Sayali Surve माजी मिस इंडिया अर्थ सायली सुर्वेचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. तिने हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. खरंतर धर्मांतरण हा विषय तसा संवेदनशील आहे. यामध्ये ग्रामीण भागातले लोक लवकर अडकतात असं अनेकदा सांगितलं जातं, अशी काही उदाहरणंही समोर आली आहेत. मात्र सुशिक्षित लोकही अनेकदा धर्मांतराच्या जाळ्यात अडकतात. सायली सुर्वेचं प्रकरणही तसंच आहे. मिस इंडिया अर्थ, धर्मांतरण आणि घरवापसी असे टप्पे सायलीच्या आयुष्यात आले. आपण जाणून घेऊ हे प्रकरण नेमकं काय आहे.
सायली सुर्वे जन्माने मुंबईकर, मोठी झाली ती पुण्यात
सायली सुर्वे जन्माने मुंबईकर पण लहानाची मोठी झाली ती पुण्यात. वयाच्या २४ व्या वर्षी सायलीने मिस इंडिया अर्थ ही स्पर्धा जिंकली. अॅव्हिएशन या विषयात सायलीने मास्टर्स केलं. तिच्या करिअरची सुरुवात तिने मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांमधून केली. नंतर तिने धर्मांतरणही केलं. पण तिथला छळ इतका प्रचंड होता की आता तिने हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. सायली सुर्वेने हा आरोप केला आहे की तिच्या पतीने जबरदस्तीने तिचं धर्मांतरण केलं आणि तिचा शारिरीक तसंच मानसिक छळ केला.
प्रेमविवाह, धर्मांतर आणि छळाची कहाणी
सायली सुर्वेने १० वर्षांपूर्वी आई वडिलांचा विरोध झुगारत मोहम्मद आतीफ नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं गेलं असं तिने सांगितलं. त्यानंतर तिचं नावही बदलण्यात आलं होतं. धर्मांतरण करण्यासाठी सतत दबाव टाकण्यात आला असंही सायलीने सांगितलं.

सायलीने माध्यमांना काय सांगितलं?
सगळं काही सहन करण्याची एक मर्यादा असते, ती आता संपली आहे. माझी काही चूक नसताना मला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात येत होती. मी २४ तास शिव्या ऐकल्या आहेत. मी दहा वर्षे इतका छळ सहन केला की तो अतोनात होता. मी लव्ह मॅरेज केलं त्यासाठी मला निकाह करायचा असल्याने धर्मांतर करावं लागलं. तुम्ही जेव्हा २४ तास एखाद्या व्यक्ती बरोबर राहता तेव्हा तुम्हाला माणूस कसा आहे ते समजतं. आम्हाला चार मुलं झाली. त्यामुळे मी हा प्रयत्न केला की संसार टिकावा. पण काहीही घडलं नाही. कारण मला मारहाण करणं, शिवीगाळ करणं हे सगळं माझ्याबरोबर मागची १० वर्षे घडतं आहे. माझ्या मुलं वाढत्या वयाची आहेत त्यांच्यासमोर या गोष्टी व्हाव्यात असं मला वाटत नाही त्यामुळे मी हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला आहे असं सायली सुर्वेने सांगितलं.
अन्याय सहन करण्याची माझी ताकदच संपली-सायली सुर्वे
सायलीने पुढे सांगितलं आता माझी सहन करण्याची ताकदच संपली आहे. मला वाटतंय की हे सगळं प्रकरण लव्ह जिहाद जे म्हटलं जातं तसंच आहे. अनेक लोक मला नावं ठेवतात की तू लग्नाचा निर्णय का घेतलास? मी त्यांना हे सांगू इच्छिते की जेव्हा मी तो निर्णय घेतला तेव्हा मी लहान होते, मला तेवढी समज आलेली नव्हती. एक चांगला माणूस आहे त्याच्याशी आपण संसार करु असं मला वाटलं होतं. पण तसं घडलं नाही, मला अनेक धक्कादायक अनुभव आले. निकाह होण्यापूर्वी मी मॉडेलिंग करत होते. २१ व्या वर्षी निकाह झाला, त्यानंतर कोर्ट मॅरेज करण्यात आलं. धर्मांतर झाल्यावरच लग्न अधिकृत मानलं जातं. धर्मांतर केलं नाही तर त्याला झिना असं म्हटलं जातं. मी हिंदू रिती रिवाज पाळत होते, लहानपणापासून जे शिकले आहे ते मी करण्याचा प्रयत्न केला. पण माझा विरोध करण्यात आला आणि तो वाढत गेला. इस्लाममध्ये आहेत तर तुला नमाज पठण करावं लागेल असंही मला सांगण्यात आलं. मी त्या दबावामुळे नमाज पठणही शिकले. ज्या माणसासाठी मी सगळं काही सोडून दिलं होतं. पण मला एक प्रॉडक्ट म्हणून वापरलं गेलं.
मी माझ्या मुलांची नावंही बदलली आहेत
मला चार मुलं झाली, आरिस, फातिमा, खालिद आणि गाजी अशी त्यांची नावं आहेत मात्र ही नावंही मी आता बदलली आहेत. माझ्या आई वडिलांनी मला जे शिकवलं ते मी त्यांना शिकवणार आहे. माझ्या घरात आणखी दोन महिला आहेत ज्यांचं धर्मांतर केलं गेलं आहे. माझी जी मोठी जाऊ आहे तिला धर्मांतराविषयी काहीही तक्रार नाही. ती बुरखा घालते, नमाज पठण करते. मात्र मूळ ती देखील हिंदूच होती. तिचं धर्मांतरण करण्यात आलं. तिचा नवरा तिला सपोर्ट करतो. माझी जी तिसरी जाऊ आहे तिला प्रॉब्लेम आहे. तिला मांस खाऊ घातलं गेलं असा आरोप तिने केला, धर्मांतर केलं गेलं. मात्र या दोघींचा वाद आमच्या सासूच्या विरोधात आहे. मात्र माझा लढा आहे तो माझ्या सासू आणि नवऱ्याच्या विरोधात आहे. मला हिंदू समाजाने बरीच मदत केली. मिलिंद एकबोटे, समीर कुलकर्णी यांनी मला बरीच मदत केली. असंही सायली सुर्वेने सांगितलं.
सायलीची मागणी काय?
कुठल्याही मुलीबरोबर असा प्रकार होता कामा नये जसा मी सहन केला. एक स्त्री म्हणजे आदिशक्ती मानली जाते. त्याचा सन्मान त्या धर्मातल्या लोकांनीही केला पाहिजे. सध्या अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत. आम्ही मुली म्हणून भावनिक विचार करुन निर्णय घेतो. पण असे निर्णय जड जातात. हिंदू संस्कृती आणि इस्लामची संस्कृती खूपच वेगळी आहे हे मला समजलं आहे. महिलांना जो सन्मान हिंदू धर्मात मिळतो तसा सन्मान त्या धर्मात मी मागच्या दहा वर्षांत पाहिलेला नाही.
