Sleeping With cloves in Your Mouth For Sleep : दिवसभराचा थकवा असूनही रात्री अंथरुणावर पडल्यावर अनेकांना बऱ्याचदा झोप लागत नाही; तर मध्यरात्री गाढ झोपेत असताना काहीजण अचानक खडबडून जागे होतात. परिणामी अपुरी झोप होणे ही आता एक सामान्य समस्या झाल्याने अनेकांनी त्यावर घरगुती उपाय शोधण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान रात्री झोपण्यापूर्वी तोंडात लवंग ठेवल्यास खूप चांगली आणि शांत झोप लागते, असा दावा समाजमाध्यमांवर केला जात आहे; पण या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का? त्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात? त्याविषयीचा हा आढावा…

शरीरासाठी झोप का महत्त्वाची आहे?

झोप ही केवळ विश्रांतीसाठीच नव्हे तर शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी महत्त्वाची असते. दिवसभराच्या थकव्यानंतर मेंदूला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी शरीराला झोपेची अत्यंत आवश्यकता असते. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याचे काम झोपेद्वारे होते. त्याशिवाय स्मरणशक्ती सुधारण्याची प्रक्रियाही झोपेदरम्यानच घडते. पुरेशी झोप घेतल्यास मधुमेहासह हृदयविकार आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळेच झोपेची वेळ आणि कालावधी याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, विचारांमधील फेरबदल ही पद्धत झोपेच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून काम करू शकते. या पद्धतीचा रात्री नियमित वापर केल्यास मेंदू शांत होऊन लवकर झोप येण्यास मदत होते.

लवंगामुळे चांगली झोप लागते का?

मुंबईतील परळ येथील ग्लेनईगल्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. हरीश चाफळे यांनी लवंग आणि झोपेच्या दाव्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. रात्री झोपण्यापूर्वी तोंडात चावलेली लवंग ठेवल्याने झोपेचा दर्जा सुधारतो किंवा चांगली झोप येते, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. मात्र, लवंगामध्ये असलेल्या सौम्य शांत करणाऱ्या गुणधर्मांमुळे काही व्यक्तींना थोडा आराम वाटू शकतो. तरीही निरोगी आणि शांत झोप येण्यासाठी चांगल्या सवयी अंगीकारणे हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे. झोपेची वेळ ठरवणे सोपे असले तरीही आजच्या धावपळीच्या जीवनात तिचे पालन करण्यात अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास निरोगी आणि दर्जेदार झोपेची सवय सहज लावता येऊ शकते, असे डॉ. हरीश यांनी स्पष्ट केले.

लवंग खरोखरच मन शांत करते का?

लवंगामध्ये ‘युजेनॉल’ सारखी अनेक नैसर्गिक संयुगे असतात, जे आपल्या शरीरातील पेशींना खराब होण्यापासून वाचवण्याचे मुख्य काम करतात. याशिवाय त्यामध्ये शरीराला सौम्य आराम देणारे गुणधर्मदेखील आढळून येतात; परंतु या घटकांचा झोपेवर आणि मानसिक ताण कमी करण्यावर थेट काही परिणाम होतो का? हे अद्याप कोणत्याही संशोधनातून सिद्ध झालेले नाही. लवंग खाल्ल्यामुळे जर कोणाला आराम वाटत असेल, तर तो अतिशय किरकोळ असू शकतो. त्यामुळेच या उपायाकडे झोपेच्या समस्येवरील उपचार म्हणून पाहिले जाऊ शकत नाही, असे डॉ. हरीश यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

तोंडात लवंग ठेवून झोपणे सुरक्षित आहे का?

झोपण्यापूर्वी तोंडात लवंग ठेवण्याचा उपाय अनेकजण करत असले, तरी ती पूर्णपणे सुरक्षित आहे, असे म्हणता येणार नाही. रात्री तोंडात लवंग ठेवून झोपल्यास ती झोपेत चुकून श्वासनलिकेत जाण्याचा किंवा घशात अडकण्याचा धोका असू शकतो. विशेषतः झोपेत लवंग श्वासावाटे आत गेल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. तसेच, दीर्घकाळ लवंग तोंडात ठेवल्यास काही व्यक्तींमध्ये हिरड्या किंवा तोंडातील ऊतींना त्रास होण्याची शक्यता असते. लवंगाचे कमी प्रमाणात सेवन सामान्यतः सुरक्षित मानले जाते; पण तिचा अतिवापर केल्यास काही दुष्परिणाम दिसू शकतात. लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तोंडात जळजळ होणे, पोटदुखी किंवा अस्वस्थता जाणवणे, तसेच काही व्यक्तींमध्ये ॲलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते, असा इशारा डॉ. हरीश यांनी दिला.

लवंग झोपेसाठी रामबाण उपाय नाही

झोपण्यापूर्वी लवंग तोंडात ठेवल्याने झोपेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारते, हा केवळ एक समज असून त्यामागे ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत, असेही डॉ. चाफळे यांनी स्पष्ट केले. झोपण्यापूर्वी तोंडात लवंग ठेवणे हा पारंपरिक घरगुती उपाय असला तरी झोप सुधारण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला उपाय नाही. सुरक्षित पद्धतीने वापरल्यास काही व्यक्तींना थोडासा आराम किंवा मानसिक समाधान मिळू शकते. मात्र, निद्रानाश किंवा झोपेच्या इतर समस्यांवर ती प्रभावी उपचार ठरू शकत नाही, ज्यांना झोपेशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घ्यावा असेही त्यांनी नमूद केले.

शांत झोप येण्यासाठी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास निरोगी आणि दर्जेदार झोपेची सवय सहज लावता येऊ शकते. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एकच वेळ निश्चित करायला हवी. अगदी सुट्टीच्या दिवशीही याच वेळापत्रकाचे पालन करायला हवे. रात्री झोपण्याआधी बेडरूममधील लाईट्स बंद केल्यास अंधारात लवकर झोप येते. झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहणे बंद करायला हवे; त्याऐवजी एखादे पुस्तक वाचण्याची सवय लावल्यास लवकर झोप येते. रात्री जड जेवण किंवा मद्यपान केल्यास झोपेच्या चक्रात अडथळा येतो. त्याऐवजी सुका मेवा किंवा फळांसारखे हलक्या पदार्थांचे सेवन करायला हवे, जेणेकरून रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नियमित योगा किंवा व्यायाम केल्यास रात्री अधिकच शांत झोप लागते, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.