What happens after death?: माणसाचा मृत्यू झाल्यानंतर काय होतं? हा प्रश्न हजारो वर्षांपासून मानवाला सतावत आला आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये जीवनाचा आढावा (life review) किंवा संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर झरझर जाण्याचे वर्णन वारंवार दिसते. पण हे फक्त मिथक आहे का? की, विज्ञानालाही त्यामागे काही सत्य सापडतं आहे? आधुनिक न्यूरोसायन्सने आता त्या गूढ क्षणांकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे आणि त्यातून आलेले निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे आहेत.
मृत्यू म्हणजे शेवट नाही, एक प्रक्रिया आहे
पूर्वी मृत्यूची व्याख्या साधी होती. हृदय थांबलं की माणूस मृत. पण आज वैद्यकीय विज्ञान सांगतं की, मृत्यू हा एक क्षण नसून एक प्रक्रिया आहे. हृदय थांबल्यानंतरही मेंदू काही काळ कार्यरत राहतो. हा काळ काही सेकंदांचा नसून काही मिनिटांचा असू शकतो आणि याच काळात काही विलक्षण गोष्टी घडतात.
२०२२ मधील धक्कादायक शोध
२०२२ साली कॅनडामध्ये न्यूरोसर्जन डॉ. अजमल झेम्मार आणि त्यांच्या टीमने एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग केला. ८७ वर्षांच्या एका रुग्णाच्या मेंदूची EEG (Electroencephalogram) द्वारे नोंद घेतली जात होती. अचानक त्या रुग्णाला cardiac arrest आला आणि त्याच्या हृदयाने काम करणे थांबवले. अपेक्षा होती की मेंदूही लगेच कार्य करण्याचे थांबावेल. पण जे दिसलं, ते विज्ञानासाठी धक्कादायक होतं. मेंदूमध्ये gamma oscillations नावाच्या लहरी दिसल्या; ज्या सहसा स्मरणशक्ती, स्वप्नं किंवा ध्यानावस्थेशी संबंधित असतात. म्हणजेच, मृत्यूच्या क्षणी त्या व्यक्तीचा मेंदू जणू काही आठवणी रीप्ले करत होता. हे प्रथमच थेट पुराव्याने सिद्ध झालं की, मृत्यूनंतर मेंदू काही काळ सक्रिय राहू शकतो.
७ मिनिटांचा जाणीव सिद्धांत
याच संशोधनातून Seven Minutes of Life ही कल्पना समोर आली. हृदय थांबल्यानंतर रक्तपुरवठा बंद होतो, पण मेंदूतील न्यूरॉन्स लगेच मृत होत नाहीत, तर ते काही मिनिटे अत्यंत तणावपूर्ण स्थितीत जिवंत राहतात.
या अवस्थेत मेंदूतील पेशी प्रचंड वेगाने आणि अनियमित पद्धतीने काम करतात. ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे न्यूरॉन्स panic mode मध्ये जातात. या काळात मेंदूमध्ये एक प्रकारची विद्युत लाट (electrical surge) निर्माण होते, जी संपूर्ण कॉर्टेक्समध्ये पसरते. काही वैज्ञानिक याला final burst of consciousness (जाणीवेचा शेवटचा स्फोट) म्हणतात.
आयुष्य डोळ्यासमोर झरकन का येतं?
आपण अनेकदा ऐकतो की, मृत्यूच्या क्षणी संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर येतं. ही फक्त कथा नाही. मेंदूतील न्यूरॉन्स जेव्हा अनियमितपणे सक्रिय होतात, तेव्हा आठवणी अचानक आणि मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊ शकतात. यामुळे मेंदू जणू movie mode मध्ये जातो. जिथे भूतकाळातील प्रसंग एकामागून एक झळकतात. हा अनुभव खूप जिवंत आणि वास्तवासारखा वाटतो. म्हणूनच अनेकांना near-death experiences (NDEs) मध्ये life flash झाल्याचा अनुभव येतो.
Near-Death Experiences: विज्ञान काय सांगतं?
हृदयविकाराच्या झटक्यातून वाचलेल्या अनेक रुग्णांनी विलक्षण अनुभव सांगितले आहेत; जसे की स्वतःच्या शरीरावरून वर तरंगणे, प्रकाशाच्या बोगद्यात जाणे, किंवा मृत नातेवाईकांना भेटणे. डॉ. सॅम पर्निया यांच्या AWARE अभ्यासात अनेक रुग्णांचे निरीक्षण करण्यात आले. यावरून असे दिसते की, मेंदू पूर्णपणे बंद होत नाही, तर काही काळ हायपर-ऍक्टिव्ह अवस्थेत जातो.
मेंदूतील रासायनिक वादळ
मृत्यूच्या क्षणी मेंदूमध्ये एक रासायनिक वादळ तयार होतं. ऑक्सिजन कमी झाल्यावर glutamate सारखे neurotransmitters मोठ्या प्रमाणात सोडले जातात. हे न्यूरॉन्सना अतिप्रेरित करतात. यामुळे मेंदूतील पेशी एकाच वेळी आणि अनियमितपणे firing करतात. gamma waves या काळात शिखरावर पोहोचतात. हा क्षण थोडा असला तरी, तो अत्यंत तीव्र अनुभव निर्माण करू शकतो. ज्यामुळे लोकांना आध्यात्मिक किंवा अलौकिक वाटणारे अनुभव येतात.
विज्ञान विरुद्ध अध्यात्म?
या सगळ्या शोधांमुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही सर्व फक्त मेंदूची जैविक प्रक्रिया आहे का? की यात काही आध्यात्मिक अर्थ आहे?
काही जण म्हणतात की हा soul transition चा भाग आहे. तर वैज्ञानिक म्हणतात की हे फक्त ऑक्सिजनच्या अभावामुळे होणारे न्यूरोलॉजिकल परिणाम आहेत. पण दोन्ही बाजूंमध्ये एक समानता आहे. मृत्यूच्या क्षणी मेंदू पूर्णपणे शांत नसतो.
मृत्यूची नव्याने व्याख्या
आजच्या वैद्यकीय जगात मृत्यूची व्याख्या बदलत आहे. हृदय थांबलं म्हणजे सर्व काही संपलं, असं आता मानलं जात नाही. मेंदूची क्रिया काही मिनिटे चालू राहू शकते, आणि काही वेळा रुग्ण परतही येऊ शकतो. यामुळे डॉक्टरांना मृत्यू घोषित करताना अधिक सावधगिरी बाळगावी लागते. आधुनिक मार्गदर्शक तत्वांनुसार, cardiac arrest नंतर काही मिनिटे निरीक्षण करणं आवश्यक मानलं जातं.
शेवट की एक नवीन सुरुवात?
मृत्यू हा शेवट आहे की एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात…हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे; मेंदूचा शेवटचा क्षण अत्यंत जिवंत, सक्रिय आणि रहस्यमय असतो. कदाचित त्या ७ मिनिटांत आपण आपल्या संपूर्ण आयुष्याचा सार अनुभवत असतो.
