Sonam Wangchuk Hunger Strike: सध्या संपूर्ण देशात सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची चर्चा सुरू आहे. भारताच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस असून, त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली आहे. मात्र प्रश्न असा निर्माण होतो, सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा संबंध आय. आय. टी. कानपूरचे माजी प्राध्यापक आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. अगरवाल यांच्याशी का जोडला जातोय? 

ज्यांनी गंगेच्या निर्मळ आणि अविरहित प्रवाहासाठी तब्बल १११ दिवस अन्नत्याग केला होता आणि अखेर याच लढ्यात त्यांनी जगाचा निरोप घेतला ते म्हणजे प्राध्यापक अगरवाल!  

‘माय गंगे’साठीचा लढा:

जी. डी. अगरवाल यांचा लढा निसर्गाचा गळा घोटून होणाऱ्या विकासाविरुद्ध होता. गंगेच्या उपनद्यांवर उभारल्या जाणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात आला होता, आणि त्यांनी याच नदींच्या गळाघोटणीला तीव्र विरोध होता. 

तर, सोनम वांगचुक ‘NEET-UG’ पपेरफुटी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरुद्ध आमरण उपोषणाला बसले आहेत. 

नदीला मुक्तपणे वाहू देण्यासाठी त्यांनी २००९ ते २०१८ या काळात अनेकदा उपोषणे केली आहेत. २००८ मध्ये उत्तरकाशीत त्यांनी पहिले उपोषण केले, तेव्हा सरकारने आश्वासन देऊन त्यांना उपोषण मागे घ्यायला लावले. पण, सरकारची आश्वासनं किती प्रामाणिक असतात याविषयी चर्चा करणं व्यर्थ ठरेल, त्यामुळे यानंतरही दोन उपोषणे झाली. 

२००९ मध्ये लोहारीनाग पाला जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात त्यांनी जेव्हा उपोषण केले, तेव्हा ३६ व्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. अखेर मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या या प्राध्यापकाचा जीव वाचवण्यासाठी सरकारने धरणाचे काम थांबवले आणि त्यांचे उपोषण सुटले. 

आय.आय.टी.चे प्राध्यापक ते संन्यासी:

उत्तर प्रदेशात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अगरवाल यांचे लहानपणापासूनच निसर्गाशी नाते होते. त्यांनी आय. आय. टी. रूरकी येथून पदवी घेतली आणि पुढे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठ येथून एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंगमध्ये पीएच. डी. पूर्ण केली. आय. आय. टी. कानपूर येथे त्यांनी तब्बल १७ वर्षे शिकवलं आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. 

देशातील सर्वात हुशार तरुणांना शिकवणाऱ्या या प्राध्यापकाने २०११ मध्ये भौतिक जगाचा त्याग केला, संन्यास घेतला आणि त्यांना ‘स्वामी ज्ञानस्वरूप सानंद’ या नावाने ओळखले गेले. ते पंडित मदन मोहन मालवीय यांनी १९०५ मध्ये स्थापन केलेल्या ‘गंगा महासभे’चे मार्गदर्शकही बनले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्थापन केलेल्या ‘नॅशनल गंगा रिव्हर बेसिन अथॉरिटी’च्या संथ कारभारावर नाराज होऊन २०१३ मध्ये ते पुन्हा उपोषणाला बसले. अडीच महिन्यांच्या या उपोषणानंतर अखेर १८ महिन्यांपासून रखडलेली या समितीची बैठक सरकारला घ्यावीच लागली. 

अखेरचा लढा आणि प्राणाहुती:

२०१८ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचे उपोषण सुरू केले. त्यापूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले होते. अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांवरील विनाशकारी प्रकल्प थांबवण्याची आणि गंगेचा प्रवाह अविरत ठेवण्याची त्यांची मागणी होती. 

२२ जून २०१८ रोजी त्यांनी आपले शेवटचे आमरण उपोषण सुरू केले. उपोषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की, “माझे हे उपोषण आता माझ्या मृत्यूनेच संपेल” त्यांनी इंग्रजी वृत्तपत्र ‘द गार्डियन’ला सांगितले होते, “हा प्रश्न पाण्याचा नाही तर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे.” 

९ ऑक्टोबर रोजी त्यांनी पाणी पिणे आणि औषधे घेणेही पूर्णपणे बंद केले. अखेर, उपोषणाच्या १११ व्या दिवशी एम्स (AIIMS) ऋषिकेश इथे या ऋषितुल्य पर्यावरणवाद्याने शेवटचा श्वास घेतला. 

ज्यांनी आपल्या रक्ताची गंगा वाहिली…

प्रा. वीरभद्र मिश्रा: हे बनारसमध्ये हिंदू विद्यापीठात हायड्रॉलिक इंजिनीअरिंगचे प्राध्यापक होते. आणि १९८२ मध्ये संकटमोचन फॉउंडेशनची स्थापना केली. वाराणसीच्या घाटांवर सांडपाणी सोडले जाऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिकरित्या पाणी शुद्ध करणारे प्रकल्प राबवले. टाईम मासिकेने त्यांना ‘हिरो ऑफ द प्लॅनेट’ म्हणून गौरवले होते. 

एम. सी. मेहता: १९८५ मध्ये त्यांनी दाखल केलेल्या ऐतिहासिक ‘गंगा प्रदूषण खटल्या’मुळे कानपूरमधील शेकडो चामड्याच्या आणि रासायनिक कारखान्यांना शुद्धीकरण प्रकल्प उभारणे सक्तीचे झाले, भारतातील पर्यावरण संबंधी कायदे भक्कम करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 

सुंदरलाल बहुगुना: गंगेची प्रमुख उपनदी असलेल्या भागीरथी नदी वर बांधल्या जाणाऱ्या ‘तेहरी धारणा’ला त्यांनी तीव्र विरोध केला होता. हा प्रकल्प हिमालयाचे पर्यावरण आणि गंगेच्या प्रवाहासाठी घटक ठरेल असे त्यांचे ठाम मत होते. 

राजेंद्र सिंग: यांनी गंगेच्या खोऱ्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि पाणी अडवून जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी राजस्थान आणि इतर राज्यांत मोठे काम केले. गंगेच्या संवर्धनासाठी स्थापन केलेल्या ‘नॅशनल गंगा रिव्हर बेसिन अथॉरिटी’ या संस्थेचे ते सदस्य होते. 

विजय मुडशिंगीकर: यांनी गंगेच्या उगमापासून संगमापर्यंतचा प्रवास करून नदीच्या प्रदूषणाचे विदारक वास्तव मांडणारी हजारो छायाचित्रे टिपली आणि देशात त्यांची मोठी प्रदर्शने भरली. २००७ मध्ये त्यांनी गंगाजल नेचर फॉउंडेशनची स्थापना केली आणि २०१० मध्ये ‘जन जोडो गंगा यात्रा’ काढून गंगेकाठच्या कोट्यवधी लोकांना या लढ्याशी जोडले.  

भारताचा हक्काचा आवाज: उपोषणाचा इतिहास

भारतात उपोषण किंवा अन्नत्याग करणे हे केवळ निषेध व्यक्त करण्याचे माध्यम नाही, तर तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा एक अत्यंत प्रखर मार्ग मानला गेला आहे. 

महात्मा गांधी: ज्यांनी केवळ उपोषणाच्या जोरावर ब्रिटीश साम्राज्याच्या पायाला हादरवून सोडले आणि भारतीय जनतेला शांततेच्या मार्गाने लढण्याचे एक सर्वात शक्तिशाली शस्त्र दिले. 

शहिद भगत सिंग: तुरुंगात असताना त्यांनी परकीय आणि निष्ठूर ब्रिटीश सत्तेविरुद्ध पुकारलेले उपोषण आजही शाळा, महाविद्यालये आणि तरुणांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची ठिणगी पेटवते. 

अण्णा हजारे: भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलन हे आपल्या काळातील सर्वात मोठे उदाहरण आहे. याच आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांच्यासारखा नेता पुढे आला, ज्यांनी नंतर आम आदमी पक्षाची स्थापना केली. 

भारतात उपोषण हे केवळ अन्नत्यागाचे आंदोलन नाही तर तो व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर मारलेला दमदार प्रहार आहे. सध्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस असून, ते अजूनही शासनाविरुद्ध आणि आपल्या तब्येतीविरुद्ध झुंज देत आहेत.