बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सोमवारी (५ ऑगस्ट) देशातून पलायन केले आणि त्या आता भारताच्या आश्रयाला आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकेर उज झमान यांनी, पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्याचे जाहीर केले. तसेच, आता लष्कराच्या मदतीने अंतरिम सरकार लवकरच स्थापन केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली. बांगलादेशमधील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला १ जुलैपासून सुरुवात झाली होती. बांगलादेश उच्च न्यायालयाने देशाच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्यांच्या वंशजांसाठी सरकारी नोकरीमध्ये ३० टक्के आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्हणून काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने आकार घेतला आणि त्याची परिणती आता पंतप्रधानांनी देशातून परागंदा होण्यामध्ये झाली आहे. मात्र, हे विद्यार्थी आंदोलन निमित्तमात्र आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शेख हसीना यांच्या राजवटीविरोधात खदखदत असलेल्या असंतोषाचा तो परिपाक असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. गेल्या जानेवारीमध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. देशातील विरोधक आणि माध्यमांना मोडीत काढून निरंकुश सत्ता चालवल्याचा आरोप शेख हसीना यांच्यावर होत आहे. बांगलादेशच्या राजकारणामधील प्रमुख राजकीय खेळाडू कोण आहेत, याविषयी माहिती घेऊयात. हेही वाचा : राजकीय आश्रय म्हणजे काय? शेख हसीना लंडनमध्ये आश्रय का मागत आहेत? शेख हसीना शेख हसीना (वय ७६) या बांगलादेशमधील प्रमुख राजकीय पक्ष अवामी लीगच्या प्रमुख नेत्या आहेत. त्यांचे दिवंगत वडील शेख मुजिबूर रहमान हे 'बंगबंधू' नावाने प्रसिद्ध असून, त्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानबरोबर १९७१ साली युद्ध झाल्यानंतर शेख मुजिबूर रहमान हे पहिल्यांदा बांगलादेशचे पंतप्रधान झाले. त्यानंतर १५ ऑगस्ट १९७५ रोजी रहमान यांची लष्करातील एका गटाकडून हत्या करण्यात आली होती. रहमान यांच्या दोन मुली म्हणजेच शेख हसीना व शेख रेहाना या जर्मनीमध्ये असल्याने या हल्ल्यातून बचावल्या होत्या. या वर्षी जानेवारीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्या पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून सत्तेवर परतल्या. ३०० सदस्यसंख्या असलेल्या बांगलादेशच्या संसदेमध्ये त्यांच्या पक्षाने २२३ जागा मिळवण्यामध्ये यश प्राप्त केले. १९९६ साली पहिल्यांदा त्या बांगलादेशच्या पंतप्रधानपदी आल्या होत्या. शेख हसीना यांचा भारताबरोबर चांगला स्नेह होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेशचे राजकीय संबंध चांगले राहिले होते. भारत-बांगलादेश सीमेवर कार्यरत असलेल्या भारतविरोधी दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेनेखील विशेषतः वस्त्रोद्योगामध्ये उच्च विकासाचा दर नोंदविला आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये अर्थव्यवस्थेतील महिलांचा सहभागही वाढत्या प्रमाणात दिसून आला. मात्र, बांगलादेशमधील नुकतीच झालेली सार्वत्रिक निवडणूक नि:पक्षपाती पद्धतीने झाली नसल्याची चिंता अमेरिकेसहित इतर काही पाश्चात्त्य देशांनी व्यक्त केली होती. अवामी लीग (AL) मुस्लीम लीगमधून फुटलेल्या गटाने १९४९ साली अवामी लीगची स्थापना केली होती. या अवामी लीगनेच विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अखेरीस बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. बांगलादेश हा भाषिक अस्मितेच्या जोरावरच पाकिस्तानपासून वेगळा झाला होता. पाकिस्तानचा भाग असलेल्या बांगलादेशमध्ये उर्दू भाषेची सक्ती होऊ लागल्यानंतर भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर वेगळ्या राष्ट्राची मागणी जोर धरू लागली होती. या सगळ्या घटनाक्रमामध्ये अवामी लीगनेच पुढाकार घेतला होता. आधी पूर्व पाकिस्तान प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशला पाकिस्तानकडून पुरेसे अधिकार दिले जात नव्हते. या कारणावरूनच बांगलादेशने अवामी लीगच्या पुढाकारामध्ये स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. १९७१ साली स्वतंत्र झाल्यानंतर बंगबंधू देशाचे पंतप्रधान झाले. मात्र, १९७५ साली त्यांची हत्या करण्यात आली. १९८० च्या दशकात बांगलादेशमधील प्रमुख राजकीय पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली किंवा त्यांना फाशी देण्यात आली. या कालावधीमध्ये संपूर्ण देशात राजकीय अस्थैर्य माजले होते. १९८१ साली हसीना या अवामी लीग पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्या होत्या. बांगलादेशमध्ये खलेदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) हा पक्षदेखील प्रमुख राजकीय पक्ष होता. हा पक्ष पुराणमतवादी, मध्य-उजवा राजकीय पक्ष मानला जातो. १९९० ते २००९ या कालावधीमध्ये अवामी लीग आणि बीएनपी या पक्षांची आलटून-पालटून सत्ता येत राहिली. एकीकडे अवामी लीग हा पक्ष धर्मनिरपेक्ष मानला जातो; तर बीएनपी हा पक्ष पुराणमतवादी मानला जातो. बीएनपी पक्षाने वेळोवेळी जमात-ए-इस्लामी यांसारख्या कट्टर धार्मिक पक्षांशीही संधान बांधले आहे. खरेदा झिया आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) १९९१ साली सत्तेवर आलेल्या खलेदा झिया (वय ७९) या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या. त्यांचे पती झियाउर रहमान हे १९७७ ते १९८१ या काळात देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची हत्या झाल्यानंतर खलेदा झिया यांनी सक्रिय राजकारणामध्ये उडी घेतली. १९७८ साली रहमान यांनी बीएनपी पक्षाची स्थापना केली होती. २००१ ते २००६ या कालावधीमध्येही झिया बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. बीएनपीला स्थापनेनंतर चांगला प्रतिसाद मिळाला होता. विशेषत: विद्यार्थी राजकारणामधून हा पक्ष आपली चांगली पकड ठेवून होता. मात्र, खलेदा झिया यांना तुरुंगवास झाल्यानंतर त्या लोकांच्या नजरेमधून दूर गेल्या आहेत. त्यामुळे नंतरच्या काही वर्षांमध्ये खलेदा झिया यांची लोकप्रियता कमी झाली. २०१८ साली भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली खलेदा झिया यांना तुरुंगवास झाला. त्यांच्यावरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून झाल्याचा आरोपही झाला होता. २०२० साली आरोग्याच्या कारणास्तव खलेदा झिया यांना तुरुंगाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली. अलीकडच्या काही वर्षांमध्ये खलेदा झिया आपल्या आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत असून, त्या बरेचदा उपचारांसाठी परदेशी जाताना दिसतात. त्यांचा मुलगा तारिक रहमान २००८ पासून ब्रिटनमध्ये स्थायिक असून, त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. जानेवारी २०२४ साली झालेल्या निवडणुकीमध्ये अवामी लीग पक्षाने हेराफेरी केल्याचा आरोप करीत बीएनपी पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. बांगलादेशमधील सध्याच्या आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनाला बीएनपी पार्टी आणि त्यांची छात्र दल नावाची विद्यार्थी संघटना भडकवत असल्याचा आरोप सत्ताधारी अवामी लीग पक्षाने केला होता. हेही वाचा : बांगलादेशमधील अस्थिरता, शेख हसीना यांनी देश सोडल्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ; काय आहेत कारणं? जमात-ए-इस्लामी १९७५ साली जमात-ए-इस्लामीची स्थापना झाली होती. हा पक्ष बांगलादेशातील सर्वांत मोठा इस्लामिक पक्ष मानला जातो. या पक्षाने वेळोवेळी बीएनपी पक्षाबरोबर संधान साधत राजकारण केले आहे; मात्र या पक्षावर २०१३ पासून निवडणुकीमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशची धर्मनिरपेक्ष राज्यघटना न मानणारी ध्येयधोरणे जमात-ए-इस्लामी पक्षाच्या घटनेमध्ये असल्याच्या कारणास्तव या पक्षावर बंदी घालण्यात आली आहे. हा पक्ष कट्टर धर्मांध राजकीय पक्ष मानला जातो. या पक्षावर निवडणूक लढविण्यावर बंदी घातली गेली असली तरीही हा पक्ष राजकीय कृती कार्यक्रम, तसेच सभा आणि बैठकाही घेऊ शकत होता. सध्याच्या विद्यार्थी आंदोलनाच्या आगीमध्ये तेल ओतण्याचे काम जमात-ए-इस्लामी पक्ष आणि त्यांच्या छात्र शिबीर या विद्यार्थी संघटनेने केल्याचा आरोप अवामी लीग पक्षाने केला आहे. गेल्याच आठवड्यात सरकारने या पक्षावर बंदी घातली आहे. जातीय पार्टी निवृत्त लष्कर अधिकारी हुसैन मुहम्मद ईर्शाद यांनी १ जानेवार, १९८६ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ते बांगलादेश लष्कराचे प्रमुख होते. त्यांनी १९८२ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांचे उपराष्ट्राध्यक्ष अब्दुल सत्तार यांना सत्तेवरून हटविणाऱ्या बंडाचे नेतृत्व केले होते. ढाका ट्रिब्युनच्या माहितीनुसार, ईर्शाद यांचा बांगलादेशच्या राजकारणावर तीन दशकांपासून प्रभाव होता. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्या काळात जातीय पार्टीने कधी अवामी लीगबरोबर, तर कधी बीएनपीबरोबर युती केली होती. २०१९ साली ईर्शाद यांचा मृत्यू झाल्यानंतर या पक्षाला उतरती कळा लागली आहे. सध्या या पक्षाचे फक्त वायव्य भागातच प्राबल्य उरले आहे. सध्या या पक्षाचे १३ खासदार संसदेमध्ये आहेत.