सोनम वांगचुक हे नाव आज केवळ लडाखच्या पर्यावरणासाठीच्या ‘क्लायमेट फास्ट’ आणि ६ व्या अनुसूचीच्या लढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते लडाखच्या घटनात्मक हक्कांपासून ते देशातील तरुण पिढीच्या प्रश्नांपर्यंतचा एक बुलंद आवाज बनले आहेत. शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी प्रयोग करणाऱ्या वांगचुक यांनी देशातील तरुणांच्या भवितव्याशी होणारा खेळ, शिक्षणव्यवस्थेतील गोंधळ आणि नीट पेपरफुटीसारख्या गंभीर घोटाळ्यांवरही थेट आणि ठाम भूमिका मांडली. पण सोनम वांगचुक हे केवळ राजकीय आणि सामाजिक प्रश्न, शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी यांवर बोलणारे आंदोलक नाहीत; तर ते ज्या स्वदेशी विज्ञान, पर्यावरण आणि शिक्षण पद्धतीसंदर्भातील बाबींचा पुरस्कार करतात, त्या बाबी ते स्वतःच्या प्रत्यक्ष जगण्यातून सिद्ध करून दाखवतात.

लडाखमध्ये हिवाळ्यात जेव्हा तापमान उणे २० अंश सेल्सिअस (-20°C) पर्यंत घसरतं, नळाचं पाणी गोठून जातं आणि हाडं गोठवणारा गारठा असतो, अशा परिस्थितीतही सोनम वांगचुक यांचं घर कोणत्याही हीटरशिवाय किंवा विजेच्या वापराशिवाय आतून मस्त १८°C ते २०°C उबदार राहतं. एवढ्या थंडीत हे कसं शक्य आहे? बाहेर हाडं गोठवून टाकेल इतका गारठा असतानाही वांगचुक यांच्या घरात आतून उबदारपणा कसा अनुभवायला मिळतो यामागचं विज्ञान जाणून घ्या.

सिमेंट बाहेरचं तापमान कसं शोषून घेतं?

सिमेंट किंवा काँक्रीट हे स्पंजसारखं असतं. भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार सिमेंटमध्ये उच्च औष्णिक वाहकता (High Thermal Conductivity) असते. त्यामुळे सिमेंट किंवा काँक्रीट हे पटकन उष्णता शोषून घेतात.
उन्हाळ्यात दिवसभर उन्हात राहून सिमेंट प्रचंड तापतं आणि ती सगळी उष्णता रात्री घराच्या आत फेकली जाते, ज्यामुळे घर भट्टीसारखं उकडतं. तर हिवाळ्यात ते बाहेरची गोठवणारी थंडी लगेच आत ओढून घेतं आणि घरातील नैसर्गिक ऊब बाहेर फेकून देतं. या स्थितीला थर्मल ब्रिजिंग (Thermal Bridging), असे म्हणतात.

वांगचुक यांच्या ‘पॅसिव्ह सोलर’ मॉडेल:

सोनम वांगचुक यांनी आपल्या पूर्वजांच्या या पारंपरिक मातीच्या घरांच्या विज्ञानाला आधुनिक भौतिकशास्त्राची (Modern Physics) जोड दिली. तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या ज्या ५ मुख्य बाबींवर हे मॉडेल उभे केले गेलेय, त्या खालीलप्रमाणे :

दबलेली माती (Rammed Earth):

सिमेंटऐवजी स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारी माती, वाळू, चिखल, लहान दगड आणि पेंढा विशिष्ट प्रमाणात एकत्र मिसळून लाकडी साच्यांमध्ये भरून, त्यावर तीव्र दाब देऊन या जाडजूड भिंती बनवल्या जातात. या भिंती निसर्गातील एक उत्तम ‘थर्मल बॅरियर’ म्हणून काम करतात, ज्या बाहेरची थंडी आत येऊ देत नाहीत आणि घरातील ऊब बाहेर जाऊ देत नाहीत.

दक्षिणमुखी काच (South-Facing Glazing):
लडाख हा उच्च उंचीवर असलेला बर्फाळ वाळवंटी प्रदेश आहे, जिथे थंडी प्रचंड असली तरी सूर्यप्रकाश मुबलक असतो. वांगचुक यांच्या घराची संपूर्ण दक्षिण बाजू दुहेरी काचेने (Double Glazed Glass) बनवली आहे. ही काच दिवसभर सूर्याची किरणं घरात शोषून घेते.

पाण्याच्या बाटल्यांची ‘थर्मल बॅटरी’ (Heat Sink):
काचेच्या अगदी मागे एक काळी भिंत (Black Wall) उभारली आहे, ज्यामध्ये पाण्याच्या टाकाऊ प्लास्टिक बाटल्या रचण्यात आल्या आहेत. पाण्यामध्ये उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता (Specific Heat Capacity) सर्वांत जास्त असते. दिवसभर या बाटल्यांमधील पाणी सूर्याची किरणे शोषून गरम होतात आणि रात्री जेव्हा बाहेरचं तापमान शून्याच्या खाली घसरतं, तेव्हा या बाटल्या साठवलेली ही औष्णिक ऊर्जा हळूहळू घरातल्या हवेत सोडतात.

शून्य पाणी वापरणारे ‘ड्राय कंपोस्टिंग टॉयलेट’:
थंडीत पाण्याचे पाईप गोठतात आणि त्यामुळे अनेकदा पाईपमधून पाणी येत नाही. म्हणून या टॉयलेटमध्ये फ्लशसाठी पाण्याचा एकही थेंब वापरला जात नाही. त्यात मानवी विष्ठा-मूत्र वेगळं केलं जातं आणि लाकडाचा भुसा किंवा राख टाकली जाते. त्यामुळे दुर्गंध येत नाही आणि काही महिन्यांत याचं सुपीक सेंद्रिय खतात रूपांतर होतं.

मध्यवर्ती ओपन किचन (Central Open Kitchen):

स्वयंपाकघर एका कोपऱ्यात बंदिस्त न ठेवता, ते घराच्या अगदी मध्यभागी बांधलं गेलं आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना बाहेर पडणारी नैसर्गिक उष्णता संपूर्ण घरात पसरून घराला गरम ठेवतेच; पण घरात स्वयंपाक करणारी व्यक्तीही कुटुंबातील संवादाच्या केंद्रस्थानी राहते.

गावची जुनी घरं विरुद्ध काँक्रीटचे डबे:

जर आपण थोडं बारकाईनं पाहिलं, तर वांगचुक यांनी वापरलेलं हे तंत्रज्ञान आपल्यासाठी पूर्णपणे नवीन नाही. आपल्या भारतातील खेड्यापाड्यांत आपल्या पूर्वजांनीही घरबांधणी करताना शतकानुशतके याच विज्ञानाचा आधार घेतला होता:

पारंपरिक घरांचं औष्णिक विज्ञान: महाराष्ट्रातील जुने मातीचे वाडे, कोकणातील जांभ्या दगडांची घरं, किंवा ग्रामीण भागातील शेण-मातीनं सारवलेली कौलारू घरं उन्हाळ्यात नैसर्गिकरीत्या थंड आणि हिवाळ्यात ऊबदार राहायची. माती आणि शेणामध्ये औष्णिक ऊर्जा साठवून ठेवण्याची (Thermal Mass) अद्भुत क्षमता असते.

हवा आणि प्रकाशाची नैसर्गिक रचना: पूर्वीच्या घरांमध्ये असणारी पडवी, माजघर, पडवीचे खांब आणि मधोमध असलेलं अंगण यांमुळे सूर्यप्रकाश आणि हवा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात खेळती राहायची.

काँक्रीटचा खोटा अट्टहास: दुर्दैवानं, ‘प्रगती’ आणि ‘आधुनिकतेच्या’ खोट्या आकांक्षेपायी आज आपल्या खेड्यांमध्येही मातीची घरं पाडून काँक्रीटचे डबे उभे केले जात आहेत.

काँक्रीटच्या जंगलात अडकलेल्या आणि कृत्रिम एसी-हीटरच्या आहारी गेलेल्या आपल्या आधुनिक समाजासाठी सोनम वांगचुक यांचं हे घर एक डोळे उघडणारं उदाहरण आहे. खरी प्रगती म्हणजे निसर्गाचा विध्वंस करून हाय-टेक उपकरणांवर जगणं नव्हे, तर आपल्या पूर्वजांच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन निसर्गाशी सुसंगत जीवन जगणं होय!