Siya Goyal-Sonam Raghuvanshi Cases Raised Questions Explained : सिया गोयल आणि सोनम रघुवंशी या दोन्ही महिलांशी संबंधित कथित हत्या देशभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. कारण- या दोन्ही प्रकरणांमध्ये सुशिक्षित, सधन/मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांचा समावेश आहे. या महिलांचे ज्यांच्याशी लग्न जुळले होते किंवा नुकतेच लग्न झाले होते अशा पुरुषांची हत्या केल्याचे समोर आले. समाजशास्त्रज्ञांच्या मते, ही प्रकरणे वैयक्तिक कर्तृत्व आणि कुटुंब व विवाह यांसारख्या संस्थांशी संबंधित तणावावर प्रकाश टाकतात.
१८ जून २०२६ ला लोहगड किल्ल्याजवळ दरीत पडून पुणेकर व्यावसायिक केतन अग्रवालचा धक्कादायक मृत्यू झाला. या वर्षींच्या अखेरीस त्यांचे लग्न ठरवण्यात आले होते. मात्र, याआधीच केतनची अखेर ठरली. कुटुंबीयांनी साखरपुडा ठरवल्यानंतर केतनची होणारी वधू सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने त्याला ठार मारण्याचा कट रचला होता, असा आरोप पोलिसांनी केला. सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी हे दोघेही सध्या अटकेत आहेत.
मे २०२५ मध्ये इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी याची मेघालयमध्ये हनिमूनदरम्यान कथितरीत्या हत्या झाली होती. या प्रकरणात त्याची पत्नी सोनम रघुवंशीने तिचा कथित प्रियकर आणि इतर काही जणांसोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला. मात्र, सोनमने हे सर्व आरोप फेटाळले असून, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजात महिलांचे स्वातंत्र्य, शिक्षण, तसेच त्यांची वृत्ती यावर चर्चा सुरू आहेत. मात्र, प्राध्यापिका अचला यांनी या चर्चेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यांच्या मते, “स्वतंत्र आणि सुशिक्षित महिला आक्रमक किंवा हिंसक होत आहेत, अशा रूढ समजुतीतून या प्रकरणाकडे पाहण्याऐवजी समाजातील व्यापक आणि संरचनात्मक (systemic) आव्हानांच्या दृष्टीने पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.”
नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या प्यु रिसर्च सेंटरच्या अभ्यासानुसार, बारावीतील ७४ टक्के मुलांनी भविष्यात लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, मुलींमध्ये हे प्रमाण ६१ टक्के होते. त्यावरून तरुणींमध्ये लग्नाबाबत संकोच किंवा साशंकता वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे चीनमध्ये २०२४ मध्ये विवाहांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांनी घसरले, जे १९८६ नंतरचे सर्वांत कमी प्रमाण आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये एक अपत्य धोरण रद्द केले तरीही विवाह आणि जन्मदरात अपेक्षित वाढ झालेली नाही; तर दक्षिण कोरियातही २०१३ ते २०२३ या दशकात विवाहांची संख्या सुमारे ४० टक्क्यांनी घटली. तर, जपानमध्ये १०० हून अधिक वर्षांतील सर्वांत कमी जन्मनोंद झाली आहे. यावरुन दिसून येते की, फार कमी लोक विवाह करण्याचा पर्याय निवडत आहेत.
युरोपमध्येही कुटुंबव्यवस्थेचे स्वरूप समांतररीत्या बदलत आहे. फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तानुसार, युरोपियन युनियनमधील प्रत्येक सात तरुणांपैकी एक राहणे पसंत करतो. आधुनिक लोकसंख्याशास्त्रातील सर्वांत मोठा बदल केवळ जन्मदर घटणे नाही, तर अविवाहित राहणाऱ्यांची वाढती संख्या असल्याचे हा अहवाल नमूद करतो.
मात्र, भारतातील परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. देशात दरवर्षी सुमारे ९० लाख ते एक कोटी विवाह होतात. त्यापैकी जवळपास ९० टक्के विवाह हे कुटुंबाने जुळवलेले असतात. म्हणजेच देशात दररोज सरासरी २५ हजारांहून अधिक विवाह जुळवले जातात.
भारतात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची वैयक्तिक निवड नसते. कुटुंब, जात, धर्म, सामाजिक स्तर आणि समुदाय या घटकांशी जोडलेली एक महत्त्वाची सामाजिक संस्था मानली जाते. राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषद (NCAER) मधील समाजशास्त्रज्ञ सोनल देसाई यांच्या अंदाजानुसार, भारतातील सुमारे ९५ टक्के विवाहांवर कुटुंबाचा प्रभाव असतो किंवा ते कुटुंबीयांच्या पुढाकारानेच ठरवले जातात. त्याव्यतिरिक्त सुमारे ४० टक्के महिलांना आपल्या जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार मिळत नाही; तर सुमारे ६५ टक्के महिला आपल्या होणाऱ्या पतीला प्रथमच लग्नाच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास भेटतात. यावरून विवाहाच्या निर्णयात वैयक्तिक निवडीपेक्षा कुटुंबाची भूमिका आजही अधिक प्रभावी असल्याचे दिसून येते.
याबाबत समाजशास्त्राच्या प्राध्यापिका अचला प्रीतम टंडन म्हणतात, “आपण अशा समाजात जगत आहोत, जिथे नातेसंबंध आणि जोडीदार निवडण्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य अजूनही मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात नाही. विशेषतः विवाह, मैत्री आणि स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्यांवर समाजाच्या अपेक्षा आणि व्यक्तीच्या आकांक्षा किंवा निवडी या सुसंगत नसतात.”
प्राध्यापिका टंडन असा युक्तिवाद करतात, “आजच्या तरुणांना शिक्षण, करिअर आणि मैत्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा अधिक स्वातंत्र्य मिळत आहे. मात्र, विवाहाच्या बाबतीत हे स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात मर्यादित ठेवले जाते.’ पुढे त्या म्हणतात, ‘भारतातील अनेक कुटुंबे आपल्या मुलींना पेहराव, मैत्री, घराबाहेर जाण्याच्या वेळेबाबत किंवा जागेबाबतही तुलनेने अधिक स्वातंत्र्य देतात. मात्र, लग्न आणि मालमत्तेशी संबंधित निर्णयांचा विषय येतो तेव्हा, त्याच मुलींकडून पारंपरिक पुरुषप्रधान सामाजिक नियमांचे पालन करण्याची अपेक्षा केली जाते. हा एक मोठा विरोधाभास आहे.”
प्रा. टंडन यांच्या मते, “जेव्हा समाजाच्या अपेक्षा आणि व्यक्तीच्या इच्छा यांच्यात संघर्ष निर्माण होतो, तेव्हा स्वतःचा जीवनसाथी निवडू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी जुळवून आणलेले (Arranged) लग्न अनेकदा अडथळा असल्याचे वाटू लागते.
उत्तर प्रदेशातील समाजशास्त्रज्ञ प्राध्यापिका रीना सिंह यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स रिसर्च’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ट्रान्सफॉर्मेशन ऑफ फॅमिली अँड मॅरेज नॉर्म्स इन द एरा ऑफ जनरेशन झेड विथ स्पेशल रेफरन्स टू इंडिया’ या अभ्यासात मांडले आहे की, आजची पिढी मागील पिढ्यांच्या तुलनेत व्यक्तिमत्त्व, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीला अधिक महत्त्व देते. त्यांच्या मते, त्यामुळे तरुण-तरुणी विवाहाकडे केवळ सामाजिक बंधन म्हणून पाहत नाहीत. तर, भावनिक जवळीक, परस्पर आदर आणि संयुक्त निर्णय प्रक्रियेवर आधारित एक भागीदारी म्हणून ते विवाहाकडे पाहत आहेत.
अनेकांचा समज असतो की, श्रीमंत किंवा उच्चशिक्षित कुटुंबांतील महिलांना जीवनातील निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. मात्र, विविध संशोधनांमधून काही वेगळेच निष्कर्ष समोर येतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5, 2019-21) नुसार, शिक्षण आणि रोजगारात महिलांचा सहभाग वाढला असला तरी कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग अजूनही समान पातळीवर पोहोचलेला नाही.
त्याचप्रमाणे, प्यू रिसर्च सेंटरने २०२१ मध्ये भारतातील धर्म आणि समाजरचनेवर केलेल्या अभ्यासात असे आढळले की, भारतात विवाह आजही जात, धर्म आणि कुटुंबाच्या संमतीशी जोडलेला आहे. बहुसंख्य भारतीय आजही आपल्या सामाजिक गटातच विवाह करण्याला प्राधान्य देतात.
विशेषतः उच्च मध्यमवर्गीय आणि सधन कुटुंबांमध्ये, प्रतिष्ठा, जातीय अनुकुलता, वारसा हक्क आणि सामाजिक स्थान यांसारख्या घटकांना मोठे महत्त्व दिले जाते. अशा वेळी निर्णयांवर नेहमीच उघडपणे दबाव आणला जातो असे नाही. अनेकदा भावनिक बंधने, कुटुंबाच्या अपेक्षा आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांच्याच माध्यमातून व्यक्तीच्या निर्णयांवर प्रभाव पडत असल्याचे संशोधनातून स्पष्ट होत आहे.
शंभर वर्षांहून अधिक काळापूर्वी अमेरिकन समाजशास्त्रज्ञ चार्ल्स हॉर्टन कूली यांनी ‘लुकिंग ग्लास सेल्फ’ (Looking Glass Self) ही संकल्पना मांडली होती. या सिद्धांतानुसार, इतर लोक आपल्याकडे कसे पाहतात किंवा आपल्याबद्दल काय विचार करतात, याच्या आधारेच व्यक्ती स्वतःची ओळख आणि प्रतिमा घडवत असते. सोशल मीडियाच्या युगात या संकल्पनेचे महत्त्व अधिक वाढले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्यू रिसर्च सेंटरने २०२४ मध्ये, अमेरिकेतील किशोरवयीन मुलांवर केलेल्या अभ्यासानुसार, सुमारे तीन-चतुर्थांश किशोरवयीन मुले दिवसातून अनेक वेळा सोशल मीडिया वापरतात. त्यामुळे डिजिटल माध्यमांवरील मान्यता, लाइक्स आणि सार्वजनिक प्रतिमा हे त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन मानसशास्त्रीय संस्थेने (APA) प्रकाशित केलेल्या संशोधनात असे नमूद करण्यात आले आहे की, ऑनलाइन प्रतिमा जपण्याचा अतिरेक व्यक्तीच्या सार्वजनिक प्रतिमा आणि खरे व्यक्तिमत्त्व यांच्यातील दरी अधिक वाढवू शकतो.
दरम्यान, लोहगड किल्ल्यावरील घटनेनंतर सिया गोयलने तिचा होणारा पती केतन अग्रवाल याच्यासोबतची इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. या बातमीमुळे सोशल मीडियावर तयार होणाऱ्या सार्वजनिक प्रतिमेच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, आजच्या अनेक तरुणांसाठी सोशल मीडिया हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही. ते असे व्यासपीठ बनले आहे, जिथे नातेसंबंध, यश, आनंद आणि वैयक्तिक आयुष्याचे विशिष्ट चित्र काळजीपूर्वक मांडले जाते. मात्र, ही डिजिटल प्रतिमा आणि वास्तविक आयुष्य यांच्यात अनेकदा मोठी तफावत असू शकते.
सियाने ती पोस्ट करण्याइतका आत्मविश्वास दाखवणे आणि नंतर या दुहेरी भूमिकेतून आपण सहज बाहेर पडू असे मानणे म्हणजे “जनरेशन झेड’ (Gen Z) च्या युगात डिजिटल प्रतिमेला सामाजिक व्यक्तिमत्त्वापेक्षा अधिक महत्त्व कसे मिळत आहे, हे दर्शवते. विशेष म्हणजे प्रत्यक्ष संवादांऐवजी डिजिटल विश्वात जीवन जगण्याच्या बाबतीत आता जुन्या पिढीही मागे राहिलेली नाही,” असे प्राध्यापक टंडन नमूद करतात.
