हस्ते मदत केली. यामुळे ही मोहीम केरळच्या इतिहासातील लोकसहभागातून उभी राहिलेली सर्वात मोठी निधी उभारणी मोहीम ठरली. यादरम्यान मृत मुलाच्या कुटुंबीयांनी ही नुकसान भरपाई स्वीकारल्यानंतर रहीमची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. मात्र, सौदी प्रशासनाने रहीमला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण करण्याचे आदेश दिले. या खटल्यात लागू करण्यात आलेल्या अरबी कॅलेंडरनुसार त्याची ही २० वर्षांची शिक्षा यंदा २० मे रोजी पूर्ण झाली.

रहीमच्या कुटुंबीयांनी सोसल्या अनंत यातना

रहीम हा सौदीच्या तुरुंगात असताना केरळमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. रहीमला अटक झाल्याच्या अवघ्या सहा महिन्यांनंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले होते, तर त्याची वृद्ध आईही अनेक वर्षे मुलाच्या आठवणीत अंथरुणाला खिळून होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये रहीमची फाशी माफ झाल्यानंतर ती त्याला सौदी अरेबियात भेटायला गेली होती. दरम्यानच्या काळात केवळ अधूनमधून होणारे व्हिडीओ कॉल्स हाच या कुटुंबासाठी एकमेव दिलासा होता. अखेर ईदच्या दिवशी माचिलाकाथू कुटुंबाची २० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आणि रहीम सौदी अरेबियातून सुखरूप मायदेशी परतला.