सहवैमानिकाने जीवघेणा हल्ला केल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छार रक्तबंबाळ झाले होते. त्यांच्या डोक्याला, मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. या गंभीर परिस्थितीतही त्यांनी धैर्य न सोडता विमानाचा ताबा आपल्याकडेच ठेवला. कसाबसा कॉकपिटचा दरवाजा उघडल्यानंतर विमानातील प्रवासी आणि इतर कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर सहवैमानिकाला ताब्यात घेतले. त्याचवेळी विमानातून प्रवास करणारे एक दंतवैद्य कॅप्टन मच्छार यांच्या मदतीला धावून आले. अत्यंत तणावपूर्ण वातावरणातही त्यांनी तब्बल ४५ मिनिटे शर्थीचे प्रयत्न करून वैमानिकाचे प्राण वाचवले. त्यामुळेच प्लायदुबईच्या विमानाचे सौदी अरेबियात सुरक्षित लँडिग करता आले. या संपूर्ण घटनेचा थरार आता समोर आला आहे, त्याविषयी…
प्लायदुबईच्या विमानातील थरारक प्रसंग
गेल्या आठवड्यात दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला; पण भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे हा कट उधळला गेला. रक्तबंबाळ अवस्थेत असतानाही त्यांनी विमानाचे सुरक्षित लँडिग केले आणि १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. याच विमानातून प्रवास करणारे इस्रायली दंतवैद्य डॉ. शुता मुसायेव यांनी कॉकपिटमध्ये घडलेला थरारक प्रसंग सांगितला. तसेच कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचेही त्यांनी कौतुक केले. या घटनेबाबत डॉ. मुसायेव सांगतात की, प्लायदुबईचे विमान हजारो फूट उंचीवर असताना अचानक कॉकपिटमधून आरडाओरड सुरू झाली होती. त्याचवेळी विमान झपाट्याने खाली जात असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. या गोंधळात अचानक कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि आतील दृश्य पाहून सगळेच हादरून गेले. सहवैमानिकाने जीवघेणा हल्ला केल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. या गंभीर परिस्थितही ते विमानावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीत होते.
दंतवैद्य डॉ. मुसायेव यांनी सांगितला थरार
डॉ. मुसायेव पुढे म्हणाले की, स्मित मच्छार यांनी दरवाजा उघडल्यानंतर मी कॉकपिटच्या दिशेने धावलो. तो क्षण इतका गंभीर होता की अवघ्या पाच ते दहा मिनिटांतच सगळ्यांचाच मृत्यू झाला असता. स्मित मच्छार रक्तबंबाळ झाले होते आणि त्यांच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून हल्लेखोर सहवैमानिकाला पकडले आणि तातडीने कॉकपिटमधून बाहेर काढले. तो हल्लेखोर आम्हाला काहीही सांगायला तयार नव्हता. त्याउलट मला मारून टाका म्हणत आरडाओरड करत होता. आम्ही त्याचे हेडफोनने हात बांधले आणि त्याला एका जागेवर बसवले. त्यानंतर तिसऱ्या एका पायलटने विमानाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले. मात्र, स्मित मच्छार शुद्धीवर राहणे अत्यंत गरजेचे होते. त्याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. कृपया झोपू नका, डोळे उघडे ठेवा… आम्हाला तुमची गरज आहे, असे मी त्यांना सांगत होतो. त्या ४५ मिनिटात मच्छार यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्येकानेच धडपड केली. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्यांना शुद्धीत ठेवण्याचे आव्हान आमच्यासमोर होते.
“मला वाचवा, मला इथे मरायचे नाही”
डॉ. मुसायेव पुढे सांगतात की, कॅप्टन मच्छार यांना झालेल्या जखमांवर दाब देण्यासाठी मी एका टी शर्टचा वापर केला. तरीदेखील त्यांचा रक्तस्राव थांबत नसल्याने मी विमानातील कर्मचाऱ्यांकडे बर्फ मागितला. त्यांना अतिशय खोल जखमा झाल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या पॅकेट्सची गरज होती. मात्र, प्रत्येक वेळी रक्तस्राव किती आहे हे पाहण्यासाठी टी-शर्ट बाजूला केल्यानंतर पुन्हा अधिक रक्त वाहू लागायचे. त्यामुळे फार जोर न लावता मी जखमांवर दाब देत राहिलो आणि बर्फाचा वापर केला. यादरम्यान कॅप्टनला शुद्धीत ठेवण्यासाठी मी त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारपूस करण्यास सुरुवात केली. तुम्हाला किती मुले आहेत, त्यांची नावे काय आहेत, असे मी त्यांना विचारत राहिलो. तसेच घाबरू नका, तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे परत जाल. आपण लवकरच लँडिंग करणार आहोत, असे मी त्यांना वारंवार सांगत होतो. त्याचवेळी कृपया मला वाचवा. मला इथे मरायचे नाही असे ते मला सांगत होते. उपचारादरम्यान मच्छार वेदनेने व्याकुळ होऊन वेदनाशामक औषध मागत होते. परंतु अति-रक्तस्रावाच्या धोक्यामुळे मी त्यांना औषध न देता फक्त पाण्याचे थेंब दिले, असेही डॉ. मुसायेव यांनी सांगितले.
प्रवाशांची विमानातील शोधमोहीम
यादरम्यान डॉ. मुसायेव हे कॅप्टन मच्छर यांचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत असताना काही प्रवासी विमानात आणखी कोणी हल्लेखोर किंवा दहशतवादी लपलेला तर नाही ना याचा शोध घेत होते. विमान सौदी अरेबियातील धावपट्टीवर उतरेपर्यंत ही तपासणी सुरूच होती. याबाबत डॉ. मुसायेव सांगतात की, स्मित मच्छार यांची प्रकृती सातत्याने खालवत होती. एकदा त्यांची नाडी खूपच मंद झाली होती. त्यानंतर मला त्यांचे ओठ निळे पडल्याचे दिसले. मी विमानातील कर्मचाऱ्याला सांगितले की आपल्याला लवकरात लवकर लँड करावे लागेल. आता मच्छार यांच्याकडे जास्त वेळ नाही. विमान सुरक्षितपणे लँडिग झाल्यानंतर मी मच्छार यांना वैद्यकीय पथकाकडे सुपूर्त केले आणि गुड लक माझ्या मित्रा… सगळं ठीक होईल… असे म्हणत त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना केली.
“स्मितने आमचे प्राण वाचवले, आम्ही त्यांचे”
या भयानक प्रसंगाच्या आठवणीचा शेवट सांगताना डॉ. मुसायेव म्हणाले की, गंभीर जखमी असतानाही स्मित यांनी शेवटपर्यंत विमानावर नियंत्रण ठेवले आणि आमचे प्राण वाचवले. त्यामुळे स्मित हे आमच्यासाठी एक हिरोच आहेत. माझ्या कुटुंबाला आणि विमानातील सर्व प्रवाशांना वाचवण्यासाठी त्यांनी जे काही केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हीच कर्माची परतफेड आहे. त्यांनीआमचे प्राण वाचवले आणि आम्ही त्यांचे… यादरम्यान कॅप्टन स्मित मच्छार यांना सुरुवातीला तातडीने उपचारासाठी सौदी अरेबियातील तबूक येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अबुधाबी येथे हलवण्यात आले आहे. भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीत आता सातत्याने सुधारणा होत आहे. भारतीय दूतावास सातत्याने स्मित मच्छार यांच्या कुटुंबाच्या आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. भारतीय वैमानिकाने दाखलेल्या या धाडसाचे सध्या जगभरात कौतुक होत आहे.
