How Sleeping For Less than 7 hours Affects : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण अनेक गोष्टींशी तडजोड करतो; पण त्यातील सर्वात मोठी तडजोड ही झोपेशी संबंधित असते. काम नसले तरीही काहींना रात्री उशिरा झोपण्याची सवय असते. मोबाईल पाहताना झोप आली तरीही त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळेच झोप अपुरी राहणे ही आता एक सामान्य समस्या झाली आहे. मात्र, हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी व आयुष्यासाठी घातक ठरू शकते. अपुरी झोप घेतल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात हे तुम्ही अनेकदा वाचले किंवा ऐकले असेलच, पण त्यामुळेच आयुर्मानावरही परिणाम होऊन अकाली मृत्यूचा धोका वाढतो, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

झोप का महत्त्वाची आहे?

अनेकांना असे वाटते की- कमी झोप घेऊनही त्यांचे शरीर व्यवस्थित काम करू शकते. मात्र, सातत्याने कमी झोप घेतल्यास शरीराचे दीर्घकालीन नुकसान होते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे- झोप केवळ विश्रांतीसाठीच नव्हे तर शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी महत्त्वाची असते. दिवसभराच्या थकव्यानंतर मेंदूला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी शरीराला झोपेची अत्यंत आवश्यकता असते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याचे काम झोपेमध्ये होते. तसेच स्मरणशक्ती सुधारण्याची प्रक्रिया झोपेदरम्यानच घडते. पुरेशी झोप घेतल्यास मधुमेहासह हृदयविकार आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो, त्यामुळे झोपेची वेळ आणि कालावधी याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

झोपेबाबत संशोधन काय सांगतं?

दररोज सात तासांपेक्षा अधिक झोप घेतल्यास आयुर्मान वाढू शकते, असा निष्कर्ष अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात नोंदवण्यात आला. पोर्टलँड येथील ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेला हा अभ्यास ‘SLEEP Advances’ या शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला. हा संशोधन प्रकल्प ओएचएसयू स्कूल ऑफ नर्सिंगमधील ‘स्लीप क्रोनोबायोलॉजी आणि हेल्थ लॅबोरेटरी’ विषयाच्या विद्यार्थ्यांनी राबवला. झोपेचा मानवी शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.

आणखी वाचा : कोण आहेत IPS रामचंद्र राव? त्यांचे निलंबन कशामुळे झाले? कर्नाटकतील अश्लील व्हिडीओचे प्रकरण काय?

अभ्यास नेमका कशावर आधारित?

संशोधकांनी त्यांच्या अभ्यासासाठी अमेरिकेतील एका व्यापक राष्ट्रीय डेटाबेसचा आधार घेतला. त्यांनी अमेरिकेतील विविध जिल्ह्यांमधील लोकांच्या सरासरी आयुर्मानाचे मूल्यमापन करण्यासाठी आकडेवारी गोळा केली. २०१९ ते २०२५ या कालावधीत सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने केलेल्या सर्वेक्षणाशी या आकडेवारीची तुलना केली. त्यातून असे समोर आले की- ज्या जिल्ह्यांमध्ये ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त होते, तेथील सरासरी आयुर्मान सातत्याने कमी होऊन अकाली मृत्यूचा धोका वाढत होता. दुसरीकडे दररोज ७ तासांहून अधिक वेळ झोप घेणाऱ्या लोकांचे आयुर्मान वाढत होते आणि त्यांना कोणत्याही आजाराचा धोका नव्हता, त्यामुळे अपुरी झोप ही केवळ थकव्यापुरती मर्यादित न राहता दीर्घकालीन आरोग्यावर गंभीर परिणाम करणारी बाब असल्याचे संशोधकांनी अभ्यासात नमूद केले.

अपुरी झोप आयुर्मानासाठी घातक

झोपेसंदर्भात करण्यात आलेल्या या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक व प्राध्यापक अँड्र्यू मॅक हिल यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, झोपेचा आयुर्मानाशी इतका मजबूत संबंध असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. चांगल्या आरोग्यासाठी झोप महत्त्वाची असते हे आपण नेहमीच मानत आलो आहोत. मात्र, या संशोधनाने त्या वास्तवावर ठोस शिक्कामोर्तब केले आहे. शक्य असल्यास प्रत्येकाने दररोज सात ते नऊ तास झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, हे निष्कर्ष ऐकायला स्वाभाविक वाटतात आणि त्यामागे स्पष्ट कारणही आहे. मात्र, सर्व संशोधन मॉडेल्समध्ये हा संबंध इतक्या ठळकपणे दिसून येणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मी झोपेच्या शरीरशास्त्राचा अभ्यास करणारा तज्ज्ञ आहे आणि झोपेचे फायदे मला माहीत आहेत, तरीही पुरेशी झोप आणि आयुर्मान यातील संबंधाची तीव्रता मला थक्क करणारी वाटली.

झोप का उडते? संशोधकांनी सांगितली कारणे

संशोधकांच्या मते, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानाचे प्रमाण, लठ्ठपणा, मधुमेह, शारीरिक हालचालींचा अभाव आणि नात्यांमध्ये आलेला दुरावा, आर्थिक तणाव यांसारख्या बाबी झोपेच्या कमतरतेमागील प्रमुख कारणे ठरू शकतात. अनेकांना त्यांचे शरीर अपुऱ्या झोपेचे संकेत देत असते. सकाळी उठल्यानंतरही सतत डुलक्या येत असतील तर याचा अर्थ तुमची झोप पूर्ण झालेली नाही. झोपेच्या कमतरतेमुळे लक्ष केंद्रित न होणे, विसरभोळेपणा वाढणे, कामात लक्ष न लागणे किंवा वाहन चालवताना चुका होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय वारंवार मूड बदलणे, चिडचिड होणे, चिंता वाढणे आणि भावनांवर नियंत्रण न ठेवणे ही लक्षणेही अपुऱ्या झोपेचीच असू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि सर्दी, खोकला किंवा पोटाचे त्रास जाणवू लागतात. वाढलेला रक्तदाब, सततची डोकेदुखी, अनावश्यक वजनवाढ, भूक वाढणे आणि काम करण्याची इच्छा न होणे हीदेखील झोपेच्या कमतरतेची लक्षणे मानली जातात.

हेही वाचा : अमेरिका पाठोपाठ ‘या’ देशाने घातली २०० प्रकारच्या नोकऱ्यांवर बंदी; भारतीयांवर काय होणार परिणाम?

शांत झोप येण्यासाठी काय करावे?

झोपेची वेळ ठरवणे सोपे असले तरीही आजच्या धावपळीच्या जीवनात तिचे पालन करण्यात अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास निरोगी आणि दर्जेदार झोपेची सवय सहज लावता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एकच वेळ निश्चित करायला हवी. अगदी सुट्टीच्या दिवशीही याच वेळापत्रकाचे पालन करायला हवे. रात्री झोपण्याआधी बेडरूममधील लाईट्स बंद केल्यास अंधारात लवकर झोप येते. झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहणे बंद करायला हवे. त्याऐवजी एखादे पुस्तक वाचण्याची सवय लावल्यास लवकर झोप येते. रात्री जड जेवण किंवा मद्यपान केल्यास झोपेच्या चक्रात अडथळा येतो. त्याऐवजी सुका मेवा किंवा फळांसारखे हलक्या पदार्थांचे सेवन करायला हवे, जेणेकरून रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नियमित योगा किंवा व्यायाम केल्यास रात्री अधिकच शांत झोप लागते, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.