भारतामध्ये १ मे रोजी ‘बुद्ध पौर्णिमा’ साजरी झाली असली तरी विविध देशांत बुद्ध जयंती वेगवेगळ्या दिवशी साजरी करतात. दक्षिण कोरियामध्ये यंदा २४ मे रोजी बुद्ध जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त तीन आठवडे आधी साजऱ्या झालेल्या ‘कमळ कंदील’ महोत्सवात सर्वांचे आकर्षण एक बौद्ध भिक्खू होता. हा बौद्ध भिक्खू मानवी नसून एक मानवाकृती रोबो होता. या रोबोने आधी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर त्याला ‘गाबी’ हे धर्मनाव देण्यात आले. या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरलेल्या या रोबोविषयी…

बौद्ध कार्यक्रमामध्ये मानवाकृती रोबो

दक्षिण कोरियाची राजधानी सोल शहराच्या मध्यवर्ती भागातील बौद्ध मंदिर असलेल्या जोग्येचा येथे ६ मे रोजी विशेष दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २४ मे रोजी होणाऱ्या बुद्ध जयंतीनिमित्त ‘जोग्ये ऑर्डर ऑफ कोरियन बुद्धिझम’ या दक्षिण कोरियातील सर्वात मोठ्या बौद्ध पंथाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता एक मानवाकृती रोबो. भिक्खूंसारखे वस्त्र परिधान केलेल्या या रोबोच्या डोक्यावर पट्टी होती, जणू काही त्याने भिक्खूंसारखे मुंडण केले आहे, असे वाटावे. दीक्षा दिल्यानंतर या रोबोला ‘गाबी’ हे धर्मनाव देण्यात आले. गाबीला भिक्खूऐवजी एक गृहस्थ साधक म्हणून दीक्षा देण्यात आली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सध्या सुरू असलेल्या बौद्ध सणांच्या काळात हा रोबो एका ‘मानद’ भिक्खूची प्रतीकात्मक भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. या सणांमध्ये प्रसिद्ध ‘येओनदेउंगहोए’ म्हणजेच ‘कमळ कंदील महोत्सवा’चा समावेश असून, २४ मे रोजी त्याची सांगता होईल.

‘कमळ कंदील महोत्सव’ काय आहे?

येओनदेउंगहो (कमळ कंदील महोत्सव) हा बुद्ध जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा एक भव्य, प्राचीन कोरियन उत्सव आहे. या उत्सवाला युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी कोरियन चांद्र वर्षाच्या चौथ्या महिन्यात आठव्या दिवशी हा उत्सव आयोजित केला जातो. या उत्सवात आकर्षक कंदील मिरवणुका, प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. सोल शहराला या दिवशी उत्सवी स्वरूप येते. शहरातील जोंगनो स्ट्रीट, जोग्येसा मंदिर आणि बोंगयुन्सा मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे या मंदिरांना तीन लाखांहून अधिक नागरिक भेट देतात.

‘गाबी’ला दीक्षा कशा प्रकारे देण्यात आली?

मानवाकृती रोबोला धार्मिक दीक्षा देण्याचा कार्यक्रम जोग्ये पंथाचे मुख्य मंदिर असलेल्या जोग्येसा येथील देउंगजेओन हॉलच्या प्रांगणात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पार पडला. कोरियन भाषेत सुग्ये म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक बौद्ध शरण विधीमध्ये, बुद्ध, धर्म आणि संघ या त्रिरत्नांचा आश्रय घेणे आणि पाच मूलभूत नियमांनुसार जगण्याची शपथ घेणे समाविष्ट आहे. ‘तू स्वतःला पवित्र बुद्धाला समर्पित करशील का?’, ‘तू स्वतःला पवित्र शिकवणीला समर्पित करशील का?’ अशा प्रकारचे प्रश्न त्याला विचारण्यात आले. त्याने या प्रश्नांची ‘होय’ उत्तरे दिली. त्यांनी भिक्खूंच्या संघाने गाबीला पाळण्यासाठी पाच डिजिटल पद्धतीने सुधारित नियम सांगितले.

गाबीसाठी पाच डिजिटल नियम कोणते?

माणसाला बौद्ध धर्माची दीक्षा देताना सांगण्यात येणारे नियम, प्रतिज्ञा वेगळ्या, मात्र गाबी या रोबोला वेगळ्या प्रतिज्ञा सांगण्यात आल्या. ‘जीवनाचा आदर करणे आणि कोणालाही इजा न पोहोचवणे’; ‘इतर रोबोचे किंवा वस्तूंचे नुकसान न करणे’; ‘माणसांची आज्ञा पाळणे आणि उलट उत्तर न देणे’; ‘फसव्या पद्धतीने वागणे किंवा बोलणे टाळणे’ आणि ‘ऊर्जा वाचवणे व ओव्हरचार्ज न करणे’ आदी प्रतिज्ञा त्याच्याकडून घेण्यात आल्या. या कार्यक्रमाबद्दल जोग्ये ऑर्डरच्या सांस्कृतिक व्यवहार विभागाचे प्रमुख वेन. सेओंग वॉन यांनी सांगितले, ’’ज्या वेळी मी पहिल्यांदा मानवाकृती रोबो पाहिले, त्यावेळी मला वाटले की रोबोनी एकत्र ‘लोटस लँटर्न’ महोत्सवा भाग घेतल्यास किती छान होईल. त्यानंतर आम्ही अशा प्रकारचे रोबो तयार करून घेतले. रोबोसाठी पंचशील तयार केले, जे समाजात आणि मानवतेसाठी रोबोनी पाळले पाहिजेत, असे किमान नियम आहेत.’’

गाबी हे नाव रोबोला का देण्यात आले?

या रोबोचे धर्मनाव गाबी हे सिद्धार्थ गौतम आणि दया या अर्थाच्या कोरियन शब्दावरून घेतले आहे, असे वॉन यांनी सांगितले. ‘‘आम्ही असे नाव देण्याचा प्रयत्न केला, जे उच्चारण्यास खूप कठीण आणि जुन्या पद्धतीचे नसेल आणि जे जगभर बुद्धाची दया पसरवण्याचे प्रतीक असेल,’’ असे त्यांनी ‘कोरियान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. या सोहळ्यासाठी गाबी दोन्ही हात जोडून उभा राहिला, जमलेल्या ज्येष्ठ भिक्खूंना नमन केले आणि ‘येओनबी’  हा पारंपरिक शुद्धीकरण विधीही पार पाडला. या विधीमध्ये हाताच्या मनगटावर प्रतिकात्मक धूप जाळला जातो. मात्र गाबी हा रोबो असल्याने त्याच्या हातावर धूप जाळण्याऐवजी ‘लोटस लँटर्न फेस्टिव्हल’चे स्टिकर लावण्यात आले. त्या रोबोला १०८ मण्यांची ‘येओमजू’ म्हणजेच माळही देण्यात आली.