अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीना बोरा हत्येतील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नात्यांमधील गुंता व त्यातून घडलेल्या या हत्येत अनेक रंजक वळणे आली. स्वत:ची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी मागील जवळपास साडेसहा वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत होती. अखेर सर्वोच्च न्यायालायने शीना बोरा हत्याकांड प्रकरणात तिला दिलासा दिला आणि जामीन मंजूर केला. या प्रकरणाची सुनावणी बराच काळ चालू शकते. हे संपूर्ण प्रकरण केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा खटला लवकर संपणार नाही. प्रदीर्घ काळ तुरुंगात घालवल्यानंतर संशयित आरोपी व्यक्तीला जामिनाचा हक्क आहे, असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही इंद्राणी मुखर्जीला सशर्त जामीन मंजूर करीत आहोत, असे इंद्राणी मुखर्जी यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. पण शीना बोरा हत्या प्रकरण नेमके काय होते?

कोण इंद्राणी मुखर्जी? या प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती?

इंद्राणी मुखर्जी ही शीना बोराची आई आहे. तीच शीनाच्या हत्येतील प्रमुख आरोपीही आहे. ती एका मीडिया ग्रूपची संस्थापक सदस्य होती. इंद्राणीचे पूर्वीचे नाव पोरी बोरा. उद्योगपती पीटर मुखर्जीसोबत लग्न केल्यानंतर तिने मुखर्जी आडनाव लावण्यास सुरुवात केली. एचआर विभागात कामाला सुरुवात करणाऱ्या इंद्राणीने कमी कालावधीत उद्योग क्षेत्रात आपले नाव कमावले होते. मीडिया एग्झेक्युटीव्ह असलेल्या इंद्राणीचे वैयक्तिक जीवन खूप गुंतागुंतीचे होते. इंद्राणीने एकूण तीन लग्ने केली. पहिले लग्न सिद्धार्थ दासशी केले. सिद्धार्थ व इंद्राणीला शीना आणि मिखाईल ही दोन मुले होती. पुढे इंद्राणी व सिद्धार्थमध्ये घटस्फोट झाल्यानंतर इंद्राणी आई-वडिलांसोबत कोलकात्याला रहायला लागली. दोन्ही मुले इंद्राणीच्या आई-वडिलांकडेच लहानाची मोठी झाली. पुढे इंद्राणीने संजीव खन्नासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव विधी. पण इंद्राणी व संजीवचे लग्नही फार काळ टिकले नाही. त्यानंतर इंद्राणीने मुंबई गाठली. हेच पाऊल इंद्राणीच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. प्रसिद्धी माध्यम क्षेत्रात ती नावारुपाला आली. त्यावेळी उद्योगपती पीटर मुखर्जी तिच्या जीवनात आला. दोघांनीही लग्न केले. आता इंद्राणी तिच्या व्यावसायिक जीवनाच्या उच्च पातळीवर पोहोचली होती. तिसऱ्या लग्नानंतर इंद्राणीने पहिल्या पतीपासून झालेल्या मोठ्या मुलीला अर्थात शीनाला मुंबईत आणले. शीनाचे पुढचे शिक्षण मुंबईतच झाले. ती कामालाही लागली. सर्व ठीक सुरू होते. पण इंद्राणीने शीना तिची बहीण असल्याचे पीटरला सांगितले होते.

शीनाची हत्या

वयाच्या २४ व्या वर्षी म्हणजे २०१२ मध्ये शीना बोराची हत्या झाली. पण २०१५ मध्ये या प्रकरणाचा गुंता सुटला. त्या काळात राकेश मारिया मुंबईचे पोलीस आयुक्त होते. इंद्राणी मुखर्जीचा चालक श्याम राय मुंबई पोलिसांच्या हाती लागला. पिस्तुल ठेवल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या रायने सर्व प्रकरण पोलिसांसमोर उघड केले. मारिया यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्याचा खुलासा केला आहे. रायने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची गाडीतच गळा आवळून हत्या करण्यात आली. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तिची आई इंद्राणी मुखर्जीची मदत केली होती. मृतदेह बॅगेत भरून तो गाडीत ठेवण्यात आला. गाडी काही काळ वरळीतील गॅरेजमध्ये ठेवण्यात आली. रायगडमध्ये मृतदेह फेकण्यात आला. यात इंद्राणी मुखर्जीचा पूर्व पती संजीव खन्नाही सहभागी होता. या दाव्यांची पडताळणी शीनाचा मृतदेह रायगडमधील गागोदे गावाजवळ एका ठिकाणी टाकण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. पोलिसांनी ते अवशेष गोळा करून न्यायवैधक चाचणीसाठी पाठवले होते. याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला मदत केल्याप्रकरणी सीबीआयने पीटर मुखर्जी यालाही अटक केली. पीटर याला २०२० मध्ये जामीन मिळाला आहे.

हत्येचे नेमके कारण काय?

शीना बोराची पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल याच्यासोबतची जवळीक ही या हत्येचे प्रमुख कारण मानले जाते. दोघे एकमेकांच्या फार जवळ आले होते. आपण एकमेकांचे सावत्र बहीण-भाऊ आहोत, याची त्यांना तेव्हा कल्पनाही नव्हती. पण इंद्राणीच्या ते लक्षात आले होते. शीनाची राहुलसोबतची जवळीक कदाचित पीटर मुखर्जी यालाही पसंत नव्हती. तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या पुस्तकानुसार, शीनाची राहुलसोबतची जवळीक इंद्राणीच्या साम्राज्याला धक्का देऊ शकत होती. त्यामुळे इंद्राणीने शीना आणि मुलगा मिखाईलची हत्या करण्याचे ठरवले होते. ती बेपत्ता झाल्यानंतर शीना स्वतःहून निघून गेल्याचे राहुल व मिखाईलला सांगण्यात आले होते. त्यासाठी शीनाच्या नावाने ईमेलही करण्यात आले. त्यामुळे शीनाला कोणीही शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मारिया त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांनी शीरा बोरा प्रकरणात तीन वेळा खार पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींची चौकशी केली. पुढे याप्रकरणादरम्यानच मारिया यांना बढती देऊन मुंबई पोलीस दलातून हटवण्यात आले. त्या काळात हे प्रकरण खूप गाजले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheena bora murder case prime curprit indrani mukharjee got bail print exp pmw
First published on: 19-05-2022 at 09:09 IST