Shocking Truth behind ORS: बालरोगतज्ज्ञ डॉ शिवरंजनी संतोष हैदराबाद येथे कार्यरत आहेत. २०१७ साली त्यांना लक्षात आलं की, काही मुलांना अतिरेकी पोट साफ होतंय (अतिसार/ डायरिया) उपचार म्हणून पालक ORS देत होते पण मुलांना काही फरक पडेना. काही मुलांची तब्येत आणखी बिघडत होती. त्यांनी आणखी तपास सुरू केला आणि त्यांना धक्कादायक गोष्ट लक्षात आली.
अशक्तपणा, आजारपण आणि ORS
ओरल रिहायड्रेशन सोल्युशन अर्थात आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं असणारं ओआरएस (ORS). इतक्या सहजपणे आपण आपल्या आहारात ors चा समावेश करतो! शाळेत स्पर्धा आहेत, मैदानी खेळ सुरु आहेत, एखादी व्यक्ती आजारी आहे आणि तोंडाला चव नाही, अशक्तपणा आलाय अशा अनेक कारणास्तव डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा शरीरविज्ञानाच्या माहितगारांचा खात्रीचा उपाय म्हणजे ओआरएस! या ओआरएस बद्द्लचीच अलीकडे घडलेली कहाणी आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
ORSची सहज उपलब्धता
घराघरामध्ये आता ORS सर्वांच्याच माहितीचं झालंय. शिवाय ते जवळच्या मेडिकल स्टोअरमध्येही अगदी सहज उपलब्ध असतं. मुलांना जरा अशक्त वाटतंय किंवा अगदी मोठ्यांनाही जरा अशक्त वाटतंय असं वाटलं की, सरळ मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन ORS आणलं जातं. लहान मुलांना तर अगदी त्याची ती चवही आवडते आणि त्याचा जिभेला जाणवणारा थंडपणा… त्यामुळे मुलं तर गमंत म्हणूनही त्याचं सेवन करतात. घरात कुणालाही हगवण लागली की, तातडीचा उपाय म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. याच ORS चा अतिरेक डॉ. संतोष यांना समजला…
डॉ. शिवरंजनी संतोष ओआरएस केस
घटना घडली त्या परिसरातील प्रत्येक दुकानात ORS च्या नावाने विकली जाणारी पेये अतिरेकी साखरेने भरलेली होती, असं डॉ. संतोष यांना लक्षात आलं. औषधी ORS ऐवजी पाण्याची कमतरता भरून काढणारी ही पेये लहान मुलांसाठी प्राणघातक ठरली असती. कंपन्यांनी प्रत्येक डॉक्टरपर्यंत त्यांची उत्पादन सहजी आणि हुशारीने पोहोचवली होती. डॉक्टर संतोष यांनी याविरूद्ध लढायचं ठरवलं. सुरुवातीला त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला अनेक पत्रं लिहिली. त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी या व्यवस्थेला न्यायालयात खेचण्याच ठरवलं.
ओआरएस जनहित याचिका

तेलंगणा उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली. देशात औषधांच्या नावाखाली केली जाणारी फसवणूक न्यायालयाने लक्षात घेतली आणि डॉक्टर संतोष यांनी ही केस जिंकली. ८ एप्रिल २०२२ रोजी एफ एफ एस एस आय ने कंपन्यांना ओआरएस हा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले. मात्र दोनच महिन्यात हा आदेश सौम्य करण्यात आला. कंपन्यांनी सोबत विशेष सूचना जोडून ही उत्पादने विकावी, असा अजब आदेश काढण्यात आला. त्यानंतर मात्र डॉक्टर संतोष यांनी समाजमाध्यमांची मदत घ्यायला सुरुवात केली. त्यांनी इंस्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या माध्यमांवर जनजागृती करायला सुरुवात केली. एक सक्षम चळवळ उभी राहिली.
मधुमेही रूग्णांसाठी घातक
डॉक्टर संतोष यांनी भल्याभल्या इन्फ्लुएन्सर्सना सुद्धा चुकीची माहिती पसरविण्यापासून रोखलं. घरगुती ORS सारख्या चुकीच्या संकल्पनाविरोधात त्यांनी ठोस पावलं उचलली. ओआरएसची बोगस उत्पादने मधुमेही रूग्णांसाठी घातक असल्याचे ‘द एंडोक्राइन सोसायटी आफ इंडिया’ने जाहीर केले. इतकेच नव्हे तर मधुमेही रुग्णांना मूत्रपिंड आणि जठराचे त्रास सुरु होण्यासाठी ही द्रव्ये कारणीभूत ठरतात, हेदेखील सांगण्यात आले.
ORS ओआरएसवर बंदी
अखेरीस एफएसएसआयएआय ने देशभरात ORS ओआरएसवर बंदी जाहीर केली. या संपूर्ण प्रकरणात डॉक्टर शिवरंजनी जिंकल्या मात्र अगदी गेल्याच आठवड्यात १८० करोड इतक्या किमतीचा ओआरअएसचा खप होणं बाकी असल्यामुळे या बंदीचा फेरविचार करण्याचा निर्णय होऊ घातलाय. भारतातील १४० कोटी मुलांच्या आरोग्यापेक्षा एखाद्या उत्पादनाचा खप इतका महत्वाचा ठरतो, यासारखं धक्कादायक आणि त्याचवेळी संतापजनक दुसरं काहीच नाही, असं वाटतं.
पावडरपेक्षा डायरेक्ट ड्रिंक चालेल का?
अनेकदा आहारतज्ज्ञ म्हणून विचारलं जात- पावडरपेक्षा डायरेक्ट ड्रिंक चालेल का? याच उत्तर कायम नाही असंच असतं- आणि अनेकदा आहारतज्ज्ञांना विनाकारण अट्टाहास किंवा अवघड उपायच का सांगता असा जाबदेखील विचारला जातो.
नीट माहिती घेऊन नंतरच सेवन
परंतु बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक ‘आरोग्यदायी’ पदार्थामागे असणारं सत्य जाणून त्यानंतरच त्याचा आहारात समावेश करणं अत्यंत महत्वाचं आहे. ORS विरोधातील ही चळवळ लक्षात घेऊन सरकारने ठोस पावले उचलायला हवीत. अनेकदा व्यवसाय उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पोषक किंवा हेल्दी किंवा शून्य साखर अशी नावे वापरून वेगवेगळ्या पदार्थांची विक्री केली जाते. या पदार्थांची नीट माहिती घेऊन नंतरच त्याचे सेवन करायला हवे. कोणत्याही साखरयुक्त पदार्थाचं सेवन करताना त्याचा शरीरावर होणारा परिणाम जाणून घेणं सर्वाधिक गरजेचं आहे.

