SEBI order on Jane Street: भारतीय शेअर बाजारातील नियामक असलेल्या सेबीने जेन स्ट्रीट ग्रुपला भारतीय शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. या कंपनीने डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंगद्वारे बाजारात गैरव्यवहार केल्याचा आरोप सेबीने केला आहे. बॅक निफ्टी आणि निफ्टी ५० निर्देशांकावर परिणाम होईल, अशा पद्धतीने घाऊक प्रमाणावर केलेल्या गैरव्यवहारांच्या बेकायदेशीर माध्यमातून सुमारे चार हजार कोटींचा नफा कमावल्याचा आरोप सेबीने केला आहे. चार हजार ८४३ कोटी रुपयांचा बेकायदेशीर मार्गाने कमावलेला नफा जप्त करण्याचे आदेशही सेबीने दिले आहेत. दरम्यान, जेन स्ट्रीटने हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि सेबीशी पुढील चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.
जेन स्ट्रीट काय आहे?
जेन स्ट्रीट ग्रुप ही जागतिक पातळीवरील एक प्रमुख ट्रेडिंग कंपनी आहे. २००० साली न्यूयॉर्कमधील व्यापारी आणि तंत्रज्ञांच्या टीमने या कंपनीची स्थापना केली होती. सध्या या कंपनीत अमेरिका, युरोप आणि आशियातील पाच कार्यालयांमध्ये २,६०० हून अधिक कर्मचारी काम करतात. ही कंपनी ४५ देशांमध्ये व्यवहार करते. ही कंपनी एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समधील तिच्या कौशल्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. जागतिक इक्विटी, बाँड्स व ऑप्शन्स मार्केटमध्ये कार्यरत ती एक महत्त्वाची कंपनी आहे. शेअर बाजारातून नफा मिळविण्यासाठी कंपनीनं अल्गोरिदम आधारित रणनीतिचा वापर केला.
अमेरिकेत जेन स्ट्रीट कॅपिटल, एलएलसी, जेन स्ट्रीट एक्झिक्युशन सर्व्हिसेसद्वारे ही कंपनी सेवा देते. युरोपमध्ये जेन स्ट्रीट फायनान्शियल लिमिटेड व जेन स्ट्रीट नेदरलँड्स बीव्हीद्वारे काम करते. आशियामध्ये जेन स्ट्रीट हाँगकाँग लिमिटेड या कंपनीमार्फत व्यवहार केले जातात. या सर्व संस्था जेन स्ट्रीट ग्रुप एलएलसीच्या पूर्ण मालकीच्या कंपन्या आहेत.
जेन स्ट्रीटने गैरव्यवहार कसा केला?
सेबीच्या चौकशीतून असे उघड झाले की, इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्जमध्ये प्रामुख्याने निफ्टी आणि बँक निफ्टी फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये खूप मोठ्या संख्येने शेअर्सची खरेदी विविध संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून केली जात असे. साधारणपणे सकाळच्या वेळेस शेअर बाजार खुला झाल्यानंतर अशा प्रकारची खरेदी करून दुपारनंतर बाजार बंद होण्याच्या वेळेस तेवढ्याच मोठ्या संख्येने शेअर्सची विक्री करून त्यातून बेकायदेशीरपणे नफा कमावला जात असे. असे व्यवहार दैनंदिन पातळीवर आणि मोठ्या संख्येने केले जात असत. शेअर बाजारातील अशा व्यवहारांना ‘पम्प अॅण्ड डम्प’ म्हटले जाते. या प्रकारच्या व्यवहारांना शेअर बाजारामध्ये नियमाने बंदी आहे. या सर्व व्यवहारांसाठी जेन स्ट्रीटने त्यांच्या विविध संलग्न कंपन्याचा गैरवापर केला, असेही सेबीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्व व्यवहारांमुळे एक कृत्रिम फुगवटा बाजारात निर्माण होत होता आणि त्याचा परिणाम इतर गुंतवणुकदारांवरही होत होता, असे सेबीच्या तपासात लक्षात आले. या कंपनीने इंट्रा डे इंडेक्स मॅनिप्युलेशन स्ट्रॅटेजी वापरल्याचा आरोप सेबीने केला आहे. या कंपन्यांद्वारे कॅश इक्विटीज, स्टॉक फ्युचर्स, इंडेक्स फअयुचर्स व इंडेक्स ऑप्शन्समध्ये व्यवहार करण्यात आले आणि तेही फेरफारकरून, असे सेबीने म्हटले आहे.
जेन स्ट्रीटविरुद्ध सेबीला काय आढळले?
सेबीच्या तपासणीत भारतीय बाजारपेठेतील जेन स्ट्रीटच्या गैरव्यवहाराच्या व्याप्तीवर प्रकाश टाकणारे आश्चर्यकारक आकडे उघड झाले. तपासणी कालावधीत जेन स्ट्रीटने सर्व विभागांमध्ये एकूण ३६,०५२.१२ कोटी रुपयांचा नफा कमावला. या पॅटर्नवरून असे दिसून येते की, जेन स्ट्रीट कॅश इक्विटीज, स्टॉक फ्युचर्स, इंडेक्स फ्युचर्स व इंडेक्स ऑप्शन्स आदी संलग्न कंपन्यांचा गैरवापर प्रामुख्याने किमतीमध्ये फेरफार करण्यासाठी करण्यात आला. जेन स्ट्रीट समूहातील परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) बराचसा व्यवहार केला होता. या संस्थांनी ३२ हजार ६८१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. सेबीने असेही नमूद केले की, ही रक्कम भारतातील या एफपीआयच्या सरासरी मालमत्तेपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होती. त्यामुळे नफा परत पाठविला जाण्याची शक्यता आहे.
सेबीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या
जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ दरम्यान जेन स्ट्रीट ग्रुपने भारतीय शेअर बाजारात हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज वापरल्याची तक्रार सेबीकडे आली होती. त्यातून कंपनीने बक्कळ नफा कमावला. सेबीचे म्हणणे आहे की, जेन स्ट्रीटने भारतीय शेअर बाजारात बेकायदा ट्रेडिंग पद्धतींचा वापर केलाय. या काळात सेबीला एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात अनपेक्षित चढ-उतार झाल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. तज्ज्ञांनी सांगितले की, अशा चढ-उतारांना सामान्य समजले जाऊ शकत नाही. तसेच सेबीला त्यांच्या देखरेख यंत्रणेनेही हे सूचित केले होते.
सेबीने कोणती कारवाई केली?
सविस्तर चौकशी होईपर्यंत सेबीने जेन स्ट्रीटवर लादलेले व्यापक अंतरिम निर्बंध खालीलप्रमाणे :
मालमत्ता गोठवणे- बेकायदा नफ्यात चार हजार ८४३ कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश नियामकाने दिले आहेत. त्यामुळे जेन स्ट्रीटला ही रक्कम सेबीच्या एस्क्रो खात्यात जमा करावी लागेल.
बाजार बंदी- जेन स्ट्रीट ग्रुपच्या कंपन्यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यापासून पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सिक्युरिटीज खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यास मनाई आहे.
खाते निर्बंध- सर्व बँक खाती, डिमॅट खाती व कस्टोडियल खाती गोठवण्यात आली आहेत. सेबीच्या परवानगीशिवाय कोणतेही व्यवहार करण्याची परवानगी नाही.
मालमत्ते संदर्भातील निर्णयांवर बंदी- एस्क्रो खात्यात बेकायदेशीर नफा जमा होईपर्यंत हा ग्रुप भारतातील कोणत्याही मालमत्तेची विक्री करू शकत नाही किंवा त्या मालमत्तेच्या संदर्भातील कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही.
आदेश मिळाल्यापासून जेन स्ट्रीटकडे आक्षेप नोंदविण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी आहे आणि ते वैयक्तिक सुनावणीची विनंती करू शकतात. सेबीकडून पुढील आदेश येईपर्यंत अंतरिम निर्बंध लागू राहतील. जेन स्ट्रीटच्या भविष्यातील कोणत्याही व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश शेअर बाजारास देण्यात आले आहेत. एकंदर या प्रकरणामुळे भारतीय बाजारपेठेत कार्यरत असेल्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांबद्दलच्या भविष्यातील दृष्टिकोनावर परिणाम होऊ शकतो