– रेश्मा राईकवार

देशातील सिनेमागृहांची साखळी चालवणाऱ्या दोन अग्रणी कंपन्या पीव्हीआर लिमिटेड आणि आयनॉक्स लीझर लिमिटेड यांचे विलीनीकरण झाले. त्यामुळे भारतीय मनोरंजन क्षेत्रात ‘पीव्हीआर आयनॉक्स’ या एका नव्या महाकाय कंपनीचा जन्म झाला आहे. ‘पीव्हीआर आयनॉक्स’ची घोषणा झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या समभागांनी उच्चांकी झेप घेतली. त्यामुळे या निर्णयाचा संयुक्त कंपनी म्हणून खुद्द ‘पीव्हीआर आयनॉक्स’ला आणि त्यांच्या भागधारकांना थेट फायदा होणार हे निश्चित झाले आहे. मात्र याचा एकंदरीतच प्रदर्शक – चित्रपटगृह व्यवसाय वा चित्रपटसृष्टीवर नेमका कशा पद्धतीचा परिणाम होणार आहे हे आत्ताच अचूक सांगणे शक्य होणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. अर्थात, आघाड्यांवर विकास साधण्याचे गणित यत्र तत्र सर्वत्र यशस्वी होत असताना इथेही या दोन कंपन्यांच्या दृष्टीने हे एकीचे समीकरण भविष्यातील बदलाची नांदी ठरणार आहे.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

विलीनीकरण कशासाठी?

देशभरात जे सर्वोत्तम साखळी सिनेमागृह समूह कार्यरत आहेत त्यापैकी ‘पीव्हीआर’ आणि ‘आयनॉक्स’ हे आघाडीचे पहिले दोन दावेदार आहेत. या दोन्ही कंपन्यांनी तडकाफडकी विलीनीकरणाची केलेली घोषणा चित्रपट उद्योगातील मंडळींना आश्चर्याचा धक्का देऊन गेली आहे. करोना काळात उभ्या राहिलेल्या आणि झपाट्याने वाढत चाललेल्या ओटीटी माध्यमांबरोबरच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असा अंदाज बांधला जातो आहे. मात्र हा तर्क पूर्णपणे खरा नसल्याचे या दोन्ही कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. करोना काळात सिनेमागृह व्यावसायिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यातून बाहेर पडून नव्याने घडी बसवताना एकमेकांतील स्पर्धा संपवून एकत्र येण्याचा निर्णय भविष्यातील गुंतवणूक आणि उत्पन्नाच्या दृष्टीने काही संधी-सुविधा उपलब्ध करून देणारा ठरणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

१९,१०० कोटींवरून व्यवसायाचे गडगडलेले गाडे

एका आर्थिक पाहणी अहवालानुसार २०१९ हे वर्ष बॉलिवूडसाठी आणि एकंदरीतच सिनेमागृहांच्या व्यवसायासाठी लाभदायक ठरले होते. सिनेमागृहांची २०१९ मध्ये वार्षिक उलाढाल १९,१०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. २०२०च्या मार्चमध्ये करोनामुळे सिनेमागृहे बंद करण्याचा निर्णय झाला. मार्चपर्यंत तरीही काही ओळीने यशस्वी ठरलेल्या चित्रपटांनी दिलासा दिला होता. तरी त्या वर्षीचे आर्थिक गणित हे २०१९ पेक्षा निम्म्याहून अधिक खाली होते. २०२० मध्ये ७६०० कोटींची उलाढाल झाली होती. २०२१ मध्ये व्यवसायाचे गणित अधिकच बिघडले. याचा सर्वाधिक फटका आघाडीच्या म्हणवल्या जाणाऱ्या पीव्हीआर आणि आयनॉक्स समूहांनाही बसला. उदा. –

१. देशभरात ८४२ पडद्यांचे जाळे असणाऱ्या पीव्हीआरची आर्थिक उलाढाल २०२० मध्ये ३४५२.२३ कोटी एवढी होती. २०२१ उजाडता उजाडता पीव्हीआरच्या व्यवसायात ९१ टक्क्यांनी घट झाली आणि उत्पन्नाचा आकडा ३१०.४३ कोटींपर्यंत खाली घसरला. २०२० मध्ये पीव्हीआरला १३१.०४ कोटींचे नुकसान झाले होते, पुढच्या वर्षी नुकसानीचा आकडा ६५५.६४ कोटींपर्यंत वाढला होता.

२. देशभरात ६४८ पडद्यांचे जाळे असणाऱ्या आयनॉक्सची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. २०२०मध्ये आयनॉक्सची उलाढाल १,९१५ कोटी होती. २०२१ मध्ये त्यात ९२.३ टक्क्यांनी घट होऊन उत्पन्नाचा आकडा १४८ कोटींवर स्थिरावला. आयनॉक्सलाही २०२० मध्ये १४१ कोटींचे नुकसान झाले होते, पुढच्या वर्षी हा आकडा २५७ कोटींपर्यंत पोहोचला.

नव्या वर्षातला नवा आशावाद

गेल्या वर्षी दिवाळीत देशभरात अनेक राज्यातून अर्ध्या क्षमतेने का होईना सिनेमागृहे सुरू झाली. सिनेमागृहे सुरू केली तरी बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होतील का, आणि सिनेमागृहे सुरू झाली तरी प्रेक्षक चित्रपट पहायला तिथपर्यंत येतील का, या प्रश्नांची उत्तरे ‘सूर्यवंशी’, ‘झिम्मा’, ’पुष्पा’सारख्या हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रदर्शनाने आणि त्यांना मिळालेल्या विक्रमी यशाने दिली. ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’, ‘द काश्मीर फाईल्स’ या छोट्या-मोठ्या चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी केलेली गर्दी आणि २०० ते ३०० कोटींच्या पलीकडे जात चित्रपटांनी केलेली विक्रमी कमाई यामुळे आता टिकाव कसा लागणार, हा चिंतेचा प्रश्न उरलेला नाही, असे आयनॉक्स लीझरचे संचालक सिद्धार्थ जैन यांनी स्पष्ट केले आहे. २०२२चा मार्च महिना हा व्यवसायाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला असून यापुढे प्रेक्षकांना जास्तीत जास्त उच्च दर्जाचा सिनेमानुभव देणे हाच उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर पीव्हीआरचे अध्यक्ष अजय बिजली यांच्या मते विलीनीकरणानंतर देशभरात सिनेमाच्या पडद्यांचे जाळे अधिक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. चीनमध्ये सध्या सिनेमाचे ८०,००० पडदे तर अमेरिकेत ४०,००० पडदे आहेत. त्या तुलनेत भारतात अजूनही केवळ ९००० सिनेमाचे पडदे आहेत. त्यातही बहुपडदा सिनेमागृहांचे ३२०० पडदे आहेत. २००९ मध्ये बहुपडदा सिनेमागृहांचे निव्वळ ९२५ पडदे होते. २०१९ मध्ये हा आकडा सर्वाधिक म्हणजे ३२०० पर्यंत पोहोचला. हा वाढीचा वेग फारच कमी आहे. भारतीय लोकांचे सिनेमाप्रेम पाहता अधिकाधिक शहरांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. टियर २ आणि टियर ३ म्हणजे निम्न आणि लघु शहरांमधील सिनेमागृहांची संख्या वाढवून तिथे पोहोचणे हे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाचा तपशील काय?

विलीनीकरणाच्या निर्णयानुसार, ‘पीव्हीआर आयनॉक्स’ असे संयुक्त कंपनीचे नामकरण करण्यात आले आहे. या निर्णयानुसार पीव्हीआरचे देशभरात ७३ शहरांतील ८७१ पडदे आणि आयनॉक्सचे ७२ शहरांतील ६७५ पडदे ‘पीव्हीआर आयनॉक्स’ या एका बॅनरखाली एकत्र कार्यरत होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांचे मिळून देशभरात आता १०९ शहरांमधून ३४१ जागांवरील १५४६ पडदे एकत्र आले आहेत. १५४६ पडदे असलेले ‘पीव्हीआर आयनॉक्स’ हे महाकाय साखळी सिनेमागृह म्हणून ओळखले जाईल. असे असले तरी पीव्हीआर आणि आयनॉक्सची सिनेमागृहे सध्या आहेत त्या नावानेच सुरू राहतील.

या नव्या संयुक्त कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पीव्हीआरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निर्णयानुसार आयनॉक्सचे पीव्हीआरमध्ये विलीनीकरण झाले असून आयनॉक्सच्या भागधारकांना त्यांच्याकडील प्रत्येक १० समभागांमागे, तीन समभाग हे विलीनीकरण मार्गी लागल्यावर मिळू शकतील.

नवा निर्णय आयनॉक्ससाठी फायदेशीर

विलीनीकरणामुळे आयनॉक्सची स्थिती भक्कम झाली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. आयनॉक्सच्या डोक्यावर कोणतेही कर्ज शिल्लक नाही, पीव्हीआरचे ९१४ कोटी कर्ज असले तरी सिनेमागृह व्यवसायात ही कायमच अग्रणी कंपनी असल्याने त्यात गुंतवणूक करणे फायदेशीरच ठरेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. एकदा सिनेमागृहांच्या व्यवसायाची घडी बसली की तूट भरून काढणे शक्य होईल, असा अंदाज आहे. करोनामुळे दोन्ही कंपन्यांचे समभागही अनुक्रमे ३८ आणि २६ टक्क्याने खाली घसरले होते. नव्या निर्णयाने समभागांनीही उसळी घेतली असल्याने लवकरच दोन्ही कंपन्यांना नफ्याचे गणित जमवणे शक्य होणार असल्याचे विश्लेषकांना वाटते.

या निर्णयाचे नेमके फायदे…

‘पीव्हीआर आयनॉक्स’च्या निर्णयामुळे प्रेक्षकांना आणि निर्मात्यांनाही थेट कोणताही फरक पडणार नाही. या दोन कंपन्यांना मात्र भविष्यातील गुंतवणूक आणि विस्ताराच्या दृष्टीने काही फायदे निश्चित होणार आहेत. ते असे –

१. आघाडीच्या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या असल्याने त्यांना जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न अधिक असेल. जाहिरातीचे दर वाढवून घेणे त्यांना शक्य होणार आहे. आधीपेक्षा जास्त पडदे आणि जास्तीत जास्त शहरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याने उत्पादकांकडे सर्वाधिक जाहिरात दराची मागणी करणे शक्य होणार आहे.

२. दोन्ही समूहाच्या मालकीच्या सिनेमागृहांच्या कार्यकारी वा व्यवस्थापकीय खर्चात कपात होणार आहे. सिनेमागृहात आवश्यक असलेले खाद्यपदार्थ, शीतपेये यासंदर्भातील करार असो वा कर्मचारी नियुक्ती असो प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने मागणी असल्याने कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त पुरवठ्याची मागणी करणे शक्य होणार आहे.

३. सिनेमागृहांमध्ये आवश्यक असलेली डॉल्बी साऊंड उपकरणे, प्रोजक्टर वा अन्य तांत्रिक उपकरणांसाठीही संबंधित कंपन्यांबरोबर वाटाघाटी करत खर्चात सूट मिळवणे शक्य होणार आहे.

४. नव्याने सिनेमागृह उभारायचे असल्यास मोठमोठ्या मॉलमध्ये जागा मिळवतानाही एरवी होणारी स्पर्धा किरकोळ असेल वा पूर्णपणे नसेल. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस असे दोन ते तीन मोठेच स्पर्धक कायम याबाबतीत पुढे असतात. इथे पहिले दोन स्पर्धक एकत्र आल्याने तिसरा मोठा स्पर्धक उरणार नाही.

एकंदरीतच अशा प्रकारे दोन मोठ्या कंपन्या वा समूहांमध्ये विलीनीकरण होते, त्या एका छताखाली येतात तेव्हा त्या-त्या क्षेत्रात मोठे बदल झाल्याशिवाय राहत नाही. अधिक पैसा, अधिक गुंतवणूक, अधिक विस्ताराच्या संधी हे बेरजेचे गणित साधण्यासाठीच असे करार होत असतात. पीव्हीआर – आयनॉक्स या दोन समूहांमधील कराराचेही मनोरंजन क्षेत्रावर होणारे फायदे दिसण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. मात्र याचा ओटीटीसह इतर कोणत्याच माध्यमाच्या स्पर्धेसाठी काही संबंध नाही. जोवर सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी वा टीव्हीवर प्रदर्शित होत आहेत, तोवर कुठलाही मोठा फटका प्रदर्शकांच्या व्यवसायाला बसणार नाही. ओटीटीवरचे वैयक्तिक मनोरंजन आणि सिनेमागृहात जाऊन समूहाने मनोरंजनाचा आनंद घेणे हो दोन्ही पूर्ण वेगळे अनुभव आहेत. सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचे आनंदाचे समीकरण यापुढेही चिरंतन असेल, असा विश्वास सिनेमागृह व्यावसायिक व्यक्त करतात.