डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
Secrets of Sex Fitness and how to overcome sexual health issues naturally: आजच्या धावपळीच्या युगात लैंगिक समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. अनेकदा आपण लैंगिक समस्यांसाठी औषधे किंवा टॉनिकच्या मागे लागतो, परंतु ‘सेक्स फिटनेस’ ही संकल्पना औषधांशिवाय निरामय कामजीवनाचा मार्ग दाखवते. जेव्हा मी हठयोगाचा अभ्यास वैद्यकीय दृष्टीने करू लागलो तेव्हा एका कल्पनेचा जन्म झाला तो म्हणजे, सेक्स फिटनेस. हठयोगातील मूलतत्त्वे लक्षात घेऊन त्यांच्यातील वैद्यकीय तथ्ये लक्षात घेऊन सर्वसामान्यांसाठी उपयुक्त अशी वैद्यकीय प्रणाली विकसित केली , ती म्हणजे तांत्रिक सेक्स थेरपी. तंत्रशास्त्रावर आधारित म्हणून तांत्रिक. कुठल्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी ही फायदेशीर ठरू शकते असे माझ्या लक्षात आले.
सेक्स- फिटनेसची संकल्पना
लैंगिक समस्या दूर करण्यासाठीच नाही, तर मुळातच त्या टाळण्यासाठी या फिटनेस थेरपीचा उपयोग होऊ शकतो. आपल्या पूर्वजांच्या या अलौकिक ज्ञानाचा वैद्यकीयदृष्टीने बदल करून केलेला वापर आधुनिक काळातही लाभदायक होऊ शकतो. लैंगिक समस्यांच्या प्रत्यक्ष केसेसमध्ये जेव्हा या तंत्रांचा वापर उत्साहवर्धक जाणवला तेव्हा ही सेक्स-फिटनेसची संकल्पना मी मांडली.
लैंगिक समस्या मानसिक?
ऑक्टोबर १९९७ मध्ये इम्पोटन्स, नपुंसकतेची सहावी आशिया-पॅसिफिक परिषद क्वालालंपूरला झाली. त्यामध्ये नपुंसकतेच्या वैद्यकीय कारणांमध्ये एक नवीन संकल्पना मी मांडली – मस्क्युलर फॅक्टर, सेक्सच्या स्नायूंचा सहभाग. आजवर लैंगिक समस्यांमध्ये शारीरिक कारणांमध्ये केवळ न्युरो-व्हॅस्क्युलर म्हणजे रक्त-मज्जासंस्थेशी संबंधित किंवा हॉर्मोनल म्हणजे सेक्स हॉर्मोनशी संबंधित कारणे सापडली तरच ती शारीरिक लैंगिक समस्या नाहीतर मानसिक आहे, असा वैद्यकक्षेत्रात विचार होता, किंबहुना अजूनही आहे.

मन, विचार आणि भावनांचा पगडा लैंगिक संबंधांवर
लैंगिक समस्या या समस्या असतात, लैंगिक आजार किंवा रोग नाहीत म्हणून त्यासाठी औषधे, सेक्स टॉनिक शोधण्यात वेळ घालवू नये. सेक्स ही यांत्रिकतेने घडणारी क्रिया नाही. दोघांची मने, विचार आणि भावना यांचा पगडा लैंगिक संबंधांवर पडत असतोच. त्यामुळे लैंगिक समस्यांचा विचार सर्वंकष करावा लागतो.
… म्हणून लैंगिंक स्नायूंचा फिटनेस कमी होतो
परंतु, आजवरच्या माझ्या बत्तीस वर्षांच्या व्यावसायिक अनुभवातून बहुतेक लैंगिक समस्यांच्या केसेसमध्ये लैंगिक स्नायू अकार्यक्षम असणे किंवा शीघ्र वीर्यपतन समस्येमध्ये त्यांची प्रतिक्षिप्त क्रिया अतिजलद असणे, स्त्रीच्या लैंगिक स्नायूंच्या अकार्यक्षमतेमुळे, ढिलेपणामुळे विशेषत नैसर्गिक प्रसूतीमुळे ना तिला ना तिच्या जोडीदाराला समाधानकारक आनंद मिळणे अशी महत्त्वाची कारणे आढळली. वाढतं वय, कामसंबंधांमध्ये बराच काळाच्या गॅप्स, रेंगाळलेला मानसिक ताणतणाव (क्रॉनिक स्ट्रेस), मधुमेह, दारू-तंबाखू-धूम्रपानाचे व्यसन, इत्यादी गोष्टींनी लैंगिक स्नायूंचा फिटनेस कमी होत असतो. अशा वैद्यकीय निरीक्षणांमुळे सेक्स-फिटनेस या संकल्पनेचे महत्त्व कामजीवनात तसेच सेक्सच्या समस्यांमध्ये निश्चितच लक्षात येईल.
‘ती’ तंत्रे केजेलने स्वतःची म्हणून सांगितली
‘शिवसंहिता’ वाचताना लक्षात आले की, सेक्सच्या स्नायूंशी संबंधित तंत्रे व्यवस्थितपणे समजावून दिलेली आहेत. त्यातील चतुर्थ पटलातील श्लोक १०१ व १०२ यामधे जी तंत्रे सांगितले आहेत तीच तंत्रे डॉ. अर्नोल्ड केजेल या पाश्चात्य गायनॅकॉलीजिस्टने स्वतःची व्यायाम-तंत्रे म्हणून विसाव्या शतकाच्या मध्यावर (सन १९४८) स्त्रियांसाठी म्हणून प्रसिद्ध केलीत. पण जगाला याचा पत्ताही नव्हता, अजूनही नाही की डॉ.केजेलच्या जन्माच्या कित्येक शतके अगोदरच शिवसंहितेमध्ये विस्तृतपणे सांगितलेली आहेत.
औषधांविना सेक्स फिटनेस
आपल्याकडचेच हे मूळ ज्ञान आता दुसऱ्याच्या नावाने जगप्रसिद्ध होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्यातील कामशास्त्राविषयीचा संकुचित दृष्टिकोन! त्यामुळेच हे सर्व अमूल्य व लोकोपयोगी ज्ञान अडगळीत पडले होते. आदिनाथांची शिवसंहिता, स्वात्मारामरचित हठप्रदीपिका, गोरक्षनाथांची गोरक्षसंहिता यामधेही जी तंत्रे सांगितली आहेत त्यात वैद्यकशास्त्रदृष्ट्या योग्य प्रकारे, काळानुरूप योग्य बदल, आणि सर्व वयातील स्त्री-पुरुषांना अल्प काळातच सहजपणे, सुलभपणे शिकता येतील असा मी तयार केलेला हा औषधांविना असणारा सेक्स फिटनेस थेरपीचा ट्रेनिंग प्रोग्रम, फर्स्ट लाइन थेरपी म्हणून पुष्कळ लैंगिक समस्यांमधे वापरता येऊ शकतो.
‘आयसोटोनिक’ व ‘आयसोमेट्रिक’ व्यायामतंत्रे
यात ‘केजेलची व्यायाम तंत्रे’ नसून आपल्याकडील प्राचीन हठयोगातील बंध व मुद्रांवर आधारित ‘आयसोटोनिक’ व ‘आयसोमेट्रिक’ व्यायामतंत्रेही आहेत व कामसंबंधातील अत्युच्च आनंद स्त्री-पुरुष या दोघांनाही मिळावा म्हणून विकसित केलेली विशिष्ट कामशास्त्रीय तंत्रेही आहेत. आणि कुठल्याही वयातील सर्वसामान्यांना ती शिकता येतील अशी आहेत. प्राचीन भारतीय तंत्रशास्त्राला आधुनिक सेक्सॉलॉजी वैद्यकात मानाचे स्थान देण्याचा हा माझा प्रयत्न आहे हे निश्चित. कुठल्याही वयातील व्यक्ती त्यामुळे सेक्स फिटनेस आणून म्हणू शकेल.. नो सेक्स-रिटायरमेंट, अजून यौवनात मी!
