Understanding the long-term side effects of sleeping late is crucial, along with implementing actionable health tips in Marathi: “आजचे प्रेझेंटेशन किंवा काम पूर्ण करायचे आहे, म्हणून अजून थोडा वेळ जागूया…” असे म्हणत रोज रात्री १२ किंवा २ वाजवणे ही आजकालच्या तरुणांची जीवनशैली झाली आहे. मात्र, रात्री उशिरा झोपण्याचे दुष्परिणाम (Side effects of sleeping late) तुमच्या शरीराला आतून पोखरत आहेत, याची जाणीव अनेकांना नसते. सकाळी उठल्यावर शरीर जड वाटणे, मान आखडणे किंवा दिवसभर थकवा राहणे यामागे केवळ अपुरी झोप नसून शरीराचे नैसर्गिक जैविक घड्याळ (Circadian Rhythm) बिघडणे हे मुख्य कारण आहे.

शरीराला किंमत मोजावी लागते

…म्हणता म्हणता रात्रीचे बारा, एक, दोन वाजतात आणि झोप उशिरा लागते. सकाळी उठल्यावर डोळे उघडले तरी शरीर जड वाटतं, मान आखडलेली असते, लक्ष लागत नाही आणि दिवसभर थकवा जाणवत राहतो. आजच्या धावपळीच्या जगात ही परिस्थिती अनेकांसाठी नवी राहिलेली नाही. आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी, उद्योजक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक, परदेशातील वेळेनुसार काम करणारे कर्मचारी आणि अगदी सोशल मीडियावर वेळ घालवणारे अनेक लोक रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय लावून घेत आहेत. पण प्रश्न असा आहे की, या सवयीची किंमत शरीराला किती मोजावी लागते?

शरीराचं नैसर्गिक घड्याळ

आपल्या शरीरात एक नैसर्गिक जैविक घड्याळ असतं. याला सर्केडियन रिदम ‘Circadian Rhythm’ म्हणतात. हे घड्याळ दिवस-रात्र, प्रकाश-अंधार यानुसार शरीरातील अनेक प्रक्रिया नियंत्रित करतं.
कधी झोप येईल, कधी भूक लागेल, शरीराचं तापमान किती असेल, हार्मोन्स कधी स्रवतील आणि ऊर्जा कधी जास्त असेल हे सर्व या घड्याळाशी संबंधित असतं. रात्री उशिरापर्यंत काम करणं म्हणजे या नैसर्गिक यंत्रणेला वारंवार आव्हान देणं. शरीर झोपेसाठी तयार होत असताना आपण त्याला कामासाठी जागं ठेवत असतो.

झोपेची वेळ का महत्त्वाची असते?

अनेक जण म्हणतात, “मी रात्री दोन वाजता झोपतो, पण सकाळी दहा वाजता उठतो. माझी आठ तासांची झोप पूर्ण होते.” हे अंशतः खरं असलं तरी शरीराला फक्त झोपेचे तास महत्त्वाचे नसतात. झोपेची वेळही महत्त्वाची असते. रात्रीच्या सुरुवातीच्या काळात शरीरात गाढ झोपेचे टप्पे जास्त प्रमाणात येतात. या काळात शरीराची दुरुस्ती, ऊतींची पुनर्बांधणी, रोगप्रतिकारक शक्तीचं कार्य आणि हार्मोन्सचं संतुलन यांसारख्या प्रक्रिया घडत असतात. जेव्हा आपण झोप सतत पुढे ढकलतो, तेव्हा या प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो.

थकवा का जात नाही?

अनेक लोक सांगतात, “मी झोपलो होतो, पण सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलंच नाही.” यामागे केवळ झोपेची कमतरता नसते. खराब झोपेमुळे शरीराला पुरेशी रिकवरी मिळत नाही. परिणामी…

  • दिवसभर जडपणा जाणवतो
  • लक्ष केंद्रित करणं अवघड होतं
  • कामाची कार्यक्षमता कमी होते
  • निर्णय घेण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो
  • चिडचिड वाढू शकते
    हा थकवा केवळ मानसिक नसून शारीरिक पातळीवरही जाणवत असतो.

वेदना आणि झोप यांचा संबंध

फिजिओथेरेपीमध्ये झोप आणि वेदना यांचं नातं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
अपुरी किंवा खराब झोप असलेल्या व्यक्तींमध्ये…

  • मानदुखी
  • कंबरदुखी
  • डोकेदुखी
  • सांधेदुखी
    यांचा त्रास अधिक जाणवू शकतो.

झोप ही शरीराची नैसर्गिक रिकवरी प्रणाली आहे. दिवसभर आलेला ताण हाताळण्यासाठी शरीराला विश्रांतीची गरज असते. ती मिळाली नाही तर शरीराची ताण सहन करण्याची क्षमता कमी होऊ शकते.

उशिरापर्यंत जागणं आणि वजन वाढणं

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या व्यक्तींमध्ये वजन वाढण्याचा धोका अधिक असल्याचं अनेक अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे. कारण…

  • भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्समध्ये बदल होतात
  • रात्री जास्त खाण्याची शक्यता वाढते
  • गोड पदार्थ आणि जंक फूडची इच्छा वाढते
  • दिवसभर थकवा असल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते
    म्हणूनच झोप आणि वजन यांचं नातं खूप जवळचं आहे.

स्क्रीनचा परिणाम

उशिरापर्यंत काम करणारे बहुतेक लोक लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅब्लेट वापरत असतात. या स्क्रीनमधून येणारा प्रकाश मेंदूला अजून दिवस असल्याचा संदेश देतो. परिणामी झोपेसाठी आवश्यक असणाऱ्या मेलाटोनिन या हार्मोनच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.
यामुळे…

  • झोप उशिरा येते
  • झोपेची गुणवत्ता कमी होते
  • सकाळी ताजेतवाने वाटत नाही
    म्हणूनच उशिरापर्यंत स्क्रीन वापरणं ही दुहेरी समस्या निर्माण करू शकतं – कामाचा ताण आणि झोपेचा व्यत्यय.

विकेण्डची जास्त झोप पुरेशी असते का?

अनेक जण आठवडाभर कमी झोप घेतात आणि शनिवार-रविवारी जास्त झोपून ती भरून काढण्याचा प्रयत्न करतात. काही प्रमाणात विश्रांती मिळू शकते, पण शरीराचं जैविक घड्याळ वारंवार बदलल्यामुळे त्याचे परिणाम पूर्णपणे भरून निघतीलच असं नाही. नियमित वेळेवर झोपणं आणि उठणं हे शरीरासाठी अधिक फायदेशीर असतं.


फिजिओथेरेपीचा दृष्टिकोन

फिजिओथेरेपीमध्ये वेदना, थकवा आणि कार्यक्षमता यांचा विचार करताना झोपेला महत्त्वाचा घटक मानलं जातं.
कारण खराब झोप:

  • वेदना वाढवू शकते
  • रिकवरी कमी करू शकते
  • व्यायामाची क्षमता घटवू शकते
  • थकवा वाढवू शकते
    म्हणूनच उपचार करताना केवळ व्यायाम नव्हे, तर झोपेच्या सवयींबद्दलही मार्गदर्शन केलं जातं.

काय करता येईल?

  • झोपेची वेळ शक्य तितकी नियमित ठेवा.
  • झोपण्याच्या किमान एक तास आधी स्क्रीन वापर कमी करा.
  • रात्री उशिरा जड जेवण टाळा.
  • दिवसभर नियमित हालचाल करा.
  • कॅफिनचं प्रमाण मर्यादित ठेवा.
  • झोपेला उरलेला वेळ नव्हे तर आरोग्याचा आवश्यक भाग समजा.

अतिरिक्त एक तास गुणवत्तापूर्ण झोप अधिक फायदेशीर

आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करणं अनेकांना अपरिहार्य वाटतं. मात्र त्याचे परिणाम केवळ झोपेपुरते मर्यादित राहत नाहीत. थकवा, वेदना, कमी कार्यक्षमता, वजन वाढणं आणि शरीराची झीज भरून काढण्यातील अडथळे या सगळ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. काम महत्त्वाचं आहेच, पण शरीराला पुढच्या दिवसासाठी तयार करण्याचं काम झोप करत असते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी रात्र जागणं आवश्यक आहे हा समज बदलण्याची गरज आहे. कारण अनेकदा अतिरिक्त एक तास कामापेक्षा अतिरिक्त एक तास गुणवत्तापूर्ण झोप शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.