शरद ऋतूची सुरुवात झाली की थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होते. हिवाळापूर्व वातावरणात हवेतील आर्द्रता हळूहळू कमी होते. पण, सध्याच्या वातावरणीय बदलांमुळे ऑक्टोबर महिन्यात प्रचंड उकाडा सोसावा लागत आहे. पहाटे आणि रात्री थोडा गारवा जाणवत असला तरी दिवसभरात घामाच्या धारा थांबत नाहीत. हवामान एकदम कोरडे असल्याचे जाणवते. याच बदलांसोबत अनेक भागांत वायू प्रदूषणही वाढते. अशा संमिश्र वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सर्दी, खोकला आणि फ्लूसारख्या श्वसनाच्या संसर्गांचा धोका वाढू शकतो, त्वचेचा तजेलदारपणादेखील कमी होऊ लागतो. यावेळी रोजच्या आहाराकडेही लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे.
शरद ऋतू किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला हवेतील तापमान आणि ओलावा कमी होतो, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक रासायनिक समतोल बिघडतो. परिणामी त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी त्वचेला अधिक मेहनत करावी लागते. परिणामी त्वचा कोरडी पडते, ओठ सुकतात. तसेच चेहऱ्यावर फोड येऊ शकतात.
ऋतू बदलादरम्यान आपल्या शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधकता वाढू शकते. अशावेळी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. तसेच शरीरात चरबीचा अतिरिक्त साठा होऊ शकतो, ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो, तसेच आजारांची लागण होण्याचाही धोका असतो.
अशा वेळी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि खराब झालेल्या उतींची दुरुस्ती करण्यासाठी विविध पोषक घटकांची आवश्यकता असते. जीवनसत्त्वं, खनिजं, प्रथिनं, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा सुरळीत ठेवण्याास मदत करतात. त्यासाठी फळं, ताज्या भाज्या, सुका मेवा, बिया आणि काही मसाल्यांचा आहारात समावेश केल्यास निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, संतुलित आहारासोबत पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्याने शरीरातील अनेक क्रिया सुरळीत पार पडू शकतात.
१. मोसंबी, संत्री आणि आवळा
- संत्रं, मोसंबी आणि आवळा यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. हे जीवनसत्त्व शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा व्यवस्थित काम करण्यास मदत करतं.
- संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती करण्यात आणि त्यांचं कार्य सुरळीत ठेवण्यात व्हिटॅमिन सी ची भूमिका असते.
- याशिवाय, हानिकारक घटकांमुळे होणारं शरीरातील पेशींचं नुकसान कमी करण्यासही ते मदत करतं.
- रोजच्या आहारात या फळांचा समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते
२. हिरव्या पालेभाज्या
- हिवाळ्याच्या सुरुवातीला पालक, मेथी आणि मोहरीची पानं यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक पोषक घटक मिळतात
- या भाज्यांमधून शरीराला विविध जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. हे घटक शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
- उदाहरणार्थ, पालकामधील व्हिटॅमिन ए त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतात आणि श्वसनमार्गाच्या आतील आवरणाचं संरक्षण करण्यासाठी ते महत्त्वाचं असतं.
३. सुका मेवा आणि बिया
- बदलत्या हवामानात आहारातून शरीराला पुरेसं पोषण मिळणं गरजेचं असतं. यासाठी बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया हे चांगले पर्याय आहेत.
- या पदार्थांमधून शरीराला प्रथिनं, चांगली चरबी, व्हिटॅमिन ई आणि झिंकसारखी खनिजं मिळतात.
- बदामातील व्हिटॅमिन ई पेशींच्या नुकसानीचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं, तर भोपळ्याच्या बियांमधील झिंक रोगप्रतिकारक पेशींच्या कार्यासाठी महत्त्वाचं असतं.
- अक्रोडमधून ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सही मिळतात. हे सर्व पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात,
- त्यामुळे रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात सुका मेवा आणि बियांचा समावेश केल्यास त्याचा शरीराला फायदा होतो
४. आलं आणि लसूण
- स्वयंपाकघरात नेहमी वापरले जाणारे आलं आणि लसूणदेखील आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात
- आल्यामध्ये जिंजरॉल्स नावाची संयुगं असतात. त्यांच्यात अँटीऑक्सिडंट आणि दाह कमी करण्याचे गुणधर्म आहेत.
- लसणामध्ये ॲलिसिन आणि सल्फरयुक्त इतर संयुगं आढळतात, जी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेसाठी फायदेशीर ठरतात.
- आलं-लसणामुळे भाजी, आमटी किंवा इतर पदार्थांची चव तर वाढतेच. सोबतच ते खाल्ल्याने सर्दी किंवा इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका कमी होतो
५. दही आणि आंबवलेले पदार्थ
- संतुलित आहारामुळे बदलत्या वातावरणातही पोटाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.
- रोजच्या जेवणात दही खाणे फायदेशीर ठरू शकते. दह्यात प्रथिनं, कॅल्शियम आणि आतड्यांसाठी उपयुक्त ठरणारे जीवाणू असतात. हे जीवाणू आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचं संतुलन राखण्यास मदत करतात, त्यामुळे केवळ फळ आणि भाज्या खाण्यापेक्षा दही खाणे उपयुक्त ठरते.
- रोगप्रतिकारक यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी आतड्यांचं आरोग्य राखणं गरजेचं असतं.
- यासोबतच, आंबवलेल्या पिठापासून तयार केलेले इडली आणि डोशासारख्या पदार्थांमधूनही पोषक घटक मिळतात
६. अंडी आणि प्रथिनयुक्त पदार्थ
- शरीरातील उतींच्या निर्मितीसाठी अँटीबॉडीज महत्वाची भूमिका बजावतात.
- हेच अँटीबॉडीज तयार करण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते,
- त्यामुळे केवळ फळं आणि भाज्यांवर अवलंबून न राहता प्रथिनांचाही आहारात समावेश करावा.
- अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. अंड्यामध्ये उच्च दर्जाची प्रथिनं, व्हिटॅमिन बी१२ आणि सेलेनियमसारखे पोषक घटक मिळतात.
- शाकाहारी व्यक्तींना डाळी, हरभरा, राजमा, पनीर, दूध आणि सोयापासून तयार केलेल्या पदार्थांतून प्रथिने मिळू शकतात. मांसाहारींसाठी मासे आणि कमी चरबी असलेलं मांस हेही पर्याय उपयुक्त ठरतात. परंतु, या सर्वांचे योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे असते.
७. रताळं, गाजर आणि हंगामी भाज्या
- गाजर, रताळं आणि भोपळ्यासारख्या हंगामी भाज्यांमध्येही शरीरासाठी उपयुक्त ठरणारे घटक असतात.
- गाजर आणि रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन असतं. शरीर त्याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करतं. हे जीवनसत्त्व त्वचा आणि नाक, घसा व श्वसनमार्गाच्या आतील आवरणाचं आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतं.
- हे आवरण हानिकारक सूक्ष्मजीवांना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतं.
- गाजरमधून फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, तर रताळ्यातील कर्बोदकं शरीराला ऊर्जा देतात, त्यामुळे बदलत्या वातावरणात संतुलित आहार घेतल्याने शरीर निरोगी राखण्यास मदत होऊ शकते
