Neuroscience of accent adaptation: मुंबईतल्या गल्लीबोळात वाढलेला आरव जेव्हा लंडनच्या एका कॅफेमध्ये ब्रिटिश लहेजात ACCENT कॉफी मागू लागला, तेव्हा त्याला स्वतःच्याच आवाजाचं नवल वाटलं. मराठी मातृभाषा असलेल्या त्याच्या जिभेची ‘ट-ठ’ची ठेवण आणि वर्षानुवर्षे ‘र’चा स्पष्ट उच्चार करण्याची सवय कशी बदलली, हे त्याचं त्यालासुद्धा समजलं नाही. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, माणूस आपल्या मातृभाषेचा प्रभाव ओलांडून नवीन लहेजा (Accent) कसा आत्मसात करतो? काही लोक परदेशात गेल्यावर लगेच तिथला उच्चार कसा पकडतात, तर काहींच्या बोलण्यात वर्षानुवर्षे मूळ भाषेचा ठसा तसाच का राहतो?

उच्चारपद्धती म्हणजे काय? (Accent VS Dialect)

प्रत्येक भाषा बोलण्याची एक विशिष्ट पद्धत असते. उच्चारपद्धती ही प्रामुख्याने शब्दोच्चार, आवाजाची पट्टी, ताल आणि स्वरांचे चढ-उतार यांच्याशी संबंधित असते. भाषाशास्त्रात ‘उच्चारपद्धती’ (Accent) आणि ‘बोलीभाषा’ (Dialect) या दोन भिन्न संकल्पना आहेत.

नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीचे भाषातज्ज्ञ (linguist) ॲडम कूपर यांच्या मते:

“उच्चारपद्धती म्हणजे बोलीभाषेशी जोडलेलं उच्चारांचं स्वरूप आहे, तर बोलीभाषेमध्ये उच्चारांच्या पलीकडे जाऊन भाषेच्या विविध स्तरांचा (शब्दसंग्रह आणि व्याकरण) समावेश असतो.”

उदाहरणावरून समजून घेऊया:

उच्चारपद्धती (Accent): जेव्हा दोन व्यक्ती एकाच प्रमाण भाषेतील वाक्य (“मला हे समजले नाही”) वेगवेगळ्या लयीत किंवा ठसक्यात बोलतात. उदा.

बोलीभाषा (Dialect): जेव्हा त्याच वाक्यासाठी संपूर्ण वेगळी स्थानिक शब्दरचना वापरली जाते (उदा. मालवणीत “माका हे कळना” किंवा वऱ्हाडीत “मले हे समजलंच नाही जी”).

आपल्या मूळ उच्चारपद्धतीची घडण कशी होते? (Accent Formation)

आपण ज्या प्रदेशात, समाजात आणि भाषिक भोवतालात लहानाचे मोठे होतो, तिथल्या ध्वनींचा परिणाम आपल्या उच्चारांवर होतो. लहानपणीच आपली मूळ उच्चारपद्धती पक्की होण्यामागे चार मुख्य वैज्ञानिक कारणे आहेत:

  • मेंदूतील ध्वनी नकाशा (Phonetic Inventory): वयाच्या १२-१३ वर्षांपर्यंत आपला मेंदू सभोवताली ऐकू येणाऱ्या सर्व आवाजांचे न्यूरल नेटवर्क तयार करतो. मेंदू या वयात ऐकलेल्या ध्वनींना ‘मूळ ध्वनी’ मानतो.
  • स्नायूंची स्मृती (Motor Control & Muscle Memory): एक शब्द उच्चारण्यासाठी जीभ, ओठ, जबडा आणि स्वरयंत्रातील १०० हून अधिक स्नायू एकाच वेळी काम करतात. मातृभाषा बोलताना या स्नायूंना विशिष्ट हालचालींची पक्की सवय झालेली असते.
  • श्रवणाची क्षमता (Auditory Filter): आपला मेंदू नवीन भाषेतील बारकावे ऐकताना मूळ भाषेचा फिल्टर वापरतो. उदा. इंग्रजीतील ‘Think’मधील ‘थ’ आणि ‘Tea’मधील ‘ट’चा फरक ज्या भाषेत नाही, त्यांचा मेंदू दोन्ही ध्वनींना एकाच वर्गात टाकतो.
  • भाषेची लय आणि भर (Prosody & Stress Transfer): प्रत्येक भाषेची स्वतःची गती आणि आवाजाचा चढाव-उतार असतो. नवीन भाषा बोलताना आपण नकळत मातृभाषेची लय त्यावर लागू करतो.

महाराष्ट्रात ‘दर १२ कोसांवर भाषा बदलते’ या म्हणीप्रमाणे मालवणी, वऱ्हाडी किंवा अहिराणी लहेजा तयार होण्यामागे हीच शारीरिक व भौगोलिक कारणे आहेत. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील नागपूरहून मुंबईत आलेल्या ‘राधिका’चा लहेजा आणि नागपुरातच राहिलेल्या तिच्या सासूच्या (‘सरिता’) उच्चारातील सूक्ष्म फरक याच सामाजिक व प्रादेशिक घटकांचे उदाहरण आहे.

माणसाची उच्चारपद्धती कधी बदलते? (Accent Variation)

आपली उच्चारपद्धती आयुष्यभरासाठी स्थिर नसते; परिस्थितीनुसार ती बदलू शकते. प्रामुख्याने ज्या घटकांमुळे लहेजात बदल घडतो ते घटक खालीलप्रमाणे :

  • भौगोलिक स्थलांतर: नवीन शहर किंवा देशात राहायला गेल्यानंतर (उदा. मुंबईतून लंडनला गेलेला आरव).
  • व्यावसायिक गरज: कॉरपोरेट क्षेत्रात, आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी बोलताना किंवा प्रसारमाध्यमांमध्ये काम करताना स्पष्ट संवादासाठी लोक नवीन उच्चारपद्धती स्वीकारतात.
  • दीर्घकालीन सहवास : एकाच विशिष्ट भाषिक समूहासोबत सतत राहिल्याने त्यांच्या बोलण्याचा प्रभाव नकळत आपल्यावर पडू लागतो.

‘शॅमेलिऑन इफेक्ट’ आणि ‘कोड-स्विचिंग’ (The Chameleon Effect & Code-Switching):

सरडा जसा सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी रंग बदलतो, तसाच मानवी मेंदू संवादादरम्यान समोरच्या व्यक्तीची भाषा आणि तिचा लहेजा टिपण्याचा प्रयत्न करतो. भाषाशास्त्रात याला ‘कॅमेलीन इफेक्ट’ (Chameleon Effect) किंवा ‘कम्युनिकेशन अकोमोडेशन थिअरी’ (Communication Accommodation Theory) म्हणतात.

जेव्हा आपण एखाद्या नवीन वातावरणात जातो, तेव्हा तिथल्या माणसांशी नातं जोडण्यासाठी, सामाजिक मान्यता मिळविण्यासाठी आणि संवादातील अडथळे दूर करण्यासाठी आपला मेंदू अनैच्छिकपणे (subconsciously) समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याची गती, आवाजाचा चढाव-उतार आणि उच्चारपद्धतीची नक्कल करू लागतो.

यासोबतच ‘कोड-स्विचिंग’ (Code-Switching) ही एक रंजक भाषिक प्रक्रिया आहे आहे:

  • लहेजातील लवचिकता: लंडनमध्ये राहणारा आरव तिथल्या कॅफेमध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करताना सहकाऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी ब्रिटिश लहेजा वापरतो; पण तोच आरव जेव्हा संध्याकाळी घरी फोन करून मुंबईतील आई-वडिलांशी बोलतो, तेव्हा क्षणात त्याचा मूळ मुंबईकर लहेजा पुन्हा जागा होतो.
  • अनैच्छिक बदल: ही अदलाबदल इतकी नैसर्गिक असते की, बोलणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाही आपण लहेजा बदलला आहे याचा तत्काळ अंदाज येत नाही.

काही लोकांकडे लहेजा सहज बदलण्याणे कसब, तर काहींचा मूळ ठसा कायम… असं का?

एकाच वातावरणात राहूनही काही व्यक्ती नवीन उच्चारपद्धती लगेच आत्मसात करतात; तर काहींच्या बोलण्यात मूळ मातृभाषेचा ठसा आयुष्यभर तसाच राहतो. या फरकामागची मुख्यत्वे चार वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय कारणे खालीलप्रमाणे :

  • वय आणि न्यूरोप्लास्टिसिटी (Age & Neuroplasticity): भाषाशास्त्रात याला ‘क्रिटिकल पिरिअड हायपॉथेसिस’ म्हणतात. वयाच्या १२-१३ वर्षांआधी (पौगंडावस्थेपूर्वी) जर एखादी व्यक्ती नवीन भाषेत किंवा देशात गेली, तर तिचा मेंदू नवीन ध्वनी नकाशे सहजगत्या तयार करतो. वयाच्या २५-३० नंतर मेंदूची ही लवचिकता कमी होते, ज्यामुळे प्रौढ वयात जुने ध्वनी नकाशे ओलांडून नवीन लहेजा पक्का करणे कठीण जाते.
  • सांस्कृतिक अस्मिता आणि मानसिक जोडणी (Identity & Cultural Pride): उच्चारपद्धती ही माणसाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असते. ज्या व्यक्ती आपल्या मूळ प्रदेशाशी किंवा संस्कृतीशी अत्यंत घट्ट जोडलेल्या असतात, त्यांचा मेंदू मूळ लहेजा सोडून नवीन लहेजा स्वीकारण्यास अनैच्छिकपणे विरोध करतो. त्यांच्यासाठी मूळ उच्चारात बोलणे ही स्वाभिमानाची बाब असते.
  • ध्वनी-सहानुभूती आणि संगीताची आवड (Phonetic Empathy & Musical Ear): ज्या लोकांचा ‘म्युझिकल इअर’ चांगला असतो किंवा ज्यांना संगीतातील लयीची उत्तम जाण असते, ते नवीन भाषेतील आवाजाचा चढाव-उतार (Pitch) आणि शब्दांवरील ताण पटकन ओळखतात. अशा व्यक्ती नवीन लहेजा वेगाने आत्मसात करतात.
  • स्नायूंची पक्की सवय (Vocal Cord & Muscle Memory): वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने बोलल्यामुळे आपली जीभ, ओठ व स्वरयंत्र यांच्या स्नायूंना विशिष्ट हालचालींची पक्की सवय झालेली असते. प्रौढ वयात जीभ आणि जबड्याला नवीन उच्चारांसाठी वेगळे वळण देणे शारीरिकदृष्ट्याही आव्हानात्मक ठरते.

उच्चारपद्धती: मानवी ओळखीचा जिवंत प्रवास

काही वर्षांपूर्वी गूगलने डिजिटल आवाजासाठी केवळ ब्रिटिश आणि अमेरिकन उच्चारपद्धती स्वीकारल्या होत्या; पण आज गूगलने ब्रिटिश, अमेरिकन, ऑस्ट्रेलियनसोबतच ‘भारतीय इंग्रजी’ (Indian English Accent)लासुद्धा अधिकृतपणे जागतिक स्वीकृती दिली आहे.

उच्चारपद्धती ही केवळ शब्दांची जोडणी नसून, ती माणसाचा प्रवास, त्याची संस्कृती आणि त्याच्या मेंदूची लवचिकता दर्शवणारी एक जिवंत प्रक्रिया आहे. त्यामुळेच परदेशात जाऊन ब्रिटिश लहेजा बोलणारा आरव असो किंवा नागपुरी ठसका जपणारी सरिता; उच्चारांमधील हेच वैविध्य मानवी संवादाला समृद्ध बनवतं.