२३ नोव्हेंबरच्या पहाटे मुंबईत एका मोठ्या कार अपघातात एका १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर अभिनेता सोनू सूदने अपघात रोखण्यासाठी पाण्याने भरलेले क्रॅश बॅरिअर्स बसवण्याचा सल्ला दिला. बॉलीवूड चित्रपट निर्मात्याच्या मुलाची कार विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दुभाजकावर आदळली; ज्यात त्या मुलाचा मृत्यू झाला. यावेळी तो आपल्या तीन मित्रांबरोबर होता. सोनू सूद विशेषतः करोनामध्ये लॉकडाऊनच्या काळात त्याने केलेल्या अनेक मानवतावादी कार्यांसाठी ओळखला जातो. सोनू सूद याने २८ नोव्हेंबर रोजी ‘एक्स’वर पोस्ट केले, “मला एका लहान मुलाबद्दल ऐकून खूप वाईट वाटले, ज्याच्या कारचा अपघात झाला आणि त्याने आपला जीव गमावला. मला असे वाटते की, जर आपल्या देशात प्रत्येक रस्ता दुभाजकावर पाण्याने भरलेले क्रॅश बॅरिअर्स बसवले, तर आपण लाखो जीव वाचवू शकतो. प्रत्येक रस्त्यावर ही प्रणाली कार्यान्वित करणे अनिवार्य केले पाहिजे.” ही प्रणाली नक्की काय आहे? त्यामुळे खरंच अपघात रोखले जाऊ शकतात का? त्याविषयी जाणून घेऊ.
पाण्याने भरलेल्या क्रॅश बॅरिअर्सची प्रणाली काय आहे?
पाण्याने भरलेले क्रॅश बॅरिअर्स प्रामुख्याने रस्त्यावरून धावणाऱ्या कार, व्हॅन व बाईक आदी वाहनांपासून संथ गतीने चालणाऱ्या पादचाऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी वापरले जातात. हे क्रॅश बॅरिअर्स हार्ड प्लास्टिकने तयार करण्यात येतात आणि एक मजबूत व विश्वासार्ह सुरक्षा प्रदान करतात. ही प्रणाली जलद आणि सोप्या रीतीने उभारता येते. टिकाऊ प्लास्टिकपासून तयार केले गेलेले क्रॅश बॅरिअर्स पाण्याने भरता येतील अशा रीतीने डिझाईन केलेले असतात. या क्रॅश बॅरिअर्समध्ये पाणी भरल्यामुळे ते उशीसारखे कार्य करतात आणि वाहनाच्या गतिज ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे टक्कर होण्याची तीव्रता कमी होते आणि वाहनांचे नुकसान व प्रवाशांना होणाऱ्या दुखापतीचे स्वरूप कमी असते.
हेही वाचा : आता विद्यार्थ्यांना ठरवता येणार पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी; यूजीसीची नवीन योजना काय? याचा कसा फायदा होणार?
हे क्रॅश बॅरिअर्स बांधकामाची ठिकाणे, रस्त्यांची कामे व कार्यक्रमाच्या जागा यांसारख्या मोकळ्या जागांमध्ये तात्पुरती गरज म्हणून वापरले जातात. ते रस्त्यांवर उभारणे अगदी सोपे आहे आणि ते त्वरित काढून टाकता येऊ शकतात. तसेच, ते नवीन ठिकाणी हलवले जाऊ शकतात; ज्यामुळे हे प्लास्टिक क्रॅश बॅरिअर्स तात्पुरत्या गरजांसाठी खूप उपयुक्त ठरतात. परंतु, पाण्याने भरलेले क्रॅश बॅरिअर्स कायमस्वरूपी उभारणी करण्यासाठी योग्य नाहीत. कारण- ते काँक्रीट किंवा स्टील क्रॅश बॅरिअर्ससारखे मजबूत नसतात.
काँक्रीट क्रॅश बॅरिअर्स काय आहेत?
महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर काँक्रीट क्रॅश बॅरिअर्स आढळतात. हे क्रॅश बॅरिअर्स त्यांच्या मजबुती आणि टिकाऊपणासाठी ओळखले जातात. हे क्रॅश बॅरिअर्स महामार्ग, पूल आणि मध्यभागी दुभाजकांच्या ठिकाणी स्थापित केले जाऊ शकतात. कारण- या ठिकाणी मजबूत प्रतिकार प्रभाव
महत्त्वपूर्ण असतो. ते एकदा स्थापित केल्यानंतर, ते दीर्घकाळ टिकू शकतात आणि त्यांची सातत्याने देखभालही आवश्यक नाही. याचा एक तोटा म्हणजे ते स्थानाच्या बाबतीत कमी लवचिक असतात आणि त्यांना स्थापित करणे व काढणे यांसाठी अधिक वेळ आणि संसाधने आवश्यक असतात. हे क्रॅश बॅरिअर्स वाहतूक व्यवस्थापन, पादचाऱ्यांचे संरक्षण आणि टकरींमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त असले तरी तात्पुरता उपाय म्हणून त्यांचा वापर करणे शक्य नाही.
ट्रॅफिक बॅरिकेड्ससाठी पारंपरिकपणे काँक्रीट आणि केबलची निवड केली जाते. वॉटर बॅरिकेड्स हा उच्च मूल्याधारित पर्याय आहे; जो हाय स्पीड ट्रॅफिक झोनमध्ये जीव वाचवू शकतो. टेक्सास ट्रान्स्पोर्टेशन इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, सहभागींनी पाणी भरलेल्या प्लास्टिक बॅरिकेड्सना प्राधान्य दिले. कारण- सुधारित सुरक्षा क्षमता, जलद गतीने उभारणी, एका जागेवरून दुसरीकडे सहजतेने हलवणे शक्य आणि किफायतशीर, असे पाण्याने भरलेल्या बॅरिकेड्सचे इतर फायदेही आहेत.
भारतात रस्ते अपघात
२०२३ मध्ये भारतात रस्ते अपघातात सुमारे १.७३ लाख लोकांचा मृत्यू झाला. याचा अर्थ राज्य आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी ४७४ जण आपला जीव गमावतात किंवा जवळजवळ दर तीन मिनिटांनी एकाचा मृत्यू होतो. या आकडेवारीनुसार जास्तीत जास्त ४.६३ लाख लोक जखमी झाले. हे प्रमाण २०२२ च्या तुलनेत चार टक्के जास्त होते. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये रस्त्यावरील मृत्यूंची संख्या १.६८ लाख होती. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने मात्र मृतांची संख्या १.७१ लाख असल्याचे सांगितले.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची आकडेवारी दर्शवते की, उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक मृत्यूंची (२३,६५२) नोंद झाली. त्यानंतर तमिळनाडू (१८,३४७), महाराष्ट्र (१५,३६६), मध्य प्रदेश (१३,७९८) व कर्नाटक (१२,२३१) यांचा क्रम लागतो. अपघाती जखमींच्या
यादीत तमिळनाडू ७२,२९२ या संख्येसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर या यादीत मध्य प्रदेश (५५,७६९) व केरळ (५४,३२०) ही राज्ये आहेत.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारची योजना कशी आहे?
२०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सामाजिक वर्तन बदलण्याचे आणि ‘4Es’ने रस्ता सुरक्षा मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘4Es’ मध्ये इंजिनियरिंग, एन्फोर्समेंट, एज्युकेशन व इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस यांचा समावेश होतो. ते पुढे म्हणाले की, हे उद्दिष्ट गाठून, रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी सर्व संबंधितांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. त्यांनी चालकांना नियमित नेत्रतपासणी करून घेण्याचे आवाहन केले. तसेच, संस्थांना त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून मोफत नेत्रतपासणी शिबिरे घेण्यास प्रोत्साहित केले.