Read for Cash: कल्पना करा – तुम्ही रोज दादर ते चर्चगेट असा ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोने प्रवास करता. साधारणपणे २५ मिनिटांच्या या प्रवासात तुम्ही मोबाईल न उघडता बॅगेतलं पुस्तक उघडता. फक्त १५ मिनिटं वाचता आणि त्या बदल्यात सरकार तुम्हाला थेट पैसे देते! हे ऐकायला विचित्र वाटतं ना? पण सिंगापूरमध्ये आता हेच प्रत्यक्षात घडतंय. सिंगापूरच्या ‘नॅशनल लायब्ररी बोर्डा’ने (NLB) या महिन्यात पाच वर्षांची ‘राष्ट्रीय वाचन मोहीम’ सुरू केली आहे. या मोहिमेचं उद्दिष्ट अगदी साधं आहे – लोकांनी मोबाईल बाजूला ठेवावा आणि किमान दिवसाला १५ मिनिटं पुस्तक वाचावं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सिंगापूर सरकार नागरिकांना चक्क बक्षीस देतंय! 

योजना नेमकी कशी चालते?

योजनेचं गणित अगदी सोपं आहे – तुम्ही एका विशिष्ट सरकारी प्लॅटफॉर्मवर तुमचं वाचन नोंदवायचं. एका बैठकीत किमान पंधरा मिनिटं वाचन झालं, तरच ती बैठक ग्राह्य धरली जाते. प्रत्येक बैठकीसाठी तुम्हाला वीस व्हर्च्युअल नाणी मिळतात. ही नाणी जमा करत करत तुम्ही एक हजार नाण्यांपर्यंत पोहोचलात की त्याचं सिंगापूर डॉलरमध्ये रूपांतर होतं; म्हणजे साधारण पन्नास दिवस सलग वाचन केलं, तर तुम्हाला काही रोख रक्कम मिळते. सध्या एका दिवसात फक्त एकच बैठक नोंदवता येते, त्यामुळे रोजची शिस्त लागणं हाच या योजनेचा गाभा आहे.

सध्या हा एक प्रायोगिक टप्पा असून तो या वर्षाच्या अखेरीपर्यंत चालेल. लोकांच्या प्रतिक्रियांनुसार यात पुढे बदल आणि नवीन सुविधा जोडल्या जातील, असं ‘एनएलबी’ने स्पष्ट केलं आहे. या मोहिमेला एक सामाजिक बाजूही आहे – लोकांनी वाचलेल्या वेळेतून एक देणगी मोहीमही राबवली जात आहे, ज्यातून ‘एनएलबी’ला साडेसात लाख वाचन-मिनिटं आणि दीड लाख सिंगापूर डॉलरपर्यंतची देणगी जमा करायची आहे.  विशेष म्हणजे, या योजनेमागचा विचार अगदी व्यवहार्य आहे – पंधरा मिनिटांसाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. मेट्रोतले तीन स्टेशन्स, बसची वाट बघतानाचा वेळ किंवा सकाळच्या चहाबरोबरची काही मिनिटं – ‘एवढ्याशा कालावधीतसुद्धा वाचता येतं’ असा संदेश देण्यात येत आहे. 

मेंदूला गंज बसतोय का?

खरा प्रश्न हा आहे – सिंगापूरसारख्या देशाला अशी योजना राबवायची गरज का भासली? 

ही मोहीम केवळ जास्त पुस्तकं वाचली जावीत यासाठी नाहीये. यामागचा खरा उद्देश आहे, लोकांची एकाग्रता टिकवण्याची क्षमता पुन्हा वाढवणं. सध्या आपण बहुतांश वेळ मोबाईलवरच्या ३० सेकंदांच्या रील्स आणि पोस्ट्स बघण्यात घालवतो आणि यामुळे दीर्घकाळ एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची आपली सवय हळूहळू कमी होत चालली आहे. 

‘एनएलबी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेलिसा टॅम यांनी याबद्दल एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे – त्या म्हणतात, “छोट्या स्वरूपातील कंटेंट आपल्याला माहिती देत असले, तरी दीर्घ वाचनामुळे एकाग्रता, विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती वाढते. आपल्याला अशी पिढी घडवायची आहे, जी जिज्ञासू असेल, विचारपूर्वक निर्णय घेणारी असेल आणि गुंतागुंतीचं जग समजून घेण्यास सक्षम असेल.”

हा प्रश्न फक्त सिंगापूरपुरता मर्यादित नाही. जगभरातले शिक्षणतज्ज्ञ सध्या ‘ब्रेन रॉट’ या संकल्पनेवर चिंता व्यक्त करत आहेत. ब्रेन रॉट म्हणजे सतत उथळ, वरवरचा डिजिटल कंटेंट बघितल्यामुळे विचारशक्तीवर होणारा नकारात्मक परिणाम. अमेरिकेतल्या पंधरा वर्षांच्या विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्याचे गुण अलीकडच्या आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये घसरले आहेत, तर सिंगापूर आणि चीनसारखे आशियाई देश मात्र यात चांगली कामगिरी करत आहेत, असं ‘सीएनएन’ने अहवालात नमूद केलं आहे.

मग प्रश्न असा उरतो – जर सिंगापूर आधीच एवढं चांगलं काम करतंय, तर ही योजना कशासाठी? याचं उत्तर आहे – वयानुसार विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण वाढत जातो आणि त्यामुळे ‘आवड म्हणून वाचणं’ हळूहळू मागे पडतं. सिंगापूरला हीच सवय पुन्हा जिवंत ठेवायची आहे.

बक्षिसांचा खेळ कशासाठी?

आता खरी गंमत आहे ती या योजनेच्या मानसशास्त्रीय बाजूत! सिंगापूर सरकारने इथे एक अतिशय हुशार खेळी खेळली आहे – माणसाच्या मनाला बक्षीस मिळाल्यावर जो आनंद होतो, त्याचाच वापर करून एक चांगली सवय रुजवण्याचा प्रयत्न.

आपला मेंदू लहान बाळासारखा वागतो – जेव्हा आपल्याला काहीतरी मिळतं, मग ते छोटंसं बक्षीस असो, एखादा पॉइंट असो किंवा नाणं तेव्हा मेंदूत डोपामाईन नावाचं एक रसायन स्रवतं, ज्यामुळे आपल्याला बरं वाटतं. सोशल मीडिया ॲप्सनी नेमकं हेच तंत्र वापरून आपल्याला त्यांच्या ॲप्समध्ये गुंतवून ठेवलं आहे. लाईक्स, नोटिफिकेशन्स, स्क्रोलिंगचा अनंत ओघ. सिंगापूरने आता हेच तंत्र उलट दिशेने वापरलं आहे – मोबाईलपासून दूर नेण्यासाठी आणि पुस्तकाकडे वळवण्यासाठी.

यालाच वर्तनशास्त्रात ‘गॅमिफिकेशन’ म्हणतात – एखाद्या साध्या, कंटाळवाण्या वाटणाऱ्या कृतीला खेळासारखं रूप देणं. नाणी जमा करणं, एका ठराविक टप्प्यावर पोहोचल्यावर बक्षीस मिळणं, रोजचा ‘स्ट्रीक’ कायम ठेवणं; या सगळ्या गोष्टी आपल्याला परत परत तीच कृती करायला भाग पाडतात. माणसाला प्रगती दिसली की तो अधिक प्रयत्न करतो – आणि इथे नाण्यांची वाढती संख्या हीच प्रगतीची खूण बनते. शिवाय, या योजनेत एक ‘सवय’देखील जाणीवपूर्वक तयार केली जाते आहे. दिवसातून एकच बैठक नोंदवता येत असल्यामुळे, लोकांना रोज न चुकता वाचावं लागतं. मानसशास्त्रात असं मानलं जातं की, एखादी कृती सातत्याने केली की ती हळूहळू सवयीत बदलते. सुरुवातीला पैशांसाठी सुरू केलेलं वाचन, कालांतराने आपोआप एक आनंददायी सवय बनू शकते आणि तेच सिंगापूरला हवं आहे.

ही योजना फक्त पैसे वाटण्याचा उपक्रम नाही. ही एक सुनियोजित मानसशास्त्रीय रचना आहे, जी माणसाच्या बक्षीसप्रेमी स्वभावाचा वापर करून, त्याला पुन्हा एकदा पुस्तकांकडे आणि खऱ्या अर्थाने खोल विचार करण्याच्या सवयीकडे घेऊन जाते. मोबाईलच्या जगात हरवलेली एकाग्रता परत मिळवण्यासाठी सिंगापूरने शोधलेला हा मार्ग, कदाचित इतर देशांनाही विचार करायला लावणारा ठरू शकतो.