US Iran war gold silver prices अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर मध्य-पूर्वेतील तणाव टोकाला पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर अमेरिकेने इराणमध्ये सत्ताबदलासाठी लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि आखाती देशांतील अमेरिकन तळांवर हल्ले केले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण- मध्य-पूर्वेतील या संघर्षाचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होताना दिसत आहे.

भू-राजकीय तणावामुळे जागतिक आर्थिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली; तर सोन्याचेही दर काही प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळाले. सोने-चांदीच्या दरातील या अस्थिरतेचे नेमके कारण? युद्धाचा सोने-चांदीच्या दरावर कसा परिणाम होतो? जाणून घेऊयात…

सोने-चांदीचे अस्थिर दर आणि त्यामागील कारणे

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे ही घसरण पाहायला मिळत आहे. स्पॉट सिल्व्हरचे दर सात टक्क्यांनी कोसळल्याने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुख्य म्हणजे अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत असताना सोन्याचे दर नवनवीन उच्चांक गाठत आहेत आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एका टप्प्यावर सोन्याचे दर प्रति औंस १०० डॉलर्सने वधारले; तर चांदीचे दर ८० डॉलर्सवरून वेगाने खाली आले आहेत. सोन्या-चांदीच्या दरातील या तफावतीने गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. साधारणपणे भूराजकीय संकटाच्या काळात दोन्ही धातूंच्या दरांत वाढ होते. मात्र, यावेळी सोने वधारले आणि चांदी घसरली आहे.

चांदीच्या घसरणीमागील कारणे काय?

सोन्याचा उपयोग ९० टक्के मौल्यवान धातू म्हणून होतो; तर चांदी अजूनही औद्योगिक मागणीवर अवलंबून आहे. सध्या जागतिक पुरवठा साखळी विस्कळित होण्याच्या भीतीमुळे या औद्योगिक मागणीला फटका बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी चांदीतील आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याच काळात गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत.

जे. पी. मॉर्गनच्या विश्लेषकांनी अमेरिका-इराण संघर्षापूर्वीच सोन्याचे लक्ष्य प्रति औंस ६,००० ते ६,३०० डॉलर ठेवले होते. २०२६ साठी चांदीचा अंदाज किमान ४९ डॉलर्सपासून ते कमाल ३०९ डॉलर्सपर्यंत वर्तवला जात आहे. चांदीबद्दलच्या अनिश्चिततेमुळे ही मोठी तफावत दिसून येत आहे. जागतिक बाजार अजूनही संभ्रमात आहे की, औद्योगिक तेजीचा कल चांदीच्या किमतीवर परिणाम करेल की युद्धाचा? त्यामुळे जोवर हे निश्चित होत नाही, तोवर चांदीत चढ-उतार सुरूच राहील आणि सोन्यातील गुंतवणूक स्थिर राहील.

सुरक्षित गुंतवणूक पर्याय

सोने हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. युद्धजन्य परिस्थितीत लोक सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. परिणामी मागणी वाढल्याने सोन्याचे दरही वाढतात. इराण-अमेरिकेतील संघर्षादरम्यान जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवला आहे. परंतु, ५,४०० डॉलर्सच्या स्तरावर या तेजीला ब्रेक लागला. अवघ्या एका तासात सोन्याचे दर ५,३१० ते ५,३२० डॉलर्सच्या दरम्यान आले म्हणजेच उच्चांकावरून १०० डॉलर्सची घसरण झाली.

या घसरणीची प्रमुख कारणे:

  • वर्षभरातील २४ टक्क्यांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफा मिळवला आहे.
  • अमेरिकन डॉलर निर्देशांक मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी सोने महाग झाले.
  • व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील या अपेक्षेने ट्रेझरी यिल्ड्समध्ये वाढ झाली.

घसरण होऊनही सोन्याचे दर ऐतिहासिकदृष्ट्या उच्च पातळीवर आहेत आणि महागाईपासून संरक्षण मिळवण्यासाठी गुंतवणूकदार अजूनही सोन्याकडे आकर्षित होत आहेत.

युद्धाजन्य परिस्थिती असूनही सोने-चांदीचे दर का पडत आहेत?

जागतिक गुंतवणूकदारांनी रोख रकमेला (लिक्विडीटी) पसंती दिल्याने अमेरिकन डॉलर मजबूत झाला. डॉलर मजबूत झाला की, सोने-चांदीवर दबाव येतो. दुसरे म्हणजे व्याजदर धोरण. भूराजकीय अस्थिरता असूनदेखील, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह व्याजदर चढेच ठेवेल, असे बाजाराला वाटते. उच्च व्याजदरामुळे सोन्यासारख्या उत्पन्न न देणाऱ्या मालमत्तेचे आकर्षण कमी होते. तिसरे कारण म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील घडामोडी. ‘ओपेक +’ कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन २,०६,००० बॅरलनी वाढू शकते. या वृत्तामुळे पुरवठ्याअभावी होणाऱ्या महागाईची भीती कमी झाली आणि धातूंच्या किमतींवरील दबावही कमी झाला.

सोने-चांदीचे दर वाढणार की घटणार?

सध्या मौल्यवान धातूंमधील तेजीचा कल कायम आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याचा साठा वाढवत आहेत. भूराजकीय तणाव अजूनही निवळलेला नाही आणि महागाईची जोखीमही कायम आहे. औद्योगिक मागणी वाढेल, तेव्हा चांदीत अतिशय वेगाने तेजी येईल, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे. तसेच, फेडरल रिझर्व्ह युद्धाने ग्रासलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी व्याजदरात कपात केल्यास चांदीला सुरक्षित गुंतवणूक आणि औद्योगिक मागणी या दोन्ही बाजूंकडून मोठा आधार मिळेल.