Social Media Soft Blocking : कधी एखाद्याचे स्टेटस दिसत नाही, पोस्ट फीडमध्ये येत नाहीत, पण त्याने आपल्याला ब्लॉकही केलेले नसते… असा अनुभव आला आहे का? सोशल मीडियावर एखाद्याला ब्लॉक करणं हा खूप जड जाणारा पर्याय वाटू शकतो. एखाद्याशी आपल्याला पूर्णपणे संपर्क तोडायचा नसतो, पण त्याची सततची उपस्थितीही नकोशी वाटत असते. अशावेळी काही जण थेट ब्लॉक करण्याऐवजी हळूहळू स्वत:च त्यांच्यापासून दूर राहण्याचा मार्ग निवडतात.

सोशल मीडियावर या प्रकाराला ‘सॉफ्ट ब्लॉकिंग’ म्हटलं जातं. यात समोरच्या व्यक्तीला थेट ब्लॉक न करता तिच्या स्टोरीज म्यूट करणे, त्यांना पोस्ट किंवा स्टोरीज सेटिंग्स मधून हाइड करणे, फॉलो करणे थांबवणे किंवा संवाद कमी करणे असे पर्याय वापरले जातात. म्हणजे संपर्क पूर्णपणे तोडायचं नाही, पण डिजिटल आयुष्यातील त्यांची जागा हळहळू कमी करायची.

हा ट्रेंड केवळ तरुणांपुरता मर्यादित नाही. मित्र, नातेवाईक, सहकारी किंवा ओळखीच्या व्यक्तींपैकी कोणाशीही सोशल मीडियावर असं अंतर ठेवलं जाऊ शकतं. पण लोक थेट ब्लॉक करण्याऐवजी असा ‘सॉफ्ट’ मार्ग का निवडत आहेत? यावर तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.

थेट ब्लॉक करण्यापेक्षा सॉफ्ट ब्लॉकिंग हा शांतपणे दूर जाण्याचा पर्याय काही युजर्ससाठी समाधान देणारं असू शकतं. मात्र, ज्याच्यापासून अंतर ठेवलं जातंय, त्याच्यासाठी हा अनुभव तितकाच भावनिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकतो. समोरची व्यक्ती अचानक आपल्याशी का अंतर ठेवतेय, याचा विचार त्याच्या मनात सुरू होतो.

यामागची कारणं प्रत्येक वेळी सारखी नसतात. काहींना सोशल मीडियावर काही गोष्टी खाजगी ठेवायच्या असतात, तर काही जण ब्रेकअप किंवा मैत्रीत झालेल्या वादानंतर स्वतःला थोडी स्पेस देण्यासाठी हा मार्ग निवडतात. एखाद्याला आपली सीमा राखायची असते, पण संपर्क अचानक तोडायचा नसतो.

कठीण संवाद टाळण्यासाठी, समोरच्याला उत्तर न देता दूर जाण्यासाठी किंवा जाणूनबूजून त्या व्यक्तीची प्रतिक्रिया पाहण्यासाठी काही जण सॉफ्ट ब्लॉकिंगचा वापर करु शकतात.

मात्र, जिथे सकारात्मक डि़जिटल सीमा संपतील आणि समोरच्याशी बोलणं टाळण्यासाठी किंवा त्याला जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यासाठी सॉफ्ट ब्लॉकिंगचा वापर सुरू झाला, तर परिस्थिती वेगळी होऊ शकते. कोणापासून अंतर ठेवायचं असेल, तरी समोरच्याला विनाकारण संभ्रमात किंवा भावनिक त्रासात न टाकता ते कसं करता येईल, यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

सॉफ्ट ब्लॉकिंग जास्त का टोचू शकतं?

तज्ज्ञांच्या मते, एखाद्याने आपल्याला थेट ब्लॉक केलं, तर संवाद कुठेतरी थांबला आहे, हे स्पष्ट होतं. सॉफ्ट ब्लॉकिंगमध्ये मात्र असं काही स्पष्ट समजू शकत नाही. समोरची व्यक्ती सोशल मीडियावर अचानक आपल्यापासून दूर होते; पोस्ट दिसेनाशा होतात, स्टोरी अपडेटही दिसत नाहीत किंवा संवाद कमी होतो. पण यामागचं कारण सांगितलं जात नाही. त्यामुळे मनात “माझ्याकडून काही चूक झाली का?”, “समोरच्याला माझ्यापासून अंतर हवंय का?”, “मी पुन्हा बोलावं का?” असे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

मानसशास्त्रज्ञ आणि ‘मंध्यान केअर’च्या संस्थापक डॉ. साक्षी मंध्यान यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “थेट नकार मिळाल्याने होणारा त्रास वेगळा असतो, पण सॉफ्ट ब्लॉकिंगमध्ये नेमकं काय घडलं, हे स्वतःच शोधत बसावं लागतं. कोणताही वाद किंवा शेवटचा संवाद झालेला नसतो. सोशल मीडियावर काहीतरी बदलल्याचं फक्त जाणवतं आणि मग मन त्यामागची कारणं शोधू लागतं. समोरच्या व्यक्तीने आपल्या बोलण्याचा गैरसमज करुन घेतलाय का? समोरच्या व्यक्तीला दूर राहायचं होतं का? की ती आपल्याकडून पुन्हा संपर्काची अपेक्षा करत आहे?”

असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि आपल्या मनाला ती खंत वाटू लागते. डॉ. साक्षी मंध्यान पुढे सांगतात, आपण सोशल मीडियावर झालेले संवाद पुन्हा पुन्हा आठवतो आणि संवादात कोणते बदल झाले याचा अर्थ लावू लागतो. मात्र, नेमकं कारण काय, याचं स्पष्ट उत्तर नसल्याने विचार काही थांबत नाहीत. सोशल मीडियावरील नात्यांमध्ये समोरची व्यक्ती आपल्याबद्दल नेमकं काय विचार करते किंवा नातं कुठे आहे, हे समजून घेणं अनेकांसाठी महत्त्वाचं असतं.

डॉ. मंध्यान यांच्या मते, सॉफ्ट ब्लॉकिंगचा भावनिक त्रास केवळ अंतर ठेवल्यामुळे होत नाही, तर त्यामागची अस्पष्टता अधिक त्रासदायक ठरते. स्पष्टपणे सीमा आखली तर वाईट वाटू शकतं; पण आपली स्थिती काय आहे, हे किमान समजतं. सॉफ्ट ब्लॉकिंगमध्ये मात्र काहीतरी बदललं आहे, याची जाणीव होते; पण नेमकं काय आणि का? हे समजत नसल्याने प्रश्न कायम राहतात.

सॉफ्ट ब्लॉकिंग योग्य आहे की नाही, हे कसं ओळखाल?

सोशल मीडियावर काही व्यक्तींपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी सॉफ्ट ब्लॉकिंग हा योग्य पर्याय असू शकतो. मात्र यातून ती व्यक्ती काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे, हा प्रश्न समोरच्या व्यक्तीला पडतो. एखाद्याला आपला पूर्वीचा प्रियकर/ पूर्वीची प्रेयसी आपल्या फीडमध्ये दिसू नये किंवा आपल्या अपडेट्सवर नजर ठेवू नये असे वाटत असेल, ही एक योग्य सीमा ठरु शकते.

उदाहरणार्थ, ब्रेकअपनंतर एखाद्याला आपला पूर्वीचा प्रियकर/ पूर्वीची प्रेयसी आपल्या फीडमध्ये दिसू नये किंवा आपल्या अपडेट्सवर नजर ठेवू नये असे वाटत असेल, तर सोशल मीडियावर त्याच्यापासून अंतर ठेवणं स्वतःची सीमा ठरवण्याचा एक योग्य मार्ग ठरू शकतो.

डॉ. मंध्यान यांच्या मते, सॉफ्ट ब्लॉकिंगचा हेतू समोरच्याच्या लक्षात यावा आणि त्याने त्यावर रिअँक्ट करावं, अशी अपेक्षा असेल तर परिस्थिती वेगळी असते. उदाहरणार्थ, समोरच्याने आपल्याशी पुन्हा बोलावं, त्याला अपराधी वाटावं किंवा “नेमकं काय झालं?” असं विचारावं, यासाठी जाणीवपूर्वक अंतर ठेवणं ही योग्य पद्धत नसते.

त्याचप्रमाणे, संपर्क तोडायचा आहे किंवा अंतर ठेवायचं आहे, हे थेट सांगण्याऐवजी सॉफ्ट ब्लॉकिंगचा वापर केला तर गैरसमज वाढू शकतात. एक प्रश्न स्वत:ला विचारा, “मला खरंच थोडं अंतर हवं आहे का, की समोरच्याने माझं बोलणं समजून घ्यावं असं मला वाटतंय?” फरक साधा आहे, वैयक्तिक स्पेसची गरज असेल, तर ती नक्की घ्या; पण त्यातून समोरच्याची परीक्षा घेण्याची किंवा त्याला एखादा मॅसेज देण्याची गरज नाही, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात.