Shiv sena Party Split History : सत्ता, संघर्ष आणि बंडखोरी ही बाब महाराष्ट्रातील राजकारणासाठी काही नवीन नाही; पण शिवसेनेच्या बाबतीत मात्र हा संघर्ष नेहमीच जास्त चर्चिला गेला आहे. ‘एकसंध आणि शिस्तबद्ध पक्ष’, अशी ओळख असलेल्या शिवसेनेत गेल्या काही दशकांत अनेक बंडे झाली. या बंडांनी महाराष्ट्राच्या सत्तेची समीकरणे तर बदललीच; पण पक्षांतर्गत रचनेलाही मोठे धक्के दिले. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक ते राज ठाकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच शिवसेनेला राम राम केला होता. त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकसंध शिवसेनेची दोन गटांत विभागणी झाली. सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा मोठे बंड होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील बंडखोरीच्या इतिहासाचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
शिवसेनेच्या स्थापनेचा इतिहास
१९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर या पक्षाने आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली. मराठी माणूस आणि भूमिपुत्रांना न्याय हाच शिवसेनेचा मुख्य अजेंडा होता. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला, जिथून बाळासाहेबांच्या शब्दाला शिवसैनिकांसाठी आदेशाचे स्वरूप आले. हळूहळू शिवसेनेने मुंबई आणि ठाण्यात आपले पाय रोवायला सुरुवात केली. १९६८ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ४२ जागा जिंकून सर्वांना धक्का दिला. त्याशिवाय ठाणे पालिकेवरही शिवसेनेचा भगवा फडकला. कम्युनिस्ट पक्षांचा मुंबईवरील प्रभाव मोडून काढण्यात शिवसेनेने महत्त्वाची भूमिका बजावली.
शिवसेनेचा विस्तार कसा झाला?
१९८० च्या दशकात बाळासाहेबांनी शिवसेनेच्या राजकारणाची दिशा बदलली. केवळ ‘मराठी’ या मुद्द्यावरून पक्ष राज्यभर पसरू शकत नाही, हे ओळखून त्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. १९८५ मध्ये मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनेने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवले. पुढे १९८९ साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपाची ऐतिहासिक युती झाली. बाळासाहेब ठाकरे हे या युतीचे मुख्य मार्गदर्शक होते. याच काळात शिवसेनेने ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. विशेष म्हणजे, बाळासाहेबांनी स्वतः कधीही कोणतेही सरकारी पद घेतले नाही. ते फक्त मुंबईतील आपल्या मातोश्री निवासस्थानावरून शिवसैनिकांना आदेश देत होते.
शिवसेनेतील बंडाला सुरुवात कशी झाली?
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावशाली नेतृत्वाच्या काळातही शिवसेनेला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागला. १९९१ मध्ये मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी शिवसेनेत पहिले मोठे बंड केले. त्यावेळी पक्षातील जवळपास १८ आमदारांना घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९९९ मध्ये गणेश नाईक आणि २००५ साली नारायण राणे यांनीही शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. लागोपाठ झालेल्या या बंडांमुळे शिवसेनेची अवस्था काहीशी खिळखिळी झाली होती; पण बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा पक्षाची मोट बांधण्याचे काम सुरू केले. मात्र, २००६ मध्ये बाळासाहेबांचे पुतणे व शिवसेनेचे अत्यंत लोकप्रिय नेते राज ठाकरे यांनी अंतर्गत मतभेदांमुळे शिवसेना सोडली आणि स्वतःचा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) हा पक्ष स्थापन केला. हा शिवसेनेसाठी सर्वांत मोठा धक्का मानला गेला. उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्रे जात असल्यामुळे नाराज झालेल्या राज ठाकरेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती, असे राजकीय विश्लेषक सांगतात.
उद्धव यांनी पक्षाला कशी बळकटी दिली?
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. या धक्क्याने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. त्यानंतर पक्षाची पूर्ण धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. उद्धव यांनी शिवसेनेच्या आक्रमक शैलीला अधिक संयमी आणि संघटनात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांचे भाजपाबरोबरचे संबंध काहीसे ताणले गेले आणि शिवसेनेने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला; मात्र निवडणुकीनंतर भाजपा – शिवसेनेत पुन्हा युती झाली आणि दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेत पुन्हा दुरावा निर्माण झाला. तरीदेखील २०१९ मध्ये दोन्ही पक्षांनी विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवली; पण मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाबरोबरची युती तोडली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि या पदावर विराजमान होणारे ते ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले. करोना काळात ठाकरे यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत जबाबदारीने हाताळली.
२०२२ मध्ये शिवसेनेत ऐतिहासिक फूट
२०२२ मध्ये शिवसेनेच्या इतिहासातील सर्वांत मोठे बंड झाले. उद्धव ठाकरे यांचे सर्वांत निकटवर्तीय मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० पेक्षा जास्त आमदारांना घेऊन सुरतमार्गे गुवाहाटी गाठली. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे अनेक खासदारही गेले, परिणामी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे बहुमत कमी झाले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे शिंदेंनी भाजपासोबत हातमिळवणी करून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. या पक्षफुटीचा कायदेशीर लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला; मात्र अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाकडे सोपवले. त्यानंतर शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे अधिकृत नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले; तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ असे नाव व मशाल चिन्ह देण्यात आले. या प्रकरणाला ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, त्यावर अद्याप अंतिम सुनावणी होणे बाकी आहे. मराठी अस्मितेच्या ठिणगीतून सुरू झालेली बाळासाहेबांची शिवसेना आज दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली गेली आहे.
ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार?
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे अनुक्रमे नऊ खासदार आणि २० आमदार निवडून आले; तर एकनाथ शिंदेंनी सात खासदार आणि ५६ आमदार निवडून आणत सरकारमधील आपले स्थान मजबूत केले. सध्या एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असून, शिवसेनेचे मूळ चिन्ह व नाव त्यांच्याकडेच आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे ७ खासदार आणि जवळपास १६ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे सेनेच्या काही नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे- ठाकरे गटाच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला असून, सर्व जण पक्षप्रमुख ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटाकडून कथितपणे राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. जर ठाकरे यांचे आमदार आणि खासदार पुन्हा शिंदे गटात गेल्यास त्यांची पक्षावरची पकड आणखीनच कमकुवत होईल, असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात घडणाऱ्या या राजकीय घडामोडींकडे सगळ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
