एक परदेशी स्त्री, जी भारतातील सर्वांत प्रभावशाली राजकीय कुटुंबाचा भाग बनली आणि ज्यांनी त्याच कुटुंबाच्या पक्षाचे (काँग्रेसचे) नेतृत्व केले. आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वामुळे त्या आज देशवासियांच्या मनात घर करून आहेत, त्या म्हणजे सोनिया गांधी. सोनिया गांधी यांनी १९६८ मध्ये राजीव गांधी यांच्याशी विवाह केला आणि भारतात स्थायिक झाल्या. त्यानंतर जवळपास सहा दशकं त्यांनी भारतीय राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी जवळून पाहिल्या. १९९१ मध्ये पती राजीव गांधी यांची हत्या आणि त्याआधी १९८४ मध्ये सासू इंदिरा गांधी यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला, अशा वैयक्तिक दुःखद घटनांचा त्यांना सामना करावा लागला.
आता वयाच्या ८० व्या वर्षी सोनिया गांधी पुन्हा चर्चेत आल्या आहेत, ते त्यांच्या आगामी आत्मचरित्रामुळे. सोनिया गांधी यांचे ‘Belonging: A Journey of Love’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक १० नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाची झलक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच इन्स्टाग्राम, एक्स आणि फेसबुकवर प्रवेश केला आहे. या पुस्तकाची मोठी चर्चा होईल, किंबहुना ‘तमाशा’ होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. या पुस्तकाची देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे. कारण भारताच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या साक्षीदार असलेल्या सोनिया गांधी पहिल्यांदाच आपल्या आयुष्याचा प्रवास स्वतःच्या शब्दांत मांडणार आहेत.
२०१२ मध्ये ‘फोर्ब्स’ मासिकाने जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत सोनिया गांधी यांना सहावं स्थान दिलं होतं. काँग्रेसमध्ये आजही त्यांचं महत्त्व कायम आहे. पक्षात राजकीय पेच निर्माण झाला किंवा मित्रपक्षांशी मतभेद झाले, तर सोनिया गांधी संकटमोचक म्हणून उभ्या राहतात. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी काँग्रेसबाहेरील नेत्यांशीही चांगले संबंध निर्माण केले. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, बिहारचे लालू प्रसाद यादव आणि उत्तर प्रदेशच्या मायावती यांच्याशी त्यांचे राजकीय संबंध राहिले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते. संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार सत्तेत असताना डाव्या पक्षांशी निर्माण होणारा तणाव कमी करण्यातही सोनिया गांधी यांनी अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाची वेळ आणि सध्याच्या गुंतागुंतीच्या राजकीय वातावरणावर त्याचा काय परिणाम होईल, याबद्दलही चर्चा सुरू आहे. आज काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील संघर्षाच्या केंद्रस्थानी नेहरू-गांधी कुटुंब आहे, त्यामुळे या पुस्तकातील अनुभव आणि त्यातून समोर येणाऱ्या गोष्टींना राजकीय महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या पुस्तकाविषयी आताच नाही तर अनेक वर्षांपासून उत्सुकता होती. ब्रिटिश इतिहासकार आणि लेखक पॅट्रिक फ्रेंच हे सोनिया गांधी यांचे चरित्र/पुस्तक लिहित असल्याची चर्चा होती. मात्र, अज्ञात कारणांमुळे ते पुस्तक प्रकाशित होऊ शकले नाही. २०२३ मध्ये फ्रेंच यांचे निधन झाले आणि त्यानंतर या पुस्तकाची चर्चा काहीशी मावळली.
सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राजकीय वारशाची जबाबदारी सांभाळली, पण त्यांच्या मनात नेहमी एक सल कायम राहिली, ती म्हणजे, ‘मी नेहरूंची मुलगी नाही.’ त्यांच्या सासू इंदिरा गांधी यांना वडील जवाहरलाल नेहरू यांच्या राजकीय वारशातून काही फायदे मिळाले होते. मात्र, सोनिया गांधी यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली, त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्राचं ‘Belonging: A Journey of Love’ हे शीर्षकही महत्त्वाचं ठरतं. हे पुस्तक केवळ सोनिया आणि राजीव गांधी यांच्या प्रेमकथेपुरतं मर्यादित नसेल, तर नेहरू-गांधी कुटुंबाचा राजकीय वारसा, त्याग आणि योगदान यांवरही प्रकाश टाकणारे असणार आहे. घराणेशाही आणि सत्तेवरचा जन्मजात हक्क असल्याच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्नही त्यातून दिसू शकतो.
जेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारलं
भारताला आतापर्यंत १४ पंतप्रधान लाभले. त्यापैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे तिघे नेहरू-गांधी कुटुंबातील होते. नेहरू यांनी १७ वर्षे, इंदिरा गांधी यांनी १६ वर्षे, तर राजीव गांधी यांनी पाच वर्षे देशाचे नेतृत्व केले. याशिवाय पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचून संधी न मिळालेले अनेक नेते भारतीय राजकारणात होऊन गेले. मात्र, पंतप्रधानपदाची संधी समोर असतानाही ती न स्वीकारणाऱ्या नेत्यांचा गट वेगळाच आहे. सोनिया गांधी यांचा त्यात समावेश होतो.
२००४ मध्ये सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या संसदीय पक्षनेते पदावर निवड झाली, तेव्हा पंतप्रधानपद त्यांच्यापासून दूर नव्हते. संयुक्त पुरोगामी आघाडीतील (यूपीए) घटक पक्षांचाही त्यांना पाठिंबा होता. तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याचे पत्र तयार ठेवले होते. मात्र, ऐनवेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला आणि डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली. या निर्णयाची देशभर चर्चा झाली आणि त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे ‘पडद्यामागून सूत्रे हलवणारी मुख्य शक्ती’ म्हणून पाहिले जाऊ लागले.
पंतप्रधानपदाची संधी नाकारण्याचा निर्णय घेणाऱ्या सोनिया गांधी या एकमेव नेत्या नव्हत्या. त्याआधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्योती बसू आणि माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनीही ही संधी नाकारली होती. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून जवळपास २५ वर्षे काम केलेल्या ज्योती बसू यांना १९९६ मध्ये पंतप्रधानपदाची संधी मिळाली होती. मात्र, माकपच्या पॉलिट ब्युरोने त्यांना ही संधी स्वीकारण्याची परवानगी दिली नाही. पुढे बसू यांनी या निर्णयाला ‘ऐतिहासिक चूक’ असे संबोधले. त्याचवर्षी संयुक्त आघाडीचे सरकार स्थापन होत असताना व्ही. पी. सिंह यांनाही पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचा पाठिंबा मिळणार नाही, याची जाणीव असल्याने त्यांनीही ती स्वीकारली नाही.
या दोघांच्या तुलनेत सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारल्याचा निर्णय अधिक नाट्यमय ठरला. माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी त्यांच्या आत्मचरित्रात असा दावा केला की, आपल्या आईने पंतप्रधान होऊ नये, असे राहुल गांधी यांना वाटत होते. पंतप्रधान झाल्यास सहा महिन्यांत त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती राहुल यांना होती, असे सिंह यांनी आत्मचरित्रात नमूद केले. देशातील सर्वोच्च पद नाकारल्यामुळे सोनिया गांधी यांची राजकीय वर्तुळात स्वीकारार्हता वाढली असे मानले जाते. आज काँग्रेसमधील सर्वांत प्रभावशाली आणि ज्येष्ठ नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
इटलीच्या नागरिक असूनही सोनिया गांधी यांनी भारतीय समाजाशी कसे नाते जुळवले, याचे एका हरियाणातील गावकऱ्याने नेमक्या शब्दांत वर्णन केले आहे. सोनिया यांच्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “त्या लग्न करून इथे आल्या आणि इथल्याच झाल्या.” लग्नानंतर स्त्रीने पतीच्या कुटुंबाची आणि समाजाची ओळख स्वीकारण्याची प्रचलित सामाजिक धारणा त्यांच्या बाबतीतही खरी ठरली. एखाद्या इटालियन पुरुषाने भारतीय महिलेशी लग्न करून भारतात स्थायिक होण्याची घटना असती, तर गोष्ट कदाचित वेगळी असती.
समकालीन भारतीय राजकारणात सोनिया गांधी यांचं स्थान वेगळं आहे. त्यांनी अनेकदा पडद्यामागून सत्तेची सूत्रं हाताळली. त्यांच्या प्रभावाखाली तीन पंतप्रधानांचा राष्ट्रकारभार हाकला. त्यात १९८४ ते १९८९ या काळात पंतप्रधान असलेले त्यांचे पती राजीव गांधी, १९९१ ते १९९६ या काळातील पी. व्ही. नरसिंह राव आणि २००४ ते २०१४ या काळात पंतप्रधानपद भूषवलेले डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश होतो. या तिन्ही पंतप्रधानांच्या कार्यकाळात सोनिया गांधी सत्तेच्या आणि राजकारणाच्याही केंद्रस्थानी होत्या. त्यांच्या नजरेसमोर देशात अनेक मोठे बदल घडत होते. मंडल आयोगाच्या शिफारशींवरून सुरू झालेलं राजकारण, राम मंदिर आंदोलनामुळे निर्माण झालेला संघर्ष, काश्मीर आणि पंजाबमधील अस्थिरता अशा अनेक घडामोडी घडल्या. याच काळात परकीय चलनाचा साठा कमी झाल्याने देशाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला आणि अर्थव्यवस्था खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या सगळ्या घडामोडींदरम्यान काँग्रेसची ताकद हळूहळू कमी होत गेली. राजीव गांधी यांच्या काळात लोकसभेच्या ४१४ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला पुढे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली १८ पक्षांची आघाडी करून सरकार चालवावे लागले. अखेर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर काँग्रेसची केंद्रातील सत्ता गेली.
सोनिया गांधींच्या राजकीय प्रवासातील चढ-उतार
काँग्रेसची घसरण सुरू असतानाच १९९७ मध्ये सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पक्षातील अंतर्गत मतभेद आणि फूट रोखून काँग्रेसला एकत्र ठेवण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २००४ मध्ये विजय मिळवला. त्यानंतर माहितीचा अधिकार आणि मनरेगा यांसारखे कायदे आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नागरिकांना हक्क देणाऱ्या या योजनांमुळे काँग्रेसला २००९ मध्ये पुन्हा सत्तेत येण्यास मदत झाली. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर काँग्रेसपासून दुरावलेल्या अल्पसंख्याकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यातही सोनिया गांधी यांना यश आले. अनेक संकटं असूनही त्यांनी काँग्रेसला नवी उभारी देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
मात्र, हिंदू मतदारांची बदलती मानसिकता ओळखण्यात त्यांना अपयश आल्याची टीका केली जात. २०१४ नंतरची काँग्रेसची घसरण रोखण्यातही त्या अपयशी ठरल्याचे बोलले जाते. राहुल गांधी यांच्यासाठी पक्षाचे नेतृत्व राखून ठेवले असाही त्यांच्यावर आरोप झाला. तरीही काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्षपद सांभाळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल २२ वर्षे पक्षाचे नेतृत्व केले. या काळात गोपाळ कृष्ण गोखले, सरोजिनी नायडू, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, मदन मोहन मालवीय, राजेंद्र प्रसाद, जे. बी. कृपलानी, के. कामराज आणि इंदिरा गांधी यांसारख्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनाही त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मागे टाकले आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसमधील नेत्यांनी पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी परदेशातून भारतात आलेल्या आणि राजकारणापासून दूर राहिलेल्या सोनिया गांधी पुढे काँग्रेससाठी अपरिहार्य बनल्या, ही त्यांच्या राजकीय प्रवासातील औत्सुक्याची गोष्ट आहे. १९९१ मधील परिस्थितीची तुलना १९६६ शी करता येते. त्यावेळी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी मोरारजी देसाई यांना बाजूला ठेवण्यासाठी इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी बसवले होते. इंदिरा गांधी आपल्या नियंत्रणात राहतील, अशी या नेत्यांची अपेक्षा होती. मात्र, पुढे इंदिरा गांधी यांनीच या नेत्यांवर मात केली.
