कल्पना करा, तुम्ही एका अशा गुहेमध्ये प्रवेश करत आहात जी इतकी विशाल आहे की तिच्या आत ४० मजली इमारत सहज उभी राहू शकते! एवढेच नाही, तर या गुहेच्या आत स्वतःची नदी आहे, स्वतःची जंगले आहेत आणि चक्क स्वतःचे ढगही निर्माण होतात! ही कोणतीही काल्पनिक कथा किंवा साय-फाय चित्रपटातील दृश्य नाही, तर आपल्याच पृथ्वीवर अस्तित्वात असलेले एक वास्तव आहे

सोन डूंग नाव कसे पडले आणि ती कुठे आहे?

ही गुहा व्हिएतनाममधील ‘फाँग न्हा-के बांग’ या राष्ट्रीय उद्यानात स्थित आहे. व्हिएतनामी भाषेत सोन डूंग या शब्दाचा अर्थ ‘डोंगरातील नदीची गुहा’ असा होतो. या गुहेच्या आतून एक मोठी, वेगाने वाहणारी भूमिगत नदी जाते, म्हणून तिला हे नाव देण्यात आले आहे.

ही गुहा किती मोठी आहे?

ही गुहा सुमारे ९ किलोमीटर लांब, २०० मीटर उंच आणि १५० मीटर रुंद आहे. शहरातील ४० मजल्यांची एखादी प्रचंड मोठी इमारत या गुहेच्या आत सहज उभी राहू शकते. गुहेचे काही भाग इतके विशाल आहेत की तिथून एक मोठे बोईंग ७४७ विमान सहज उडून जाऊ शकते. शास्त्रज्ञांच्या मते, या गुहेमध्ये एखाद्या मोठ्या शहराचा संपूर्ण परिसर किंवा कित्येक मोठे क्रीडा स्टेडियम सामावून जाऊ शकतात.

या गुहेचा शोध कसा लागला?

या विशाल गुहेचा शोध लागण्याची गोष्ट एखाद्या साहसी कथेसारखीच मनोरंजक आहे. १९९०मध्ये हो खानह हा लाकुडतोड्या जंगलात मूल्यवान लाकूड शोधत होता. यावेळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. निवारा शोधत असताना त्याला एका खडकाच्या फटीतून जोराचा वारा आणि पाण्याचा आवाज आला. तिथे जाऊन पाहिल्यावर त्याला एका मोठ्या बिळासारखा मार्ग दिसला. पण भीती आणि धुक्यामुळे तो आत गेला नाही आणि घरी परतला. त्यानंतरच्या काळात तो त्या गुहेचा मार्ग पूर्णपणे विसरून गेला. २००८मध्ये हो खानहने गुहा पुन्हा शोधली; २००९मध्ये ब्रिटिश-व्हिएतनामी पथकाने तिचे सर्वेक्षण केले. जेव्हा शास्त्रज्ञ आत गेले, तेव्हा त्यांच्यासमोर जगातील सर्वात विशाल नैसर्गिक गुहांपैकी एक अद्भुत विश्व उलगडले.

गुहेच्या आत काय काय दडले आहे?

सोन डूंग गुहा म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत खजिनाच आहे. या गुहेच्या आत वाहणारी नदी आणि बाहेरून येणारी हवा यामुळे आतमध्ये एक वेगळेच तापमान तयार होते. आतल्या पाण्याच्या वाफेमुळे गुहेच्या छताजवळ पांढरे शुभ्र ढग तयार होतात आणि आतमध्ये धुके साचते. म्हणजेच, गुहेच्या आत स्वतःची एक इकोसिस्टम आहे. गुहेच्या काही भागांत हजारो वर्षांपूर्वी छत कोसळल्यामुळे मोठे खड्डे तयार झाले आहेत. यांना वैज्ञानिक भाषेत ‘डोलिन’ म्हणतात. या उघड्या भागातून सूर्याचा प्रकाश आणि पावसाचे पाणी थेट गुहेच्या आत येते. त्यामुळे गुहेच्या आत चक्क एक मोठे जंगल आहे. या जंगलात वेगवेगळी झाडे, माकडे, उडणाऱ्या खारी, पक्षी आणि वटवाघुळे राहतात. शास्त्रज्ञांनी या जंगलाला ‘गार्डन ऑफ एडम’ असे नाव दिले आहे.

जगातील सर्वात उंच दगडी खांब येथेच का ?

गुहेच्या छतातून पाण्याचे थेंब वर्षानुवर्षे खाली टपकतात. या पाण्यात कॅल्शियम आणि खनिजे असतात. हे थेंब खाली साचून काळाच्या ओघात दगडांचे उंच खांब तयार होतात. सोन डूंग गुहेत सुमारे ८० मीटर (२३० फूट) उंच दगडी खांब आहेत. हे जगातील सर्वात उंच दगडी खांबांपैकी मानले जातात. या गुहेत पाण्याचे लहान-लहान खड्डे आहेत, जिथे पाण्यातील खनिजे गोल-गोल फिरून दगडाचे छोटे सुंदर गोळे तयार होतात. यांना ‘केव्ह पर्ल्स’ किंवा गुहेतील मोती म्हणतात. हे दिसायला बेसबॉलच्या चेंडूएवढे किंवा मोठ्या गोळ्यांसारखे दिसतात.

ही गुहा किती जुनी आहे?

शास्त्रज्ञांच्या मते ही गुहा सुमारे २० ते ५० लाख वर्षे जुनी आहे. लाखो वर्षांपूर्वी वाहणाऱ्या नदीच्या पाण्याने चुनखडीचे खडक हळूहळू कोरले आणि ही प्रचंड गुहा तयार झाली आहे.

गुहेत फिरता येते का?

नाही! ही सफर अजिबात सोपी नाही. या गुहेचे आणि तिथे राहणाऱ्या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी व्हिएतनाम सरकार एका वर्षात फक्त १,००० पर्यटकांनाच आत जाण्याची परवानगी देते. २०१३मध्ये ही गुहा पहिल्यांदा सामान्यांसाठी खुली करण्यात आली. येथे येण्यासाठी एका व्यक्तीच्या टूरचा खर्च सुमारे २.६-२.७ लाख रुपये इतका आहे. तिथे पोहोचण्यासाठी अनेक तास दाट जंगलातून चालावे लागते, नद्या ओलांडाव्या लागतात आणि दोरीच्या साहाय्याने उंच खडकांवर चढावे लागते. या गुहेची सफर करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या अत्यंत तंदुरुस्त असणे गरजेचे असते.

Chandrakant.dadas@expressindia.com