Revelations about donald Trump in Epstein files अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) लैंगिक तस्करीमधील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्या चौकशीशी संबंधित हजारो पानांची कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. अमेरिकन काँग्रेसने राजकीय दबाव टाकल्यानंतर पारदर्शकता कायद्याअंतर्गत एपस्टीन फाइल्स प्रकाशित करण्यात येत आहेत. एपस्टीन फाइल्सच्या नव्या भागात जेफ्री एपस्टीनच्या खासगी विमानाच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख झाला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या कागदपत्रांतून लैंगिक गुन्हेगार एपस्टीनबरोबरच्या त्यांच्या जुन्या संबंधांविषयीची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या या हजारो पानांच्या कागदपत्रांमध्ये अंतर्गत ईमेल, विमानांच्या प्रवासाची नोंद, हस्तलिखित नोट्स आणि काही वादग्रस्त बाबींचा समावेश आहे. मात्र, यातील काही दावे असत्य असू शकतात, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे. ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये नक्की काय समोर आले? जाणून घेऊयात…

एपस्टीनच्या खासगी विमानाने प्रवास

न्यू यॉर्कच्या जिल्ह्यातील एका अमेरिकन वकीलाच्या जानेवारी २०२० मधील एका अंतर्गत ईमेलनुसार, ट्रम्प यांनी १९९३ ते १९९६ दरम्यान किमान आठ वेळा एपस्टीनच्या खासगी विमानाने प्रवास केला होता. हे प्रमाण पूर्वी नोंदवलेल्या किंवा आम्हाला माहीत असलेल्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नव्या एपस्टिन फाइल्समध्ये ८ जानेवारी २०२० रोजी न्यू यॉर्कच्या जिल्ह्यातील एका अमेरिकन वकिलाने लिहिलेल्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वीपेक्षा कितीतरी वेळा एपस्टीन यांच्या खासगी विमानातून प्रवास केला आहे. या प्रवासात डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीन यांच्याबरोबर कोण कोण होते, याचाही उल्लेख आहे. विभागाने रविवारी जारी केलेल्या नवीन फाइल्समध्ये सुमारे २९,००० पाने आहेत ज्यात न्यायालयीन रेकॉर्ड, व्हिडिओ आणि ईमेल समाविष्ट आहेत, असे ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तात दिले आहे.

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, त्याच ईमेलमध्ये असे नमूद केले आहे की, किमान चार विमान प्रवासांदरम्यान एपस्टीनची जवळची सहकारी गिसलेन मॅक्सवेलदेखील विमानात होती. गिसलेन मॅक्सवेलला मानवी तस्करीच्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आले होते. १९९३ मधील एका प्रवासात केवळ एपस्टीन, ट्रम्प आणि एक २० वर्षांची तरुणी प्रवासी म्हणून होते, जिचे नाव गुपित ठेवण्यात आले आहे. इतर दोन प्रवासांत अशा महिला उपस्थित होत्या, ज्यांना पुढे मॅक्सवेल प्रकरणात संभाव्य साक्षीदार मानले गेले होते, असेही वृत्तात सांगण्यात आले आहे.

कागदपत्रांमधील नोंदी आणि ट्रम्प यांची जुनी विधाने परस्परविरोधी?

‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी यापूर्वी सार्वजनिकरीत्या असा दावा केला होता की, त्यांनी कधीही एपस्टीनच्या विमानाने प्रवास केला नाही. मात्र, आता समोर आलेली फ्लाईट लॉग्स थेट या विधानांना खोटे ठरवतात. त्यात ट्रम्प यांचे नाव ‘वारंवार प्रवास करणारे प्रवासी’ म्हणून नमूद आहे. काही प्रवासात त्यांची तत्कालीन पत्नी मार्ला मॅपल्स आणि त्यांची मुलेदेखील त्यांच्याबरोबर असल्याचे नमूद आहे. ही कागदपत्रे कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचा आरोप करीत नसली तरी एपस्टीनशी असलेल्या संबंधांबाबत ट्रम्प यांनी आजवर मांडलेली भूमिका यामुळे खोटी ठरते, असे ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

एपस्टीनच्या पत्रात ट्रम्प यांचा उल्लेख?

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, त्यातील सर्वांत वादग्रस्त खुलाशांपैकी एक म्हणजे एपस्टीनने त्याचा सहकारी डॉक्टर लॅरी नासार याला लिहिलेले हस्तलिखित पत्र. ऑगस्ट २०१९ मध्ये एपस्टीनच्या मृत्यूच्या काही दिवस आधी हे पत्र त्याने लिहिल्याचे समजते. या पत्रात राष्ट्राध्यक्षांचा उल्लेख करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. न्याय विभागाने स्पष्ट केले आहे की, या पत्राची सत्यता अद्याप तपासली गेलेली नाही. अधिकाऱ्यांना पाकीट आणि पोस्टल स्टॅम्पवर काही विसंगती आढळल्या आहेत. एफबीआयने हे पत्र हस्ताक्षर तपासासाठी पाठवले होते; परंतु त्याच्या सत्यतेबाबत कोणताही सार्वजनिक निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीनच्या गुन्ह्यांची कोणतीही माहिती असल्याचा किंवा त्यात सहभागी असल्याच्या वृत्तांना वारंवार फेटाळले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एपस्टीन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सीलबंद ठेवण्याचे प्रयत्न केले होते. तरीही या फाइल्स सार्वजनिक करण्याचा दबाव त्यांच्यावर वाढला. त्यामुळे आता या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे प्रकाशित करण्यात येत आहेत.२०२० च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीपूर्वी एफबीआयकडे ट्रम्प यांच्यासंदर्भात केलेले दावे खोटे आणि निराधारा असल्याचेही न्याय विभागाने म्हटले आहे.

एपस्टीन फाइल्समधील खळबळजनक फोटो

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे काही फोटो समोर आले आहेत. काही फोटोंमध्ये क्लिंटन स्वीमिंग पूल आणि हॉट टबमध्ये दिसत आहेत. क्लिंटन यांनी मात्र मागेच सर्व आरोप फेटाळले होते. पॉप गायक मायकल जॅक्सन हा काही फोटोंमध्ये एपस्टीनबरोबर दिसून येतो. द गार्डियनच्या वृत्तानुसार, एपस्टीन फाइल्समध्ये दाखवलेले अनेक फोटो तारीख आणि संदर्भाशिवाय दाखवले आहेत. पीडितांचे संरक्षण करण्यासाठी काहींच्या चेहऱ्यावर काळे डाग दाखवले आहेत. तसेच अपमानास्पद सामग्रीचे प्रकाशन केले जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे.