UNESCO GEOfood concept: आपण जे खातो त्याचा संबंध मातीशी आहे, हे सहज समजते. पण मातीचा संबंध नेमका कशाशी आहे? तो खडकांशी. मग आपल्या ताटातला भात, भाजी, फळे किंवा धान्य यांची गोष्ट कुठेतरी पृथ्वीच्या आत दडलेल्या खडकांपर्यंत जाऊन पोहोचते का? या प्रश्नाचे उत्तर होय, असेच आहे. आपल्या ताटातील भात, भाजी किंवा फळे यांची गोष्ट कशी सुरू होते आणि युनेस्कोचा ‘GEOfood’ उपक्रम काय आहे, ते जाणून घ्या.
मूळाशी असतं भूगर्भशास्त्र
ताटात भात वाढलेला असतो. बाजूला भाजी, (वरण) डाळ, भाकरी आदी असते. या सर्व अन्नघटकांच्या मागे असतात ते शेतकरी, पाऊस, सूर्यप्रकाश, पाणी आणि माती हे सर्व घटक. त्याहीपेक्षा त्याच्या मूळाशी असणारा मूलभूत घटक म्हणजे भूगर्भशास्त्र.
मूळ खडकाचा सर्वत्र प्रभाव
आपण खातो ते थेट दगड नसले, तरी अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत खडकांचा वाटा खूप मोठा असतो. मातीची निर्मिती, तिच्यातील खनिजांचे स्वरूप, पाण्याचा निचरा, जमिनीची रासायनिक वैशिष्ट्ये आणि त्यातून उगवणाऱ्या वनस्पतींवर, त्या भागातील पर्यावरणावर त्या प्रदेशाच्या भूगर्भीय रचनेचा प्रभाव असतो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) संशोधन अहवालात म्हटले आहे की, मातीच्या निर्मितीतील ‘parent material’ म्हणजे मूळ खडक किंवा त्यापासून निर्माण झालेली सामग्री, मातीतील खनिजे, पोषकद्रव्ये, सामू (pH) आणि पोत यांच्यावर प्रभाव टाकते. म्हणूनच ‘ताटातला दगड’ ही कल्पना केवळ काव्यात्मक नाही; तर तिच्यामागे भूविज्ञानाची ठोस प्रक्रिया आहे.

माती एक जिवंत व्यवस्था
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडक कायम तसेच राहत नाहीत. ऊन, पाऊस, वारा, तापमानातील बदल, पाण्याची रासायनिक क्रिया आणि सूक्ष्मजीव यामुळे ते हळूहळू झिजतात. या प्रक्रियेला वातावरणामुळे झालेली धूप (व्हेदरिंग) म्हणतात. खडकांचे कण सुटतात. त्यातील काही खनिजे रासायनिक प्रक्रियांमधून बदलतात. पाण्याबरोबर काही घटक वाहून जातात, तर काही जमिनीत साठतात. वनस्पतींचे अवशेष त्यात मिसळतात, सूक्ष्मजीव आणि मातीतील जीव त्यांचे विघटन करतात. हजारो-लाखो वर्षांच्या या प्रक्रियेत माती तयार होते. मातीच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, हवामान, सजीव, भूगर्भीय गोष्टी आणि काळ या पाच प्रमुख घटकांचा मोलाचा वाटा असतो. म्हणजेच माती ही केवळ ‘धूळ’ नसते. तर ती एका अर्थाने खडक, खनिजे, सेंद्रिय पदार्थ, पाणी, हवा आणि असंख्य सजीव यांची जिवंत व्यवस्थाच आहे. …याच मातीतून अन्नाची सुरुवात होते.
पृथ्वी एकच पण ठिकठिकाणची माती वेगवेगळी का?
एखाद्या प्रदेशात काळी माती असते, दुसरीकडे लालसर माती, कुठे वालुकामय जमीन, तर कुठे चिकणमाती. या फरकामागे हवामान आणि वनस्पतींबरोबरच भूगर्भीय इतिहासाचाही मोठा वाटा असतो. उदाहरणार्थ, बसॉल्टसारख्या ज्वालामुखीय खडकांपासून तयार झालेल्या मातीत आणि ग्रॅनाइटसारख्या खडकांपासून तयार झालेल्या मातीत खनिजांचे स्वरूप वेगवेगळे असते. FAOच्या संशोधन अहवालानुसार, ग्रॅनाइटपासून तयार झालेल्या मातीचा सामू आणि मूलद्रव्यांचे प्रमाण बसॉल्टपासून तयार झालेल्या मातीपेक्षा वेगळे असू शकते.
याचाच परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होतो
वनस्पती मातीमधून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर तसेच लोह, जस्त, तांबे यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये घेतात. यातील प्रत्येक घटक वनस्पतीच्या वाढीत वेगवेगळे काम करतो. खडकांची धूप हे परिसंस्थेत खनिजे पोहोचण्याचे महत्त्वाचे स्रोत आहे. विशेषतः फेल्सस्पारसारख्या खनिजांवर सूक्ष्मजीव आणि बुरशीच्या क्रियेमुळे पोटॅशियमसारखे घटक तयार होतात. म्हणून शेतातील पिकाच्या मुळांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक खनिजामागे भूगर्भीय घटक कार्यरत असतात.
दख्खनची काळी माती
आपल्यासाठी याचे सर्वात जवळचे उदाहरण दख्खनच्या पठारात पाहायला मिळते. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड ज्वालामुखीय उद्रेकांतून तयार झालेल्या बसॉल्टच्या विस्तीर्ण थरांनी दख्खनचा मोठा भाग व्यापला. त्यानंतर दीर्घ काळात या खडकांची धूप आणि इतर प्रक्रियांमधून विशिष्ट प्रकारची माती तयार झाली. आज आपण ज्या जमिनीत पीक घेतो, तिच्यामागे अशाप्रकारे लाखो वर्षांचा भूगर्भीय इतिहास आहे. शेतकऱ्याला त्या इतिहासाची माहिती असणे प्रत्येक वेळी आवश्यक नसते; पण त्याच्या पिकाच्या मुळांना त्याचा परिणाम निश्चितरूपाने जाणवत असतो. यामुळेच ‘जमीन’ हा केवळ शेतीचा विषय नाही. तर तो भूगोल, भूविज्ञान, हवामान, जीवशास्त्र आणि मानवी संस्कृती यांना जोडणारा विषय आहे.
अन्नाची चवही भूविज्ञानच ठरवते का?
हवामान, तापमान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, शेतीची पद्धत, वाण, कापणीची वेळ, प्रक्रिया आणि मानवी परंपरा या सर्व घटकांवर अन्नाची चव अवलंबून असते. पण त्यातही ती चव निश्चित करण्यात भूगर्भीय परिस्थितीचा वाटा हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. याच विचाराला जगभरात GEOfood या उपक्रमाने एका वेगळ्या पद्धतीने मांडले आहे.
‘GEOfood’ म्हणजे नेमके काय?
GEOfood ही UNESCO Global Geoparksशी जोडलेली आंतरराष्ट्रीय संकल्पना आहे. स्थानिक अन्न, स्थानिक उत्पादक, त्या प्रदेशाचा भूगर्भीय वारसा आणि स्थानिक सांस्कृतिक परंपरा यांच्यातील संबंध अधोरेखित करणे हाच या संकल्पनेचा उद्देश आहे. UNESCOच्या मते, GEOfood स्थानिक अन्न आणि भूगर्भीय वारसा यांच्यातील संबंध स्पष्ट करतं आणि स्थानिक समुदायांमध्ये अधिक शाश्वत अन्नव्यवस्थांना प्रोत्साहन देते.
म्हणजे ‘हे अन्न या ठिकाणी तयार होतं’ एवढेच सांगायचे नाही; तर ‘हे अन्न याच प्रदेशात का विकसित झालं?’ हा प्रश्न विचारायचा. भूगर्भ, माती, पाणी, हवामान, जैवविविधता आणि माणसाची अनेक पिढ्यांची शेतीची जाण या सर्व घटकांची एकत्रित सांगड घालायची.
५०० मीटर उंचीवरील कलिंगडाची ४०० वर्षांची गोष्ट
याचे एक सुंदर उदाहरण दक्षिण कोरियातील Mudeungsan UNESCO Global Geoparkचे आहे.
या परिसरातील कलिंगडांचे उत्पादन सुमारे ५०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर केले जाते आणि त्यामागे ४०० वर्षांहून अधिक काळाची स्थानिक परंपरा असल्याचे UNESCOने नमूद केले आहे. हे कलिंगड GEOfood उत्पादन म्हणून ओळखले जाते. इथे मुद्दा केवळ ‘कलिंगड चवीला चांगले लागते’ एवढाच नाही. तर एका विशिष्ट भूप्रदेशात, विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितीत आणि विशिष्ट मानवी परंपरेत एखादे अन्न कसे रुजते, त्याची ही गोष्ट आहे. म्हणजे भूगोलची अन्नाशी गाठभेट होते किंवा अन्नासाठी भूगोल कारणीबूत ठरतो, तेव्हा त्यातून एक संस्कृती तयार होते.
ताट म्हणजे छोटेखानी पृथ्वीच!
आपण एखादी भाकरी हातात घेतो तेव्हा त्यात गहू किंवा ज्वारी असते. त्या धान्याच्यामागे जमीन आहे. जमिनीमागे माती आहे. मातीमागे खडक आणि त्यांचे व्हेदरिंग आहे. पाणी आहे, हवामान आहे. सूक्ष्मजीव आहेत, शेतकरी आहे आणि या सगळ्यांच्या मागे हजारो-लाखो वर्षांचा पृथ्वीचा इतिहासही आहे. एका साध्या भाजीच्या ताटातही हीच कथा दडलेली आहे. म्हणून ‘आपण दगड खातो का?’ या प्रश्नाचे थेट उत्तर ‘नाही’ असे देता येईल; पण ‘आपल्या अन्नाचा काही भाग भूगर्भातूनच येतो का?’ या प्रश्नाचे उत्तर नक्कीच ‘हो’ असे आहे.
खनिजे खडकांतून मातीत येतात. माती वनस्पतींना आधार देते. वनस्पती अन्न तयार करतात. प्राणी वनस्पती खातात. आणि अखेरीस त्या अन्नसाखळीचा एक टप्पा म्हणून ते आपल्या ताटात येते.
अन्नाची खरी ‘लोकल’ ओळख
आज ‘लोकल फूड’, स्थानिक उत्पादन आणि शाश्वत शेती याविषयी जगभर चर्चा होते. पण एखाद्या पदार्थाला खऱ्या अर्थाने ‘स्थानिक’ म्हणायचे असेल तर त्याची कथा फक्त गाव किंवा जिल्ह्यापासून सुरू होत नाही.
तर ती त्या प्रदेशाच्या भूगर्भापासून सुरू होते. GEOfoodचा विचार म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. UNESCO सांगते की, या उपक्रमाद्वारे स्थानिक छोटे उत्पादक, शेतकरी कुटुंबीय आणि स्थानिक उद्योगांना स्थानिक अन्न, पर्यटन, शिक्षण आणि अन्नकथनाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो.
अन्नाकडे पाहण्याची दृष्टी बदलते आहे
भाजी म्हणजे फक्त भाजी राहत नाही. ती एका प्रदेशाची कथा होते.
फळदेखील माती, पाणी, हवामान आणि मानवी परंपरेचे प्रतिनिधी होते.
आणि माती? तीदेखील शेतावरचा मातीचा थर नसते तर ती पृथ्वीच्या दीर्घ भूगर्भीय स्मृतीचे जिवंत रूप असते.
खडकांचेही योगदान…
पुढच्या वेळी ताटात भात, भाकरी, भाजी किंवा एखादे फळ आले, तर एक क्षण त्याकडे वेगळ्या नजरेने पाहता येईल. त्या अन्नामध्ये सूर्यप्रकाश आहे, पावसाचे पाणी आहे, शेतकऱ्याचे श्रम आहेत, बीजाचा इतिहास आहे आणि त्याहून खोलवर कुठेतरी खडकांचेही योगदान आहे. आपल्या ताटाची वा अन्नाची गोष्ट स्वयंपाकघरात नव्हे तर ती पृथ्वीच्या पोटात सुरू होते!
संदर्भ
- UNESCO — GEOfood and UNESCO Global Geoparks
- UNESCO — GEOfood for sustainable development in UNESCO Global Geoparks
- FAO — How is soil formed?
- FAO — Soil formation, soil profile and soil classification
- UNESCO — Mudeungsan UNESCO Global Geopark
- GEOfood International — What is GEOfood
