भारतीय हवाई दलाचे वैमानिक शुभांशु शुक्ला मंगळवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी सज्ज आहेत. ISS मध्ये जाणाऱ्या अॅक्सिओम-४ मोहिमेचा भाग म्हणून शुभांशु मंगळवारी उड्डाण करणार आहेत. अंतराळात जाण्याची तयारी करत असतानाच त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी स्वत:सोबत बाळगण्याला प्राधान्य दिलं आहे. शुभांशु हे त्यांच्यासोबत काही भारतीय स्वादिष्ट पदार्थ घेऊन जाणार आहेत.
मंगळवारी १० जून रोजी शुभांशु संध्याकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटर इथून इतर तीन अंतराळवीरांसह मोहिमेला सुरुवात करणार आहेत. साधारणपणे अमेरिकन अंतराळ संस्था त्यांच्या सर्व अंतराळ मोहिमांसाठी अन्नपदार्थांसाठी एक प्रमाणित मेन्यूचे पालन करते, असे इस्त्रोच्या ह्यूमन स्पेसफ्लाइट सेंटरचे संचालक डी. के. सिंग यांनी सांगितले. भारत पहिल्यांदाच आयएसएसमध्ये अंतराळवीर पाठवत असल्याने शुभांशु यांना स्वत:च्या घराप्रमाणे जाणवावे यासाठी इस्त्रोने एक खास गोष्ट केली आहे. इस्त्रो शुभांशु यांच्यासाठी काही भारतीय पदार्थ पाठवत आहे. भारतीय हवाई दलाचे वैमानिक शुभांशु शुक्ला हे कक्षेत १४ दिवस घालवतील आणि राकेश शर्मा यांच्या १९८४ च्या प्रतिष्ठित उड्डाणानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय म्हणून इतिहास रचतील. या मोहिमेत असं काय वेगळेपण असेल आणि शुभांशु नेमकं काय सोबत घेऊन जाणार आहेत ते जाणून घेऊ…
अंतराळवीरांसाठी भारतीय अन्न
मोहिमेपूर्वी शुभांशु आपल्यासोबत खास तयार केलेले भारतीय पदार्थ घेऊन जातील. आयएसएसला प्रवास करणाऱ्या कोणत्याही भारतीयासाठी ही पहिलीच वेळ असेल. त्यांच्या मेनूमध्ये आमरस, मूग डाळ हलवा, गाजर हलवा आणि तांदळापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा समावेश आहे.
लखनऊमधील विज्ञान शिक्षिका सुची शुक्ला यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, “सुरुवातीला शुक्ला यांना उड्डाणात भारतीय पदार्थ घेऊन जाण्याची परवानगी नव्हती, कारण पाककृती सामान्यतः मसालेयुक्त असते.
भारतीय जेवणात मसाले जास्त असल्याने ते घेऊन जाण्याची परवानगी मिळत नव्हती. पण, शेवटी त्यांनी काही पदार्थांना परवानगी दिली. शुभांशु फिटनेसचे चाहते आहेत आणि त्यांना योगात खूप रस आहे.” मात्र, आता काही भारतीय पदार्थ घेऊन जाण्यास परवानगी मिळाल्याने शुभांशु त्यांच्या सहकारी अंतराळवीरांसोबत या भारतीय चवी शेअर करण्यास उत्सुक आहेत, असेही त्या म्हणाल्या.
अॅक्सिओम-४ मोहिमेबद्दल
- शुभांशु शुक्ला स्पेसएक्स ड्रॅगन या अंतराळ यानातून १४ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आयएसएसवर जातील
- अॅक्सिओम-४ मोहिमेसाठी मंजूर झालेल्या सात भारतीय प्रयोगांपैकी एक ‘व्हॉयेजर टार्डिग्रेड्स’ हा प्रयोग आहे
- सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत या सूक्ष्म जीवांचा अभ्यास प्रयोगामध्ये केला जाणार आहे
- आयएसएसवर केला जाणारा व्हॉयेजर टार्डिग्रेड्स प्रयोग हा पूर्वीच्या अभ्यासांवर आधारित
आंतरराष्ट्रीय मोहिमांसाठी नासाची स्पेस फूड सिस्टीम्स लॅबोरेटरी फ्रीज-ड्राईड अन्न तयार करते आणि अंतराळवीरांच्या मेन्यूसाठी निवडलेल्या व्यावसायिकरित्या उपलब्ध पेय पावडर, कुकीज, कँडी आणि इतर वाळवलेल्या वस्तूंचे पॅकेजिंग करते. भारतीय अंतराळवीरांना घरची चव मात्र मिळत नाही. मात्र, आता इस्रो आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे संशोधन केल्यानंतर अवकाश-अनुकूल भारतीय अन्न कोणते आहे ते सांगितले आहे. शुभांशु यांच्या मेनूव्यतिरिक्त म्हैसूरस्थित संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेने (डीएफआरएल) इडली, उपमा, बिर्याणी, पुलाव, डाळ, भाजीपाला करी, रोटी आणि हलवा यांसारखे पदार्थ खास तयार केले आहेत. हे सर्व पदार्थ शून्य गुरुत्वाकर्षण लक्षात घेत तयार केलेले आहेत.
हे जेवण खास कंटेनरमध्ये पॅक केले जाते आणि ते खाण्यापूर्वी पाण्याने पुन्हा हायड्रेट करावे लागेल, असे सिंग यांनी द प्रिंटला सांगितले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हाच मेन्यू गगनयान क्रूड मिशनचाही भाग असेल, जे भारताचं पहिलं मानवी अंतराळयान आहे. हे यान २०२७ पर्यंत उड्डाण करण्याची अपेक्षा आहे. शुभांशु शुक्ला त्या मोहिमेतदेखील सामील असतील. “आम्ही काही पर्याय विकसित केले आहेत. जरी ते सर्व गगनयान मोहिमेसाठी वापरले गेले नसले तरी भविष्यातील मानवी अंतराळयानांसाठी ते उपयुक्त ठरतील”, असे सिंग यांनी म्हटले.
काही छायाचित्रे, हंसाचे सॉफ्ट टॉय
खाणे आणि विज्ञान प्रयोगांसोबत शुभांशु शुक्ला घरातून काही वस्तूदेखील घेऊन जात आहेत. “कोणत्या वस्तू सोबत घेऊन जात आहेत, हे प्रोटोकॉलमुळे उघड करू शकत नाही. एकदा तुम्ही काहीही अंतराळात नेले की त्या अंतराळात प्रवास केलेल्या प्रमाणित वस्तू ठरतात, म्हणून तो त्या परत आणेल आणि त्या आमच्यासाठी खास ठरतील. तो परत आल्यानंतरच आपल्याला त्या वस्तू काय आहेत हे कळेल”, असे शुभांशु यांच्या बहिणीने सांगितलं आहे.
या मोहिमेत एक लहान हंसाचा सॉफ्ट टॉय आहे, जो अॅक्सिओम-४ क्रूसाठी शून्य-गुरुत्वाकर्षण सूचक म्हणून काम करेल. ‘जॉय’ नावाचा हा हंस शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीरांसाठी विशेष आहे.
“भारतीय संस्कृतीत हंस हे देवी सरस्वतीचे वाहन आहे. ते ज्ञान, शिक्षण आणि पवित्रतेचे प्रतीक आहे”, असे शुभांशु यांनी स्पष्ट केले. “हंसात दूध आणि पाणी वेगळे करण्याची दुर्मीळ क्षमता असल्याचे मानले जाते, जे शुद्धता, शहाणपण आणि कृपा दर्शवते. हे प्रतीक बाळगल्याने मला ज्ञान आणि दबाव यांच्यातील नाजूक संतुलन राखता येईल”, असेही ते म्हणाले.
” शुभांशु यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि आम्ही सर्व जण खूप आत्मविश्वासू आणि सकारात्मक आहोत. आता आम्हाला भीती वाटत नाही. त्याचे नाव इतिहासाच्या पुस्तकात नोंदवले जाईल याचा आम्हाला आनंद आहे”, असे त्यांचे कुटुंबीय म्हणाले. त्यांची आई आस्था शुक्ला यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, “वो खुद बहुत उत्साहित है की वो भारत के लिए कुछ नया करने जा रहा है। बस जल्दी से मिशन खतम कर के वापस आ जाये.” (तो खूप उत्साहित आहे, कारण तो भारतासाठी काहीतरी नवीन करायला जात आहे. आशा आहे की मोहीम यशस्वीरित्या संपवून तो लवकरच परत येईल.)

या मोहिमेतील अंतराळवीर सध्या मोहिमेपूर्वी क्वॉरंटाइनमध्ये आहेत. ते दररोज कुटुंबात व्हिडीओ ग्रुप कॉलसाठी सामील होतात. त्यांची पत्नी डॉ. कामना शुभा शुक्ला आणि पाच वर्षांचा मुलगा हे त्यांच्यासोबत फ्लोरिडामध्ये आहेत. स्पेसएक्स आणि नासा यांच्या भागीदारीत टेक्सासस्थित अॅक्सिओम स्पेसद्वारे चालवले जाणारे हे अभियान चार अंतराळवीर, मिशन कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), मिशन पायलट शुभांशू शुक्ला (भारत) आणि मिशन तज्ज्ञ स्लावोस उझनान्स्की-विस्निव्स्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) यांना दोन आठवड्यांच्या मुक्कामासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणार आहे