राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पाकिस्तानी हस्तक शाहजाद भट्टीच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी केली तेव्हा भट्टीच्या कार्यपद्धतीची माहिती जाहीर झाली. एक गुंड ते पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’चा (आयएसआय) हस्तक असलेला शाहजादच्या दहशतवादी गटाचा भारतीय तपास यंत्रणांनी पर्दाफाश केला आहे. आता केंद्र सरकारने शाहजाद भट्टीचा कथित गट ‘दहशतवादी’ घोषित केला आहे. याबाबत अलीकडे अधिसूचना जारी करण्यात आली. याचा अर्थ काय?
अधिसूचनेचा अर्थ काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १६ सप्टेंबर रोजी ‘एक्स’वरील (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘दहशतवादा’विरुद्ध शून्य सहिष्णुतेचे धोरण घोषित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेची अंमलबजावणी करत, केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘शाहजाद भट्टी नेटवर्क’ला दहशतवादी कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करीत आहे. या यादीत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट, कांग्लीपाक कम्युनिस्ट पार्टी, ऑल त्रिपुरा टायगर फोर्स, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम, स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी), पीपल्स वॉर (आणि त्यांच्या सर्व शाखा व आघाड्यांच्या संघटना) आदींचा समावेश आहे. भट्टीच्या नेटवर्कचा मुख्य उद्देश भोळ्या-भाबड्या तरुणांना आणि स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून सीमेपलीकडून शस्त्रे, स्फोटके आणि अमली पदार्थांची तस्करी करणे हा आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या अधिसूचनेमुळे आता संबंधितांविरुद्ध दहशतवाद कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होण्यातील मार्ग मोकळा झाला आहे.
शाहजाद भट्टी कोण आहे?
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मूळचा असलेला शाहजाद भट्टी हा समाजमाध्यमांवर व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता, धार्मिक आणि सामाजिक विषयावरील वक्ता म्हणून वावरत होता. मात्र प्रत्यक्षात तो पाकिस्तानातील कट्टर गुंड होता. पाकिस्तानात त्याच्यावर २०१३पासून चोरी आणि दरोड्याचे अनेक फौजदारी गुन्हे दाखल आहेत. २०१५नंतर बलात्कारासारखे गंभीर गुन्हेही त्यांच्यावर दाखल झाले. त्याच काळात तो दुबईला पळून गेला. दुबईत तो दुग्धव्यवसाय करु लागला. दुबईत असताना त्याचा संबंध बलुचिस्तानात पाळेमुळे असलेल्या फारूक खोकार टोळीशी आला. या टोळीचा तो एक प्रमुख बनला. ३३३ या नावे तो वावरू लागला. धार्मिक विषय तसेच भारत-पाकिस्तान संबंधावर तो वादग्रस्त व्हिडिओ प्रसारीत करु लागला. या मार्गातून त्याने तरुणांना भडकावण्यास सुरुवात केली. यातूनच ‘तेहरिक-ए- तालिबान हिंदुस्तान’ (टीटीएच) या गटामागे शाहजाद असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळू लागली. त्याआधी तो छुप्या पद्धतीने भारतात दहशतवादी कारवाया, अमली पदार्थ तस्करीसाठी तरुणांची भरती करण्यात सक्रिय झाला होता, हेही तपासात उघड झाले.
भट्टीचा संबंध कसा?
फेब्रुवारी २०२६मध्ये गुरदासपूर येथे हत्या करण्यात आलेल्या पंजाब पोलिसांतील दोघा कॉन्स्टेबलच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना पहिल्यांदा ‘तेहरिक-ए-तालिबान हिंदुस्तान’ या आतापर्यंत अपरिचित गटाचे नाव पुढे आले. हा गट स्थापन करण्यामागे भट्टी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. ही पाकिस्तानात कार्यरत असलेली संघटना आहे. यामार्फत भट्टी भारतात सक्रिय झाला. भट्टीने या दोन पोलिसांच्या हत्येची ध्वनिचित्रफित प्रसारीत केल्यामुळे शिक्कामोर्तबत झाले. २४ मे २०२६ रोजी पंजाबमधील आणखी एका पोलिसाची हत्या झाली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे ‘तेहरिक-ए-तालिबान हिंदुस्तान’ या गटाशी म्हणजे भट्टीशी संबंध असल्याचे प्रस्थापित झाले. त्यानंतर या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भट्टीशी संबंधित अनेक तरुणांना ताब्यात घेतले. भट्टीचे भारतातील हस्तक आबिद जट्ट आणि अजमल गुज्जर या दोघांशी या तरुणांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांना पाकिस्तानातील ‘आयएसआय’शी संबंधित हस्तकाकडून आर्थिक पाठबळ पुरविण्यात आल्याची बाब तपासात उघड झाली. हा हस्तक म्हणजे भट्टी असल्याची तपास यंत्रणांची खात्री पटली. त्यानंतर देशभरात भट्टीशी संपर्कात असलेल्या तरुणांची धरपकड सुरु करण्यात आली.
त्याची कार्यपद्धती कशी आहे?
आतापर्यंत पाकिस्तानच्या ‘आयएसआय’शी छुपा संबंध असलेले हस्तक भारतात थेट दहशतवादी कारवाया घडवून आणत होते. भट्टीने भारतीय तरुणांची माथी भडकावून त्यांच्यामार्फत दहशतवादी कारवाया घडविण्याचा मोठा कट आखला होता. (स्टुडन्टस् इस्लामिक मुव्हमेंट ॲाफ इंडियाचा पाकिस्तानी हस्तकांनी बॅाम्बस्फोट घडविण्यासाठी वापर केला होता) त्यासाठी त्याने पद्धतशीरपणे काही भारतीय तरुणांना हाताशी धरले. उत्तर प्रदेशमधील धौलाणा येथील अझिम राणा आणि मेरठमधील आझाद राजपूत यांना तपास यंत्रणेने मार्चमध्ये अटक केली तेव्हा हे दोघेही समाजमाध्यम आणि एनक्रिप्टेड (सुरक्षित/गुप्त) संवाद माध्यमांद्वारे पाकिस्तानातील सूत्रधारांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. धार्मिक स्थळे, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणांशी संबंधित छायाचित्रे, ध्वनिचित्रफित आणि विशिष्ट ठिकाणांची माहिती गोळा करून ती पाठवत होते. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी या आरोपींनी पाकिस्तानातील सूत्रधारांना अनेक ध्वनिचित्रफिती आणि छायाचित्रे पाठवली होती. त्यामध्ये दिल्लीतील सनातन धर्म मंदिर, ग्रेटर नोएडातील रावण मंदिर, रमेश नगर मेट्रो रेल्वे स्थानक आणि इतर अनेक सार्वजनिक ठिकाणांचा समावेश होता. सदर माहिती गोळा करून पुढे पाठवण्यासाठी आरोपींना भरमसाठ आर्थिक मोबदला मिळाला होता. याच तपासात पाकिस्तानातील कथित सूत्रधार शाहजाद भट्टी असल्याचे स्पष्ट झाले.
आतापर्यंत काय कारवाई केली गेली?
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात राबवण्यात आलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत २००हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून शाहजाद भट्टीचे नाव समोर आले आहे. पंजाबी भाषेत संवाद साधणारा आणि इन्स्टाग्राम व फेसबुकवर नियमितपणे व्हिडिओ पोस्ट करणारा भट्टी सध्या संयुक्त अरब अमिरातीमधून आपले सूत्रे हलवतो. गेल्या वर्षभरात त्याने ‘संघटित गुन्हेगारी’कडून ‘दहशतवादाशी कारवायांकडे’ कूच केले आहे. त्याच्या ‘३३३’ ने शेवट होणाऱ्या अनेक इन्स्टाग्राम खात्यांची सुरक्षा यंत्रणांनी दखल घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी भट्टीशी संबंधित १२५ इन्स्टाग्राम खाती बंद केली. ऑक्टोबर २०२५पासून पोलिसांनी १५ गुन्हे नोंदवून ६९ आरोपींना अटक केली. त्यापैकी दोन-तृतीयांश पंजाब आणि उत्तर प्रदेशातील आहेत. यातील बहुतेक अर्धशिक्षित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. आखाती देशांमध्ये स्थलांतर किंवा वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी पैशाचे आमीष दाखवून समाजमाध्यमाद्वारे भरती करण्याची पद्धत वापरली जात आहे. भरती झालेल्या अनेकांना टेहळणी, हल्ले, निधीपुरवठा आणि रसद पुरवठा यांसारखी कामे सोपवली जात. या नेटवर्कविरोधात दिल्ली पोलिसांनी १०८ ठिकाणी छापे टाकून ३५ जणांविरुद्ध कारवाई सुरू केली. ग्रेनेड, पिस्तूल, काडतुसे, पेट्रोल बॉम्ब, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिम कार्ड जप्त केले. भट्टीचा भारतातील गुन्हेगारी कारवायांशी प्रारंभ पंजाबमधून झाला आणि त्याने उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, बिहार, तेलंगण, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि केरळ अशा १४ राज्यांत पसरला. राष्ट्रीय तपास संस्थेने भट्टीचा सहभाग असलेल्या तीन गुन्ह्यांची नोंद केली आहे.
डिजिटल भरती मोड्युल कसे काम करते?
‘पे-पर-टास्क’ (प्रत्येक कामासाठी मोबदला) या आधारावर शाहजाद भट्टीचे मोड्युल कार्यरत होते. समाजमाध्यम, ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्स व एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून प्रामुख्याने तरुणांना सामील करून घेतले जात होते. या तरुणांना सुरुवातीला रेल्वे स्थानके, सरकारी इमारती, लष्करी छावणीचे परिसर आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांची छायाचित्रे काढणे आदी कमी जोखमीची कामे दिली जात असत. त्यानंतर याच तरुणांना मोक्याच्या ठिकाणांची टेहळणी, गुप्त माहिती गोळा करणे आणि प्रचारात्मक कारवायांची जबाबदारी दिली जात होती. या कारवाईमुळे संपूर्ण भारतातील सुमारे ९०० तरुण या मोड्युलमध्ये असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत संवेदनशील ठिकाणे, वाहतूक पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या इतर ठिकाणांची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती असलेले मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. समाजमाध्यमांवरील प्रभाव, आर्थिक प्रलोभने आणि गुप्त माहिती गोळा करण्याच्या कारवाया यांचा मेळ घालणाऱ्या वाढत्या डिजिटल भरती मोड्युलचे उदाहरण म्हणून तपास यंत्रणांनी या पद्धतीचे वर्णन केले आहे. फेब्रुवारी ते जून २०२६ या काळात केलेल्या कारवाईतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. आता ही संघटना दहशतवागी घोषित झाल्याने तपास यंत्रणांचे हात बळकट झाले आहेत.
nishant.sarvankar@expressindia.com
