डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
Understanding the biological path of Sexual Energy to the Hypothalamus: ‘शिवसंहिते’मध्ये लैंगिक स्नायूंशी संबंधित जी तंत्रे शेकडो वर्षांपूर्वी सांगितली आहेत, तीच आज आधुनिक विज्ञानात ‘केजेल एक्सरसाईज’ म्हणून ओळखली जातात. लैंगिक ऊर्जा केवळ प्रजननापुरती मर्यादित नसून, ती मेंदूतील विशिष्ट केंद्रांना उत्तेजित करून शरीरात चैतन्य कसे निर्माण करते, हे समजून घेणे काळाची गरज आहे. ‘शिवसंहिते’त सेक्सच्या स्नायूंशी संबंधित तंत्रे व्यवस्थितपणे समजावून दिलेली आहेत. त्यातील चतुर्थ पटलातील श्लोक १०१ व १०२ यामधे जी तंत्रे सांगितले आहेत, तीच तंत्रे डॉ. अर्नोल्ड केजेल या पाश्चात्त्य गायनॅकॉलीजिस्टने स्वत:ची व्यायाम-तंत्रे म्हणून विसाव्या शतकाच्या मध्यावर स्त्रियांसाठी म्हणून प्रसिद्ध केली. पण जगाला याचा पत्ताही नव्हता, अजूनही जगाला माहीत नाही की, डॉ. केजेलच्या जन्माच्या कित्येक शतके आधी ‘शिवसंहिते’मध्ये विस्तृतपणे ती सांगितलेली आहेत.

ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्याची व्यथा

‘अरे डॉक्टर, मी आता आहे ऐंशी वर्षांचा. माझी बायको जाऊनही अकरा वर्षे होऊन गेली आहेत. तुला माहीत आहेच माझी दोन्हीही मुलं आता कित्येक वर्ष अमेरिकेत राहात आहेत, त्यांच्या संसारात पूर्णपणे गुंतून गेलेली आहेत. आणि मी आता इथे एकटाच असतो. त्यांच्याकडे तरी किती दिवस राहाणार. मला करमत नाही तिथे. इथे एवढ्या मोठ्या बंगल्यात शेवटी मी एकटाच. म्हणून माझ्या दोन्हीही मुलांनी सांगितलं की, बाबा तुम्ही आता कम्पॅनियन बघा, दुसरं लग्न करा. आम्हाला तुमच्या इस्टेटीतून काही दिलं नाही तरी चालेल.’

तरुणींची स्थळं आली

ऐंशी वर्षांचे यशवंतराव सरकारी नोकरीतून उच्च पदावरून निवृत्त झालेले. उच्चभ्रू वर्गात मोडणारे. मला लहानपणापासून ओळखत होते. त्यांच्या कुटुंबाची साधारण माहिती मला होती.
‘काका, तुमची मुलं जर म्हणताहेत तर माझा सल्ला कशाला पाहिजे?’ मी जरा बुचकळ्यातच पडलो होतो. कोणासाठी जोडीदार निवडण्याचे काम तर काही माझे नव्हते.
‘अरे, तुझ्याकडे मी वेगळ्याच कामासाठी आलो आहे. मला कम्पॅनियनची गरज आहे हे माझ्या लक्षात आले. मुलांचं म्हणणं मी शेवटी मनावर घेऊन वधूसाठी जाहिरात दिली. आणि तुला सांगतो, जाहिरातीत माझ्या वयाची व गरजेची पूर्ण माहिती देऊनही प्रस्तावांची नुसती रीघ लागली. आणि तुला खोटं वाटेल तरुणींची सुद्धा भरपूर ‘स्थळं’ आली.’

Human brain hypothalamus and sexual energy connection | Science of sexual wellness in Marathi | मेंदूतील हायपोथॅलॅमस आणि कामऊर्जा प्रवास | लैंगिक आरोग्य आणि विज्ञानाधारित माहिती
कामऊर्जेचा मेंदूपर्यंतचा प्रवास (फोटो- AI)

वय नव्वदीचं आणि लग्न

‘अहो काका, तुमच्या सांपत्तिक स्थितीची सगळी खरी माहिती दिल्यावर असं घडणारच.’ मी त्यांना म्हटलं.
मला एक विनोद आठवला. एका पंचाहत्तरीच्या माणसाबरोबर त्याच्या नवीन तिशीतल्या बायकोला पाहून त्याच्या एका मित्राने आश्चर्य व्यक्त केले त्यावेळी त्या माणसाने त्याला सांगितले, ‘अरे मी तिला माझं वय खोटं सांगितलं.’ मित्राने चकित होऊन विचारले, ‘अरेच्चा, तू काय साठ वगैरे सांगितलेस की काय?’ तो माणूस हसून म्हणाला, ‘नाही रे, मी नव्वद सांगितले!’

काकांची रोमँटिक स्टोरी

थोडक्यात, आमच्या या यशवंतराव काकांची स्थिती काही वेगळी नव्हती. पण आमचे काका सरळमार्गी असल्याने त्यांनी सत्य सांगूनच नातं निवडायचं ठरवलं होतं. असो. काका सांगत होते, ‘मी पूर्ण विचार करून शेवटी एका सत्तरीच्या स्त्रीचा प्रस्ताव मान्य केला आहे. माझ्या मुलांनी आणि तिच्याही मुलांनी आम्हा दोघांना ग्रीन सिग्नल दिला आहे.’
काय गंमत आहे बघा. पूर्वी मुलं आईबाबांच्या ग्रीन सिग्नलने नातं फायनल करीत, आता… कालाय तस्म नम: आणखी काय? मी यशवंतराव काकांची रोमँटिक स्टोरी उत्सुकतेने ऐकत होतो.

लग्नापूर्वीच ‘लग्नसिद्ध अधिकारा’ची जाणीव

‘पण तिनं मला एक अट घातली आहे.’ काका थोडे थांबले.
‘कोणती अट काका?’ मीही गोष्टीत गुंगून गेलो होतो.
‘अरे, ती म्हणाली, ‘मी रोमँटिक आहे आणि मला तुमच्याकडून काही ना काही प्रमाणात तसे संबंध हवेत.’ काकांनी माझ्या विषयाकडे संभाषण आणले. मला त्या स्त्रीच्या या वयातही होणाऱ्या इच्छेचे काही आश्चर्य वाटले नाही, पण तिने लग्नापूर्वीच तिच्या ‘लग्नसिद्ध अधिकारा’ची जाणीव या ऐंशी वर्षांच्या नरोत्तमाला ज्या धाडसाने करून दिली, त्याचे कौतुकमिश्रित आश्चर्य जरूर वाटले. (आणि नवविवाहित तरुणींनाही हे असे ठणकावून सांगणे अजूनही जमत नाही याचे वैषम्य वाटते.)

सहजीवनात कामजीवनाचं त्रांगडं

‘काका, ती बाई जर एवढी स्पष्टवक्ती आहे तर, ती मनाने पण मोकळ्या स्वभावाची असणार.’- मी.
‘अरे, खरं आहे. म्हणून तर मी तिला पसंत केले आहे. आयुष्याच्या शेवटच्या घटका तरी एकटेपणात न जाता सहजीवनात जातील, असा मी विचार केला. पण त्या सहजीवनात आता कामजीवनाचं त्रांगडं असेल असे काही अपेक्षित नव्हतं मला. अरे, अकरा, बारा वर्षांपूर्वी बायको गेल्यानंतर मी हा विषयच विसरलो होतो. पण पुन्हा तो अशा पद्धतीने येईल असे काही वाटले नव्हते. आणि म्हणूनच तुझ्या सल्ल्यासाठी आलो आहे. काही तरी टिप्स मला दे बाबा.’ काकांनी माझ्याकडे येण्याचे प्रयोजन शेवटी सांगितले.

कामसंवर्धक’ सेक्स फिटनेस

माझ्याकडे आलेल्या आजवरच्या केसेसमधील यशवंतराव ही सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होती. मी त्यांची मेडिकल हिस्टरी घेऊन त्यांची काळजीपूर्वक सेक्सॉलॉजिकल तपासणी केली. आणि त्या कामघातक व्यसने नसणाऱ्या, स्वतचे आरोग्य व्यवस्थित व काळजीपूर्वक जपणाऱ्या काकांना तीन-चार वेळा बोलावून टप्प्या टप्प्याने माझ्या काही ‘कामसंवर्धक’ सेक्स फिटनेस थेरपीच्या गोष्टी शिकवल्या.

कामजीवन हृदयसंजीवनी व तारुण्यवर्धक

वैद्यकीय दृष्टीने कामजीवन हृदयसंजीवनी व तारुण्यवर्धक असते, हे त्यांना समजावून देऊन सेक्सकडे सकारात्मक बघायला सांगितले. त्यांचा भावी जोडीदार तसा विचार करतोय याबद्दल त्यांचे मी अभिनंदन केले. कामजीवन ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे हे पटवून समाजाने आणि कायद्याने मान्यता दिलेल्या या गोष्टीला लग्नबंधनात संकोचाने बघण्याची गरज नाही हे समजावले.

रोमँटिकपणाला वयाचे बंधन नसते

रोमँटिकपणाला वयाचे बंधन नसते हे कळल्यावर काका खुशीने गेले. त्यानंतर त्यांचा संपर्क जो झाला तो फोनवर साडेचार वर्षांनी.
‘माझे एकदम मजेत चाललंय बघ. बायकोही खूश आहे. ती म्हणते की मी लग्नापूर्वी होतो त्याच्याहीपेक्षा आता जास्तच तरुण दिसतोय. आणि तेही कुठलीही औषधं न घेता! तुझ्या टिप्स चालू आहेतच.’ काका एकंदर खुशीत होते.

मधुमेह व वाढलेले वजन

सत्तर, पंचाहत्तरीचे कितीतरी ‘तरुण’ अशा सल्ल्यासाठी माझ्याकडे येऊन गेले. सेक्स फिटनेस थेरपीच्या टिप्स उपयोगी पडण्यापूर्वी त्या सर्वानाच कामघातक तंबाखू, गुटखा, स्मोकिंग ही व्यसने पूर्णपणे बंद करण्यासाठी भाग पाडले होते. (दारू व्यसन अर्थातच कुटुंबघातक असल्याने अशांना गरज लागल्यास काही सेवाभावी संस्थांची मदत आवश्यक असते.) मधुमेह, वाढलेले वजन यांचा विचारही आवश्यकच असतो.

स्व- कामशास्त्र- हठयोग

आपल्या प्राचीन विचारवंतांनी ऋग्वेदापासूनच सेक्सला डोळसपणे पाहिले, निरामयपणे पाहिले. सृष्टीनिर्मितीला ‘काम’बीज कारणीभूत आहे हे जनमानसावर ठसवून त्यांनी  त्यातून शास्त्र निर्माण केले. मैथुन क्रियेशी संबंधित कामशास्त्र आणि स्वतःशीच संबंधित असणारे स्व-कामशास्त्र म्हणून हठयोग यांचा उगम झाला. कामसूत्र रूपाने कामशास्त्र महर्षी मल्लनाग वात्स्यायनांनी इसवी सन चौथ्या शतकात सूत्रबद्ध केले. हठमध्ये स्वततच असलेली कामऊर्जा, सेक्शुअल एनर्जी कार्यान्वित करून मेंदूतील अमृतानंदाचा, ऑरगॅझमचा अनुभव घेण्याची क्रिया अभिप्रेत आहे. ही कामऊर्जा लैंगिक अवयवांशी संबंधित असणाऱ्या मज्जातंतूंच्या जाळ्यांशी, नव्‍‌र्ह प्लेक्ससशी निगडित असते हे हठयोगाचे गृहीत आहे. यालाच त्या विचारवंतांनी कुंडलिनी शक्ती, सेक्शुअल एनर्जी म्हटले आहे.

हायपोथॅलॅमसपर्यंत कामऊर्जा कशी पोहोचते?

एका एनर्जी पॉइंटपासून, लिंग/ योनीमुळाच्या मज्जातंतूंच्या जाळीपासून, मूलाधार चक्रापासून म्हणजेच मज्जातंतूंच्या पेल्वीक प्लेक्ससपासून सेक्शुअल उत्तेजनाच्या मेंदूतील केंद्रांपर्यंत, हायपोथॅलॅमसपर्यंत, ही कामऊर्जा काही विशिष्ट क्रियांनी उत्तेजित करीत वाहून नेण्याची संकल्पना हठयोगात मांडली गेली. या लिंग-योनी संबंधित मज्जातंतूंच्या उत्तेजनाने मेंदूकेंद्रामधे नव्‍‌र्ह इम्पल्सेस, मज्जा-संवेदना जाऊन चैतन्य निर्माण होत आहे असे जाणवायला लागते. कारण मेंदूतील या विशिष्ट भागात ऑक्सीटोसीन हे हॉर्मोन त्यावेळी तयार होत असते. त्यामुळे सेक्स थिरपी समजून घ्या, नो सेक्स रिटायरमेंट!