Side Effects Of Eating Too Much Ghee Health Warning : प्राचीन काळापासून तूप हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा पारंपरिक आणि महत्त्वाचा भाग राहिला आहे. मात्र, सध्या निरोगी जीवनशैलीच्या नावाखाली तुपाचे अतिसेवन करण्याचा एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. समाजमाध्यमांवरील विविध दावे बघून काहींनी आपल्या रोजच्या आहारातील तुपाचे प्रमाण वाढवले आहे. अगदी सकाळच्या ब्लॅक कॉफीपासूनच ते रात्री झोपण्याआधी चमचाभर तूप खाणे अनेकांना फायदेशीर वाटत आहे. शुद्ध तुपामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि आरोग्यासाठी इतरही फायदे मिळत असल्याचा त्यांचा समज आहे. या पार्श्वभूमीवर तुपाचे अतिसेवन केल्यास त्याचे आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे, त्याविषयी…
जास्त तूप खाणे ठरू शकते धोकादायक?
गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने शरीराला कोणतेही अतिरिक्त आरोग्यदायी फायदे मिळत नाहीत; उलट त्याचे शरीरावर अनपेक्षित आणि विपरीत परिणाम होऊ शकतात, असा इशारा ग्रेटर नोएडा येथील अस्पेरिया रुग्णालयातील पचनसंस्था शस्त्रक्रिया विभागाचे तज्ज्ञ डॉ. अभिषेक अग्रवाल यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिला. केवळ तुपाच्या सेवनावर अवास्तव भर देण्याऐवजी रोजच्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने, फायबर आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा हवा. संतुलित आहाराचा भाग म्हणून रोजच्या जेवणात तुपाचा समावेश नक्कीच केला जाऊ शकते; पण त्याचे प्रमाण किती असावे हे अत्यंत महत्वाचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
शरीरावर होऊ शकतात विपरीत परिणाम
डॉक्टर अग्रवाल यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या आहारातील आणि कॅलरीच्या गरजेनुसार रोजच्या आहारात साधारणपणे एक ते दोन चमचे तुपाचा समावेश करता येऊ शकतो. मात्र, मोठ्या प्रमाणात तूप खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात असा विचार करणे चुकीचे आहे. तूप हा स्निग्ध पदार्थांचा एक अत्यंत दाट स्रोत असून त्यात कॅलरीचे प्रमाणही खूप जास्त असते. त्यामुळे तुपाच्या अतिसेवनाने शरीरातील दैनंदिन कॅलरीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते. या कारणास्तव, केवळ तुपाच्या स्वतंत्र सेवनावर भर देण्याऐवजी, पुरेशा प्रमाणात प्रथिने, फायबर आणि योग्य प्रमाणात आवश्यक स्निग्ध पदार्थ असणारा संतुलित आहार राखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही डॉक्टर अग्रवाल म्हणाले.
तुपामुळे खरंच वजन कमी होते का?
दररोज तूप खाण्याच्या वाढत्या ट्रेंडमागे समाजमाध्यमांवर अनेक दावे केले जातात. तुपामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो, शरीरात ऊर्जा वाढते आणि वजन कमी होण्यासही मदत होते, असे दावेही काही लोकांकडून केले जातात. याच समजुतीमुळे अनेकांनी रोजच्या आहारात तुपाचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तूप खावे, या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे डॉक्टर अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, तूप खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते असा काहींचा समज असला, तरी आहारातील पुरेशा फायबरला तूप हा कधीही पर्याय ठरू शकत नाही. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि पोट नियमित स्वच्छ होण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खाणे आणि संपूर्ण संतुलित आहार घेणे हेच अधिक महत्त्वाचे असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.
ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिसळल्यास काय होते?
वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिसळून हादेखील समाजमाध्यमांवर आणखी एक लोकप्रिय ट्रेंड पाहायला मिळतो. मात्र, दाव्याला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार उपलब्ध नसल्याचे डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितले. त्याउलट तूप आणि ब्लॅक कॉफीचे हे मिश्रण घेतल्याने काही व्यक्तींना पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. विशेषतः शरीराला सहज पचवता येण्यापेक्षा जास्त प्रमाणात चरबीचे सेवन केल्यास मळमळणे, पोट फुगणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तुपाच्या अतिसेवनामुळे काय होऊ शकते?
तूप हा भारतीय आहारातील पारंपरिक घटक असला तरी त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास पचनसंस्थेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात तूप खाल्ल्याने शरीरात मोठ्या प्रमाणात आहारातील चरबी तयार होऊ शकते. त्यामुळे काही व्यक्तींना पोट फुगणे, मळमळणे किंवा पोटात अस्वस्थतेचा त्रास जाणवू शकतो. विशेषतः एखादी व्यक्ती “जास्त तूप खाल्ल्याने आरोग्याला अधिक फायदे मिळतील” या समजुतीने नियमितपणे अनेक चमचे तूप सेवन करत असेल, तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. तूप पूर्णपणे आहारातून वगळण्याची गरज नसली तरी त्याचे सेवन योग्य प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहारामध्ये तुपाचा समावेश करताना व्यक्तीच्या एकूण आहाराच्या गरजा, शारीरिक हालचाली आणि दररोजच्या कॅलरीच्या आवश्यकतेचा विचार करणे गरजेचे आहे. तूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणून ते अधिक प्रमाणात खाल्ले पाहिजे, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही, असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.
पित्ताशयातील खड्यांचा वाढू शकतो धोका
डॉ. अग्रवाल यांच्या मते, ज्या व्यक्तींना आधीपासूनच पित्ताशयात खडे आहेत किंवा पित्ताशयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी तुपाचे सेवन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आहारातील चरबीचे प्रमाण अधिक असणे त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकते. जास्त प्रमाणात चरबीयुक्त आहार घेतल्याने पित्ताशयातील खड्यांशी संबंधित लक्षणे उद्भवू शकतात. त्यामुळे पित्ताशयात खडे असलेल्या व्यक्तींनी तूप किंवा इतर चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करताना प्रमाणावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पित्ताशयातील खड्यांमुळे काही वेळा पित्ताशयाला सूज येऊ शकते. काही गंभीर परिस्थितींमध्ये या खड्यांमुळे स्वादुपिंडावरही परिणाम होण्याचा धोका निर्माण होतो, असा इशाराही डॉ. अग्रवाल यांनी दिला आहे.
प्रमाणात सेवन हाच आरोग्याचा खरा मंत्र!
तूपाचे अतिसेवन करणे आणि त्याला आरोग्यवर्धक उपाय समजणे ही चिंतेची बाब ठरू शकते. संतुलित आहाराचा भाग म्हणून तुपाचे मर्यादित प्रमाणात सेवन केले जाऊ शकते. मात्र, अधिक प्रमाणात तूप खाल्ल्याने आरोग्य, पचनशक्ती किंवा वजन कमी होण्यास आपोआप फायदा होतो, असे मानण्यास कोणताही ठोस आधार नाही, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. जर तुम्हाला तूप खाणे आवडत असेल, तर प्रमाणात सेवन हाच आरोग्याचा खरा मंत्र आहे. रोजच्या आहारात एक ते दोन लहान चमचे तूप फायदेशीर ठरू शकते; पण त्याचे अतिसेवन अत्यंत हानिकारक ठरू शकते. तसेच ब्लॅक कॉफीसारख्या पेयांमध्ये ते मिसळून पिण्याने आरोग्याला कोणतेही अतिरिक्त वैज्ञानिक फायदे मिळत नाहीत. उलट त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टर अग्रवाल यांनी दिला आहे.
