Silent Heart Attacks in Women : जगभरात हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार- दरवर्षी दोन कोटींहून अधिक लोकांचा हृदयविकाराने मृत्यू होतो. केवळ पुरुषांनाच नव्हे तर महिलांमध्येही या विकाराचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. हृदयविकाराची वाढती प्रकरणे पाहता त्याच्या लक्षणांची माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जेरेमी लंडन यांनी पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा झटका कशा वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो या विषयावर आपले मत मांडले आहे. त्याविषयीचा हा आढावा…

हृदयविकाराच्या झटक्याची ‘शांत’ लक्षणे

आपले शरीर व्यवस्थितपणे काम करण्यासाठी हृदय निरोगी राहणे फार गरजेचे असते. साधारणत: एका निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनीट ६० ते १०० असायला हवेत असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. तसे पाहता हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात अनेक लक्षणे दिसतात; पण छातीत अचानकपणे वेदना होणे हे त्याचे सामान्य लक्षण मानले जाते. डॉ. लंडन यांच्या मते, महिलांमध्ये हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात. छातीत हलका दाब, पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास, मान किंवा जबड्यात वेदना, थकवा किंवा मळमळ. अनेक ही लक्षणे सामान्य आजार समजून दुर्लक्षित केली जातात. परिणामी महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका आणखी वाढत गेल्याने उपचारासाठी विलंब होतो.

महिलांचे या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष!

महत्त्वाची बाब म्हणजे, महिलांच्या हृदयविकाराच्या झटक्यामध्ये वेदना नसलेली इतर लक्षणेदेखील आढळून येतात. श्वास घेण्यास त्रास होणे, अनपेक्षित थकवा किंवा कमजोरी जाणवणे, मळमळ, उलट्या, चक्कर येणे, घाम येणे यांसारख्या गोष्टींकडे महिला सर्रासपणे दुर्लक्ष करतात. परंतु ही लक्षणे हृदयाच्या आरोग्याचा इशारा देणारी असतात, असे मत डॉ. लंडन यांनी व्यक्त केले आहे. महिलांनी आपल्या शरीरातील सूक्ष्म बदलांवर लक्ष ठेवणे, नियमित तपासण्या करून घेणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे आणि ताण-तणाव नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.

महिलांमधील हृदयविकाराची लक्षणे कोणती?

  • डॉ. लंडन यांनी हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिलांमधील वेदना नसलेली आणि दुर्लक्षित केली जाणारी काही गंभीर सांगितली आहेत.
  • छातीत वेदना नसतानाही श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे हे हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकते.
  • हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही महिलांना अनपेक्षित थकवा किंवा अशक्तपणाचा त्रास जाणवू शकतो.
  • कधी कधी महिलांमध्ये मळमळ किंवा उलट्या होणे यांसारखी लक्षणे दिसतात, जी पोटाच्या आजारासारखी वाटू शकतात.
  • याशिवाय चक्कर येणे, हलके डोके फिरणे, थंड व ओलसर घाम येणे अशीही लक्षणे दिसायला लागतात.
  • काही महिलांना आधीच भीतीची भावना किंवा काहीतरी वाईट होणार असल्याचा अंदाज येऊ शकतो.
  • महिलांनी या लक्षणांची योग्य वेळेत ओळख करून त्वरित वैद्यकीय तपासणी करावी, असा सल्ला डॉ. लंडन देतात.

हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक कोणते?

संशोधनानुसार, हृदयविकाराचा धोका प्रत्येक महिलेच्या वैयक्तिक आरोग्यस्थितीनुसार आणि वयोगटानुसार वेगळा असतो. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन या हार्मोनचे प्रमाण कमी झाल्यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. तसेच इतर अनेक कारणेही या धोक्यात आणखीच भर घालतात. मधुमेह हा पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त प्रमाणात वाढवतो. उच्च रक्तदाबाची समस्या आणि शरीरातील कोलेस्टेरॉलचे असंतुलन यामुळेही महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याशिवाय धूम्रपान, व्यायामाचा अभाव आणि लठ्ठपणा तसेच हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास अशा विविध कारणांमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरतात.

महिलांमधील जागरूकतेची कमतरता

महिलांमध्ये निर्माण होणाऱ्या हृदयविकाराच्या धोक्याला मानसिक ताण आणि नैराश्य यांसारख्या गोष्टीही कारणीभूत असल्याचे डॉ. जेरेमी लंडन यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, मानसिक आरोग्याचा थेट परिणाम हृदयाच्या कार्यावर होतो. त्यातच सततचा ताण, झोपेचा अभाव, चिंता किंवा नैराश्य या गोष्टी हृदयावर अतिरिक्त परिणाम करून दीर्घकालीन हृदयविकाराचा धोका वाढवतात. डॉ. लंडन यांनी वैद्यकीय माहितीबरोबरच दैनंदिन जीवनशैलीशी संबंधित सल्ले देऊन जटिल वैद्यकीय भाषेतील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना वेळेआधीच जागरूक करून अशा गंभीर घटनांचे प्रमाण कमी करणे, असे त्यांचे उद्दिष्ट आहे.

हृदयविकाराला ‘पुरुषांचा आजार’ मानणे धोकादायक!

हृदयविकाराला दीर्घकाळ चुकून प्रामुख्याने पुरुषांचा आजार मानले गेले आहे. त्यामुळे महिलांवर होणाऱ्या याच्या वेगळ्या परिणामांविषयी जागरूकता कमी राहिली आहे. दीर्घकाळापासून हृदयविकार हा फक्त पुरुषांचा आजार आहे, असा गैरसमज समाजात प्रचलित आहे. या चुकीच्या धारणा महिलांमध्ये जागरूकतेचा अभाव निर्माण करतात आणि त्यामुळे निदान व उपचार उशिरा होतात. परिणामी, महिलांमध्ये मृत्यूदर आणि गंभीर आजारपणाचे प्रमाण वाढते आहे. डॉ. लंडन यांच्या मते, महिलांच्या शरीरात दिसणाऱ्या वेगळ्या लक्षणांविषयी शिक्षण आणि जागरूकता वाढवणे अत्यावश्यक आहे. विशेषतः छातीत वेदना नसताना दिसणाऱ्या हृदयविकाराच्या लक्षणांबद्दल माहिती दिल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात.

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काय कराल?

डॉ. जेरेमी लंडन यांनी हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी महिलांना काही महत्वाचे सल्लेही दिले आहे. महिलांनी नियमित व्यायाम करणे आणि चरबीयुक्त आहाराचे सेवन टाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दररोजच्या आहारात फळे, पालेभाज्या, कमी चरबीचे प्रथिने आणि कडधान्य यांसारखा गोष्टींचा समावेश करण्याचा सल्लाही डॉ. लंडन यांनी दिला आहे. आरोग्यदायी आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. महिलांमधील हृदयविकाराची लक्षणे अनेकदा पुरुषांपेक्षा वेगळी आणि कमी तीव्र दिसतात, परंतु ती तितकीच धोकादायक असतात. म्हणून या सूक्ष्म लक्षणांकडे गांभीर्याने पाहणे आणि वेळेवर उपचार घेणे अत्यावश्यक आहे, असे मतही डॉ. लंडन यांनी मांडले आहे.