काही दिवसांपूर्वी फ्रान्समधील सुपरमार्केटमधील शीतकपाटांवर सायबर हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यातील पदार्थ नासून शेकडो कोटी युरोंचे नुकसान झाले. या विचित्र घटनेतून महाराष्ट्रातील वीज कंपन्यांनीही पुढले धोके ओळखले पाहिजेत…

ही चर्चा आत्ताच कशासाठी?

महाराष्ट्रात विजेची स्मार्ट मीटर्स लावण्यात येत आहेत. पण त्यापासून काही समस्या निर्माण होऊ शकतात काय, हा प्रश्न फ्रान्समधील १२ ऑक्टोबरच्या घटनेने अधोरेखित केला आहे.  फ्रान्समधील बहुसंख्य सुपरमार्केटमध्ये थंड (थिजलेले, फ्रोझन) पदार्थ ठेवलेल्या शीतकपाटांमधील तापमान अचानक बर्‍याच प्रमाणात वाढल्यामुळे, त्यांत ठेवलेले पदार्थ नासले व ते सर्व फेकून द्यावे लागले. यामुळे अक्षरश: कोट्यवधी युरोंचे नुकसान झाले. तपासाअंती असे लक्षात आले की, तापमान नियंत्रण करणार्‍या यंत्रणांवर (थर्मोस्टॅट) सायबर हल्ला करून वरील शीतकपाटांमधील तापमान ५० अंश सेल्शिअस (१२२ अंश फॅरेनहाईट) इतके वाढवण्यात आले होते. त्यामुळे, अनेक ठिकाणी आगीदेखील लागल्या आणि ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. फ्रान्सशिवाय, पोर्तुगाल, स्पेन व हॉलंड  इ. देशांतही या हल्ल्याची झळ बसली.

विजेवर चालणारी उपकरणे ‘सायबर हल्ल्या’चे सावज कशी ठरली?

ही शीतकपाटे, अन्य यंत्रे विजेवर चालणारी असली तरी, अशा स्वरूपाचा हल्ला करणे शक्य झाले याचे कारण, इंटरनेट अथवा तत्सम संपर्कप्रणालीद्वारे ही यंत्रे जोडलेली होती. सायबर हल्ला करणे शक्य झाले याचे तपशीलात्मक कारण असे की, यंत्रणेतील सॉफ्टवेअर जुने होते; पासवर्ड इ. बर्‍याच काळ बदलले नव्हते. सायबर हल्लेखोरांनी या संपर्कयंत्रणेत बाहेरून अनधिकृतपणे प्रवेश मिळवत तापमान परस्पर बदलवून टाकले. ही यंत्रणा सुटी (स्टॅण्ड अलोन) असती, तर तिचा बाहेरच्या जगताशी संपर्क होऊ शकला नसता व सायबर हल्लेखोरांना या नियंत्रकांवर अशा प्रकारे ताबा मिळवता आला नसता.

यातून हल्लेखोरांना काय मिळणार?

फ्रान्समधील सायबर हल्ल्यामागचे हेतू  उघड झाले नसले तरी, पुढच्या काळातील एक शक्यता अशी की, हे ‘हल्ले’ कोणत्याही मानवी हेतूविनाही केले जाऊ शकतात. ‘क्लॉड’ एआय बॉटची निर्माण करणार्‍या अँथ्रोपिक या कंपनीने अलीकडेच एक गंभीर आरोप केला आहे : ‘एआय एजंट आता नजीकच्या काळात स्वत:च्या प्रतिकृती (नकला) बनवून विविध उपलब्ध (जोडल्या गेलेल्या) उपकरणांमध्ये लपून बसतील (एआय किडे वा वर्म). एआय एजन्ट हे माहितीचे भुकेले असतात व सतत माहिती गोळा करत राहणे व स्वत:ला अद्ययावत ठेवणे हा त्यांचा प्रमुख उद्योग असतो. हे वरकरणी निरुपद्रवी वाटत असले, तरी हे किडे कधी तरी ‘काड्या’ करतील हे नक्की!’ काही काळापूर्वी हे सगळे ‘लांडगा आला रे…’ अशा स्वरूपाचे कल्पनेचे खेळ वाटत होते; पण बर्‍याच गोष्टी अनपेक्षित वेगाने घडत आहेत व त्या मानाने एकंदर मानव समाजाची तयारी अपुरी पडत आहे.

याचा आपल्या स्मार्ट मीटरशी काय सबंध? 

महाराष्ट्रात सध्या  विजेची जुनी मीटर्स बदलून त्यांच्या जागी स्मार्ट मीटर्स लावणे सुरू आहे. जुनी मीटर्स फक्त एखाद्या घरी किती वीज बाहेरून (वाहात) घरामध्ये आली याचे मोजमाप करतात. त्यामुळे, किती वीज वापरली गेली हे पाहायचे तर प्रत्यक्ष मीटरसमोर उभे राहून त्या मीटरच्या पडद्यावर दिसणारा आकडा नोंदवावा लागतो. अशा जुन्या मीटरचा एक प्रमुख  सद्गुण म्हणजे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क नाही. त्यामुळे सायबर हल्ल्याची शक्यता नाही. याउलट, स्मार्टमीटरचा ‘स्मार्ट’पणा त्याचा बाहेरच्या जगाशी कायम संपर्क असण्यात (कनेक्टेड डिव्हाइस) उगम पावतो. त्यामुळे, अशा मीटरवर सायबर हल्ला होऊ शकतो.

याची काळजी आज किती करावी?

हल्लेखोर मीटरमध्ये कायमस्वरूपी बिघाड निर्माण करू शकतात; कदाचित आगही लागू शकेल अशी परिस्थिती निर्माण होईल काय अशी शंका वाटते. अथवा, जे काही मीटरने मोजले आहे (मीटर रीडिंग), त्या संख्येत हल्लेखोर पूर्णपणे फेरफार करू शकतो. उदा. भ्रष्ट कर्मचारीही मीटरमध्ये फेरफार करू शकतात. अर्थात, हे सगळे होईल असे मी म्हणत नाही. परंतु, इतक्या मोठ्या प्रमाणावर, नियंत्रण नसलेल्या जागी स्मार्ट मीटर्स लावण्यात आली, तर आणि तेथे या संभाव्य सायबर हल्ल्याची शक्यता अधिक असेल, या मुद्द्याचा गंभीरपणे विचार करण्यात आला असावा अशी अपेक्षा आहे.  

baw_h1@yahoo.com