Sant Sevalal Jayanti 2025: ‘संत सेवालाल महाराज’ यांची आज जयंती आहे. संत सेवालाल महाराज हे प्रत्येक बंजारा कुटुंबासाठी श्रद्धास्थान आहेत. त्यांची जयंती फेब्रुवारी महिन्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अलीकडेच अमृता फडणवीस यांचे ‘मारो बापू देव सेवालाल’ हे गाणं रिलीज झालं. आज साजऱ्या होणाऱ्या त्यांच्या जयंतीनिमित्ताने संत सेवालाल महाराज यांच्याविषयी जनमानसात उत्सुकता दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

संत सेवालाल महाराज कोण आहेत?

गोरबंजारा समाजातील प्रसिद्ध संत म्हणून सेवालाल महाराज ओळखले जातात. त्यांचा जन्म माघ कृष्ण पक्ष सोमवार, दि. १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक व आईचे नाव धरमणी होते. त्यांच्या आई- वडिलांना लग्नाच्या १२ वर्षांनंतरही मुलबाळ नव्हते. पुढे, जगदंबेच्या कृपेमुळे सेवालाल यांचा हा जन्म झाला, अशी बंजारा समाजाची श्रद्धा आहे. सेवालाल महाराजही जगदंबेचे परम शिष्य होते. तरुण असताना त्यांनी जगदंबा देवीला अर्पण करण्यासाठी चिखलापासून शिरा बनवला होता, असे सांगितले जाते.

शहर केले कॉलरामुक्त

हैदराबादमध्ये असताना त्यांनी एकदा संपूर्ण शहर कॉलरामुक्त केले होते, असेही म्हटले जाते. संत सेवालाल यांचे वयाच्या ३३ व्या वर्षी महाराष्ट्रात निधन झाले होते. त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचारी व्रताचे पालन केले. संत सेवालाल महाराज यांच्याकडे आध्यात्मिक गुरू आणि समाजसुधारक म्हणून पाहिले जाते. संत सेवालाल यांच्यावर बंजारा समाजाची विशेष श्रद्धा आहे. कर्नाटक, तेलंगाणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या भागात बंजारा समाज आढळतो. सेवालाल महाराज यांचे श्रीक्षेत्र रुईगड येथे निधन झाले. तर महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबेच्या मंदिराशेजारी आहे.

२०२३ साली वर्षभर जयंतीउत्सव

संत सेवालाल महाराज यांची १५ फेब्रुवारी २०२३ रोजी २८४ वी जयंती होती. या निमित्ताने सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा उत्सव पूर्ण वर्षभर साजरा करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. त्यावेळी केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात ‘संत सेवालाल महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासी, भटक्या जमातीच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांनी बंजारा समाजासह आदिवासी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. संत सेवालाल महाराज यांना आयुर्वेद आणि निसर्गोपचारविषयी सखोल ज्ञान होते,’ असे नमूद केले होते.

पर्यावरणस्नेही क्रांतिसिंह सेवालाल महाराज

क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांनी समाजासाठी दिलेली शिकवण आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला. कारण जंगलांचे अस्तित्व टिकवणे म्हणजेच आपले जीवन टिकवणे होय असे ते मानत. त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये आणि सन्मानाने आयुष्य जगावे यावर भर दिला. इतरांशी वाईट न बोलणे आणि कोणालाही इजा न करणे हेही त्यांच्या शिकवणीचे महत्त्वाचे अंग होते.

स्त्रीसन्मानाचा प्रसार

स्त्रियांबद्दल विशेष सन्मान बाळगावा, मुली या देवीचे स्वरूप आहे, असे ते सांगत. संकटांना निर्भयपणे सामोरे जाण्याचे, तसेच धीराने आणि आत्मविश्वासू जीवन जगण्याचे त्यांनी मार्गदर्शन केले. पाण्याचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असून तहानलेल्यांना पाणीपुरवठा करावा, परंतु पाणी विकणे हे सर्वात मोठे पाप आहे, असे त्यांचे मत होते.

प्राण्यांवर विशेष प्रेम व अंधश्रद्धेला विरोध

वडीलधाऱ्यांचा आदर करावा, तरुणांवर प्रेम करावे आणि प्राण्यांचाही सन्मान करावा, अशी त्यांची शिकवण होती. जंगल सोडू नका आणि ते नष्ट करू नका, कारण जंगल नष्ट करणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा नाश करणे असे त्यांनी ठामपणे सांगितले. मनन केल्याने आंतरिक शांती मिळते, अध्ययन करा, ज्ञान मिळवा आणि ते इतरांमध्ये वाटा, असे ते मार्गदर्शन करत. माणुसकीवर प्रेम करावे, अंधश्रद्धांना दूर ठेवावे आणि जीवन तर्कशुद्ध पद्धतीने जगावे, हा त्यांचा संदेश होता. कुटुंब आणि समाज यांची जबाबदारी पार पाडावी आणि समाजातील बंधुता कधीही भंग करू नये, असे ते शिकवत. धैर्य, मानवता आणि चिंतनशीलता या गुणांचे ते प्रतीक होते.

बुद्धीप्रामाण्यवादी संत

बुद्धीप्रामाण्यवादी संत अशी त्यांची ओळख होती. त्यांनी मार्ग चुकलेल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी जीवनभर मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांनी दिलेली शिकवण आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे विचार समानता, पर्यावरणसंवर्धन, माणुसकी, शिक्षण आणि समाजातील एकात्मता यांवर आधारलेले होते. त्यांनी दिलेली संघर्षमय आणि तत्त्वनिष्ठ जीवनाची शिकवण केवळ बंजारा समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार आणि तत्वज्ञान आजच्या पिढीने आत्मसात करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यांचे पर्यावरण संरक्षण, स्त्री-सन्मान, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक ऐक्य यावरील संदेश आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sevalal maharaj jayanti 2025 banjara song maro dev bapu sevalal by amruta fadnavis sant svs