Social Media Fitness Trends and Hyrox 75 Hard Challenge Reality : हायरॉक्ससारख्या स्पर्धा, ७५ दिवसांचं चॅलेंज आणि सिक्स पॅक ॲब्स मिळवण्याची क्रेझ सोशल मीडियावर वाढतेय. पण एखादं फिटनेस चॅलेंज पूर्ण करणं आणि आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची सवय लावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

जिममध्ये जाऊन व्यायाम करणं ही काही नवी गोष्ट नाही. पण, आता केवळ जिमला जाण्यापेक्षा हायरॉक्ससारख्या स्पर्धेसाठी ट्रेनिंग करणं, ७५ दिवसांचं चॅलेंज पूर्ण करणं किंवा सिक्स-एट पॅक ॲब्स मिळवणं याकडे तरुणाईचा कल वाढतोय. सोशल मीडियावर या फिटनेस ट्रेंड्सची चर्चा होतेय आणि त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्याही वाढतेय.

हायरॉक्ससारख्या स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद पाहिला तर फिटनेसचं स्वरूप बदलत असल्याचं जाणवतं. व्यायाम आता केवळ वैयक्तिक आरोग्यापुरता राहिलेला नाही. त्याला स्पर्धा, कम्युनिटी, सोशल मीडियावरची लोकप्रियता आणि स्वतःची ओळख यांची जोड मिळालीय. ७५ हार्ड चॅलेंजमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणारा अंकित बैयनपुरिया आणि त्याच धर्तीवर लोकप्रिय झालेला भारतीय ॲश्टन हॉल यांची उदाहरणं आहेत.

पण, या सगळ्या ट्रेंड्समधून खरंच दीर्घकालीन फिटनेस साधला जातोय का? एखादं चॅलेंज पूर्ण करणं आणि आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची सवय लावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सोशल मीडियावर दिसणारे फिटनेसचे आदर्श, इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव आणि व्यायामशास्त्र यांचा विचार केला तर या ट्रेंड्सचे फायदे आणि मर्यादा दोन्ही समोर येतात.

हायरॉक्सची क्रेझ

हायरॉक्स ही मॅरेथॉनसारखी केवळ धावण्याची स्पर्धा नाही. यात तुम्हाला एक किलोमीटर धावल्यानंतर एक फंक्शनल वर्कआउट करायचा असतो आणि असं आठ वेळा करायचं असतं. आठ किलोमीटर धावणं आणि त्यासोबत स्किअर्ज, स्लेज पुश, स्लेज पुल, बर्पी ब्रॉड जंप, रोइंग, फार्मर्स कॅरी, सँडबॅग लंजेस आणि वॉल बॉल्स असे आठ व्यायामप्रकार तुम्हाला हायरॉक्समध्ये पूर्ण करायचे असतात. यात शरीराची ताकद, सहनशक्ती आणि योग्य हालचाली करण्याची क्षमता या सगळ्यांचा कस लागतो.

‘लोकसत्ता’च्या वृत्तानुसार, २०१७ मध्ये जर्मनीत सुरू झालेल्या या स्पर्धेला आता जागतिक दर्जाच्या फिटनेस इव्हेंटचं रूप आलं आहे. सुरुवातीला एका गोदामात ६५० ते ७०० स्पर्धकांसह सुरू झालेल्या या उपक्रमाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. २०२५ च्या हंगामापर्यंत ८० हून अधिक स्पर्धांचं आयोजन आणि लाखो स्पर्धकांचा सहभाग नोंदवला गेला. भारतातही दिल्ली, बेंगलोर आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये या स्पर्धांना प्रतिसाद मिळतोय.

फिटनेसचं इव्हेंट मॉडेल

हायरॉक्स लोकप्रिय होण्यामागे त्याचं स्पर्धात्मक स्वरूप जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच त्यातून तयार होणारा समूहभावही महत्त्वाचा आहे. मुंबईतल्या नामांकित जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून कार्यरत असणारे समीर हळंदे यांच्या मते, अशा स्पर्धांमुळे फिटनेस क्षेत्राला आर्थिक चालना मिळते. मोठे ब्रँड्स या स्पर्धांकडे आकर्षित होतात, आयोजक आणि स्पर्धकांना आर्थिक लाभ होतो, तर सहभागी व्यक्तींना मोठ्या व्यासपीठावर ओळख मिळते. याशिवाय, हायरॉक्ससारख्या इव्हेंटमुळे लोक एकत्र ट्रेनिंग करतात, ग्रुप तयार होतात आणि फिटनेस ही एक सामाजिक कृती म्हणून समोर येते.

म्हणजेच, फिटनेस हा आता फक्त वजन कमी करणं किंवा मसल्स तयार करणं इतकाच विषय राहिलेला नाही. त्यात स्पर्धा, सहभाग, समुदाय आणि अनुभव यांची भर पडतेय. फिटनेस इंडस्ट्रीचा विस्तारही याच दिशेनं होतोय. FICCI आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या अहवालातही भारतात फिटनेस क्षेत्राचा प्रवास केवळ जिमपुरता मर्यादित न राहता विविध उत्पादनं, सेवा आणि व्यायामप्रकार असलेल्या मोठ्या इकोसिस्टमकडे होत असल्याचं नमूद केलं आहे.

व्यायामाची शिस्त लावणारं ७५ हार्ड

हायरॉक्सप्रमाणेच ७५ हार्ड हे चॅलेंजही सोशल मीडियावर लोकप्रिय झालं. यामध्ये ७५ दिवस काही ठराविक नियम पाळावे लागतात. मद्यपान आणि जंक फूड टाळणं, दररोज दोन वेळा प्रत्येकी ४५ मिनिटं व्यायाम करणं, त्यापैकी एक व्यायाम घराबाहेर करणं, ठराविक प्रमाणात पाणी पिणं, पुस्तकाची दहा पानं वाचणं आणि रोज स्वतःचा फोटो काढणं असे त्याचे नियम आहेत. यातला एकही नियम चुकला तर पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरुवात करावी लागते.

या चॅलेंजमुळे अंकित बैयनपुरिया हा हरियाणाच्या एका छोट्या गावातला पहिलवान चर्चेत आला. ७५ हार्ड चॅलेंजमुळे प्रसिद्ध झालेल्या अंकितची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आणि त्याच्याकडून या फिटनेस प्लॅनची माहितीही जाणून घेतली. अशा घटनांमुळे एखाद्या फिटनेस ट्रेंडला केवळ सोशल मीडियावरच नव्हे, तर मुख्य प्रवाहातही प्रसिद्धी मिळते.

अमेरिकन फिटनेस इन्फ्लुएन्सर ॲश्टन हॉल याच्या सकाळच्या अत्यंत शिस्तबद्ध दिनक्रमाचे व्हिडीओही असेच व्हायरल झाले. पहाटे उठणं, बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवणं, ध्यान, लेखन, व्यायाम आणि स्किनकेअर अशा गोष्टी त्याच्या व्हिडीओंमध्ये दिसतात. उत्तर प्रदेशातल्या योगेंद्र कुशवाह या पोस्टमनने हॉलच्या दिनक्रमाची भारतीय पद्धतीनं नक्कल करणारे व्हिडीओ तयार केले. त्याला ‘इंडियन ॲश्टन हॉल’ अशी ओळख मिळाली. स्वतः हॉल त्याला भेटायला आला आणि त्या भेटीने योगेंद्रचं नशीबच बदलून गेलं.

या उदाहरणातून फिटनेस ट्रेंड्सचा आणखी एक पैलू समोर येतो. व्यायामाची एखादी पद्धत लोकप्रिय झाली की ती फॉलो करणाऱ्यांनाही सोशल मीडियावर ओळख मिळण्याची संधी निर्माण होते. एखादं चॅलेंज पूर्ण करणं, त्याचे व्हिडीओ पोस्ट करणं आणि स्वतःमधला बदल दाखवणं हा स्वतःची डिजिटल ओळख तयार करण्याचा नवा मार्ग झाला आहे. पण, या लोकप्रियतेच्या आकर्षणात व्यायामाचा मूळ उद्देश मागे पडू शकतो.

ट्रेंड आणि दीर्घकालीन फिटनेस यातला फरक

समीर यांच्या मते, सोशल मीडियावर ‘७५ हार्ड’, ‘हायरॉक्स’ आणि ‘योद्धा’सारखे ट्रेंड लोकप्रिय होत असले तरी अनेक जण केवळ नवीन आव्हान म्हणून किंवा ट्रेंडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी त्यात उतरतात. दीर्घकालीन फिटनेससाठी मात्र स्ट्रेंथ आणि वेट ट्रेनिंग हा मुख्य पाया आहे. ७५ हार्ड हे स्पर्धात्मक स्वरूपाचं नसून दैनंदिन शिस्त लावणारं चॅलेंज आहे. हायरॉक्ससारख्या स्पर्धेत स्क्वॉट्स आणि बर्पीजसारखे व्यायाम असल्यामुळे आधी शरीराचा बेस तयार असणं गरजेचं आहे.

याच मुद्द्याला हायरॉक्सच्या स्पोर्ट्स सायन्स रिपोर्टमधील निरीक्षणंही आधार देतात. या स्पर्धेत धावणं हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी केवळ वेगवान धावणं पुरेसं नसून सहनशक्ती, ताकद, थकवा सहन करण्याची क्षमता आणि व्यायामाच्या वेगवेगळ्या प्रकारांमधला योग्य समन्वय आवश्यक असतो. हायरॉक्ससारख्या स्पर्धेत उतरण्यासाठी काही दिवसांचा सराव पुरेसा नसतो असं हा रिपोर्ट सांगतो. या रिपोर्टमध्ये अनुभवी खेळाडूंची रिकव्हरी, थकव्याच्या अवस्थेत निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रयत्नांचं योग्य नियोजन यांचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित केलं आहे.

राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये पुण्याचं प्रतिनिधित्व केलेले आणि खेळाडूंना प्रशिक्षण देणारे ज्ञानेश्वर येनपुरे यांच्या मते, अशा स्पर्धांसाठी सराव करताना सातत्य, सुरक्षा आणि सामर्थ्य या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्पर्धेपुरता सराव न करता तो नियमित व्यायामाचा भाग व्हायला हवा. स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर विशेष सरावाची तीव्रता कमी करता येते, मात्र व्यायामाची सवय कायम ठेवणे गरजेचे आहे.

फिटनेस इन्फ्लुएन्सर्सवर किती विश्वास ठेवायचा?

सोशल मीडियावर फिटनेसविषयक माहिती देणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सकडे तरुणाई प्रेरणेचा स्रोत म्हणून पाहते. त्यांचे वर्कआउट व्हिडीओ, डाएट टिप्स, ट्रान्सफॉर्मेशन पोस्ट्स आणि फिटनेस चॅलेंजेस पाहून अनेक जण जिममध्ये जायला सुरुवात करतात.

अफझल हुसेन सिद्दीकी आणि डॉ. रेश्मा वाजा यांनी आपल्या ‘अ कॉम्प्रेहेन्सिव्ह स्टडी ऑन सोशल मीडियाज रोल इन जिम मेंबरशिप बिहेव्हियर’ या शोधनिबंधात तरुणाईवर असलेल्या इन्फ्लुएन्सर्सच्या प्रभावावर प्रकाश टाकला आहे. यासाठी त्यांनी २०२६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, ७०.५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी इन्फ्लुएन्सरची विश्वासार्हता हा जिमविषयक सहभागासाठी महत्त्वाचा घटक असल्याचं सांगितलं. इन्फ्लुएन्सर्सचा अस्सल वाटणारा कंटेंट आणि कमी वेळेत अधिक माहिती देणारे व्हिडीओही लोकांना आकर्षित करत असल्याचं या शोधनिबंधात नमूद केलं आहे.

२०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘एन एम्पिरिकल इन्व्हेस्टिगेशन इनटू द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया फिटनेस व्हिडीओज ऑन युजर्स एक्सरसाइज इंटेंशन्स’ या संशोधनासाठी फिटनेस व्हिडीओंचा व्यायाम करण्याच्या इच्छेवर होणारा परिणाम तपासण्यात आला. यात इन्फ्लुएन्सरच्या विश्वासार्हतेचा प्रभाव सर्वाधिक महत्त्वाचा ठरला. त्यानंतर त्याचं व्यक्तिमत्त्व आणि शारीरिक आकर्षकता महत्त्वाची ठरली; मात्र केवळ तज्ज्ञ असल्याचा दावा व्यायामाची इच्छा निर्माण करण्यासाठी पुरेसा नव्हता.

पण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सर्टिफाइड पर्सनल ट्रेनर यांच्यात फरक आहे असं समीर सांगतात. इन्फ्लुएन्सर लोकप्रिय आहे म्हणजे त्याचं मार्गदर्शन प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. प्रशिक्षित ट्रेनरला दुखापती, पोश्चर करेक्शन आणि PCOD सारख्या वैयक्तिक आरोग्यविषयक समस्यांचा अनुभव असू शकतो, त्यामुळे एखाद्या इन्फ्लुएन्सरचा व्यायाम किंवा डाएट प्लॅन आंधळेपणानं फॉलो करण्याऐवजी स्वतःच्या गरजेनुसार त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे.

शरीराविषयीचा न्यूनगंड इन्फ्लुएन्सर्सच्या पथ्यावर?

फिटनेस कंटेंटमधला सर्वाधिक आकर्षक भाग म्हणजे शरीरात झालेला बदल दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ. ‘आधी आणि नंतर’चे फोटो, सिक्स-एट पॅक ॲब्स, मोठे बायसेप्स आणि कमी बॉडी फॅट यांचं प्रदर्शन तरुणांना प्रेरणा देतं. पण, सतत अशा शरीरांची तुलना स्वतःशी केली तर व्यायामाचा उद्देश आरोग्याऐवजी दिसण्यापुरता मर्यादित होऊ शकतो.

२०१८ च्या ‘फिटस्पिरेशन अँड थिनस्पिरेशन’ या ‘जर्नल ऑफ ईटिंग डिसऑर्डर्स’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात ‘फिटस्पिरेशन’ म्हणजे फिटनेस आणि आरोग्यासाठी प्रेरणा देणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि ‘थिनस्पिरेशन’ म्हणजे अतिशय बारीक शरीरयष्टीचं समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट्स यांची तुलना केली गेली. अभ्यासात दोन्ही प्रकारच्या पोस्ट्समध्ये शरीराच्या दिसण्यावर, आकर्षक पोझेसवर आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्याच्या संदेशांवर भर असल्याचं आढळलं.

याचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. सतत आदर्श शरीरांच्या प्रतिमा पाहिल्याने स्वतःच्या शरीराविषयी असमाधान निर्माण होऊ शकतं. एखाद्याला आपण पुरेसे फिट नाही, आपली प्रगती कमी आहे किंवा आपल्याला अपेक्षित शरीरयष्टी कधीच मिळणार नाही असं वाटू शकतं. सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक आकर्षक शरीरयष्टीमागे योग्य प्रकाशयोजना, कॅमेरा अँगल, एडिटिंग आणि अनेक वर्षांची मेहनत असू शकते. मात्र, प्रेक्षकांपर्यंत अनेकदा फक्त अंतिम परिणाम पोहोचतो.

चॅलेंजमुळे प्रेरणा मिळते, पण दुखापतींची शक्यताही वाढते

सोशल मीडिया फिटनेस चॅलेंजचा फायदा होतो का, याचा अभ्यास करण्यासाठी चेक प्रजासत्ताकमधल्या एका युनिव्हर्सिटीत २०२१ मध्ये ६७ तरुणांना ३० दिवसांचं पुश-अप चॅलेंज दिलं गेलं. यात सहभागी व्यक्तींना दररोज १२ ते १५ पुश-अप्सचे तीन सेट करायचे होते. चॅलेंज संपल्यानंतर महिलांच्या पुश-अप क्षमतेत सरासरी ५.८, तर पुरुषांच्या क्षमतेत ७ रीपिटेशन्सची वाढ झाली.

पण, याच अभ्यासात काही धोकेही दिसले. चॅलेंजदरम्यान २० टक्के सहभागी व्यक्तींना वेदनांमुळे व्यायाम थांबवावा लागला. काही जणांना चॅलेंज संपल्यानंतरही खांदा आणि मनगटाच्या वेदना जाणवत होत्या, त्यामुळे चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात शरीर देत असलेले संकेत दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं.

याशिवाय, सोशल मीडियावर चॅलेंजमध्ये सहभागी झाल्यानंतर आपली प्रगती सार्वजनिकपणे दाखवण्याचा दबावही निर्माण होतो. एखादा दिवस व्यायाम चुकला तर अपयशाची भावना येऊ शकते. काही जण ही भावना टाळण्यासाठी दुखापत किंवा थकवा असतानाही व्यायाम सुरू ठेवतात, त्यामुळे चॅलेंजची रचना, व्यायामाची तीव्रता आणि विश्रांती यांचा विचार करणं आवश्यक आहे.

व्यायामाची आवड टिकवणं हेच खरं यश

सोशल मीडिया व्यायामाची प्रेरणा देऊ शकतो का, याचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास २०२० मध्ये करण्यात आला. त्यासाठी ५१८ तरुणांवर चार आठवड्यांचा इन्स्टाग्राम आधारित प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामुळे सहभागी तरुणांची व्यायामाबद्दलची आवड बदलली नाही; मात्र व्यायामाशी संबंधित सकारात्मक भावना वाढल्याचं संशोधनात दिसलं. सोशल मीडियामुळे व्यायामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आनंददायी होऊ शकतो, पण फक्त सोशल मीडिया कंटेंटमुळे दीर्घकालीन व्यायामाची आवड निर्माण होते असं या अभ्यासातून सिद्ध झालेलं नाही.

ज्ञानेश्वर यांच्या मते, हायरॉक्स असो, ७५ हार्ड असो किंवा मॅरेथॉन, एखादं चॅलेंज पूर्ण करण्यापुरता सराव मर्यादित ठेवू नये. तो दीर्घकाळासाठी शरीराचं सामर्थ्य आणि स्टॅमिना वाढवणारा असायला हवा. स्पर्धेच्या तयारीत आहार, साधनं, प्रशिक्षक आणि दुखापतींचा धोका यांचाही विचार करायला हवा. एखादी गंभीर दुखापत झाली तर स्पर्धेसाठी केलेला वेळ, खर्च आणि मेहनत वाया जाऊ शकते.

हायरॉक्स, ७५ हार्ड किंवा सिक्स पॅक ॲब्स यापैकी कोणताही ट्रेंड पूर्णपणे चांगला किंवा वाईट नाही. त्यातून व्यायामाची सुरुवात होत असेल, लोक एकत्र येत असतील आणि नियमित हालचालींची सवय लागत असेल तर त्याचा फायदा नक्कीच आहे. पण, फिटनेसचा अर्थ एखादं चॅलेंज पूर्ण करणं किंवा सोशल मीडियावर आकर्षक दिसणं इतकाच नाही. व्यायामामुळे शरीराची ताकद, सहनशक्ती आणि आरोग्य सुधारतंय का ही खरी कसोटी आहे. ट्रेंड येतील आणि जातील; पण त्यातून तयार झालेली व्यायामाची सवय टिकली, तरच या फिटनेस फंड्यांचा खरा उपयोग झाला असं म्हणता येईल.