Shekhar Suman Prolonged Grief Disorder symptoms: अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा आयुष याचे निधन ‘एंडोमायोकार्डियल फायब्रोसिस’ (Endomyocardial Fibrosis) या दुर्मीळ आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजारामुळे झाले होते. या दुःखद घटनेला ३१ वर्षे झाली आहेत. तरीही शेखर सुमन हे त्या धक्क्यातून अद्याप पूर्णपणे सावरलेले नाहीत. त्यामुळे जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर काळाच्या ओघात दुःख आपोआप कमी होतेच असे नाही, हे त्यांच्या अनुभवातून समजते. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. मोनिका चिब यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर होणाऱ्या दुःखातून सावरण्यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नसते. प्रत्येक व्यक्तीचा हा अनुभव वेगळा असतो.”

जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर एखादी व्यक्ती काही काळाने दैनंदिन आयुष्यात पुन्हा पहिल्यासारखी वागू लागते, कामावर जाते आणि नेहमीच्या जबाबदाऱ्या पार पडते. मात्र, याचा अर्थ असा अजिबातच नाही की, प्रिय व्यक्तीच्या विरहाचे दुःख आता विरले आहे. जवळच्या व्यक्तीचे निधन होते, तेव्हा आपण केवळ त्या व्यक्तीला गमावत नाही, तर तिच्याबरोबर जोडलेल्या अनेक गोष्टी हळुहळू स्मृतीतून अस्तंगत होत जातात. एकत्र घालवलेले क्षण, रोजच्या सवयी, भावनिक आधार आणि भविष्यातील योजना या सर्वांवर मोठा आघातच झालेला असतो.

फाइव्ह स्टेजेस ऑफ ग्रीफ

मानसशास्त्रातील प्रसिद्ध संशोधक डॉ. एलिझाबेथ कुबलर-हॉस (Elisabeth Kübler-Ross) यांनी १९६९ मध्ये मांडलेल्या ‘फाइव्ह स्टेजेस ऑफ ग्रीफ’ (5 Stages of Grief) या सिद्धांतानुसार, “दुःखातून सावरणे ही एकरेषीय प्रक्रिया नसते. एखादी व्यक्ती सर्व टप्पे पार करून पुढे गेली, तरीही जुन्या आठवणी तिला पुन्हा दुःखाच्या पहिल्या टप्प्यावर आणू शकतात.”

सवयी दुःखात बदलतात

अभिनेते शेखर सुमन यांच्या मोठ्या मुलाचे (आयुष) १९९५ मध्ये वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी निधन झाले. एखाद्या आई-वडिलांनी मूल गमावले, तर त्यांचे दुःख केवळ निधनापुरते मर्यादित राहत नाही. मुलाच्या भविष्याबद्दल पाहिलेली स्वप्ने आणि त्याच्याबरोबर अनुभवायचे क्षण कायमचे अपूर्ण राहतात. तसेच, जोडीदाराच्या निधनानंतर रोजच्या साध्या गोष्टीही त्याची आठवण करून देतात. एकत्र जेवणे, फिरायला जाणे किंवा गप्पा मारणे या सवयी अचानक दुःखात बदलतात.

दुःख आयुष्याचा एक भाग

मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचाही मनावर परिणाम होतो. अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. तर दुसरीकडे, दीर्घकाळ आजारी असलेल्या व्यक्तीची काळजी घेताना कुटुंबाला सतत चिंता आणि मानसिक थकवा सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक वर्षांनंतरही आठवण येणे म्हणजे व्यक्ती सावरण्यात अपयशी ठरली असा अर्थ होत नाही. काळानुसार दुःखाची तीव्रता कमी-अधिक होऊ शकते. मात्र, ते दुःख आयुष्याचा एक भाग म्हणून राहते.

प्रत्येक व्यक्ती दुःखाला वेगवेगळ्या पद्धतीने का सामोरी जाते?

दुःखातून सावरण्याची प्रक्रिया प्रत्येकासाठी वेगळी असते. काही लोक आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतात, तर काही जण शांत राहतात किंवा स्वतःला कामात गुंतवून घेतात. बाहेरून व्यक्ती कशी दिसते, यावरून तिच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज लावता येत नाही.

परिस्थितीनुसार दुःखाचे स्वरूप बदलते

परिस्थितीनुसार दुःखाचे स्वरूपही बदलते. घरातील लग्न, सण-उत्सव किंवा एखादे यश अशा प्रसंगी प्रिय व्यक्तीची उणीव जास्त जाणवते. आनंदाच्या क्षणी ती व्यक्ती सोबत नाही, ही जाणीव पुन्हा दुःखाला वाट करून देते. भारतात सण आणि कौटुंबिक परंपरांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे अशा प्रसंगी प्रिय व्यक्तीची अनुपस्थिती अधिक तीव्रतेने जाणवते. एखादी व्यक्ती जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आनंदी आहे. मात्र, एखाद्या विशिष्‍ट दिवशी ती पुन्हा हळवी होऊ शकते. याचा अर्थ तिची मानसिक प्रगती वाया गेली असा होत नाही.

दुःखातून सावरण्यासाठी काय करता येईल?

लेखक आणि दुःख/शोक विषयातील तज्ज्ञ डेव्हिड केसलर (David Kessler) यांनी त्यांच्या ‘फाइंडिंग मिनिंग: द सिक्सथ स्टेज ऑफ ग्रीफ’ (Finding Meaning: The Sixth Stage of Grief) या प्रसिद्ध पुस्तकात म्हटले आहे की, “प्रिय व्यक्तीच्या जाण्यानंतर स्वतःला पुन्हा आनंदी ठेवणे म्हणजे त्या व्यक्तीचा अपमान नव्हे, तर त्यांच्या आठवणींना दिलेल्या सन्मानाचे ते प्रतीक आहे.”

स्वतःच्या भावना स्वीकारा

कुटुंबासाठी खंबीर राहण्याच्या प्रयत्नात अनेक जण दुःख दडपून ठेवतात. भावना दाबण्याऐवजी त्या स्वीकारणे गरजेचे आहे. विश्वासू व्यक्तीशी बोलणे, भावना लिहून काढणे किंवा स्वतःला वेळ देणे फायदेशीर ठरते.

दैनंदिन दिनचर्या कायम ठेवा

दुःखाचा परिणाम झोप, भूक आणि एकाग्रतेवर होतो. त्यामुळे नियमित जेवण, पुरेशी विश्रांती आणि थोडा वेळ चालणे यांसारख्या साध्या सवयींनी आयुष्याला पुन्हा शिस्त आणि स्थैर्य मिळते.

प्रिय व्यक्तीच्या आठवणी जपा

फोटो पाहणे, आठवणी सांगणे किंवा त्या व्यक्तीशी जोडलेली एखादी चांगली परंपरा पुढे सुरू ठेवणे यामुळे मनाला शांतता मिळते. आठवणी जपण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते.

दुःख व्यक्त करण्याच्या इतरांच्या पद्धतीचा आदर करा

एकाच घरातील व्यक्तींची दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. एखाद्याला त्याबद्दल बोलायला आवडते, तर दुसऱ्याला शांत राहायला आवडते. त्यामुळे प्रत्येकाला काय हवे आहे, हे विचारून मदत करावी.

स्वतःला पुन्हा आनंदी होण्याची परवानगी द्या

पुन्हा हसणे, छंद जोपासणे किंवा भविष्याचे नियोजन करणे यामुळे अनेकांना अपराधी वाटू शकते. परंतु, आनंदी राहणे म्हणजे प्रिय व्यक्तीला विसरणे नव्हे. दुःख आणि आनंद हे दोन्ही एकाच वेळी आयुष्यात असू शकतात.

मानसोपचारतज्ज्ञांची मदत कधी घ्यावी?

दीर्घकाळ दुःख टिकून राहणे म्हणजे मानसिक आजार झाला असा होत नाही. मात्र, हे दुःख असह्य झाले आणि रोजचे आयुष्य जगणे कठीण झाले, तर तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक ठरते. सतत अपराधीपणाची भावना, चिंता, झोपेच्या समस्या किंवा दीर्घकाळ निराशा वाटणे ही याची लक्षणे आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात याला ‘प्रोलाँग्ड ग्रीफ डिसऑर्डर’ (Prolonged Grief Disorder) असे म्हणतात. यात निधन झालेल्या व्यक्तीची तीव्र ओढ सतत जाणवते आणि दैनंदिन कामांवर वाईट परिणाम होतो. अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असते.

कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर प्रोलाँग्ड ग्रीफच्या (Center for Prolonged Grief) संचालक डॉ. एम. कॅथरीन शिअर (Dr. M. Katherine Shear) यांच्या संशोधनानुसार, “आपल्या जवळच्या व्यक्तीचे दुःख हे काळाबरोबर पूर्णत: संपत नाही, तर आपण त्या दुःखाच्या भोवती आपले नवीन आयुष्य जगायला शिकतो.” तसेच, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि DSM-5-TR (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders) यांनी ‘प्रोलाँग्ड ग्रीफ डिसऑर्डर’ला एक स्वतंत्र मानसिक आरोग्य स्थिती म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे.

दुःखात असलेल्या व्यक्तीला कशी मदत करावी?

प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ सी. एस. लुईस (C.S. Lewis) यांनी त्यांच्या ‘अ ग्रीफ ऑब्झर्व्ड’ (A Grief Observed) या पुस्तकात दुःखाचे वर्णन करताना म्हटले आहे की, “जवळच्या व्यक्तीचे जाणे म्हणजे शरीराचा एखादा अवयव गमावल्यासारखे आहे. जखम भरून येते, पण त्या अवयवाची जागा आयुष्यभर रिकामीच राहते.”

अशा वेळी ‘झाले ते झाले, आता पुढे चला’ असा सल्ला देणे टाळावे. यामुळे दुःखी व्यक्तीला आपले दुःख कोणी समजून घेत नाही असे वाटू शकते. त्याऐवजी तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या आणि भावनिक आधार द्या. पहिल्या काही आठवड्यांनंतरही तिची विचारपूस करत राहा आणि महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. तिला बोलायचे असल्यास ऐकून घ्या आणि एकटे राहायचे असल्यास तिच्या इच्छेचा आदर करा.