Meghalaya Honeymoon Murder Case Update : देशभर गाजलेल्या इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला एक वादग्रस्त वळण मिळाले. पतीच्या हत्येप्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशी हिला मेघालय न्यायालयाने जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे, तीनवेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर चौथ्यांदा केवळ पोलिसांच्या एका तांत्रिक चुकीमुळे तिला हा कायदेशीर दिलासा मिळाला. या निर्णयामुळे मृत राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयात सुनावणीदरम्यान काय घडले? पोलिसांकडून कोणती तांत्रिक चूक झाली आणि त्यामुळे सोनमला जामीन कसा मिळाला? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

पोलिसांकडून नेमकी चूक काय झाली?

आरोपी सोनम रघुवंशीच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे मेघालय न्यायालयाच्या सोमवारी (२७ एप्रिल) निदर्शनास आले. पोलिसांनी आरोपीच्या अटकेच्या कागदपत्रांमध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम ४०३ (१) नमूद केले होते. त्याशिवाय सोनमच्या अटकेशी संबंधित सर्व कागदपत्रे, अटक मेमो, केस डायरी आणि अधिकाऱ्यांची सूचना, यामध्ये पोलिसांनी याच कलमाचा उल्लेख केला होता. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारचे कोणतेही कलम अस्तित्वातच नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. हत्येच्या गुन्ह्यासाठी कायद्यात कलम १०३ (१) ची तरतूद आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, जुन्या भारतीय दंड संहितेत कलम ४०३ हे मालमत्तेच्या अपहाराशी संबंधित होते. यादरम्यान तांत्रिक चूक लक्षात आल्यानंतर सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, पोलिसांकडून झालेली ही ‘टायपिंग मिस्टेक’ आहे. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

न्यायालयाने जामीन देताना काय म्हटले?

कोणत्याही आरोपीला आपण कोणत्या गुन्ह्याखाली अटकेत आहोत हे जाणून घेण्याचा अधिकार असतो. अस्तित्वात नसलेले कलम लावल्यामुळे आरोपीच्या अधिकारांचे हनन झाले असून, ही अटकच बेकायदा ठरते असे न्यायालयाने स्पष्ट केले. सोनमला अटकेनंतर सुरुवातीच्या काळात कायदेशीर सल्ला किंवा वकील उपलब्ध करून दिल्याचे कोणतेही पुरावे रेकॉर्डवर नाहीत, असेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. अटकेच्या प्रक्रियेत आणि कायदेशीर कलमांच्या उल्लेखात झालेल्या या तांत्रिक त्रुटीमुळे आरोपी सोनमची अटक कायदेशीर निकषांवर टिकू शकली नाही आणि परिणामी न्यायालयाने तिला चार अटींवर जामीन मंजूर केला. १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीत पोलिसांकडून होणाऱ्या अशा तांत्रिक चुका आरोपींसाठी ‘वरदान’ ठरू शकतात, हेच या प्रकरणातून समोर आले.

न्यायालयाने सोनमला कोणत्या अटी घातल्या?

  • न्यायालयाने तांत्रिक चुकीचा आधार घेत सोनम रघुवंशीला जामीन देताना चार अटी घातल्या.
  • आरोपीला न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर म्हणजेच मेघालय सोडून जाता येणार नाही.
  • फरार होण्याचा प्रयत्न करणे किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्यास सक्त मनाई करण्यात आली.
  • न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीला आरोपी सोनम रघुवंशीला हजर राहावे लागेल.
  • वैयक्तिक शपथपत्र आणि जामीनदार सादर करणे आरोपीला अनिवार्य करण्यात आले.

राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांचा संताप

सोनम रघुवंशीला जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच मृत राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला. राजाची आई उमा रघुवंशी यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. “माझ्या मुलाच्या हत्येची मुख्य सूत्रधार असूनही सोनमची सुटका कशी होऊ शकते? गेल्या नऊ महिन्यांपासून मेघालय पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते, पण अचानक एका-दोन महिन्यात चक्र कसे फिरले हे आम्हाला समजत नाही”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणीही उमा रघुवंशी यांनी केली. राजाचा भाऊ विपीन रघुवंशी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, या निर्णयाविरोधात ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. अजूनही या प्रकरणातील इतर चार आरोपी – आकाश, आनंद, विशाल आणि राज – तुरुंगातच आहेत. वकिलांनी आमच्यापासून अनेक गोष्टी लपवल्या, आम्ही सोनमचा जामीन रद्द करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू,” असे विपीन यांनी स्पष्ट केले.

काय आहे ‘मेघालय हनिमून मर्डर’ प्रकरण?

मूळ इंदूरचे रहिवासी असलेले राजा आणि सोनम रघुवंशी यांचे मे २०२५ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही मधुचंद्रासाठी मेघालय येथे गेले होते. २ जून २०२५ रोजी राजाचा मृतदेह एका खोल दरीत सापडला. शवविच्छेदन अहवालात राजाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने दोनदा वार केल्याचे समोर आले, ज्यामुळे हत्येचा संशय बळावला. तपासादरम्यान पोलिसांनी सोनमला तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासह अटक केली. पोलिसांनी असा दावा केला की, सोनम आणि राज यांनी मिळून राजाच्या हत्येचा कट रचला होता. त्यांनी तीन हल्लेखोरांच्या मदतीने राजावर हल्ला घडवून आणला आणि त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला. गेल्या सप्टेंबरमध्ये मेघालय पोलिसांनी या प्रकरणी ७९० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये सोनम आणि तिच्या प्रियकरासह एकूण आठ जणांना आरोपी करण्यात आले होते. सोनमने मात्र न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आता तांत्रिक कारणास्तव तिला जामीन मिळाला असला, तरी या प्रकरणाची कायदेशीर लढाई अजूनही सुरूच आहे.