Selling old gold jewelry Rules भारतीय संस्कृतीत सोन्याला अनेक अर्थाने महत्व आहे. भारतात सण-समारंभात सोन्याला विशेष महत्त्व आहे; मात्र गुंतवणूक म्हणूनसुद्धा भारतीय सोने खरेदीला महत्त्व देतात. सोन्याच्या कर्जावरील व्याजाचा दर इतर कर्ज दरांपेक्षा कमी असतो. त्याशिवाय सोन्याची विक्रीही जलद गतीने होते. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे देशभरातील अनेक लोकांनी आपले दागिने आणि नाणी मोडून नफा मिळवण्यासाठी धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, सराफांनी दिलेली किंमत ही बाजारभावापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे आणि ते पाहून अनेकांचा हिरमोड झाला आहे, असे वृत्त ‘न्यूज १८’ने दिले. घरातलं सोनं विकावं का? विकल्यास किती बाजारभाव मिळतो? तज्ज्ञ याविषयी काय सांगतात? जाणून घेऊयात…
सोने विकण्यासाठी गेलेल्या विक्रेत्यांना आलेला अनुभव
कानपूरचे रहिवासी उमेश शुक्ला पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेली अंगठी आणि चेन विकण्यासाठी दागिन्यांच्या एका दुकानात गेले. भाव वाढल्यामुळे चांगला फायदा होईल, अशी त्यांना अपेक्षा होती; पण सराफा बाजारात सध्याच्या दरापेक्षा १० ते १५ टक्के कमी दराने सोने खरेदी करण्याची तयारी दुकानदारांनी दर्शवली. निराश होऊन त्यांनी सोने न विकण्याचा निर्णय घेतला. असाच अनुभव दिल्ली-एनसीआरमधील अनुरागला आला. त्याने १० वर्षांपूर्वी सोन्याचे नाणे खरेदी केले होते आणि जेव्हा हे नाणे तो विकायला गेला, तेव्हा त्याला बाजारभावापेक्षा जवळपास पाच टक्के कमी किंमत देऊ करण्यात आली.
काही लोक गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करतात,; तर काही भविष्यातील सुरक्षा किंवा कौटुंबिक गरजांसाठी. जेव्हा सोन्याचे भाव वाढतात, तेव्हा गुंतवणूकदारांना नफा मिळवण्याची संधी दिसते, तर इतर लोक आर्थिक गरजेमुळे सोने विकतात. मात्र, दोन्ही बाबतीत, बहुतेक विक्रेत्यांना बाजारभावापेक्षा ५ ते १० टक्के कमी रक्कम मिळते.
सोने विकल्यास किती नुकसान होते? तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
कानपूरचे ज्वेलरी व्यावसायिक अमित सोनी आणि अर्थतज्ज्ञ शरद कोहली सांगतात की, हा फरक सोने खरेदी आणि विक्रीच्या गणितावर अवलंबून असतो, ज्यामध्ये मेकिंग चार्जेस, कर, शुद्धतेची तपासणी आणि सराफाचा नफा यांचा समावेश असतो. त्यांनी पाच वर्षांपूर्वीच्या खरेदीचे उदाहरण दिले. त्यावेळी प्रति १० ग्रॅममागे सोन्याचा भाव ४८ ते ४९ हजार रुपये होता.
ग्राहकांनी १२ ते २० टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्जेस, सोन्यावर तीन टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्जेसवर पाच टक्के जीएसटी भरला होता. एका उदाहरणानुसार, ४८ हजार रुपयांच्या १० ग्रॅम सोन्यावर सुमारे ८,६४० रुपये मेकिंग चार्जेस आणि १,६९९ रुपये जीएसटी लागला, ज्यामुळे एकूण किंमत ५८,३४० रुपयांवर गेली. जीएसटीचे दर निश्चित असले तरी मेकिंग चार्जेस प्रत्येक सराफाकडे वेगवेगळे असतात.
जेव्हा तेच दागिने काही वर्षांनी विकले जातात, तेव्हा त्यात होणारे नुकसान स्पष्टपणे दिसते. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५५,००० रुपयांवर पोहोचला असला तरी सराफ साधारणपणे ‘मेल्टिंग’ आणि ‘वेस्टेज’साठी पाच ते आठ टक्के कपात करतात. जर आठ टक्के कपात केली, तर तीच रक्कम १२,४०० रुपये होते. त्याव्यतिरिक्त, चार ते पाच टक्के मार्जिन लावले जाते. हे मार्जिन ६,००० रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. एकूणच, दागिने हॉलमार्क असलेले आणि शुद्ध असले तरीही विक्रेत्याला १० ग्रॅममागे बाजारभावापेक्षा १८ ते २० हजार रुपये कमी मिळू शकतात. जर सोन्यात कमी शुद्धता आढळली, तर ही कपात आणखी १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
तज्ज्ञ सांगतात की, ब्रँडेड शोरूम्समध्ये चांगल्या ‘बायबॅक’ योजना असतात, विशेषतः जर दागिने त्यांच्याकडूनच खरेदी केले असतील तर. अशा परिस्थितीत, मेल्टिंग आणि वेस्टेजची कपात शून्य ते दोन टक्क्यांपर्यंत मर्यादित असू शकते. काही ब्रँड्स सध्याच्या पूर्ण दराने बायबॅकची सुविधाही देतात; पण स्थानिक सराफाकडून घेतलेले सोने ब्रँडेड स्टोअरमध्ये नेल्यास, त्यात शुद्धता आणि प्रक्रियेच्या खर्चाच्या आधारावर कपात होऊ शकते.
गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय काय?
अमित सोनी सांगतात की, गुंतवणुकीसाठी दागिन्यांपेक्षा सोन्याची नाणी हा उत्तम पर्याय आहे. नाण्यांवर सहसा मेकिंग चार्जेस खूप कमी (सुमारे शून्य ते दोन टक्के) असतात. त्याच सोन्याची पुन्हा विक्री करताना किरकोळ मार्जिन वगळता मोठी कपात केली जात नाही. अनेक ब्रँडेड शोरूम्स नाण्यांवर १०० टक्के बायबॅक गॅरंटीदेखील देतात.
सोन्याची किंमत ठरवण्यापूर्वी, सराफ आधी त्याची शुद्धता आणि हॉलमार्क तपासतात. हॉलमार्क नसल्यास सराफ स्वतः शुद्धतेची चाचणी करतात. ब्रँडेड स्टोअर्स शुद्धता तपासण्यासाठी ‘एक्स-रे फ्लोरोसेन्स’ तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यामुळे ही प्रक्रिया लहान स्थानिक दुकानांच्या तुलनेत अधिक पारदर्शक होते.
सोने विकताना काय काळजी घ्यावी?
काही कंपन्या ऑनलाइन सोने खरेदी करून प्रयोगशाळेत त्याची तपासणी करतात. तरीही काही प्रकरणांमध्ये प्रश्न उपस्थित केले गेल्यामुळे सावधगिरी बाळगणे योग्य ठरते. तज्ज्ञांच्या मते, ज्यांनी स्थानिक सराफाकडून दागिने खरेदी केले आहेत त्यांनी ते त्याच दुकानात परत विकण्याचा विचार करावा. कारण आपल्याच दुकानातील दागिन्यांच्या शुद्धतेबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता कमी असते.
जर एखादा सराफ कमी दर देत असेल, तर निर्णय घेण्यापूर्वी सोन्याची खरी शुद्धता समजून घेण्यासाठी दुसऱ्या दुकानात त्याची तपासणी करणे योग्य ठरते. हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करणे आणि बिल जपून ठेवणे भविष्यातील वाद टाळण्यासाठी मदत करते. ब्रँडेड शोरूम्स यासाठी अधिक पारदर्शक मानले जातात आणि जर सोने तिथूनच खरेदी केले असेल, तर त्यांच्या बायबॅक योजना विक्रेत्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात.
गुंतवणुकीसाठी ‘गोल्ड ईटीएफ’चा पर्याय
अर्थतज्ज्ञ शरद कोहली यांच्या मते, शुद्ध गुंतवणुकीसाठी ‘गोल्ड ईटीएफ’ हा एक चांगला पर्याय आहे. त्यांच्या मते, ईटीएफ गुंतवणूकदारांना मेकिंग चार्जेस, साठवणुकीच्या समस्या किंवा शुद्धतेची चिंता नसते. त्यांना मूळ बाजारभावाने सोने खरेदी आणि विक्री करण्याचा पर्याय मिळतो. सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे.
शरद कोहली गुंतवणूकदारांना किमती घसरल्यावर घाबरून न जाण्याचा सल्ला देतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याने १८० रुपयांना गोल्ड ईटीएफ खरेदी केला आणि त्याची किंमत १५० रुपयांवर आली, तर तो तोट्यात विकणे योग्य ठरणार नाही. सोन्यामधील गुंतवणूक तीन ते चार वर्षे टिकवून ठेवल्यास किमती पुन्हा वाढू शकतात आणि नफा मिळू शकतो. त्यांच्या मते, सोन्याच्या बाबतीत अधिक चांगला परतावा मिळवण्यासाठी व्यापाऱ्याऐवजी गुंतवणूकदाराप्रमाणे वागले पाहिजे.
