Silver Loan India: आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात चांदीच्या विविध वस्तू असतात (उदा: चांदीचे ताम्हण, पळी, पंचपात्र, तांब्या, ताट, वाटी. निरंजन आदी) या सर्व वस्तू रोजच्या व्यवहारात वापरल्या जात नाहीत. तथापि, निमित्तमात्र त्या वस्तू कारणपरत्वे वापरल्या जातात (उदा: विविध पूजा किंवा धार्मिक कार्ये ). सामान्यत: या चांदीच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी किंवा हल्ली बँकेच्या लॉकर मध्ये ठेवल्या जातात. आपण याकडे सोन्याप्रमाणे गुंतवणूक म्हणून पाहत नाही किंवा या वस्तू सहसा विकतही नाही. बऱ्याचदा चांदीच्या वस्तू कारणपरत्वे भेट दिल्या जातात किंवा भेट म्हणून मिळतात. त्यामुळे अशा चांदीच्या वास्तूमध्ये भावना गुंतलेल्या असतात.

कधी निकडीची आर्थिक गरज भासली तर आपण सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचा विचार करतो व असे सोने तारण कर्ज आजकाल बँका तसेच खाजगी वित्तीय संस्था ( उदा: मन्नापूरम फायनान्स, मुत्थूट फायनान्स आदी) सहजगत्या देऊ करतात. मात्र आत्तापर्यंत आपल्याकडे असलेल्या चांदीच्या वस्तू तारण (गहाण) ठेवून कर्ज मिळत नव्हते. खरे तर गेली कित्येक दिवस चांदीचे भाव सातत्याने वाढतच आहेत आणि या पुढेही वाढतच राहतील, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात सहजपणे वर उल्लेखिलेल्या वस्तूंच्या स्वरुपात सुमारे ८ ते १० किलो चांदी असू शकते. सध्याचा चांदीचा बाजारभाव विचारात घेता आपल्याकडील चांदीची किंमत सुमारे रु.१५ ते २० लाख इतकी असू शकते.

आता ‘सिल्वर लोन’ही मिळणार?

सध्या बँका तसेच एनबीएफसीज फक्त सोनेतारण कर्ज देत आहेत. मात्र लवकरच चांदी तारण ठेऊन आता कर्ज देऊ शकणार आहेत व याला सिव्हर लोन असे म्हटले जाईल. आरबीआयने याबाबत अलीकडेच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत व त्यानुसार पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून (१ एप्रिल २०२६ ) बँका तसेच एनबीएफसीज खालीलप्रमाणे सिल्व्हर लोन देऊ करतील.

silver price record high
चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. (File Photo)
  • • चांदीचे दागिने तसेच चांदीची नाणी तारण म्हणून स्वीकारली जातील, मात्र चांदीचे बार तसेच ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड्स) तारण म्हणून स्वीकारले जाणार नाहीत.
  • • जास्तीतजास्त १० किलो वजनापर्यंतचे दागिने व ५०० ग्रॅम वजनापर्यंतची नाणी प्रती कर्जदार तारण म्हणून स्वीकारली जातील.

एलटीव्ही (लोन टू व्हॅल्यू) कशी ठऱणार?

  • • १) रु.२.५ लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारण दिलेल्या चांदीच्या बाजारमूल्याच्या ८५%
  • • २) रु. २.५ लाख ते रु.५ लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारण दिलेल्या चांदीच्या बाजार मूल्याच्या ८०%
  • • ३) रु. ५ लाखांवरील कर्जासाठी तारण दिलेल्या चांदीच्या बाजार मूल्याच्या ७५
  • . ४) तारण दिलेल्या दागिन्यातील फक्त चोख चांदीचे वजन एलटीव्हीसाठी विचारात घेतले जाईल. (दागिन्यातील खडे किंवा तत्सम बाबींचे वजन वगळून )

नियम काय असतील?

  • • कर्जाची सव्याज परतफेड झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत तारण ऐवज कर्जदारास परत करणे बँक/एनबीएफसी वर बंधनकारक असणार आहे. विलंब झाल्यास प्रतिदिनी रु.५००० दंड रक्कम द्यावी लागणार आहे.
  • • कर्ज थकीत राहिल्यास वसुलीसाठी पुरेशी नोटीस देणे आवश्यक असणार आहे. कर्जदाराकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास पारदर्शी पद्धतीने लिलाव करून कर्ज रक्कम वसूल केली जाईल. यासाठीची राखीव किंमत (रिझर्व्ह प्राईस) बाजार भावाच्या ९०% पेक्षा कमी असता कामा नये.
  • • कर्जदार तसेच त्याचे नातेवाईक लिलावात भाग घेऊ शकणार नाहीत.

या नवीन सुविधेमुळे अडीअडचणीच्या वेळी आपल्याकडे घरात अथवा लॉकर मध्ये पडून असलेल्या चांदीच्या वस्तू जसे की दागिने, ताटे, ताम्हण, भांडी- लोटे यासारख्या वापरात नसलेल्या व नुसत्याच पडून असलेल्या परंतु भावनिकदृष्ट्या जतन करीत असलेल्या चांदीच्या वस्तू तारण ठेऊन सहजगत्या कर्ज घेता येईल व कर्ज परतफेडीनंतर आपल्या वस्तू आपल्याला जशाच्यातशा परत मिळतील. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या चांदीच्या वस्तूंकडे केवळ भावनिकदृष्ट्या न पाहाता व्यावहारिक दृष्टीकोन ठेऊन गुंतवणूक म्हणून पाहावे व असलेल्या चांदीत शक्य होईल तेव्हा वाढ करावी. कारण चांदीच्या भावात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आपल्या गुंतवणुकीचे मूल्य तर वाढेलच, शिवाय अडचणीच्या वेळी खात्रीशीर रक्कम उभी करता येऊ शकेल.