human body’s reaction to hunger strikes: सध्या नीट पपेरफुटी विरोधात आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. सध्या त्यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस आहे. मात्र आपल्या सगळ्यांना एक स्वाभाविक प्रश्न पडला असेलच, सोनम वांगचुक इतके दिवस काही न खाता अजून जिवंत कसे आहेत? 

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनम वांगचुक आपल्या तब्येतीची हमी देत असले तरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपलं शरीर हे अनेक पदार्थांनी बनलेलं आहे. आपल्या सांगाड्याच्या वर अनेक उतींचे, पेशींचे आणि त्वचेचे स्टार आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती अन्न आणि पाण्याचा त्याग करते, तेव्हा शरीर एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि धोकादायक टप्प्यातून जात असते. 

हा प्रवास वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी १९४४-४५ मध्ये ‘मिनेसोटा स्टार्व्हेशन एक्स्पेरिमेंट’ करण्यात अली होती. आपण या प्रयोगाच्या आधारे ज्या काही प्रश्नांची उत्तरे आपण शोधणार आहोत ते खालीलप्रमाणे:

  • अन्न आणि पाण्याशिवाय मानवी शरीर किती काळ जिवंत राहू शकतं?
  • दीर्घकाळ उपोषण केल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने काही खाल्ले किंवा प्यायले, तर त्याचे शरीर लगेच पूर्वपदावर येईल का?
  • त्यानंतर शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतील की त्याचे विपरीत (उलट) परिणाम होतील?

भूक आणि शरीराचा संघर्ष : ‘मिनेसोटा स्टार्व्हेशन एक्स्पेरिमेंट’ काय सांगते?

ॲन्सेल कीज यांनी अमेरिकेत ३६ तरुणांवर एक ऐतिहासिक प्रयोग केला, ज्याला ‘मिनेसोटा स्टार्व्हेशन एक्स्पेरिमेंट’ म्हणून ओळखलं जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उपासमारीचा सामना करणाऱ्या लोकांना पुन्हा कसे बरे करायचे, हे शोधणे या प्रयोगाचे उद्दिष्ट होते. या प्रयोगातून उपासमारीचे  शरीर आणि मनावर जे परिणाम होतात, ते समोर आलेले धक्कादायक परिणाम :

शारीरिक बदल: सहा महिने केवळ अर्ध्या पोटावर राहिल्यामुळे या तरुणांच्या शरीराचे वजन २५% नी घटले. त्यांचे हृदये आकुंचन पावली, रक्तदाब कमालीचा घसरला आणि शरीरातील चरबी पूर्णपणे संपून स्नायू गळू लागले.

मानसिक परिणाम: सर्वांत भीतीदायक परिणाम म्हणजे या व्यक्तींमध्ये प्रचंड नैराश्य (Depression) आणि चिडचिड वाढली. ते २४ तास केवळ अन्नाचाच विचार करू लागले होते. काही जण तर जेवणाची पुस्तके गोळा करू लागले.

पुनरुत्थानाचा धडा: जेव्हा त्यांना पुन्हा अन्न देण्यास सुरुवात झाली, तेव्हा असे लक्षात आले की, शरीराला मूळ स्थितीत आणणे हे केवळ अन्न खाण्याइतके सोपे नाही. काही व्यक्तींना पूर्ण बरे होण्यासाठी तब्बल दोन वर्षे लागली.

प्रदीर्घ उपोषणाचा शरीरावर टप्प्याटप्प्यांनी काय परिणाम होतो?

प्रसिद्ध हवामान आणि शिक्षण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केलेल्या २१ दिवसांच्या उपोषणाच्या निमित्ताने, ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने वैद्यकीय तज्ज्ञांच्या हवाल्याने शरीरात होणारे अत्यंत घातक बदल स्पष्ट केले आहेत. व्यक्ती जर केवळ पाण्यावर (किंवा इलेक्ट्रोलाइट्सवर) अवलंबून असेल, तर शरीरात होणारी स्थित्यंतरे खालीलप्रमाणे:

सुरुवातीचा टप्पा (रक्तदाब घसरणे आणि थकवा) : सफदरजंग रुग्णालयाचे माजी विभागप्रमुख डॉ. बी. के. त्रिपाठी यांच्या मते, अन्नाअभावी ‘डिहायड्रेशन’ होते आणि रक्तदाब (BP) झपाट्याने कमी होतो. शरीर आपली ऊर्जा वाचवण्यासाठी सुरुवातीला हाता-पायांकडील रक्ताभिसरण थांबवते. साठवलेले कार्बोहायड्रेट्स (ग्लुकोज) संपल्याने प्रचंड थकवा, डोकेदुखी आणि चिडचिड होते.

१० दिवसांनंतर (चरबी व स्नायूंचे नुकसान): चरबी संपल्यानंतर शरीर स्नायू (Muscles) खायला सुरुवात करते. नुसते इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पाणी प्यायले तरी शरीराला आवश्यक प्रथिने, जीवनसत्त्वे आणि कॅलरीज मिळत नाहीत. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, हृदयगती बिघडते आणि अवयवांमधील प्रथिनांची झीज होते.

स्टार्व्हेशन कीटोॲसिडोसिस (Starvation Ketoacidosis): जेव्हा शरीरातील कॅलरीज पूर्णपणे संपतात, तेव्हा शरीर प्रथिनांचे साठे वापरू लागते. आरएमएल (RML) रुग्णालयाचे डॉ. हंसराज यांच्या मते, या प्रक्रियेत ‘कीटोन्स’ (Ketones) नावाचा घातक घटक मोठ्या प्रमाणावर तयार होतो. त्यामुळे रक्ताची पीएच (pH) पातळी बदलते आणि रक्त अत्यंत आम्लयुक्त (Acidic) बनते. ही अवस्था किडनीसाठी अत्यंत घातक असून, वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर ती प्राणघातक ठरू शकते.

उपोषण सोडताना शरीराला काय धोकादायक ठरू शकते? ‘नाईस गाईडलाइन्स’ आणि रिफिडिंग सिंड्रोम:

प्रदीर्घ उपोषणानंतर जेव्हा व्यक्ती पुन्हा अन्न खाते, तेव्हा त्याचे शरीर लगेच पॉझिटिव्ह चिन्हे दाखवत नाही. उलट, अचानक जास्त किंवा जड अन्न खाल्ले तर ‘रिफिडिंग सिंड्रोम’ (Refeeding Syndrome) नावाचा जीवघेणा आजार होऊ शकतो.

ब्रिटनच्या नाईस गाईडलाइन्स (NICE Guidelines) आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, उपाशी शरीरात फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांची तीव्र कमतरता असते. अचानक अन्न खाल्ल्यामुळे शरीरात ‘इन्सुलिन’चा झटका (Insulin Spike) येतो. हे इन्सुलिन रक्तातील उरलेली खनिजे पेशींच्या आत ओढून घेते. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स (विशेषतः फॉस्फरस)मध्ये अचानक मोठा बदल होतो, ज्यामुळे ‘हार्ट फेल्युअर’ (हृदयविकाराचा झटका), फिट्स येणे (Seizures) आणि श्वासोच्छ्वासाचा गंभीर त्रास होऊ शकतो.

वैद्यकीय हस्तक्षेप केव्हा व्हावा? Declaration of Malta on Hunger Strikers:

जेव्हा उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक होते, तेव्हा डॉक्टरांसमोर एक मोठी नैतिक कोंडी निर्माण होते. डॉ. त्रिपाठी आणि डॉ. हंसराज यांच्या मते, अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नाकावाटे नळी (Nasal Tube) टाकून अन्न आणि शिरेवाटे (IV) द्रव पदार्थ द्यावे लागतात. नळीद्वारे अन्न दिल्यास फारशा गुंतागुंती होत नाहीत. मात्र, बळजबरी केल्यास श्वासनलिका किंवा अन्ननलिकेला दुखापत होऊ शकते.

या समस्येवर वर्ल्ड मेडिकल असोसिएशनने (WMA) Declaration of Malta on Hunger Strikers तयार केलं आहे:

स्वायत्ततेचा अधिकार (Right to Autonomy): जर उपोषण करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असेल आणि तिने शुद्धीवर असताना उपोषणाचा निर्णय घेतला असेल, तर डॉक्टरांनी तिच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.

जबरदस्तीने अन्न देण्यास मनाई (No Force-Feeding): एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने नळीद्वारे अन्न देणे हे अनैतिक आणि अमानुष मानले जाते.

डॉक्टरांचं कर्तव्य: डॉक्टरांनी उपोषणकर्त्याला दररोज त्याच्या प्रकृतीची पूर्ण जाणीव करून दिली पाहिजे. व्यक्तीने स्वतःहून उपोषण सोडल्यास अत्यंत सुरक्षित वैद्यकीय उपचार देणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे.

जिवंत असणं विरुद्ध जगणं:

उपोषण किंवा प्रदीर्घ उपासमारीदरम्यान मानवी शरीर अंतर्गत ऊर्जेचा वापर करून २० किंवा त्याहून अधिक दिवस जगू शकते. मात्र, वैद्यकीय भाषेत, ‘जिवंत राहणं’ आणि ‘सुरक्षित असणं’ या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. जर शरीरात पुरेशी चरबी असेल आणि व्यक्ती इलेक्ट्रोलाइट्सचे पाणी पीत असेल, तर ती तग धरू शकते; पण उपोषणाचा कालावधी जसजसा वाढतो, तसतसा जीवावर बेतणारा धोकाही वाढतो.

त्यामुळे सध्या समाजात केवळ मुलांना आपले हक्क मिळतील की नाही ही चिंता नसून सोनम वांगचुक यांचं उपोषण लवकरात लवकर विजयी व्हावं आणि त्यांची तब्येत चांगली राहावी अशी अशा करत आहेत. च अस्तित्वाशी चाललेला एक अत्यंत संवेदनशील आणि जीवघेणा संघर्ष आहे, हेच वांगचुक यांच्या सद्य:स्थितीवरून पुन्हा एकदा अधोरेखित होते.