चुंबन हा तसा लोकलज्जेस्तव सार्वजनिक ठिकाणी चर्चा न करण्याचा विषय. केवळ कामोत्तेजना नव्हे तर प्रेम, स्नेह व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम म्हणजे चुंबन. मात्र चुंबनाची उत्क्रांती कशी झाली हे शास्त्रज्ञांना पडलेले एक कोडे आहे. चुंबन कसे विकसित झाले याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाने याबाबत काही निष्कर्ष नोंदवले आहेत. नर आणि वानर या दोहोंमध्ये चुंबन भावना विकसित झाल्याचेही समोर येत आहे. चुंबनाच्या उत्क्रांतीविषयी शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाविषयी…

शास्त्रज्ञांचा अभ्यास काय?

‘‘चुंबन ही अशी एक गोष्ट आहे, जी समजून घेण्यात आम्हाला खरोखर रस आहे,’’ असे वानरवर्गी प्राण्यांमधील (प्राइमेट्स) लैंगिक वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ माटिल्डा ब्रिंडल यांनी ‘सीएनएन’ला सांगितले. अनेक वानरवर्गी प्राण्यांमध्ये चुंबन प्रचलित आहे. ब्रिंडल यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या चमूने विद्यमान वैज्ञानिक साहित्य, शोधनिबंध यांचा अभ्यास केला. आधुनिक वानरवर्गी प्रजातींचे आणि त्यांच्या चुंबनाचे निरीक्षण केले. त्यासंबंधीची माहिती गोळा केली. यामध्ये चिंपांझी, बोनोबोस, ओरँगउटान आणि गोरिलाची एक प्रजाती यांचा समावेश होता. त्यानंतर शास्त्रज्ञांच्या गटाने त्याचे फायलोजेनेटिक विश्लेषण केले, ज्यामुळे शास्त्रज्ञांना जिवंत प्राण्यांच्या वर्तणुकीच्या डेटाच्या आधारे नामशेष प्रजातींमधील वैशिष्ट्यांबद्दल माहिती काढता येते. त्यामध्ये अनुवांशिक माहितीच्या आधारे वेगवेगळ्या वानरवर्गी प्रजाती यांच्या कामजीवनाचा अभ्यास करण्यात आला, असे ब्रिंडल यांनी स्पष्ट केले.

प्रागैतिहासिक चुंबने…

वेगवेगळ्या वानर पूर्वजांनी चुंबन घेतल्याच्या शक्यतांचा अंदाज लावण्यासाठी वेगवेगळ्या उत्क्रांतीवादी परिस्थितींचा मागोवा शास्त्रज्ञांच्या चमूने घेतला. त्या परिस्थतींचे सांख्यिकीय प्रारूप तयार केले. उदाहरणार्थ, चिंपांझी, बोनोबो आणि मानव चुंबन घेतात, म्हणून या सर्व प्रजातींच्या शेवटच्या सामायिक पूर्वजांनीही चुंबन घेतले असण्याची शक्यता आहे. ‘इव्होल्यूशन अँड ह्युमन बिहेवियर’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासलेखामध्ये सूचित केले गेले की चुंबन हा मोठ्या वानरांमध्ये प्राचीन गुणधर्म आहे, जो २.१५ कोटी ते १.६९ कोटी वर्षांपूर्वी या वानरगटाच्या पूर्वजांमध्ये विकसित होत होता. याचा अर्थ असा की निअँडरथल्ससारखे नामशेष झालेले मानवी पूर्वजही चुंबन घेत असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

अभ्यासातील निरीक्षणे काय?

प्रागैतिहासिक चुंबनाचे अभ्यास प्रारूप चुंबन का आणि कसे विकसित झाले हे उघड करत नाही, असे ब्रिंडल म्हणल्या. संभाव्य जोडीदारांचे मूल्यांकन करणे, कामोत्तेजना जागृत करणे, शारीरिक संबंधांपूर्वी केले जाणारे लैंगिक क्रियाकलाप, नातेसंबंधातील बंध दृढ करणे, सामाजिक तणाव कमी करणे आणि संततीला अन्न देण्यापूर्वी ते चघळणे यांतून चुंबन विकसित होते गेले, असे ब्रिंडल यांनी सांगितले. वानरवर्गी प्रजातींच्या बाहेरील प्राण्यांमध्ये चुंबन घेण्याबाबत मर्यादित माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे कालांतराने हा गुणधर्म कसा विकसित झाला असेल, हे सांगणे कठीण आहे, असे त्यांनी सांगितले.

मानवाच्या चुंबनाचा अभ्यास

मानवजातीचे सर्वात जुने चुंबन ४,५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया आणि प्राचीन इजिप्तमध्ये नोंदवले गेले होते, असे अभ्यासाअंती काही शास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र मानवी चुंबनाची उत्क्रांती हे एक कोडेच आहे, असे ब्रिंडल यांनी वाटते. मानव ज्या पद्धतीने चुंबन घेतात त्यावर ब्रिंडल यांच्या शास्त्रज्ञ चमूने केलेला अभ्यास खरोखर जास्त प्रकाश टाकत नाही, असे वॉरविक विद्यापीठातील उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञ आणि ॲड्रियानो रीस ई लामेरा यांनी सांगितले. मानवी चुंबन म्हणजे केवळ ओठांनी ओठांना केलेला स्पर्श नसून त्याचा व्यापक अभ्यास होणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. नवीन अभ्यासात असे नमूद केले आहे की चुंबन घेणे ही मानवी समाजात एक सार्वत्रिक वर्तन नाही. २०१५ च्या एका शोधनिबंधानुसार, हे फक्त ४६ टक्के संस्कृतींमध्ये नोंदवले गेले आहे. ‘‘हा अभ्यास मानवांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये चुंबन घेण्याच्या वर्तनातील अधिक सूक्ष्म फरकांचा शोध घेण्यासाठी भविष्यातील संशोधनाची स्थापना करतो, ज्यामध्ये कोणी कोणाला आणि कसे चुंबन घेण्याचे निवडते याबाबतच्या प्रश्नांचा समावेश आहे, असे उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आणि लैंगिकता व नातेसंबंध यांवरील अभ्यासक जस्टिन गार्सिया यांनी सांगितले. चुंबन हे जैविक आणि सांस्कृतिक दोन्ही आहे. मात्र ते व्यक्ती आणि लोकसंख्येनुसार बदलते, असे गार्सिया सांगतात.