Hair regrowth serum केस गळण्याची समस्या ही प्रत्येकाला उद्भवते. मात्र, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातदेखील केस गळण्याच्या समस्या उद्भवत आहेत. सध्या १३ ते ३० वयोगटातील व्यक्तींचे केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे. जास्त ताण, कमी झोप, पोषक आहाराची कमतरता अशा अनेक कारणांमुळे केस गळू शकतात.
हार्मोनल असंतुलन आणि केसांची योग्यरित्या काळजी न घेणेदेखील केस गळतीस कारणीभूत ठरते. मात्र, आता शास्त्रज्ञांनी एक असे सिरम विकसित केल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे केवळ २० दिवसांत नवे केस उगवणार आहेत. शास्त्रज्ञांनी नवीन विकसित सिरमविषयी काय म्हटले? २० दिवसांत केस उगवणे शक्य आहे का? जाणून घेऊयात…

शास्त्रज्ञांचा नवा चमत्कार
- विज्ञानाच्या निरनिराळ्या चमत्कारांनी आजवर अनेक लोकांना आत्मविश्वासाने उभे राहण्यास मदत केली आहे. असाच एक चमत्कार तैवान येथील शास्त्रज्ञांनी केला आहे.
- २० दिवसांत केस गळती थांबवून केस परत आणणाऱ्या सिरमच्या या बातमीने लोकांची उत्सुकता वाढवली आहे.
- नुकतेच नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आशादायक असे ‘रब-ऑन’ सिरम तयार केले आहे.
- त्यांनीयासाठी उंदरांवर संशोधन केले.
- त्यात त्यांना उंदरांमध्ये केसांची वाढ पुन्हा झाल्याचे आढळून आले.
- प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या सिरमने त्वचेतील चरबी पेशींना उत्तेजित करून केसांच्या कूपांना (Hair Follicles) पुन्हा तयार केले. ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.
नैसर्गिक घटक आणि चाचण्या
तज्ज्ञांच्या मते, या सिरममध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले फॅटी ॲसिड (Fatty Acids) आहेत, ज्यामुळे त्वचेवर कोणतीही जळजळ होत नाही आणि हे उत्पादन लवकरच ‘ओव्हर-द-काउंटर’ उपलब्ध होऊ शकते. याचाच अर्थ हे सिरम काही चाचण्यांनंतर लवकरच सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल, असे शास्त्रज्ञांचे सांगणे आहे.
मुख्य म्हणजे हे सिरम या अभ्यासाच्या लेखकांनी स्वत:वर वापरून पाहिले आणि सिद्ध केले आहे. नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीमधील अभ्यास-लेखक, प्रोफेसर सुंग-जान लिन म्हणाले की, त्यांनी या उत्पादनाची सुरुवातीची आवृत्ती त्यांच्या पायांवर वापरली. त्यांनी ‘न्यू सायंटिस्ट’ला सांगितले, “मी हे फॅटी ॲसिड माझ्या मांडीवर तीन आठवडे लावले आणि मला आढळले की त्यामुळे केसांची वाढ पुन्हा होण्यास प्रोत्साहन मिळाले.”
या सिरमचे वैशिष्ट्य म्हणजे ते ‘हायपरट्रिकोसिस’ नावाच्या प्रक्रियेवर आधारित आहे. प्रोफेसर लिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माहीत होते की, त्वचेच्या पृष्ठभागावर होणारी जळजळ किंवा जखम केसांच्या अत्याधिक वाढीस प्रोत्साहन देते आणि त्यांनी सिरम तयार करण्याच्या कल्पनेत याच प्रक्रियेचा उपयोग केला. अनेक वर्षांच्या उत्क्रांतीमुळे मानवाने शरीरावरील केसांचे दाट आवरण गमावले असले तरी पुरावे सांगतात की आपण अजूनही ही पुनरुत्पादक क्षमता जपून ठेवली आहे.
संशोधन गटाने मादी आणि नर उंदरांच्या पाठीवरील केस काढून तिथे ‘सोडियम डोडेसिल सल्फेट (एसडीएस)’ नावाचा जळजळ निर्माण करणारा पदार्थ लावून एक्झिमा तयार केला. सुमारे १० ते ११ दिवसांनंतर त्वचेवर एक मिलीमीटर रुंदीच्या कूपांमधून (Follicles) नवीन केस उगवू लागले. या कालावधीत ज्या भागांवर जळजळ निर्माण करणारा पदार्थ लावला नव्हता किंवा जिथे एक्झिमा नव्हता, तिथे केसांची वाढ दिसून आली नाही.
सिरम कसे कार्य करते?
संशोधकांच्या मते, या जळजळ निर्माण करणाऱ्या पदार्थांमुळे इम्यून सेल्स उंदराच्या त्वचेखालील चरबीच्या थरात जमा होतात. या पेशी फॅटी ॲसिड सोडतात, जे केसांच्या कूप स्टेम पेशींद्वारे शोषले जातात आणि अशा प्रकारे केसांच्या वाढीला चालना मिळते. संशोधकांच्या गटाने ‘सेल मेटाबॉलिझम’मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या शोधनिबंधात म्हटले आहे की, “या निष्कर्षांवरून हे दिसून येते की, यामुळे केसांच्या पुनरुत्पादनाला उत्तेजन मिळते.” रासायनिक जळजळ निर्माण करणाऱ्या पदार्थांशिवाय त्वचेवर फॅटी ॲसिडचे परिणाम अभ्यासण्यासाठी, संशोधकांनी ओलिक ॲसिड आणि पामिटोलेइक ॲसिड यांसारख्या विविध फॅटी ॲसिडसह अल्कोहोलमध्ये विरघळलेले सिरम विकसित केले.
हे सिरम केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी ठरले. याचा अर्थ असा की, जळजळ-आधारित पद्धतींचा वापर न करताही, विशिष्ट फॅटी ॲसिड केसांच्या कूपांना उत्तेजित करू शकतात आणि केसांची घनता सुधारू शकतात. प्रोफेसर लिन यांनी ‘न्यू सायंटिस्ट’ला सांगितले, “ओलिक ॲसिड आणि पामिटोलेइक ॲसिड हे नैसर्गिकरित्या तयार झालेले फॅटी ॲसिड आहेत. ते केवळ आपल्या ऊतींमध्ये नव्हे, तर अनेक वनस्पती तेलांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे त्यांचा सुरक्षितपणे वापर केला जाऊ शकतो.”
संशोधकांच्या गटाने या सिरमचे पेटंट घेतले आहे आणि बाजारात आणण्यापूर्वी माणसांच्या टाळूवर याची चाचणी केली जाणार आहे. जर हे सिरम प्रभावी सिद्ध झाले, तर हा शोध केस पुनर्संचयित करण्याच्या विज्ञानामध्ये एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.
