Sonu Nigam : ऑपरेशन थिएटर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो सर्जरीचा ताण, डॉक्टरांची लगबग आणि रुग्णाची चिंता. पण, गायक सोनू निगमच्या एका व्हिडीओने काही वेगळंच चित्र दाखवलं. ऑपरेशन सुरू असताना सोनू निगम चक्क मोहम्मद रफी यांचं ‘सुहानी रात ढल चुकी’ हे गाणं गाताना दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले, ऑपरेशन सुरू असताना रुग्ण गाऊ शकतो का? आणि हे सुरक्षित असतं का?

सोनू निगमने नंतर स्पष्ट केलं की, ही कोणतीही मोठी किंवा आपत्कालीन सर्जरी नव्हती. त्यांच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटावर वारंवार होणारी गाठ काढण्यासाठी ही छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी त्यांना स्थानिक भूल (local anaesthesia) देण्यात आली होती, त्यामुळे ते पूर्णपणे शुद्धीत होते आणि ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांशी संवादही साधू शकत होते. अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि मेडिकल टीमचे मनोरंजन करण्यासाठी मी गाणे गायले, असेही सोनू निगम म्हणाला.

पण, ऑपरेशनदरम्यान रुग्णाचं गाणं गाणं प्रत्येक वेळी सुरक्षित असतं का? आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली अशा सर्जरीदरम्यान रुग्णाला जागं ठेवण्यामागे कारण काय असतं? हे जाणून घेऊया.

वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाने गाणं गाणं ही केवळ योगायोगाने घडणारी गोष्ट नाही. मेंदूवरील काही ‘अवेक क्रॅनिओटॉमी’ म्हणजेच रुग्णाला जागे ठेवून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाशी बोलणे, त्याला काही कामे करायला सांगणे किंवा गाणे म्हणायला लावणे ही अत्यंत नियंत्रित आणि वैद्यकीयदृष्ट्या नियोजित पद्धत असू शकते.

सोनू निगमसारख्या छोट्या शस्त्रक्रियेत गाणं गाणं सुरक्षित असतं का?

सोनू निगमच्या शस्त्रक्रियेसारख्या छोट्या प्रक्रियेत स्थानिक भूल दिली असेल तर रुग्ण पूर्णपणे शुद्धीत असतो. ज्या भागावर शस्त्रक्रिया केली जात आहे, तेवढाच भाग बधिर केला जातो, त्यामुळे रुग्ण स्वतःहून श्वास घेऊ शकतो, डॉक्टरांशी बोलू शकतो आणि गरज असल्यास गाणंही गाऊ शकतो.

मात्र, यासाठी रुग्णाने शरीर स्थिर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. रुग्णाच्या हालचालींमुळे शस्त्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरांची परवानगी आणि सतत देखरेख असताना गाणं गाणे शक्य असते. उलट, शस्त्रक्रियेदरम्यान गाणे किंवा बोलणे काही रुग्णांसाठी ताण आणि अस्वस्थता कमी करण्याचा एक मानसिक आधार ठरू शकते.

मेंदूच्या शस्त्रक्रियेत रुग्णाला जागरुक का ठेवतात?

मेंदूतील ट्यूमर किंवा एपिलेप्सीशी संबंधित भाग काढताना रुग्णाला जागरुक ठेवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करतात. बोलणे, भाषा किंवा संगीत क्षमता नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील भागाजवळील ट्युमर काढायचा असेल तर शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागे ठेवले जाते, याला ‘अवेक ब्रेन सर्जरी’ किंवा ‘न्यूरोलॉजिकल मॅपिंग’ म्हणतात.

अशा वेळी रुग्णाला बोलायला, गाणे म्हणायला किंवा काही वेळा वाद्य वाजवायलादेखील परवानगी दिली जाऊ शकते. रुग्ण गात असताना सर्जन मेंदूच्या विशिष्ट भागांना अतिशय सौम्य विद्युत उत्तेजना देऊन त्यांची कार्यक्षमता तपासतात. गाण्यात अचानक अडथळा आला, शब्द चुकले किंवा आवाज थांबला, तर त्या भागाचा भाषा किंवा संगीताशी महत्त्वाचा संबंध असल्याचे संकेत मिळतात, त्यामुळे महत्त्वाच्या कार्यांवर परिणाम होऊ नये म्हणून सर्जन त्या भागाला कापणे टाळतात.

महत्त्वाचे म्हणजे, मेंदूच्या ऊतींमध्ये (Brain Tissues) वेदना जाणवून देणाऱ्या चेतातंतूंचा अभाव असतो, त्यामुळे योग्य भूल आणि देखरेखीखाली अशा प्रकारची शस्त्रक्रिया करता येते.

अशा प्रकारे शस्त्रक्रियेत रुग्णाचा सक्रिय सहभाग असल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर कायमस्वरूपी मज्जासंस्थेचे नुकसान होण्याचा किंवा बोलण्याची क्षमता गमावण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होते.

सोनू निगमच्या शस्त्रक्रियेचं कारण काय?

ऑपरेशनच्या टेबलवर गाणं गाण्याचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना सोनू निगम यांच्या आरोग्याबाबत चिंता वाटली. मात्र, ही शस्त्रक्रिया डाव्या हाताच्या अनामिका बोटावर पुन्हा आलेली गाठ काढण्यासाठी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, याच गाठीसाठी त्यांच्यावर चार महिन्यांपूर्वीही शस्त्रक्रिया झाली होती.

सोनू निगमच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर काही काळाने ही गाठ पुन्हा आली आणि आता ती दुसऱ्यांदा दिसून आली आहे. ही समस्या हाडांशी संबंधित संधिवाताच्या (Arthritis) स्थितीमुळे असू शकते, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यामागचे नेमके कारण आणि पुढील उपचार काय असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे सध्या डॉक्टरांनी गाठ पुन्हा का येत आहे, याचा पुढील तपास करूनच उपचाराची दिशा ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. “आता थांबून पाहावे लागेल,” असे सोनू निगमने सांगितले.

शस्त्रक्रियेदरम्यान सोनू निगमने एक-दोन नव्हे, अनेक गाणी गायली!

व्हायरल झालेल्या व्हिडीओत सोनू निगम केवळ एकच गाणं गाताना दिसत आहेत. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांनी डॉक्टरांसाठी दोन-तीन गाणी गायली होती. व्हायरल झालेले ‘सुहानी रात ढल चुकी’ हे त्यापैकी फक्त एक गाणं असल्याचे त्याने स्पष्ट केले.

सोनू निगमच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन थिएटरमधील हा क्षण डॉक्टरांसाठीही खास बनला. डॉक्टरांना तो क्षण आठवण म्हणून जतन करायचा होता, त्यामुळे त्यांनी सोनूच्या परवानगीने त्याचे रेकॉर्डिंग केले आणि नंतर तो व्हिडीओ सोनू निगमसोबत शेअर केला. याच रेकॉर्डिंगमधील व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि तो व्हायरल झाला.

शस्त्रक्रियेनंतरही सोनू निगम कामात व्यस्त

शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांती घेण्याऐवजी सोनू निगमने आपली कामं सुरूच ठेवली आहेत. शस्त्रक्रियेनंतर लगेचच त्यांनी एक गाण्याचा कार्यक्रमही केला असल्याचे त्याने स्पष्ट केले.

सोनू निगमने असेही सांगितले की, ‘मी अजिबात विश्रांतीवर नाहीये. शस्त्रक्रियेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी मी ‘चुन्नी’ या माझ्या गाण्याच्या लॉन्चला गेलो. कालही मी गायलो आहे. शस्त्रक्रियेनंतरही मी सध्या खूप व्यस्त आहे.’ ही त्याच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे.