डॉ. शशांत सामक व डॉ. जेसिका सामक
Extra-Marital Affairs Psychology:
‘पती, पत्नी और वो’ यांच्या बाबतीत गमतीची बाब म्हणजे शंभरपैकी नव्याण्णव जणांनी हे गृहीतच धरले होते की ‘वो’ म्हणजे ‘ती’!  जो प्रगत (?) समाज स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो त्याच समाजाची मानसिकता अशी का आहे याची चर्चासुद्धा त्या काळात वा नंतरही कधी झाली नाही. ‘वो’ म्हणजे ‘तो’ का असू शकत नाही? याचे कारण मुळातच काही सामाजिक गृहीतांमधे आहे. ही गृहीते परंपरेने समाजात घट्ट मुळे रोवून आहेत. अशी ‘वो’ परिस्थिती, विवाहबाह्य संबंधस्थिती ही मुळातच पुरुषाकडूनच अपेक्षित ठेवली गेली आहे.

‘वो’मुळे  चाळवलेली मानसिकता

‘डान्स लिटील लेडी डान्स’ टीना चार्ल्स गात होती आणि एका मोठ्या कॅसेट प्लेअरवर ते गाणं ऐकत संजीवकुमार नाचत होता. गडी एकदम खुशीत दिसत होता. त्याच्या खुशीचं कारणही त्या सिनेमाच्या टायटलमधेच दडलेलं होतं.‘पती, पत्नी और वो’. ज्यांनी हा सिनेमा पाहिला असेल त्यांच्या डोळ्यांसमोर हे सगळं येईलच. निर्मात्याने सिनेमाच्या नावामुळेच कित्येक पती-पत्नींना सिनेमाकडे खेचले होते. किती ‘वो’नी तो सिनेमा पाहिला असेल कोण जाणे, पण मध्यमवर्गीयांना त्याने आकर्षित केले होते, हे मात्र निश्चित. एका ‘वो’मुळे लोकांची मानसिकता किती मोठ्या प्रमाणात चाळवली जाते याचे मूर्तिमंत दर्शन त्या सिनेमाच्या वेळेस घडले. मानवी मानसिकता आहेच मुळी अशी. त्या सिनेमाच्या नावातील ‘वो’ जर काढूनच टाकला असता तर? तर नुसत्या ‘पती और पत्नी’साठी लोकांनी एवढी धाव घेतली असती का, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.

‘वो’ म्हणजे नेहमीच ‘ती’च कशासाठी?

आणखी एक गमतीची बाब म्हणजे शंभरपकी नव्याण्णव जणांनी हे गृहीतच धरले होते की, ‘वो’ म्हणजे ‘ती’! म्हणजे पती-पत्नी नात्यात दुसरं कोणी ‘वो’ असूच शकत नाही! काय गंमत आहे बघा, जो प्रगत(?) समाज स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो त्याच समाजाची मानसिकता अशी का आहे याची चर्चासुद्धा त्या काळात वा नंतरही कधी झाली नाही. ‘वो’ म्हणजे ‘तो’ का असू शकत नाही? आणि त्यावर अशाच प्रकारचा व अशाच धाटणीचा सिनेमा का झाला नाही किंवा होऊ शकला नाही, याचा साधा विचारही कोणा निर्मात्याच्या किंवा कोण्या सामान्याच्या वा कोण्या असामान्य विचारवंताच्या मनात का बरे नाही आला? याचे कारण मुळातच काही सामाजिक गृहीतांमधे आहे. ही गृहीते परंपरेने समाजात घट्ट मुळे रोवून आहेत. अशी ‘वो’ परिस्थिती, विवाहबाह्य संबंधस्थिती ही मुळातच पुरुषाकडूनच अपेक्षित ठेवली गेली आहे.

Extra-Marital-Affair
पती-पत्नी आणि वो मधला वो हा तोही असूच शकतो. (Photo- AI)

…त्यांना उत्तर सुचेना!

एक उदाहरण देतो. पुण्यातील एका स्त्रीरोगविज्ञान परिषदेसाठी ‘सेक्सॉलॉजी’चे व्याख्यान द्यायला मला आमंत्रित केले होते. नंतरच्या ‘एक्स्पर्ट पॅनल’ चर्चेवेळी अध्यक्ष महिलेने, ज्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या, त्यांनी उपस्थित स्त्रीवर्गाला गंमतीने का होईना, पण सल्ला दिला ‘आपापल्या पतीदेवांकडे जरा लक्ष द्या. सध्या ‘अफेअर्स’ फार वाढत चालली आहेत.’ मी लगेचच या वाक्याला आक्षेप घेऊन सर्वच श्रोत्यांना कळण्यासाठी त्या अध्यक्ष महिलेला विचारले, ‘तुम्ही पतीदेवांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिलात यामधे थोडी गल्लत होतीय असं मला वाटतं. वेश्यागमन वा कॉलगर्ल, बारगर्ल यांच्याशी असणारे संबंध ही काही ‘अफेअर्स’ होत नसल्याने तुमच्या मते असे दहापकी किती विवाहित पुरुष आहेत ज्यांना ‘अफेअर्स’साठी ‘अविवाहित’ मत्रिणी मिळतात असे तुम्हाला वाटते?’ त्या एकदम गप्पच बसल्या. त्यांना उत्तर द्यायचे सुचेना.

विवाहित स्त्रियांचेही ‘अफेअर’ असते

मी त्यांना जरा विश्लेषण करून सांगितले की, ‘माझ्याकडे आलेल्या दहापकी आठ विवाहित पुरुषांशी ‘अफेअर्स’ करणाऱ्या स्त्रिया विवाहितच आहेत. याचाच अर्थ विवाहित स्त्रियांचेही ‘अफेअर’ असते. म्हणजेच विवाहित स्त्रियांची ‘अफेअर्स’ असू शकत नाहीत किंवा त्यांना तसा अधिकारच नसतो अशी धारणा चुकीची आहे. विवाहित स्त्रियांवर ही विचारधारणा समाजाने लादलेली आहे. थोडक्यात विवाहित स्त्री-पुरुष दोघेही विवाहबाह्य संबंधात जवळ जवळ सारख्याच प्रमाणात गुंतलेले आहेत. आणि हे वास्तव आहे, नाकारू नका. त्या अध्यक्ष महिला काही बोलू शकल्या नाहीत. हा मुद्दा त्यांच्या लक्षातच आला नव्हता आणि त्या नाकारूही शकत नव्हत्या.

पुरुषी ईगो

असो, आणि सध्या ‘अफेअर्स’ फार वाढत चालली आहेत हेही फारसे बरोबर वाक्य नाही. या गोष्टी पूर्वापार महाभारत काळापासूनच तशा प्रसिद्ध आहेत (ऋग्वेदातही उल्लेख आहेत). पण सध्याच्या काळात त्या ‘ओपननेसमुळे’ जास्त लक्षात येऊ लागल्या आहेत एवढेच. स्त्रियाही आता ‘जशास तशा’ झाल्या आहेत. एका पतीदेवांने आपल्या बायकोला जरा चेष्टेत विचारले, ‘तू दशरथ राजाचे नाव ऐकलंस?’ ती म्हणाली,‘हो, मग?’ तो म्हणाला,‘नाही, त्याला तीन राण्या होत्या माहीत आहे?’ तिने कपाळावर आठ्या पाडून विचारलं, ‘बरं मग?’. पतीदेव जरा हसून म्हणाले, ‘काही नाही. मलाही सध्या तसं वाटतंय.’ तिने लगेच त्याला विचारले, ‘तू द्रौपदीचं नाव ऐकलंस?’ पतीदेव गडबडून म्हणाले, ‘तू ना प्रत्येक बोलणं मनावर घेतेस.’ राजा पतीदेवांनी तलवार लगेचच म्यान केली. आपल्याला मत्रीण असावी, पण बायकोला मित्र? शांतं पापम्. पुरुषी ईगो हा असा असतो. असे बरेच नवरे मनातून राजासारखी स्वप्ने पाहात असतात. या राजांना आपली एक राणी सांभाळता सांभाळता नाकी नऊ येत असतात. पण हौस मात्र दांडगी.

सेक्स ही दुसरी मूलभूत प्रेरणा

कुठल्याही गोष्टीची अभिलाषा ही नैसर्गिक गोष्ट असू शकते. विशेषत निसर्गाने प्राण्याच्या मेंदूत नोंदवलेल्या मूलभूत प्रेरणांना (तहान, भूक इ.) तृप्त करणारी कुठलीही गोष्ट त्याला मिळवावीशी वाटते. मनुष्य प्राण्यामधे वेगळं काही घडत नाही. मेंदूतील ते मूलभूत प्रेरणांचं उत्तेजित झालेलं केंद्र ती अभिलाषा पूर्ण होईपर्यंत शांत होत नाही. आणि ‘सेक्स’ तर प्राणीजगतातील सर्वात बलवत्तर अशी दुसरी मूलभूत प्रेरणा आहे. (सर्वात बलवत्तर पहिली मूलभूत प्रेरणा असते ‘स्वरक्षण’.) परंपरेने आपण तिच्या अभिलाषेला ‘वासना’ म्हणतो.   

…तर शारीरिक, मानसिक व भावनिक बिघाड

इतर प्रेरणांपेक्षा ‘सेक्स’ची मूलभूत प्रेरणा आणखीनच वेगळी असते. ती मानवात शारीरिक, मानसिक, भावनिक अशा तिन्ही स्तरांवर कार्यरत असते. त्रिबंधात्मक असते. ती टाळल्यास वा तिची तृप्ती न झाल्यास, शारीरिक, मानसिक व भावनिक बिघाड हा होणारच हे लक्षात ठेवले पाहिजे, ते नैसर्गिक आहे आणि निसर्गाविरुद्ध लढणे अवघड असते. या  प्रेरणेवर काही काळ ताबा ठेवता येऊ शकतो, पण ती सर्वस्वी टाळता येत नाही.