बांगलादेशात हल्लीच झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर पुन्हा एकदा भारतीय उपखंडातील महिला नेत्यांचे राजकारणातील स्थान, त्यांनी राजकारणाला दिलेल्या दिशा आणि त्यावर उमटवलेला ठसा हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांपैकी केवळ बांगलादेशात शेख हसीना यांच्या रूपाने महिला राष्ट्रप्रमुख होत्या. ती परिस्थिती आता बदलली आहे. यामुळे श्रीलंकेच्या सिरिमाओ बंदरनायके यांचा अपवाद वगळता अन्य महिला राष्ट्रप्रमुखांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आल्याचे दिसते.

उपखंडातील महिला राष्ट्रप्रमुख

सिरिमाओ बंदरनायके यांनी १९६० साली श्रीलंकेच्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा जगातील पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली होती. भारतीय उपखंडासाठी ही अर्थातच फार महत्त्वाची बाब होती. त्याचे पडसाद आजूबाजूच्या देशांमध्येही पडले. भारतामध्ये १९६६ साली इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी सत्तेवर मजबूत पकडही मिळवली. केवळ भारत, भारतीय उपखंडच नाही तर जगभरातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचे मजबूत स्थान होते. बेनझीर भुत्तो यांनी १९८८मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेताना जगातील पहिल्या मुस्लीम महिला राष्ट्रप्रमुख होण्याचा मान मिळवला. त्यानंतर तीनच वर्षांमध्ये बांगलादेशात ‘महिला राज’ सुरू झाले, ते परवापर्यंत कायम होते. १९९१मध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या बेगम खालिदा झिया पंतप्रधान झाल्या. त्यानंतर १९९६मध्ये शेख हसीना सत्तेवर आल्या. मधल्या काळात मुहम्मद हबीबुर रहमान, लतीफुर रहमान, इयाजुद्दीन अहमद, फजलुल हक आणि फखरुद्दीन अहमद यांनी अधूनमधून मुख्य सल्लागार म्हणून देशाचा कारभार पाहिला. पण खरी सत्ता बेगम खालिदा झिया आणि शेख हसीना यांच्याच हातात राहिली.

हेही वाचा >>>विश्लेषण: इथेनॉल मिश्रणाचे २० टक्के उद्दिष्ट साध्य होईल?

इंदिरा गांधी आणि बेनझीर भुत्तो

तसे पाहायला गेले तर, इंदिरा गांधी आणि बेनझीर भुत्तो यांच्यामध्ये एका पिढीचे अंतर आहे. इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी व बेनझीर भुत्तो हे खऱ्या अर्थाने समकालीन होते. पण राजीव गांधी यांच्या हत्येमुळे त्यांची राजकीय कारकीर्द अल्प ठरली. त्या तुलनेने बेनझीर भुत्तो यांनी अधिक संघर्ष केला. इंदिरा गांधी साठीच्या दशकात भारतामध्ये आणि बेनझीर भुत्तो ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात पाकिस्तानात सत्तेवर आल्या. त्यांच्यात साम्यही बरेच होते. दोघींचे वडील पंतप्रधान होते, दोघींच्या व्यक्तिमत्त्वाचा दरारा होता, पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्री असण्याचे काही तोटे असले तरी ते न दाखवता खंबीरपणे आपापल्या देशातील जनतेमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. बेनझीर यांना इंदिरा गांधी यांच्याइतका पल्ला गाठता आला नाही, पण त्यांची दिशा मात्र इंदिरा गांधींच्या मार्गाने होती. त्याचवेळी त्यांच्या क्षमतेमध्ये आणि मिळालेल्या यशामध्ये बराच फरकही दिसून येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंदिरा गांधी यांनी जे स्थान मिळवले ते बेनझीर भुत्तो यांना मिळवता आले नाही. तिसऱ्या जगाचे नेतृत्व करू पाहणारा भारत आणि मुस्लिम जगतात आघाडीचे स्थान मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणारा पाकिस्तान या देशांच्या प्राधान्यक्रमांच्या फरकाचाही हा परिणाम होता. आपल्या नेतृत्वगुणांमुळे अनेकांना प्रेरणा देणाऱ्या या दोन्ही नेत्यांचा अंत हिंसक पद्धतीने झाला. १९८४मध्ये दहशतवाद्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली. तर, २००७च्या अखेरीस बेनझीर भुत्तो यांचाही दहशतवादी हल्ल्यामध्ये करूण अंत झाला.

बांगलादेशातील सत्तासंघर्ष

बांगलादेशात १९९१पासून, म्हणजे जवळपास ३५ वर्षे बेगम खालिदा झिया आणि शेख हसीना यांची आलटूनपालटून सत्ता राहिली आहे. दोघीही राजकीय घराण्यातीलच आहेत. शेख हसीना यांचे वडील शेख मुजीब उर रहमान बांगलादेशचे संस्थापक नेते व पंतप्रधान होते. तर खालिदा झिया यांचे पती झिया उर रहमान बांगलादेशचे अध्यक्ष होते. दोघींच्या परराष्ट्र धोरणात बराच फरक आहे. शेख हसीना या भारत मित्र म्हणून ओळखल्या जातात तर खालिदा झिया यांना भारताविषयी विशेष प्रेम नाही. दोन्ही नेत्यांदरम्यान प्रचंड ईर्षा आणि स्पर्धा आहे. त्यातूनच खालिदा झिया यांना उतारवयात प्रकृती बिघडलेली असतानाही तुरुंगवास सहन करावा लागला. शेख हसीना सलग चौथ्यांदा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, देशवासियांच्या रोषामुळे सत्तेवरून पायउतार होत देश सोडावा लागला.

हेही वाचा >>>ऑलिम्पिक पदकांची खरी किंमत किती? २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक पदकांमध्ये काय वेगळेपण होते?

महिलांच्या परिस्थितीत काय फरक? 

चारही महिला नेत्यांमधील एक महत्त्वाचे साम्य असे दिसते की, त्यांनी तीन गरीब, पारंपरिक पितृसत्ताक पद्धतीला मान्यता असणाऱ्या देशांचे नेतृत्व केले. मात्र, आपापल्या देशांमध्ये महिलांच्या स्थानामध्ये फार बदल त्यांना घडवता आला नाही. किंबहुना, प्रचलित पितृसत्ताक पद्धतीनुसार त्यांनी आपापले राजकी डावपेच वापरले. भारत, पाकिस्तान, बांगलादेश किंवा श्रीलंका यापैकी कोणत्याही देशांमध्ये महिलांसाठी राखीव जागा किंवा समान संधी उपलब्ध झाल्या नाहीत. नेपाळमध्ये आतापर्यंत एकही महिला पंतप्रधान झाली नाही मात्र त्यांच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार महिलांना ३३ टक्के आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, त्याचा फायदा राजकीय घराण्यातील किंवा श्रीमंत घराण्यातील महिलांनाच अधिक होत आहे अशी टीका केली जात आहे.

nima.patil@expressindia.com