Scabies symptoms and remedies: त्वचेला खाज येण्याची अनेक कारणे आहेत. रजोनिवृत्तीच्या काळात त्वचेमध्ये नैसर्गिक तेलाची निर्मिती कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडून तिची जळजळ किंवा आग होऊ शकते. गर्भावस्थेतही खाज येणे सामान्य आहे. यामध्ये हार्मोन्समधील बदलांची महत्त्वाची भूमिका असते. तसेच पोटाचा आकार वाढत असताना पोटाभोवतीची त्वचा ताणली जाते. त्यामुळे ती कोरडी पडून खाज सुटू शकते. परंतु, रात्री झोपल्यानंतर झोपेत असताना त्वचेला खाज येत असेल तर त्यामागे नेमकं कारण काय असू शकतं? याचा घेतलेला आढावा. 

रात्रीच खाज अधिक का जाणवते?

दिवसभर आपण विविध कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे त्वचेला येणाऱ्या सौम्य खाजेकडे फारसे लक्ष जात नाही. मात्र रात्री शांत वातावरणात आणि झोपताना शरीरावरील संवेदनांकडे अधिक लक्ष जाते. खोली उष्णता अधिक असणे, जाड पांघरूण, घाम येणे आणि त्वचेचा कोरडेपणा यामुळेही रात्री खाज अधिक तीव्र जाणवू शकते. त्यामुळे झोपताना वारंवार खाज येत असेल, तर केवळ पांघरूण किंवा हवामानाला दोष न देता त्यामागील कारण शोधणे आवश्यक आहे.

खाज येण्याची कारण कोणती?

रात्री वाढणारी खाज खरूजेचं लक्षण असू शकते

रात्री तीव्र होणारी खाज हे खरूज अर्थात ‘स्केबीज’चे महत्त्वाचे लक्षण आहे. हा त्वचेचा संसर्ग अतिशय सूक्ष्म परजीवी किड्यामुळे होतो. बोटांच्या बेचक्यांत, मनगटांवर, काखेत, कंबरेभोवती, नितंबांवर किंवा जननेंद्रियांच्या परिसरात बारीक पुरळ, फोड किंवा रेषांसारख्या खुणा दिसू शकतात. घरातील एकापेक्षा अधिक व्यक्तींना एकाच वेळी रात्री खाज येत असल्यास खरूजेची शक्यता लक्षात घ्यावी.

खरूज त्वचेच्या निकट संपर्कातून तसेच बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल किंवा अंथरूण वापरल्याने पसरू शकते. त्यामुळे केवळ एका व्यक्तीने उपचार न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जवळच्या संपर्कातील व्यक्तींनाही उपचारांची आवश्यकता भासू शकते.

नवीन औषध किंवा सौंदर्यप्रसाधनामुळेही खाज येऊ शकते

नवीन साबण, परफ्यूम, बॉडी लोशन, केसांचा रंग, कपडे धुण्याची पावडर किंवा विशिष्ट प्रकारच्या कपड्यांमुळे त्वचेची ॲलर्जी अथवा ‘कॉन्टॅक्ट डर्मटायटिस’ होऊ शकतो. काही औषधे सुरू केल्यानंतरही खाज किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे खाज नेमकी कधी सुरू झाली, त्यापूर्वी कोणते नवीन उत्पादन किंवा औषध वापरले होते आणि शरीराच्या कोणत्या भागावर ती अधिक आहे, याची नोंद ठेवावी. मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही नियमित औषध अचानक बंद करू नये.

गर्भावस्थेतील तीव्र खाज दुर्लक्षित करू नका

गर्भावस्थेत त्वचा ताणल्यामुळे खाज येऊ शकते. मात्र विशेषतः हातांच्या तळव्यांना किंवा पायांच्या तळव्यांना पुरळ नसताना तीव्र खाज येत असेल आणि ती रात्री वाढत असेल, तर तातडीने स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशी खाज काही वेळा ‘इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस ऑफ प्रेग्नन्सी’ या यकृताशी संबंधित गर्भावस्थेतील विकाराचे लक्षण असू शकते. या स्थितीत आईबरोबरच गर्भाच्या आरोग्याचेही वैद्यकीय निरीक्षण आवश्यक असते.

रात्री खाज येण्यामागे कोणते वैद्यकीय आजार असू शकतात?

  • यकृताच्या समस्या: हिपॅटायटिस किंवा पित्तनलिकांशी संबंधित विकारांसह यकृताचे विविध आजार झाल्यास रक्तामध्ये पित्तातील क्षार साचू शकतात. त्यामुळे तीव्र खाज येऊ शकते आणि ही खाज अनेकदा रात्री अधिक वाढते.
  • मूत्रपिंडाचे आजार: मूत्रपिंडे योग्य प्रकारे काम करत नसल्यास रक्तामध्ये शरीरातील टाकाऊ पदार्थ साचतात. या स्थितीला ‘युरेमिया’ असे म्हणतात. त्यामुळे संपूर्ण शरीराला खाज सुटू शकते.
  • थायरॉइडचे विकार: थायरॉइड ग्रंथी अतिसक्रिय असणे किंवा कमी सक्रिय असणे, या दोन्ही स्थितींचा त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडून खाज सुटू शकते.
  • मज्जातंतूंशी संबंधित समस्या: न्यूरोपॅथी, नागीण किंवा मल्टिपल स्क्लेरोसिससारख्या आजारांमध्ये त्वचेवर कोणतेही स्पष्ट बदल दिसत नसतानाही खाज येऊ शकते.

खाज कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

  • अतिशय गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे. कोमट किंवा थंड पाणी वापरावे.
  • तीव्र सुगंध असलेले साबण, लोशन आणि डिटर्जंट वापरणे टाळावे.
  • आंघोळीनंतर त्वचा किंचित ओलसर असतानाच सुगंधरहित मॉइश्चरायझर लावावे.
  • सैल आणि सुती कपडे वापरावेत. लोकरीचे किंवा त्वचेला टोचणारे कपडे टाळावेत.
  • नखे लहान ठेवावीत. त्यामुळे नकळत खाजवल्यास त्वचेला खोलवर जखम होण्याचा धोका कमी होतो.
  • खाज येणाऱ्या भागावर काही मिनिटे थंड, ओलसर कापड ठेवता येते.
  • शयनकक्ष खूप गरम ठेवू नये आणि घाम येईल इतके जाड पांघरूण वापरणे टाळावे.

मनमानी पद्धतीने औषधे किंवा स्टेरॉइड क्रीम वापरू नका

खाज येताच कोणतीही स्टेरॉइडयुक्त क्रीम, ॲन्टिफंगल औषध किंवा ॲलर्जीची गोळी स्वतःहून घेणे योग्य नाही. खाजेची कारणं बुरशीजन्य संसर्ग, खरूज, ॲलर्जी किंवा एखादा अंतर्गत आजार अशी वेगवेगळी असू शकतात. चुकीच्या क्रीममुळे काही त्वचारोग तात्पुरते लपतात; परंतु संसर्ग अधिक पसरू शकतो. त्यामुळे वारंवार होणाऱ्या किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या खाजेसाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

रात्री येणाऱ्या खाजेबाबत कधी काळजी करावी?

आपल्याला येणारी खाज ही केवळ तात्पुरती त्वचेची जळजळ आहे की एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पुढील लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे:

  • घरगुती उपाय करूनही खाज दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कायम राहते.
  • तीव्र खाजेमुळे सतत अनेक रात्री झोपमोड होते.
  • खाजेबरोबर त्वचेवर पुरळ, लालसरपणा किंवा फोड दिसतात.
  • पू येणे, सूज किंवा ताप यांसारखी संसर्गाची लक्षणे दिसतात.
  • खाजेबरोबर कावीळ, थकवा किंवा अचानक वजन कमी होणे यांसारखी इतर शारीरिक लक्षणे जाणवतात.

यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आजाराचे लवकर निदान झाल्यास गुंतागुंत टाळता येते आणि दीर्घकाळ आराम मिळू शकतो.

रात्री शरीराला खाज येण्याचे कारण नेहमी त्वचेची समस्याच असते का?

नेहमीच असे नसते. त्वचेचा कोरडेपणा आणि ॲलर्जी ही खाज येण्याची सामान्य कारणे आहेत. मात्र काही वेळा खाज येणे हे शरीरातील एखाद्या अंतर्गत आरोग्यविषयक समस्येचे लक्षण असू शकते.

तणावामुळे खाज वाढू शकते का?

होय. तणावामुळे एक्झिमा, पित्त उठणे आणि सोरायसिस यांसारख्या त्वचारोगांचा त्रास वाढू शकतो. या सर्व आजारांमध्ये त्वचेला खाज येते.

रात्री त्वचा खाजवणे हानिकारक आहे का?

होय, त्वचा जोरजोरात खाजवल्यामुळे तिचे नुकसान होऊ शकते, जखमा होऊ शकतात आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

डॉक्टरांना कोणती माहिती सांगावी?

वैद्यकीय तपासणीदरम्यान खाज कधीपासून आहे, रात्री कोणत्या वेळी वाढते, ती संपूर्ण शरीरावर आहे की विशिष्ट भागावर, पुरळ दिसतो का, घरातील इतर कोणाला खाज आहे का आणि अलीकडे नवीन औषध किंवा सौंदर्यप्रसाधन वापरले आहे का, ही माहिती डॉक्टरांना सांगावी. आवश्यकतेनुसार डॉक्टर त्वचेची तपासणी तसेच यकृत, मूत्रपिंड किंवा थायरॉइडशी संबंधित रक्ततपासण्या सुचवू शकतात.

रात्री येणारी प्रत्येक खाज गंभीर आजाराचे लक्षण नसते. मात्र ती वारंवार होत असेल, झोप बिघडवत असेल किंवा इतर शारीरिक लक्षणांसोबत दिसत असेल, तर तिच्याकडे केवळ त्वचेची किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करू नये.